‘‘एकेकाळी आमच्या सोसायटीचा गणेशोत्सव कसला दणक्यात व्हायचा. नाटकं काय, खेळांच्या स्पर्धा काय, कधी कधी खडाजंगी भांडणंसुद्धा.. माणसांची हिरीरी होती सगळ्यात. आता सगळंच फ्रीजमधल्या अन्नासारखं झालंय. आहे का? तर आहे. टिकलंय का? तर टिकलंय. पण इच्छा खवळून उठावी, अन्नावर तुटून पडावंसं वाटावं असं कुठे काही आढळत नाही.’’
माझ्या रोजच्या फिरण्याच्या वाटेवर आमच्या भागातली एक जुनाट, पण प्रशस्त को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. दोन हमरस्त्यांच्या कोनात निवांत वसली आहे ती. दोन्ही रस्त्यांच्या बाजूने दोन मोठी फाटकं, त्यापैकी एका फाटकाजवळ रखवालदारासाठी छोटी चौकी, आतमध्ये पंचकोनात ५ मोठय़ा इमारती, मध्ये भलंमोठं आवार, त्याच्यात बॅडमिंटन कोर्टाच्या पुसत चाललेल्या रेघा, पोरांनी उडय़ा मारून जायबंदी केलेली दोन-तीन बाकं, झाडंझुडपं, काही झाडांभोवती पार, मध्यावर एक चौथरा आणि त्याखाली पाण्याची मोठी टाकी असा एकूण पसारा आहे या सहनिवासाचा.
 एकेकाळी हा परिसर नांदतागाजता होता. संध्याकाळी बऱ्याच बायका बाकांवर – पारावर बसून गप्पा मारताना दिसायच्या. चौकीजवळ घोळक्याने उभी ठाकलेली तरुण मुलं ‘पक्षी निरीक्षण’, म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पोरींना मनोभावे न्याहाळायची, हास्यविनोद करायची. शाळकरी पोरांचा धुडगूस असायचाच. हे सगळं दैनिक. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी असे राष्ट्रीय सण किंवा दिवाळी, होळी असे पारंपरिक सण – समारंभ असले म्हणजे तर सोसायटीचं आवार फुलून यायचं. आता बहुतेकवेळा शुकशुकाटच असतो. नेहमी जाऊन येऊन तिथल्या काही माणसांचे चेहरे माझ्या परिचयाचे झाले आहेत. मोघम हसणं, ‘कसं काय’ विचारणं, ‘ट्रॅफिकची म्हणजे अगदी हद्दच झालीये’ अशासारखी निरुपद्रवी वाक्यं बोलणं सुरू असतं. पण तेही वाढत नाही. बोलणं वाढायला, वाढवायला माणसं दिसायला तर हवीत? विजेच्या खांबाशी, कुंपणाच्या तारांशी थोडंच बोलता येतं?
गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर एकदमच त्या सोसायटीत चुळबूळ सुरू झालीशी वाटली. आवाराची झाडलोट सुरू झाली. फाटकाला रंग लावला. आवारातले दिवे लागले. लोंबणाऱ्या वायरी, झाडांच्या अस्ताव्यस्त फांद्या, कोणत्यातरी निमित्ताने कोणीतरी लावलेल्या पताकांचे लटकते अवशेष हे सगळं आवरलं गेलं. कारण नसताना मी सोसायटीच्या रखवालदाराशी चौकशा आरंभल्या.
‘‘सोसायटीत काही समारंभ करायचाय की काय?’’
‘‘हां. सात नंबरवालेका चल रहा है कुछ.’’
‘‘काय पण?’’
‘‘कुछ गणेशजी का बोल रहे थे.’’
‘‘अरे व्वा! एकदम गणपतीबिणपती.. जोरात हं! किती दिवसांचा ठेवणार?’’
‘‘पता नही. सात नंबरवाले को पूछना.’’
‘‘मला वाटतं, मागे असायचा तुमच्या सोसायटीचा सार्वजनिक गणेशोत्सव.’’
‘‘पता नही. सात नंबरवाले को मालूम होगा.’’
‘‘सात नंबरवाल्याचं आडनाव काय?’’ मी चिकाटी सोडली नाही. पण त्याने तरी त्याचा तिऱ्हाईतपणा कुठे सोडला? करकरीत कोऱ्या चेहऱ्याने म्हणाला,
‘‘पता नही.’’ ‘‘सात नंबरवाले का नाम सात नंबरवाले कोही मालूम होगा.’’ हे पुढचं वाक्य तो बोलला कसा नाही याचं मला आश्चर्य वाटलं. बाकी त्याचा तरी काय दोष? कोणत्या तरी सिक्युरिटी एजन्सीचा भाडोत्री रखवालदार असणार तो! जिथे पहाऱ्यासाठी उभं राहायला सांगतील तिथे जाऊन उभा राहात असणार. तो कशाला माणसांच्या नावागावाची पंचाईत करायला बसलाय? आपण ज्याची रखवाली वगैरे करतो (असं म्हणतात!) ती माणसांची वसाहत आहे का कबरस्थान आहे, का पांजरपोळ आहे याचीही फिकीर करत नसणार तो पठ्ठय़ा. उगाच माझ्यासारख्या उपटसुंभ चौकसखोरांना त्याने कशाला धूप घालावी? तो विषय तिथेच राहिला.
नेमकं गणेश चतुर्थीच्या सुमारास काही दिवस माझंच परगावी जाणं झालं. त्यामुळे त्या सोसायटीमधला उत्सव मला काही बघायला मिळाला नाही. परत आल्यावर सवयीने पुन्हा एकदा त्या सोसायटीवरून जात होते. तेव्हा नजर आपोआपच आतला वेध घेऊ लागली. चौकीमध्ये त्या भिडूचा ‘पता नव्हता.’ वेगळंच कोणीतरी तिथे खुडबुड करत होतं. माझ्या चौकसखोरीने पुनश्च डोकं वर काढलं.
‘‘मग? झाला का गणपती बसवून?’’
‘‘झाला एकदाचा. त्याचंच निस्तरतोय,’’ चौकीमधून एका आवाज आला. मी डोकावून पाहिलं. एक सद्गृहस्थ फळ्यावर खडूने काही तरी नोटीसवजा लिहित होते. त्या सोसायटीसारखाच तो फळा आणि त्यावर लिहिण्याची धडपड करणारे सद्गृहस्थ जुनेपाने दिसत होते. मला म्हणाले,
‘‘शिमगा गेल्यावर कवित्व उरतं म्हणायचे ना पूर्वी, तसा आमचा गणपती गेल्यावर बरंच सामान उरलंय मागे. त्याची काही व्यवस्था लावता येते का ते बघतोय.’’
‘‘तुम्ही स्वत: का करताय पण एवढा सगळा खटाटोप?
‘‘मीच सुरू केलं होतं म्हणून मीच आवरतोय. अहो, गणपतीच्या निमित्ताने सोसायटीतल्या कोणीकोणी काहीकाही खाली आणून टाकलं. कोणी पेढे आणून टाकले, कोणी झांजा आणल्या आरतीसाठी. निरांजनं, उदबत्तीची घरं, चौरंग वगैरे वस्तूपण गोळा झाल्या. मात्र,आता त्या आठवणीने परत न्यायचं नाव नाही काढत कोणी. बघूनबघून मलाच अस्वस्थता येते. आता मी काय घरोघरी जाऊन त्या परत करत बसणार आहे का?’’
‘‘सोसायटीच्या वॉचमनला सांगितलं असतं तर..’’
‘‘पाच-सहा दिवस इथे रखवालीला कोणी आलेलं नाही. कधी येईल माहीत नाही. माणसं मिळतात कुठे आता कामाला? अर्धी माणसं आपल्याला परवडत नाहीत, अध्र्याना आपण परवडत नसणार, शिवाय मिळालेलं माणूस टिकेल, रुजेल याची काय खात्री सध्याच्या दिवसात? म्हणून मग आपणच जमेल तेवढं करायचं.’’ बोलण्या-बोलण्यात त्यांची नोटीस लिहून झाली. ‘‘गणपतीसाठी आणलेल्या खालील वस्तू पडून आहेत. ज्यांच्या असतील त्यांनी घेऊन जाव्या,’’ अशा अर्थाने काहीबाही लिहिलं होतं त्यांनी. मी वाचत असताना म्हणाले,
‘‘आज खूप वर्षांनी फळ्यावर खडूने लिहिलं. बरं वाटलं!’’
‘‘तुम्ही शिक्षकी पेशामध्ये होतात का?’’
‘‘मास्तर होतो. साधा मास्तर. ३६ र्वष इथे राहून नोकरी केली. मधली ८-१० र्वष गावी जाऊन तिथल्या जमीन जुमल्याचं खटलं आवरून आलो. इथला फ्लॅट कुलूप लावून ठेवला होता. परत आल्यावर वाटलं, जरा काहीतरी हालचाल सुरू करावी सोसायटीमध्ये.’’
‘‘म्हणून हा गणेशोत्सव का?’’
‘‘हो. आधी वंदू तुज मोरया! सुरुवात करायला गणपती चांगला असं वाटलं.’’
‘‘मग झाली ना चांगली सुरुवात?’’
‘‘म्हटली तर झाली. पण पूर्वीसारखी जान नाही हो कशात. एकेकाळी आमच्या सोसायटीचा गणेशोत्सव कसला दणक्यात व्हायचा. नाटकं काय, खेळांच्या स्पर्धा काय, कधी कधी खडाजंगी भांडणंसुद्धा.. माणसांची हिरीरी होती सगळ्यात. आता सगळंच फ्रीजमधल्या अन्नासारखं झालंय. आहे का? तर आहे. टिकलंय का? तर टिकलंय. पण इच्छा खवळून उठावी, अन्नावर तुटून पडावंसं वाटावं असं कुठे काही आढळत नाही.’’
‘‘गणपती बसवण्यापूर्वी तुम्ही सोसायटीतल्या लोकांशी बोललाच असाल ना त्याबद्दल.. म्हणजे लोकांचे विचार घेणं.. चर्चा करणं .. वगैरे’’
‘‘केलं होतं ना तसं. मीटिंगा बोलावल्या. ज्यांना येणं जमलं ते आले. कोणी हिरीरीने ‘नाही’ ‘नको’ असंही म्हणालं नाही हो. करायचंय म्हणता तर करा. काय वर्गणीबिर्गणी ठरवत असाल ते सांगा. देऊ पाठवून. असा सगळा कारभार!’’
‘‘अलीकडे बऱ्याच जुन्या सहकारी वसाहतींची अशीच ओरड होते आहे म्हणतात. होतं असं बरं का, की मूळचे सदस्य, रहिवासी म्हातारे होत जातात. पुढच्या पिढीतले बरेचसे इथे राहात नसतात.’’
‘‘ठीक आहे. जे नसतात ते नसतातच. त्यांचं एक वेळ सोडून देऊ. पण जे इथे असतात ते इथले का नसतात, नक्की कुठे असतात, हा माझा प्रश्न आहे.’’
‘‘आताची जीवनशैलीच तशी आहे. दिवसभर नवराबायको आपापल्या नोकऱ्यांच्या ठिकाणी व्यग्र. ते घरात नसताना मुलं घरात नसलेली बरी म्हणून त्यांनाही शक्य तेवढं बाहेर अडकवलेलं. वेळ आहे कोणापाशी?’’
‘‘मग मॉलमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये गर्दी करणारे कोण असतात हो मॅडम? पुण्यातल्या एकाही बऱ्या हॉटेलमध्ये रात्री ऐनवेळी जेवायला जागा मिळत नाही. म्हणजे या गोष्टींसाठी लोकांपाशी वेळ आहे. मग आपलं अपार्टमेंट – सोसायटी – वाडी  – गल्ली किंवा जे काय असेल ते, त्याच्यासाठी तेवढा जराही वेळ नसावा, हे कसं स्वीकारावं आमच्यासारख्यांनी?’’
‘‘कुठून हा उपक्रम मांडला, असं झालंय का तुम्हाला?’’
‘‘पश्चात्ताप वगैरे नाही झालेला. पण याच्यामागची तर्कसंगती लागत नाही. कबूल आहे, माझी नोकरी आरामाची होती, आता तीही नाही, साहजिकच माझ्यापाशी वेळ आहे मोकळा. पण त्या वेळात मी नुसता लोळतही पडू शकलो असतोच की. मला हे असं काहीतरी करावंसं वाटलं. मला आस्था वाटते माझ्या राहात्या जागेविषयी, परिसराविषयी. पण आमच्याकडचे दहा-पंधरा लोकही एकेका आरतीसाठी वेळेवर खाली येऊ शकले नाहीत. कोणाचा क्लास, कोणाची टय़ुशन, कोणाची कॉन्फरन्स कॉलची वेळ, कोणाचं प्रोजेक्ट, कोणाला ‘उंच माझा झोका’ चुकवायचा नाही; असली तऱ्हा प्रत्येकाची. कोणीच कशाशीच कोणत्याच प्रकारे जुळवून घेऊ शकत नसलं तर सामूहिक व्यवहार व्हायचे कसे?’’
ते पोटतिडिकीने म्हणाले. मी काहीतरी शब्दांची जुळवाजुळव करणार तेवढय़ात म्हणाले,‘‘मला उलट प्रश्न विचारू नका. मी हाडाचा मास्तर आहे. मी प्रश्न विचारायचे आणि लोकांनी उत्तरं द्यायची अशी सवय आहे मला. म्हणून उत्तर मिळालं नाही की मला त्रास होतो. कोणीच बघणार नसेल तर आमच्यासारख्या जुन्या संस्था-संघटना यापुढच्या काळात चालायच्या कशा, हा माझा प्रश्न आहे. आणि तो दिवसेंदिवस गहन होत चाललेला आहे.’’
‘‘पता नही!’’ मी पुटपुटले. मात्र ते सवयीने बोलून गेले असं माझं मलाही वाटलं नाही. आणखी विषय वाढवून त्यांना त्रास द्यायचा माझा इरादा नव्हता. लष्करच्या भाजून झाल्यावर घरच्याही भाजायच्या होत्या. म्हणून तिथून पाय काढताना हलकेच म्हणाले,
‘‘आपलं नाव, सर?’’
‘‘सात नंबर’’