सळसळत्या उत्साहाने भारलेली चिकोंडी चाब्व्हुटा आफ्रिकेतील मालवी देशातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली तरुणी. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच तिने शेतीसाठी पूरक विषयात संशोधन केलं आणि इकोसॅन टॉयलेट्च्या माध्यमातून सोनखत वापरण्यासाठी ग्रामीण जनतेला उद्युक्त करण्याचं आव्हान लीलया पेलंलं. स्त्रियांना शेतीसंदर्भातील निर्णय घेण्याचे समान हक्क दिले पाहिजेत यासाठी आग्रही असणाऱ्या शेतीतज्ज्ञ चिकोंडीविषयी..

पर्यावरण संवर्धन, शेतीतज्ज्ञ, स्त्री हक्कांची पुरस्कर्ती अशी ही पुरस्कार विजेती तरुणी आज आफ्रिका खंडातील शेतकी व्यवसायातला आदर्श समजली जाऊ लागलीय. आज पंचविशीची, सळसळत्या रक्ताची चिकोंडी चाब्व्हुटा पूर्व आफ्रिकेतील चिमुकल्या मालवी देशात शेतकी व्यावसायिक कुटुंबात जन्माला आली.  २००५ साली बुंडा कॉलेजात पर्यावरणशास्त्रात शिक्षण घेऊ लागली, तेव्हा त्यांच्या समाजातली कॉलेज शिक्षण घेणारी पहिलीच मुलगी म्हणून तिचा गौरव करण्यात आला. बी.एस्सी.ची पदवी मिळवताना तिनं सेंद्रिय खतांवर- शेणखत, सोनखत इत्यादी. जे संशोधन केलं, त्यानं तिच्या प्राध्यापकांचं लक्ष वेधून घेतलं. चिकोंडीनं सेंद्रिय खतांमधली पोषणमूल्यं शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळेत जे संशोधन केलं, त्याचा दर्जा पाहून तिच्या प्राध्यापकांनी तिला नोकरी दिली आणि सोनखतामुळे मक्याच्या उत्पादनात होणारी वाढ नोंदवण्याच्या प्रकल्पाची जबाबदारी तिच्यावर सोपवली.
इथवर तर सारं नेहमीच्या पठडीतलं झालं. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे आज परवलीचे शब्द झाले आहेत. त्या अनुषंगानेच शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं वाढीला लागलंय. सेंद्रिय खतं वापरून पिकवलेला भाजीपाला आणि फळं यांना बाजारात वाढीव किंमत मिळतेय, हे आपण प्रत्यक्ष अनुभवतच आहोत. प्रश्न आहे सेंद्रिय खतांच्या उत्पादनासाठी जनतेला प्रवृत्त करण्याचा. शेतकऱ्यांनी स्वत: सोनखत तयार करून वापरणं किती किफायतशीर आहे, हे त्यांच्या गळी उतरवण्याचा. या गोष्टीसाठी त्या खतांच्या गुणवत्तेवर स्वत:चा विश्वास असणं जेवढं गरजेचं आहे, तेवढीच गरज आहे हे लोकांना पटवता येईल अशा नेतृत्वगुणांची आणि करीला झोपडपट्टीतील स्त्रियांना हे करायला उद्युक्त करणं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाची कसोटीच! परंतु हे सारं या तरुणीनं करून दाखवलं. ‘इकोसॅन’ टॉयलेट्मधून (सोनखत करण्यासाठी मानवी मलमूत्र गोळा करता येण्याजोगे संडास) मानवी उत्सर्जन गोळा करून सोनखत बनवायला झोपडपट्टीतील स्त्रियांना उद्युक्त करणं आजिबात सोपं नव्हतं. चिकोंडी प्रांजळ कबुली देते की सुरुवातीला ती १५ स्त्रियांच्या गटाला ही गोष्ट पटवू पाहात होती, तेव्हा तिच्या गाठीला प्रबोधनाचा अनुभव नसल्यामुळे, पहिल्याच आठवडय़ात गटातून निम्म्या स्त्रिया गळल्या. परंतु जेव्हा तिनं स्वत:च्या हातांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि ते सोनखत शेतीत कसं वापरायचं याचे स्वत: धडे दिले, तेव्हा त्या स्त्रियांची खात्री पटली की, जर एक पधवीधर मुलगी हे करत असली, तर त्यांनी ते करून पाहायला कोणताच अडथळा नसणार! झोपडपट्टीतील त्यांच्या घरामागच्या लहान लहान वाफ्यांमध्ये हे सोनखत वापरून जेव्हा या स्त्रियांनी पंधरा पोती मक्याचं पीक घेतलं, तेव्हा चिकोंडीला आपल्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. ती म्हणते की, जेव्हा तुम्ही जीव ओतून कोणतंही काम हाती घेता, तेव्हा तुम्ही अडचणींचे डोंगरही सहजपणे ओलांडू शकता. तिनं झोपडपट्टीतील स्त्रियांना दिलेले धडे किती यशस्वी झाले आहेत, याची निशाणी म्हणजे अशा ‘इकोसॅन’ टॉयलेट्ससाठी नोंदवली जाणारी वाढती मागणी. चिकोंडी लिलाँग्वेमधील तीन वेगवेगळय़ा झोपडपट्टय़ांमध्ये काम करून तेथील स्त्रियांना सोनखत बनवण्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देत होती, तेव्हा सोनखताच्या वापरामुळे मक्याच्या उत्पादनात होणारी प्रचंड वाढ पाहून या स्त्रियांनी ठरवलं की जास्तीचं सोनखत विकून शेतीबरोबरच खत विक्रीचा जोडधंदा सर्वाच्याच हिताचा ठरेल. आता चिकोंडी साठ गृहिणींना हे प्रशिक्षण देत आहे. हा तिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठीचा संशोधन प्रकल्प आहे. जर तिला प्रकल्पांचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रभावीपणे मांडता आले, तर ती संशोधनासाठी आणखी अर्थसाहाय्य मिळवू शकेल.
आफ्रिकेतील एकूण १८० स्त्री शास्त्रज्ञांची अहअफऊ (आफ्रिकन विमेन इन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च अण्ड डेव्हलपमेंट) शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे; त्यात चिकोंडीचा समावेश आहे. चिकोंडीचं म्हणणं आहे की, ही शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिला आपल्या व्यावसायिक आयुष्याचा आराखडा आखायला आणि आपली नैसर्गिक कुवत गाठायला खूप मदत झाली. इतरांशी व्यावसायिक नाती जोडणं, नेतृत्व गुण संपादन करणं, आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणं या सर्व गोष्टी या शिष्यवृत्तीमुळे तिला शिकता आल्या.
टुकेनी ओबासी यांनी तिची मुलाखत घेतली, तेव्हा तिला त्यांनी तिच्या व्यावसायिक उद्दिष्टांबद्दल प्रश्न विचारला. चिकोंडीचं उत्तर अगदी स्पष्ट आणि नि:संदिग्ध होतं. ती म्हणाली, ‘‘मला भविष्यकाळासाठी वारसा मागे ठेवायचाय. पर्यावरण, सातत्यानं करता येण्याजोगी शेती, स्त्रियांचे आणि मुलींचे हक्क आणि शिक्षण आणि स्त्रियांचं सबलीकरण या क्षेत्रांवर मला माझा ठसा उमटवायचा आहे. मी जन्मले तेव्हा माझा देश होता, त्यापेक्षा तो अधिक चांगला बनवून जगाचा निरोप घ्यायची माझी प्रांजल इच्छा आहे. त्यामुळे मी पीएच.डी.साठी प्रबंध लिहिणार आहे. त्यानंतर माझी स्वत:ची कंपनी स्थापन करून शेतकी क्षेत्रातील उदयोन्मुख कंपन्यांसाठी इन्क्युबेटर (अशा उद्योगांना यश मिळावं म्हणून विविध प्रकारचं साहाय्य पुरवणारी यंत्रणा) स्थापन करायचं माझं उद्दिष्ट आहे. कालांतरानं मला धोरणं आखण्यात सहभाग घ्यायचा आहे.
 आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक स्त्रीनं अष्टपैलू विकास घडवावा, असं तिचं ठाम मत आहे. ती स्वत: त्यासाठी तिचे इतर छंद जोमानं जोपासतेय. ती विविध विषयांवर वाचन करते, एरोबिक्स करते, पोहायला जाते, नृत्य शिकते, अनेकांशी संपर्क साधून नाती जोडते आणि वैचारिक देवघेव करते. यावर्षी ‘मोरेमी इन्स्टिटय़ूट फॉर विमेन्स लिडरशिप इन आफ्रिका’ या संस्थेनं आफ्रिका खंडातील अठ्ठावीस होतकरू तरुण स्त्री-नेत्यांमध्ये- चिकोंडीची निवड केली आहे. या सर्व स्त्रिया एकोणीस ते पंचवीस वर्षांच्या वयोगटातल्या आहेत. आफ्रिका खंडातील विविध क्षेत्रांमधील- स्वास्थ्य, तंत्रज्ञान, समाजसेवा, शिक्षण, शेतकी-हजारो स्त्रियांमधून या अठ्ठावीस रत्नांची निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर चिकोंडीनं अ‍ॅक्रामधील या संस्थेत या उन्हाळय़ात प्रशिक्षण घेतलं. अर्थ आणि वेळेचं व्यवस्थापन, राजकारणात सहभाग घेणं, प्रकल्पाचं संयोजन आणि कार्यवाही करणं, नेतृत्व गुण वापरून संघ स्थापन करणं अशा अनेक विषयांवर तिनं प्रशिक्षण घेतलं. विविध क्षेत्रात ज्ञान मिळवून, वेगवेगळी कौशल्यं आत्मसात करून, त्यांचा वेगवेगळय़ा क्षेत्रात वापर करण्यासाठी सिद्ध झालेली आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करून त्याला उज्ज्वल भविष्यकाळाकडे नेणारी चिकोंडी आज इतरांसाठी एक आदर्श बनली आहे.
सोनखताच्या तिच्या पहिल्याच प्रकल्पाच्या वेळेस चिकोंडीनं वेगवेगळय़ा श्रोत्यांना आपला संदेश वेगवेगळय़ा प्रकारे देण्याची कला आत्मसात केली. बऱ्याचशा स्त्रिया तिच्यापेक्षा वयाने जास्त होत्या आणि विवाहित होत्या. ही कालची पोर आपल्याला काय अक्कल शिकवणार असा त्यांना प्रश्न पडला होता. परंतु पूर्ण तयारीनिशी आणि आत्मविश्वासानं तिनं त्यांना जे सांगितलं, ते त्यांना पटलं. त्या अनुभवानंतर चिकोंडीला प्रकर्षांनं वाटू लागलं की स्त्रियांना शेतीसंदर्भातील निर्णय घेण्याचे समान हक्क देणं आवश्यक आहे. शेतकी क्षेत्रातले मालकीहक्क, शेतकी उत्पादनाचं वितरण, कामाची (स्त्री-पुरुषांमध्ये) न्याय्य वाटणी आणि अशा अनेक बाबतीत स्त्रियांना समानाधिकार देणारे बदल कायद्याद्वारे घडवले जावेत अशी तिची मागणी आहे.
शेतकी संशोधक म्हणून व्यवसायाला प्रारंभ करून आज चिकोंडीनं आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरावर गरुड भरारी घेतली आहे. आपल्या निवडीच्या कार्यक्षेत्रात काम करून तिनं अपार समाधान मिळवलंय. ती म्हणते, ‘‘शेतकी व्यवसायाद्वारे तुम्ही लोकांची आयुष्यं बदलू शकता, अन्नधान्याचं उत्पादन वाढवून देशाला समृद्ध करू शकता आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावू शकता. माझे काम मला अतीव समाधान मिळवून देतं, कारण माझं संशोधन लोकांपर्यंत पोचवून त्याला येणारी गोमटी फळं पाहणं हा अत्यंत समृद्ध करणारा अनुभव असतो.’’
अत्यंत चिमुकला असा पूर्व- आफ्रिका खंडातला मालावी देश. तिथली एक तरुणी आपल्या समर्पिततेनं आणि नेतृत्व गुणांनी पूर्ण आफ्रिका-खंडापुढला आदर्श बनली आहे!