‘‘माहेर म्हणजे फक्त आई-वडिलांचे चेहरे असतात का? ते तर आम्ही केव्हाही स्काइपवर बघू शकतोच. आवाज ऐकावेसे वाटले तर फोन पडल्येत शंभर. या सगळ्याच्या आगेमागे बरंच काही येतं तेव्हा माहेर बनतं ना? ते घर, ती गल्ली, ती पेठ, तिच्यातलं ते देऊळ किंवा थिएटर, ती शाळा, तिच्या आवारात टगेगिरी करणाऱ्या मैत्रिणी, ते चांभारचौकशा करणारे शेजारीपाजारी, नाक्यावरचा वाणी, ती सदैव तोंड वासून उघडी पडलेली पोस्टाची पेटी.. लाख गोष्टी असतात एका माहेरच्या चित्रामध्ये.’’
आठ दिवसांसाठी माहेरपणाला आलेली मुलगी अवघ्या दोन दिवसांमध्ये ‘परत जाते’, ‘जायला हवं’ वगैरे करायला लागली तेव्हा आई दुखावली. लेकीच्या माहेरपणाचे तिने केलेले नाना बेत, पाहिलेली नाना स्वप्नं अध्र्यात मोडली. जावयाला अचानक कंपनीचा एक ‘एम.ओ.यू. साइन’ करायला परदेशी जावं लागणार होतं. या घटनेमुळे रातोरात सगळी चक्रं फिरली होती. मग नातवाचा क्लास, मुलीच्या ‘जिम’ चे सवलतीचे दिवस वाया जाणं वगैरे जोडमुद्दे पुढे यायला वेळ लागला नाही. मुलगी पठ्ठी मनानं घरी पोचलीही. तिची सामानाची बांधाबांध सुरू असताना आई खट्टूू  सुरात म्हणाली,
‘‘शेवटी काय, दोन दिवसांतच आवरलं ना तुझं माहेरपण?’’
‘‘काय करणार? सगळी परिस्थिती तू बघतेच आहेस.’’
‘‘परिस्थिती वगैरे ठीक आहे, पण मूळ मुद्दा वेगळाच आहे. आताच्या तुम्हा मुलींना माहेराची ओढच राहिली नाही.’’
‘‘चलाऽऽ तुझी हरदासाची कथा आली मूळपदावर’’ लेकीने हसून साजरं केलं. आईची तिच्याबाबत एवढी एकच तक्रार असायची. ‘तुला माहेरी यावंसं वाटत नाही.’ ‘आम्ही तरुणपणी माहेरी जायला जशा धडपडायचो तसं तुम्ही मुली मानत नाही.’ लेकीची आईच नव्हे, सगळ्या आत्या, मावशा, माम्या वगैरे त्या वयाचा महिलावर्ग एकत्र जमला की हीच कुरकुर करायचा. आताच्या मुली लग्न करून सासरी गेल्या की तिकडच्याच होतात. त्यांना माहेरची ओढ राहत नाही. आपापल्या मुलींची उदाहरणं देत साधारणपणे तेच मुद्दे यायचे.
‘‘हल्ली सासरी सासुरवास असतोच कुठे? की बुवा, तो नकोसा झाला म्हणून निवांत माहेरी जावंसं वाटावं? ’’
‘‘स्वातंत्र्य, बरं, स्वातंत्र्य! लग्न झाल्यानंतर स्वतंत्र राहायची चटक लागते मुलींना. मग पुन्हा कोणाच्याच हाताखाली राहावंसं वाटत नसणार! अगदी आईच्यासुद्धा!’’
‘‘वयाच्या पंचविशी-तिशीत लग्न केल्यावर मनात कोवळीक तरी कशी टिकणार?’’
‘‘नुसतं तेवढंच नाही. मला वाटतं आताच्या लोकांना मुळी आपल्यासारखं भाबडं, भावुक होताच येत नाही. माहेरी राहत असताना ते जवळचं, लग्न झाल्यावरचा परिसर तेव्हा जवळचा. असला रोखठोक कारभार सगळा.’’
असं काहीबाही आणि पुन:पुन्हा ऐकलं की कधी कधी मुलीला राग यायचा. आपणही रोखठोक बोलावं असं वाटायचं. पण आता आईचा उतरलेला चेहरा बघून जीभ रेटली नाही. तिनं नुसतंच आईच्या हातावर थोपटल्यासारखं करून आवराआवर पुढे चालू केली.
‘‘तू तुझ्या शाळेत जाऊन आलीस का? जायचं म्हणत होतीस.’’
‘‘नाही जमलं. राहून गेलं ह्य़ा ना त्या कारणाने.’’
‘‘बघायला हवं होतंस. तुमच्या जुन्या दगडी शाळेचा केवढा मोठा एज्युकेशन कॉम्प्लेक्स झालाय ते. सगळीकडे चकाचक.. पॉश इमारती .. लिफ्टवाल्या.. काही वर्ग एअरकंडिशण्डसुद्धा..’’
‘‘अरे वा ऽ आमच्या शाळेने फारच प्रगती केलेली दिसत्येय.. मध्ये अनुचा फोन आला होता तेव्हा ती सांगत होती..’’
‘‘अनु म्हणजे?’’
‘‘ती नाही का ग.. कोपऱ्यावरच्या वाण्याच्या मागच्या चाळीत राहणारी.. कुरळ्या केसांच्या दोन घट्टमुट्ट वेण्या घालून शाळेत येणारी .. रोज बरोबर शाळेत जायचो आम्ही..’’
‘‘तिची आणि तुझी गाठ पडली होती का? मागच्या वेळेला तरी?’’
‘‘छे ग! पंधरा वर्षांमध्ये चेहरासुद्धा आमनेसामने पाहिला नाही तिचा. लग्न करून ऑस्ट्रेलियालाच गेली ना ती.. इंडियात आली की फोनबिन करते.. कधीतरी मेल येते.. आमच्या तेव्हाच्या बॅचचा विद्यार्थी संघबिंघ आहे ना काहीतरी.. त्यातून तिला शाळेच्या कायापालटाचं कळलं होतं.. त्याचीच खात्री करून घेत होती ती माझ्याकडून.’’
‘‘ती राहायची ती चाळ केव्हाच पाडली..’’
‘‘आम्ही पाहत होतो तेव्हापासून ती चाळ पडायलाच आली होती.. पण लपाछपी खेळायला खूप जागा होत्या तिच्यात.. म्हणून आमचा जीव होता तिच्यावर..’’
‘‘तेवढं आठवत नाही. तेव्हा माझी बँकेची नोकरी होती.’’
‘‘माझ्या लग्नानंतरसुद्धा चालूच होती की ती! सुरुवातीला मी इथे यायचे तर तू नोकरीवर जायचीस, बाबा दौऱ्यावर, दादाचा कधी घरात पायच ठरत नसे. एकेकदा वाटायचं आपण फक्त हय़ा घराच्या भिंतींसाठी, दारांसाठी इथे येऊन बसतोय की काय..’’
‘‘माझ्या रजा तुम्हा मुलांसाठीच वापरायचे ना मी?.. तुझं लग्न.. त्याची परीक्षा वगैरे.. गेली पाच र्वष मागे लागल्येय.. तुम्ही दोघं एकत्र एकदम इथे सुट्टीला या. तुम्हाला जमत नाही.’’
‘‘तो बोटीवरचा माणूस. तो नेमका आमच्या मुलांच्या परीक्षांच्या दिवसात आला तर काय करायचं?.. आमच्या मुलांचं वेळापत्रक एस.एस.सी. बोर्डाचं.. त्याची मुलं आय.सी.एस.सी.वाली.. प्रत्येकाचं तंत्र वेगळं..’’
‘‘फक्त आम्ही आई-बाप तेच आहोत. त्याच जुन्या इच्छा धरून बसलेलो. मुलांनी चार दिवस एकत्र, निवांत, इथे हय़ा वास्तूत आपल्याबरोबर राहावं वगैरे.. ’’
‘‘ही वास्तू तरी कुठे आमच्या वेळची राहिली आहे आई? काकानं वाटणी मागितल्यावर काय आडवंतिडवं वाटप केलं आहेत तुम्ही तिचं.. थांगपत्ता लागत नाही एकेकदा वाडय़ात कुठून आत शिरायचं आणि कुठून कुठल्या खोलीत जायचं त्याचा.’’
‘‘असं आताच म्हणत्येस. पुढे इथे टॉवर झाल्यावर काय म्हणशील?’’
‘‘माहीत नाही. आणखी एक धागा सुटल्यासारखं वाटेल एवढं नक्की.’’ मुलगी निर्णायक बोलली आणि थोडा वेळ निमूट आपलं काम करत राहिली. आई जड अंत:करणाने त्याकडे बघत बसली. बराच वेळ गेल्यावर मुलीनं पुन्हा आईकडे मोहरा वळवला आणि समजुतीच्या सुरात म्हणाली,
‘‘आमच्या पिढीकडे बोटं दाखवणं सोपं आहे आई. तेवढंच मोकळ्या मनाने समजूनही घ्यावं ना कधीतरी. तुम्हाला काय वाटतं? माहेर म्हणजे फक्त आई-वडिलांचे चेहरे असतात का? ते तर आम्ही केव्हाही स्काइपवर बघू शकतोच. आवाज ऐकावेसे वाटले तर फोन पडल्येत शंभर. हय़ा सगळ्याच्या आगेमागे बरंच काही येतं तेव्हा माहेर बनतं ना? ते घर, ती गल्ली, ती पेठ, तिच्यातलं ते देऊळ किंवा थिएटर, ती शाळा, तिच्या आवारात टगेगिरी करणाऱ्या मैत्रिणी, ते चांभारचौकशा करणारे शेजारीपाजारी, नाक्यावरचा वाणी, ती सदैव तोंड वासून उघडी पडलेली पोस्टाची पेटी.. लाख गोष्टी असतात एका माहेरच्या चित्रामध्ये. कबूल आहे, सुटय़ा, एकेकटय़ा असताना अगदीच फुटकळ असतील त्या. पण चित्रातली एकेक गोष्ट गळत चालली की चित्राचे रंग उडायला लागतात. तुमच्या पिढीपर्यंत मुली माहेरपणाला जायच्या तेव्हा माहेरचं पूर्वीचं चित्र बरंचसं टिकून असायचं आई. आता आई-बाप नोकरीवर, काकामामा दूर, सख्खी भावंडं पांगलेली, मैत्रिणींचा पत्ता नाही. खुणेच्या जागा नाहीत, दर खेपेला बघावं तर काहीतरी वेगळं, नवंनवं समोर येतंय. अशाने एकेकदा फारच हरवल्यासारखं वाटायला लागतं. दरवेळेला परक्या अनोळखी जगातच एकटय़ाने शिरायचं असेल तर त्याच्यासाठी माहेर कशाला हवं ना? बाहेरच्या आयुष्यात तेच तर करतो आम्ही.’’
मुलगी पोटतिडिकीने म्हणत गेली, आई संदिग्ध चेहऱ्याने तिच्याकडे बघत राहिली. एका क्षणी मुलीला तिची दया आली आणि एकदम नूर बदलून तिनं जाहीर करून टाकलं, ‘‘इतकी नव्‍‌र्हस होऊ नकोस आई. हय़ा वर्षी माझ्या कुटुंबाला आणि दादाच्या कुटुंबाला सगळ्यांना जेव्हा सवड मिळेल तेव्हा, आम्हा दोघांच्या जवळच्या, सोयीच्या एखाद्या रिसॉर्टवर किंवा हॉलिडे होमवर आपण सगळे एकत्र जमू या. तेच आमचं माहेरपण, चालेल?’’