‘मेंदूची मशागत’ हे सदर सुरू झाल्यापासून कित्येकांनी ई-मेलवरून संवाद साधला, विविध प्रकारचे प्रश्न विचारले. यात मुलांच्या अभ्यासावरचे प्रश्न बरेच होते. यात काही प्रश्न असे होते, की ज्यांची उत्तरं ‘लोकसत्ता’च्या सर्वच वाचकांसमोर यावीत असं वाटलं, त्यांची उत्तरं इथे देत आहे.
मुलांचा मेंदू चपळ असतो, त्यांना चालना हवी असते, असं म्हणतात. पण मग मुलं अभ्यासाला नेहमीच का कंटाळतात?
समोर आलेला कोणताही प्रश्न सोडवणं हा बुद्धीला आवडणारा प्रकार आहे. केवळ मोठी माणसंच नाहीत, तर सर्व वयाची मुलं विविध प्रकारचे प्रश्न सतत सोडवत असतात. मित्राकडे / मैत्रिणीकडे आई खेळायला पाठवत नाही, तर काय करावं, म्हणजे ती पाठवील, मला सायकल चालवता येत नाही, पण मी प्रयत्न करेनच आणि सायकल चालवून दाखवीनच, असे प्रश्न मुलांना पडतात आणि ते बरोबर त्यातून वाट काढत असतात. त्यांच्या भावविश्वात जे आहे, ते खरे प्रश्न सोडवायला त्यांना आवडतात. पण परीक्षेत सोडवायचे प्रश्न मात्र त्या पद्धतीचे नसतात. ते प्रत्यक्ष प्रश्न नसतात. दैनंदिन जीवनाशी अशा प्रश्नांची उत्तरं सोडवायचा संबंध असेलच असं नाही. असे प्रश्न बहुतांशी स्मरणशक्तीची, केलेल्या अभ्यासाची, आकलनाची परीक्षा घेणारे असतात. त्यात तंत्राचाही भाग असतो. खरे प्रश्न आणि परीक्षेतले प्रश्न यांची तुलना करता येणार नाही. परीक्षेतले प्रश्न सोडवण्यातून गुण मिळतात, तर खरे प्रश्न सोडवण्यातून व्यावहारिक पातळीवर अक्कलहुशारी येते. अभ्यासातून मेंदूला खरीखुरी चालना मिळणार असेल तर मुलं अभ्यासही मनापासून करतील.
मुलांना अभ्यास अवघड का वाटतो?
समजा, मूल नव्यानेच काही शिकत आहे, अशा वेळी त्याच्या मेंदूत काय घडत असतं? जे शब्द आधीपासून माहीत आहेत, ज्या संकल्पना माहीत आहेत, त्या शब्दांना मेंदू प्रतिसाद देतो. ज्या विषयाशी संबंधित अनुभव घेतलेले आहेत, त्या संदर्भातले शब्द कृतींसह पक्के कळलेले असतात. त्या बाबतीत प्रश्न नसतो. प्रश्न असतो तो माहीत नसलेल्या शब्द-संकल्पनांबद्दल.
 ऐकलेल्या माहितीतले बरेचसे शब्द ‘माहीत’ नसतात म्हणून ‘कळत’ नाहीत. तांत्रिक भाषेत सांगायचं तर न कळणाऱ्या शब्दांमुळे मेंदूत विद्युत-रासायनिक प्रक्रिया घडून येत नाही. ते शब्द केवळ कानांवरून जातात. मेंदू अर्थासह त्याची दखल घेत नाही. त्यामुळे त्या शब्दांचं आकलन होत नाही. प्रौढांच्या मेंदूतही हे घडत असतं. उदा. इंग्रजी बातम्या ऐकताना जे तांत्रिक शब्द माहितीचे नसतात, ते समजत नाहीत. आकलनाशिवाय तसेच पुढे जातात. परंतु या शब्दांचा लगेच शब्दकोशात अर्थ बघितला तर बातमीचा एकूण अर्थ चटकन लागतो.
 मुलांना अर्थ कळले नाहीत तर असा आकलनाशिवाय ऐकलेला मजकूर तसाच वाया जातो. दिवसभरातल्या विविध विषयांच्या तासांमध्ये असे अनेक मजकूर वाया जातात. विषय शिकवणं म्हणजे समोरच्याला जे माहीत नाही ते नीटपणे माहीत करून देणं. पण असं नीटपणे माहीत करून दिलं जातं का, याचं उत्तर शोधावं लागेल.
 वर्गात जर खूप मुलं असतील तर एका शिक्षकाला प्रत्येकाची दखल घेणं कदाचित जमणार नाही. मात्र अशा परिस्थितीत वेगळे उपाय योजावे लागतील. अन्यथा हे शिक्षण निर्थकच ठरेल. आपल्या वर्गातल्या मुलांना धडय़ातले कोणते शब्द अडणार आहेत, याची कल्पना शिक्षकांना असायला हवी. यासाठी त्यांनी मुलांच्या पातळीवर जाऊन धडय़ाचं वाचन करायला हवं. न कळणारे शब्द, संकल्पना याविषयी आधीच सविस्तर माहिती द्यायला हवी. शक्य तिथे चित्ररूपाने, सीडीज दाखवून, काही भाग गोष्टीरूपाने सांगून विषय त्यांच्या आकलनाच्या पातळीवर आणून ठेवला पाहिजे.
शब्द माहीत नसतील तर पाठाखालचे शब्दार्थ वाचून शब्दांचे अर्थ समजतीलही; पण संकल्पना कशा समजणार?
त्यासाठी शिक्षकांनीच मदत करायला हवी.  अभ्यासाला मदत करणारं कोणतंच पुस्तक संकल्पना स्पष्ट करून सांगण्याची जबाबदारी घेत नाही. करू शकत नाही. त्यात केवळ तांत्रिक माहिती असते. नीट आणि स्पष्ट आकलन होईल अशा प्रकारे संकल्पना सांगितलेल्या नसतात. मुलांना समजेल अशा भाषेत सांगणं ही खरं तर कलाच आहे. पण सर्व मुलांना शिकवलेलं सर्व समजत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आकलनाची प्रक्रिया आधी अधुरीच राहते.
दुसरा मार्ग आहे तो मुलांनी आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वत:च शोधावीत. वाचनालयातून, शिक्षकांना पुन:पुन्हा विचारून, इतरांना विचारून, याची माहिती मुलांनीच काढावी. परंतु ही अपेक्षा माध्यमिक शाळेतल्या मुलांकडून करता येऊ शकते. प्राथमिक शाळेतली मुलं न समजलेल्या प्रत्येक संकल्पनेचा शोध कसा घेतील? त्यांना विचारून मदत करावीच लागेल.
तिसरा पर्याय म्हणजे मुलांना शंका विचारण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. त्यांच्या शंकांचं निरसन करताना उत्तरं मिळत जातील. पण तिथंही बहुतेक ठिकाणी मोकळेपणा नसतो, त्यामुळे उत्तरंही मिळत नाहीत. शंका या शंकाच राहतात. शिकलेल्या विषयावर प्रश्न विचारायचे असतात, याचीही सवय पुढे निघून जाते. या सगळ्या परिस्थितीमुळे मुलं कित्येक अर्थाचा/ संकल्पनांचा बॅकलॉग डोक्यात ठेवूनच वरच्या वर्गात जात राहतात.
   विषयांचं आकलन न होताही ते वरच्या वर्गात जातात कसे, हा प्रश्न पडण्याचं वास्तविक काही कारण नाही. कारण आज जे शिक्षक आहेत किंवा पालक आहेत ते स्वत: या परिस्थितीतून गेल्यामुळे उत्तर सोपं तर आहेच, शिवाय स्वानुभवातलंही आहे. ते म्हणजे परीक्षेत ज्या प्रश्नांची उत्तरं लिहायची त्याची उत्तरं केवळ पाठांतरावर लिहिता येतात.
प्रश्नाचं उत्तर कळो न कळो, ते काय लिहायचं असतं हे मुलांना सांगितलं जातं. तसं ते लिहितात आणि पास होतात. उत्तरं घोकून-लिहून स्मरणात जातं. आकलनाशिवायच. न समजलेल्या मजकुरावरही गुण मिळवता येतात ते या मार्गाने. जे शिकवलं आहे ते लिहून काढा अशी सवय लागून जाते.
 मूल शाळेत जायला का घाबरतं, ते कळत नाही.
शिकत असताना मुलं अनेक अनुभवांना घाबरत असतात. मार देणाऱ्या शिक्षकांचा यात पहिला क्रमांक असतो. मार खाताना ज्या दु:खद आणि अपमानित करणाऱ्या भावना सहन केलेल्या असतात त्या स्मरणात पक्क्या असतात. त्यामुळे ते शिक्षक बघितले की त्या भावना आठवतात.
दुसरं म्हणजे, विविध प्रकारच्या शारीरिक आणि शाब्दिक शिक्षा या दु:खद भावनांशी जोडल्या गेल्यामुळे लक्षात राहतात. शिक्षा म्हणून एखादा गृहपाठ पुन्हा करायला सांगितला तर त्या गृहपाठातला मजकूर किती लक्षात राहतो हे बघायला पाहिजे. त्याऐवजी अशी शिक्षा झाली म्हणून राग, अपमान, धुसफूस, रडारड हे लक्षात राहतं. पण त्यातला अभ्यासाचा भाग मात्र लक्षात राहणं अवघड.  ज्या कोणामुळे आणि ज्या कशामुळे पूर्वी भीती वाटलेली होती, तो घटक समोर आला की मेंदूकडून सूचना मिळते. उदा. लांब राहा. पूर्वीच्या अनुभवांची आठवण करून दिली जाते. ज्या मुलांच्या शालेय जीवनात असे शिक्षक, अपमानित करणाऱ्या शिक्षा, कमी गुण, सततचं अपयश, पालकांची  बोलणी असं सगळंच असेल त्यांची शिक्षणाविषयी एकूण गोळाबेरीज दु:खी भावनांभोवती एकवटली जाते. आणि म्हणून फारच पक्केपणाने स्मरणात जाते.
असे अनुभव येणं हे शालेय जीवनासाठी तर घातक असतंच. पण एकूण पुढच्या आयुष्यासाठीसुद्धा! म्हणून यामागचं कारण शोधून काढावं लागेल.  
 ध्यान करणं हे मेंदूसाठी चांगलं असतं का?
ध्यानामुळे मेंदू आणि त्याचाच एक भाग असलेलं मन शांत होतं, एकाग्र होतं. प्राणायामामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे डोळे मिटून काही वेळ बसणं हे चांगलंच.    
drshrutipanse@gmail.com