जगातल्या निम्म्याहून जास्त लोकांना वाचण्यासाठी, स्पष्ट दिसण्यासाठी चष्मा लागतो, नाही तर काँटॅक्ट लेन्सेस. पण चष्मा हरवतो, घसरतो, खराब होतो तर काँटॅक्ट लेन्सेस त्रास देतात. हा दृष्टिदोष, म्हणजे चष्म्याचा नंबर नाहीसा झाला तर? हे शक्य झालंय प्रगत तंत्रज्ञानानं.

सू क्ष्म निरीक्षण आणि पारंपरिक शहाणपण या जोडगुणांच्या बळावर वैद्यकशास्त्राचा विकास संथ गतीत होत असताना त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली, तेव्हा अनेक आश्चर्यजनक आणि क्रांतिकारक असे शोध लावले गेले. ज्यामुळे उपचारांची भाषाच बदलून गेली आणि रुग्णांना वरदान ठरतील अशा पद्धती अस्तित्वात आल्या. यात नेत्ररोगोपचारांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे.
तुम्हाला माहीत आहे? जगातल्या निम्म्याहून जास्त लोकांना वाचण्यासाठी, स्पष्ट दिसण्यासाठी चष्मा लागतो, नाही तर काँटॅक्ट लेन्सेस. पण चष्मा हरवतो, घसरतो, खराब होतो तर काँटॅक्ट लेन्सेस डोळ्यांना टोचतात, खाली पडतात, डोळे लाल होतात. हा दृष्टिदोष, म्हणजे चष्म्याचा नंबर नाहीसा झाला तर? हे शक्य झालंय आताच्या तंत्रज्ञानानं.
एखाद्याचा डोळा वाजवीपेक्षा लांब असो(मायोपिया), आखूड असो (हायपरमेट्रोपिया) किंवा कॉर्नियाचा पृष्ठभाग खडबडीत असो, लेसर किरणांच्या साहाय्यानं कॉर्नियाची जाडी विशिष्ट प्रमाणात आणि विशिष्ट ठिकाणी कमी करून हा दृष्टिदोष कायमचा घालवता येतो. ही उपचार पद्धती सुरू झाली. १९८७ या वर्षी, परंतु यामध्ये काही त्रुटी होत्या. या उपचारात कॉर्नियाच्या संवेदनशील पृष्ठभागाला जखम होत असे. डोळे दिपणे, लाल होणे, पाणी येणे असे त्रास व्हायचे कधी-कधी दोन वेळा हा उपचार करावा लागे.
या पद्धतीत सुधारणा म्हणून ‘लॅसेक’ पद्धतीचा शोध लावला गेला. यात कॉर्नियाच्या पृष्ठभागावर धातूच्या पात्यानं सूक्ष्मसा छेद देऊन झाकण उघडावं तसा वरचा पापुद्रा उचलला जातो आणि पृष्ठभागाखालच्या काही भागावर एक्सायमर लेसरचा उपयोग केला जातो. त्यामुळे तेवढय़ा भागाची वाफ होऊन त्या ठिकाणी कॉर्नियाची जाडी कमी होते. त्यानंतर सुरुवातीला वर उचललेला पापुद्रा पुन्हा जाग्यावर ठेवतात, इथे तो आपोआप जुळून येतो.
लॅसेक उपचारात अजून सुधारणा घडवलीय ‘फेम्टो लॅसेक’ यंत्रानं. यामध्ये धातूचं पातं वापरलेलं नाही. पापुद्रा उचलण्याचं काम फेम्टोलेसरनं केलंय. खालच्या विशिष्ट जाडीच्या भागाचं बाष्पीभवन करण्याचं काम एक्सायमर लेसरनी केलंय. पापुद्रा उचलण्यामागचा हेतू होता कॉर्नियाच्या सर्वात जास्त संवेदनशील पेशींच्या थराला सुरक्षित ठेवणे आणि होता होईल तो रुग्णाची दृष्टी निदरेष ठेवणे अशा दृष्टीने फेम्टो लॅसेक उपयुक्त असलं तरी क्वचित काही वेळा कॉर्नियाचा वर उचललेला पापुद्रा खाली ठेवताना ‘मानवी’ चूक होऊ शकते. पापुद्रा सरकू शकतो, जिथे जंतुसंसर्ग होऊ शकतो किंवा त्यानंतर डोळा शुष्क होऊ शकतो (‘ड्राय आय’).
कोणत्याही क्षेत्रात मानवी जिज्ञासा ही अपरंपार असते. फेम्टो लॅसेकमधल्या संभाव्य दोषांचं निराकरण करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील होतेच आणि त्यातूनच उदयाला आली ‘रिलॅक्स स्माइल’ यंत्रणा. चष्म्याचा नंबर घालण्यासाठी आजच्या घटकेला ही सर्वश्रेष्ठ पद्धत आहे. या पद्धतीत ना धातूची धारधार पाती आहेत, ना पापुद्रा सरकल्यामुळे होणारी गुंतागुंत. कॉर्नियाचा सर्वात प्रभावशाली पृष्ठभाग सुरक्षित राहावा म्हणून आटोकाट काळजी घेतली आहे. वरचा पापुद्रा न उचलताच पृष्ठभागाखालचा काही भाग केवळ २ ते ४ मि.मी. इतक्या सूक्ष्म छिद्रातून ओढून बाहेर काढला जातो. कॉर्नियाच्या नाजूक पेशींना, डोळ्यातील इतर पेशींना कमीत कमी धक्का लागून ही शस्त्रक्रिया पार पडते. केवळ काही मिनिटांत. तासाभरानं रुग्ण घरी जातो. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर कामाला लागतो. फरक फक्त एवढाच, त्यानं चष्मा किंवा काँटॅक्ट लेन्सेस घातलेले नसतात.
कॉर्नियाचा कोणता भाग किती प्रमाणात कमी करायचा हे डोळ्याच्या मूळ दोषावर म्हणजे चष्म्याच्या नंबरावर अवलंबून असतं. लेसर यंत्रावर याची अचूक आकडेमोड झालेली असते. शक्यता आहे की, पुढच्या काही वर्षांत अजून नवनवीन निदरेष उपकरणं येतील आणि सर्व स्त्री-पुरुषांनी आपापला दृष्टिदोष या उपचारांनी काढून टाकलेला असेल. चष्मे केवळ वाढीच्या वयाची मुलंच वापरताना दिसतील.
केस पांढरे होणं, त्वचा सुरकुतणं ही जशी वय झाल्याची लक्षणं आहेत, तशीच एक उतारवयाची खूण म्हणजे डोळ्यात मोतीबिंदू येणं. म्हणजेच संपूर्ण पारदर्शक असलेलं नेत्रभिंग हळूहळू दुधासारखं पांढरट आणि अपारदर्शक होणं. पन्नाशी उलटली की बहुतेकांच्या डोळ्यात हा बदल होऊ लागतो. डोळ्यामध्ये छेद घेऊन बुबुळाच्या मागे जाऊन अपारदर्शक नेत्रभिंग बाहेर काढता येतं याचे संदर्भ थेट इ.स.पू. काळात सुश्रुतसंहितेत आढळतात. मात्र अर्वाचीन काळातली मोतीबिंदू शस्त्रक्रिया अस्तित्वात आली १९४० मध्ये.
जेमतेम साठ-सत्तर वर्षांपूर्वी डोळ्यात इंजेक्शन देऊन तो बधिर करून सुमारे  १०-१२ मिमी इतका लांब छेद कॉर्नियाच्या परिघावर घेत असत आणि नाजूकशा चिमटय़ानं नेत्रभिंगावरचं आवरण उघडून आतलं भिंग बाहेर काढत आणि त्यानंतर डोळ्याची जखम टाके घेऊन शिवून टाकत. या शस्त्रक्रियेनंतर, मस्तक जराही हलवू न देता हॉस्पिटलमध्ये सात दिवस सक्तीची विश्रांती आणि महिनाभर डोक्याला ड्रेसिंग असा कार्यक्रम असायचा. डोळा बरा झाला की जाडजूड काचेचा चष्मा दिला जाई. त्याच्या वजनामुळे रुग्ण हैराण व्हायचे. यानंतरची सुधारणा म्हणजे कृत्रिम नेत्रभिंगाची निर्मिती आणि मोतीबिंदू काढल्यावर रिकाम्या झालेल्या जागेत त्या भिंगाचं आरोपण. अर्थात यामुळे रुग्णांचा मोठाच फायदा झाला. जाड वजनदार चष्मा वापरण्याऐवजी, अगदी स्पष्ट दृष्टीसाठी आवश्यक तेवढय़ाच नंबरचा चष्मा वापरायला लागे. तरीदेखील कॉर्नियाच्या परिघावरचा मोठा छेद आणि टाके या गोष्टी होत्याच.
यामध्ये क्रांती झाली ‘फॅकोमात्सिफिकेशन’ या पद्धतीमुळे. यात कॉर्नियाच्या परिघावर केवळ २ ते ४ मि.मी. इतका लहान छेद घेतला जातो आणि फॅको उपकरण त्या छिद्रातून बुब्बुळामागे भिंगापर्यंत घातलं जातं. भिंगावरचं आवरण उघडून आतल्या मोतीबिंदूवर फॅको उपकरण त्या छिद्रातून बब्बुळामागे भिंगापर्यंत घातलं जातं. भिंगावरचं आवरण उघडून आतल्या मोतीबिंदूवर फॅको उपकरणातून अल्ट्रासाऊंड लहरींचा मारा केला जातो त्यामुळे भिंग विघटित होऊन त्याचं सूक्ष्म कणात रूपांतर होतं. त्यानंतर हे कण सक्शन मशीन वापरून ओढून काढले जातात. नंतर नवं कृत्रिम भिंग घडी घालून त्याच छोटय़ाशा छिद्रातून आत घालून घालून भिंगाच्या जागी ठेवलं जातं आणि मोठय़ा कुशलतेनं त्याची घडी उलगडून ते व्यवस्थित बसवतात. कॉर्नियाचा छेद इतका लहान असतो की तो आपोआप बरा होतो, म्हणून याला बिनटाक्याची शस्त्रक्रिया म्हणतात. आज फॅकोइमल्सिफिकेशन ही पद्धती सर्व शहरी आणि निमशहरी भागात प्रचलित आहे. या शस्त्रक्रियेनंतर १-२ तासांत रुग्ण घरी जाऊ शकतो आणि आठवडय़ाभरात कामाला लागतो.
फॅकोइमल्सिफिकेशन ही अत्यंत ‘तंत्रसंवेदनशील’ प्रक्रिया असून त्यासाठी मशीन उत्तम दर्जाचं हवं. नेत्रतज्ज्ञ कुशल आणि प्रशिक्षित हवा. फॅको मशीनमधून अल्ट्रासाऊंड लहरी किती वेळ आणि कुठे सोडायच्या यावर त्याचा पूर्ण ताबा असायला पाहिजे. यात काही चूक झाली तर डोळ्यात वाजवीपेक्षा जास्त उष्णता निर्माण होऊन आजूबाजूच्या पेशींना इजा पोहोचू शकते. कॉर्नियाचा पृष्ठभागही बदलू शकतो. त्याची वक्रता कमी अधिक होऊ शकते. भिंगावरचं आवरण खराब झालं तरी शस्त्रक्रिया तितकी यशस्वी होत नाही.
या त्रुटींवर मात केलीय आधी उल्लेख केलेल्या फेम्टो कोल्ड लेसर मशीननं, शस्त्रक्रियेत होऊ शकणाऱ्या ‘मानवी’ चुका (ह्य़ुमन एरर) बऱ्याच अंशी कमी केल्या आहेत या पद्धतीत अल्ट्रासाऊंडच्या ऐवजी लेसर वापरल्यामुळे कडक मोतीबिंदूचे तुकडे होतात. डोळ्याबाहेर ओढून काढायला फार शक्तिमान सक्शनची आता गरज पडत नाही. उष्णताही निर्माण होत नसल्यानं नाजूक पेशींना इजा होत नाही. भिंगाच्या आवरणाचंही नुकसान होत नाही आणि घेतलेला छेद लवकर भरून येतो. नव्या भिंगाचं रोपण झाल्यावर एक विशिष्ट द्राव आत सोडतात ज्यामुळे आतला दाब पूर्ववत होतो.
फेम्टो कोल्ड लेसर कॅटॅरॅक्ट मशीन ही अगदी नवीन यंत्रणा आहे. खर्च अफाट आहे. सामान्य माणसाच्या ऐपतीबाहेर वाटतो. इथे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की, फॅकोइमल्सिफिकेशन ही सध्या रुळलेली पद्धत वापरून लक्षावधी रुग्णांचा फायदाच झालेला आहे आणि कुशल नेत्रतज्ज्ञाच्या हाती या शस्त्रक्रियेच्या यशस्वितेबद्दल शंका बाळगायला नको.
कृत्रिम नेत्रभिंगातही आता खूप सुधारणा झाल्या आहेत. पूर्वीची ठरावीक केंद्रबिंदूची (मोनोफोकल) भिंग मागे पडून आता द्विकेंद्री (बायफोकल) किंवा बहुकेंद्री (मल्टिफोकल) भिंगांना पसंती मिळू लागली आहे. यामुळे अतिशय सक्षम अशी ऱ्हस्व आणि दीर्घदृष्टीतर मिळतेच, पण कॉर्नियाच्या खडबडीतपणामुळे होणारा त्रासही टाळता येतो. असं म्हणता येईल की रुग्णाला या शस्त्रक्रियेनंतर तरुण वयातही निदरेष दृष्टी परत मिळते.
नवीन येऊ घातलेल्या ‘एस्फेरिक’ भिंगामुळे तर पाऊस, धुकं, हिमवर्षांव, संधिप्रकाश सगळ्यामध्ये स्पष्ट दिसतं. काही अभिनव भिंगात तर घातक अतिनील किरणही फिल्टर करण्याची क्षमता आहे. अर्थात आपल्या अपेक्षा जेवढय़ा जास्त तेवढीच भिंगांची किमतही जास्त!
नेत्रोपचार शाखेतले हे केवळ दोनच
 नमुने. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विजयपताका मिरवणारे!
डॉ. लीली जोशी –  drlilyjoshi@gmail.com
या लेखासाठी साहाय्य : डॉ. माधुरी चांदोरकर, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि लेसरतज्ज्ञ