त्या घटनेचा शेवट जरी सुखान्त झाला, तरी मनात विचार येतो, की त्यासाठी पुलाखालून किती पाणी वाहून जावं लागलं? एका उमलत्या आयुष्याची उमेदीची र्वष अशी ग्रहणाने का ग्रासली? एवढय़ा शिकलेल्या वडिलांनी स्वत:च्या प्रतिष्ठेच्या खोटय़ा कल्पनांसाठी आपल्या डॉक्टर मुलीच्या भावनांचा असा बळी का दिला? आणि तिनेही तो का जाऊ दिला?
सुकेशिनी असं म्हणता येईल असे असणारे लांबसडक केस पण आता पूर्ण कापलेले, डोक्याचा चकोट, त्यावर १०-१२ जखमा -त्यांना टाके घालून बंद केलेल्या, त्यावर बँडेजचं पूर्ण पागोटं, ते दिसू नये म्हणून बांधलेला रुमाल व हाता-पायांवर अजून १२-१३ जखमा-त्याही टाके घातलेल्या- जिथे तिथे ड्रेसिंग- चेहऱ्यावर एक अपरिहार्य करपलेपण, पण नजरेत मात्र करारी अश्रू! -हे वर्णन आहे एका २४ वर्षीय डॉक्टर मुलीचं- ते देखील माझी कनिष्ठ सहकारी म्हणून काम केलेल्या स्त्रीचं. तुमचा विश्वास बसेल?
ते असं घडलं की, अतिशय हसरी, मनमिळाऊ मंजू स्वत:च्या अभ्यासाच्या मेहनतीने पहिल्या क्रमांकाने होमिओपॅथिक डॉक्टर झाली. तिचे वडीलही मुंबईच्या एका उपनगरामध्ये वर्षांनुवष्रे ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून गाजलेले. हे कुटुंब मूळचं गुजरातचं; पण अंदाजे ३० वर्षांपूर्वी शिक्षण संपल्यानंतर हे डॉक्टर मुंबईत व्यवसायासाठी आले आणि इथेच स्थायिक झाले. या मुलीचं शिक्षण संपत येऊ लागलं; तसा घरात तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला. गुजराती समाजात, त्यातही त्यांच्या पोटजातीत तिच्या शिक्षणाच्या तोलामोलाचा, अनुरूप मुलगा मिळणं मुश्कील होतं. त्यांच्या जातीमधील बहुतांश मुलांची दहावी-बारावीनंतर शिक्षणं बंद व्हायची व वडिलांच्या व्यवसायातच त्यांनी हातभार लावायचा, अशी परंपरा होती. ‘आता या मुलीला योग्य वर शोधावा तर जातीतला मिळणार नाही आणि जातीबाहेरचा केला तर मला लोक वाळीत टाकतील’ या एकाच विचारावर मंजूचे वडील अडून राहिले. गावी त्यांचे भाऊबंद वडिलोपार्जति शेती सांभाळत व त्यांची कुटुंबे पिढय़ान्पिढय़ा तिथे राहत. अर्थातच त्यांची शिक्षणेही बेताचीच, त्यांच्या संपूर्ण कुटुंबात तिचे वडीलच सर्वात जास्त शिकलेले, व्यवसायाच्या बांधीलकीमुळे ४-५ वर्षांतून फक्त दोन दिवसांसाठी गावी जाऊ शकत. अशा परिस्थितीत मंजूच्या डॉक्टर वडिलांना मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचं लग्न- जातीत सुयोग्य वर मिळत नाही म्हणून अन्य जातीत- तिच्या शिक्षणाशी सुयोग्य ठरेल अशा मुलाशी करून देण्यात एवढी अडचण का वाटावी? पण आपल्याला गावाकडचे भाऊबंद वाळीत टाकतील, आपली बदनामी होईल, कदाचित गावाकडील मालमत्तेचा वाटाही मिळणार नाही या गोष्टींना सगळं महत्त्व देऊन त्यांनी तिच्या लग्नाची एक अभिनव युक्ती काढली. त्यांनी तिचं लग्न त्याच उपनगरातल्या एका दहावी पास झालेल्या बििल्डग मटेरियल सप्लायर्सचा व्यवसाय करणाऱ्या ‘स्वजाती’तल्या मुलाशी लावून दिलं. लग्नानंतर सहा महिने मुलगी माहेरी राहील, मग समाजाच्या पद्धतीनुसार काही विधी- रिवाज झाल्यावर ती नवऱ्याच्या घरी जाईल, मग हळूहळू सहवासाने दोघांत प्रेम निर्माण होईलच; मग काय हरकत आहे? असा विचार करून मुलीला पटवून त्यांनी गावी जाऊन हे लग्न लावून दिले. परत कामावर आल्यावर माझ्या आग्रहाखातर तिने लग्नाचे फोटो दाखवले तेव्हा तिच्या थंड चेहऱ्याकडे पाहून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सासरची माणसं अशिक्षित, अडाणी दिसत होती आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावर ना शिक्षणाचं वा व्यवसायातल्या आत्मविश्वासाचं तेज!
ठरल्याप्रमाणे पहिले सहा महिने माहेरी राहून ती त्याच्याकडे राहायला गेली. मध्यंतरी तिने त्याच गावात स्वत:चा दवाखाना चालू केला, वडिलांच्या ओळखीमुळे बरेच पेशंट तिच्याकडे येऊ लागले होते. व्यावसायिक पातळीवर प्रगती होत असताना वैवाहिक पातळीवर तिची काय अवस्था होती?
मंजूने वडिलांना कमीपणा (?) न येऊ देण्यासाठी हे लग्न केलं; पण मनाने हा विवाह ती कधीच स्वीकारू शकली नाही. शैक्षणिक तफावतीमुळे तिला तिचा नवरा सतत वेगळा वाटत राहिला. तिने त्याला म्हणे प्रथमच सांगून टाकलं, ‘मला तुझ्याबद्दल जेव्हा मनापासून प्रेम वाटायला लागेल, तेव्हाच आपलं वैवाहिक जीवन चालू होईल. तोपर्यंत माझ्याशी शारीरिक जवळीक करायची नाही.’ या विचित्र अटीनुसार एकत्र राहण्यात जवळजवळ एक वर्ष गेलं. एकीकडे डॉक्टरी व्यवसायात ती चांगलं नाव कमावू लागली; तिकडे तिच्या नवऱ्याचा व्यवसाय फार वेग घेत नव्हता. बाकी जगाच्या नजरेत मात्र ते ‘नवरा-बायको’ होते. रीतसर लग्न झालेले, २५-२६ वर्षांचे तरुण वयातले, एकत्र राहणारे ते दोघे, असे किती दिवस निभणार? शेवटी व्हायचं तेच झालं.
सव्वा वर्षांने तिच्या नवऱ्याने एका रात्री तिच्याशी शारीरिक संबंधांची इच्छा दर्शविली; त्यावर तिने विरोध केला. त्याबरोबर त्याने घरातील चाकूने तिच्या डोक्यावर व अंगावर अनेक ठिकाणी जखमा केल्या. त्या स्थितीत ती त्याच्याशी झटापट करत राहिली. शेवटी रक्तबंबाळ अवस्थेत तिने आई-वडिलांना फोन केल्यावर ते तिला त्याच गावातील ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे सर्व जखमांना टाके घालण्यात आले. तिथले सगळे डॉक्टर्स तिला व तिच्या वडिलांना ओळ्खत होते. तिच्या नवऱ्यावर पोलीस केस केली गेली. नंतर पुढच्या ड्रेसिंगला एकदा जखमा सर्जनने बघाव्यात म्हणून ती आईला घेऊन माझ्याकडे आली होती. तिला या परिस्थितीत पाहून माझं मन विषण्ण झालं. मी ड्रेसिंग करताना तिची आई एकच वाक्य बोलली, ‘मॅडम, बोल कोणाला लावायचा? आमचीच चूक आहे आम्हाला भोगायलाच लागणार!’ यथावकाश तिच्या शरीराच्या जखमा भरल्या. पण बाहेर जाण्याएवढी स्थिती येण्यासाठी साधारण तीन महिने तिचा दवाखाना बंद होता, ती घराच्या बाहेरदेखील पडत नव्हती. आई-वडिलांच्या घरी राहून भोगलेला तिचा तो वनवास आणि अज्ञातवासही होता.
कालांतराने गावच्या पंचायतीसमोर ही केस उभी राहिली व पंचांनी दोघांना विभक्त होण्याची परवानगी दिली. वडिलांच्या प्रतिष्ठेला गावातल्या नातेवाइकांसमोर काही आच आली नाही. केवढी मोठी अचिव्हमेंट होती, ती त्यांच्या दृष्टीने!
दोन वर्षांनी मंजूचं लग्न त्यांच्याच पोटजातीतल्या बिजवर इंजिनीअर मुलाशी झालं. ती आता एका मोठय़ा मॅटíनटी हॉस्पिटलमध्ये नोकरी करते, तिला एक छान छोकरी झाली आहे. नवरा त्याच्या व्यवसायात चांगला यशस्वी होत आहे. दोन शरीरंच नव्हे; तर दोन मनंदेखील सुसंस्कृततेच्या एका छान पातळीवर जुळली आहेत, तेही तशाच सुशिक्षित कुटुंबीयांच्या प्रेमळ छत्रछायेत!
या घटनेचा शेवट जरी सुखान्त झाला, तरी मनात विचार येतो, की त्यासाठी पुलाखालून किती पाणी वाहून जावं लागलं? एका उमलत्या आयुष्याची उमेदीची र्वष अशी ग्रहणाने का ग्रासली? एवढय़ा शिकलेल्या वडिलांनी स्वत:च्या प्रतिष्ठेच्या खोटय़ा कल्पनांसाठी आपल्या मुलीच्या भावनांचा असा बळी का दिला? एक डॉक्टर -सामाजिक पारंपरिक बंधनांपुढे इतका सहज मान तुकवत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करायची? ‘मी एक वेळ एकटी राहीन पण तुम्हाला सोयीचं वाटणारं हे प्रायोगिक लग्न करणार नाही’ हे सांगण्याची तडफ मंजूने का नाही दाखवली? कधी तरी जात असलेल्या गावातल्या लोकांना -‘माझ्या मुलीच्या योग्यतेचा जातीतला वर दाखवा; नाही तर मी तिच्यायोग्य दुसऱ्या जातीतला वर बघण्यास मुखत्यार आहे’  हे ते ठामपणे का नाही सांगू शकले? या लग्नासाठी त्यांनी मुलीला विश्वासात घेतलं होतं का? ‘लग्न’ ही अशी -‘पाहावं करून!’ म्हणण्यासारखी गोष्ट आहे का? शेवटी अशा विचित्र परिस्थितीत एका निरपराध मुलाच्या वैवाहिक भावना कोंडीत पकडण्याचा अधिकार या दोघांना कोणी दिला?
या घटनेतून मी प्रत्येक वधूपित्याला  मुलीचा आंतरजातीय विवाह करायला प्रवृत्त करते आहे, असे समजू नये; पण धर्म, जात, पोटजात यांपेक्षा मुलाचे शिक्षण, कर्तबगारी, निव्र्यसनीपणा, सुसंस्कृतपणा, कौटुंबिक पाश्र्वभूमी हे जास्त महत्त्वाचे आहे हे नेहमी लक्षात घ्यायला हवे. वडिलांचा ‘मैं हूं ना!’ म्हणत ठामपणे मुलीच्या पाठीवर विसावणारा आश्वासक हातच मुलीसाठी स्वर्ग बनेल; नाहीतर ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा स्थितीत अडकलेल्या त्या मुलीने काय करायचं?