‘‘माझ्याशी लग्न म्हणजे वादळाशी झुंज आहे. डॉक्टर असलो तरी प्रॅक्टिस करणार नाही, तुला आर्थिक व एकूणच सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. मी संसारात पाहुण्यासारखा असेन,’’  मी कुमारसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यावर त्याने मला हे ऐकवलं होतं, पण मी शिकले वादळाशी सामना करण्याचं. माझ्या मनात आत्मिक सोशिकतेचं एक आंतरिक तंत्र निर्माण झालं. एकमेकांना खूश ठेवायचं तंत्रही साध्य झालं. त्यामुळे भावनात्मक किंवा असुरक्षितता वाटेनाशी झाली. एक आत्मीय नातं निर्माण झालं.’’ सांगताहेत, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी आपले पती डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याबरोबरच्या ४५ वर्षांच्या सहजीवनाविषयी.

वर्ष असावं १९६४-६५. कॉलेज संपवून लाकडी पुलावरून मी पायी घरी जात होते. पुलाच्या टोकाला डावीकडे सध्या जेथे पोलीस चौकी आहे, तेथे नंद्याचं ‘रेडिओ हाऊस’ नावाचं दुकान होतं. नंद्या म्हणजे नंदू नवाथे. आमचा ‘यूथ ऑर्गनायझेशन’मधला मित्र. दुकानात पाच-सहा पोरं बसली होती. तेवढय़ात माझ्या नावाने दुकानातून हाका आल्या. पाहिलं तर आमचा तत्कालीन ‘यूथ ऑर्गनायझेशन’चा ग्रुप अड्डय़ावर बसलेला होता. पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींची ही संघटना नुकतीच स्थापन झाली होती. मी त्यात काम करीत असे. नंदूच्या घराच्या गच्चीवर आम्ही संध्याकाळी जमत असू.  वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, वादविवाद, प्रत्यक्ष कामं चालत. मी दुकानात वर चढले. त्या ग्रुपमध्ये मेडिकल कॉलेजची दोन-तीन मुलं बसली होती. त्यात अन्या (अनिल अवचट) व कुमार  होते. उभ्या उभ्या विचारपूस सुरू झाली. नवीनच ओळखी होत्या.
कुमार जरा बोलका, धीट वाटला. मी विचारलं, ‘‘काय चाललंय सध्या? अभ्यास, परीक्षा?’’ त्यावर कुमार म्हणाला, ‘‘काही नाही, नापास झालोय. एक विषय राहिलाय.’’ निर्विकार, शांत चेहरा. आपल्या हातातली छोटीशी पुस्तिका दाखवीत म्हणाला, ‘‘ही ‘आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली’ पुस्तिका. मी लिहिलीय. ‘माणूस’ साप्ताहिकाच्या माजगावकरांनी वाचल्यावर बोलावून घेतलं. त्यांनी ‘माणूस’च्या एका अंकात ही पुस्तिका पूर्ण छापलीय. चार आणे किंमत आहे, बघ तू पण वाचून. जगभरच्या तरुणांच्या चळवळींची मीमांसा केली आहे. आम्ही सगळे ती रस्त्यावर उभे राहून विकतोय. संघटनेसाठी फंड गोळा करतोय.’’ कुमार पुस्तिकेतील मजकुराबद्दल बोलतच राहिला. मी त्याला मध्येच अडवलं (आजही त्याच्या बोलण्याच्या धबधब्याला मला अडवावं लागतं..) मी म्हणाले, ‘‘बघेन वाचून. आता निघते.’’ असं म्हणत चार आणे दिले व काढता पाय घेतला. त्याकाळी दोन आणे, चार आणे वाचवणं व पॉकेटमनी साठविणं हा एक आवडता उद्योग असे.
ही कशी मुले आहेत?..नापास होतात? दंगलीवर पुस्तिका काढतात. ती रस्त्यावर विकतात, फंड गोळा करतात..! ही काय भानगड आहे? असं विचारचक्र मनात सुरू झालं. याविषयी चर्चा तरी कुणाशी करणार? हा कुमार सप्तर्षी म्हणजे भलतंच विचित्र प्रकरण दिसतंय. नापास झालो हेसुद्धा किती थंडपणे बोलला! विद्यार्थी जीवनात कायम टॉपर राहिलेल्या मला हे सगळं अजब वाटलं. मैत्रिणींशी बोलले. मेडिकलची मैत्रीण म्हणाली, ‘‘जरा जपून ऊर्मिला, ही मेडिकलची मुलं भारी आहेत. अन्याय झाला की लगेच आंदोलनं करतात. मुला-मुलींना एकत्र करतात- मुलींशी मैत्री करतात. त्यांच्यापैकी एकाने तर मेडिकलच्या कॉलेज क्वीनशी दोस्ती केलीय- खेडय़ातला आहे.’ तो मुलगा म्हणजे कुमार होता. माझं कुतूहल जागं झालं. उत्सुकता वाढली. हीच मुलं संघटनेची सभासद फी म्हणून रक्तदान करायला लावत. मी ज्या स्तरात व जातीत (गुजराथी) वावरले होते, त्या समाजातील तरुणांपेक्षा, त्यातील वातावरणापेक्षा हे तरुण व त्यांचं वागणं नक्कीच वेगळं होतं. नंदूच्या गच्चीवरील माझी ये-जा वाढू लागली.
तत्कालीन सामाजिक घटनांवर चर्चा करणं, नवनवीन पुस्तकं वाचणं, त्यावर मतं मांडणं, पुरोगामी विचारांचा मागोवा घेणं, लेख लिहिणं, हॉस्पिटलमधील गरजूंना वेगवेगळ्या पद्धतीची मदत करणं, त्यांच्यासाठी फुकट औषधं गोळा करणं, अशी बरीच कामं आम्ही ग्रुपने करीत असू. एकत्रित काम करताना या नव्या मित्र-मैत्रिणींबरोबर खूपच छान वाटू लागलं. मन रमू लागलं. सहवासाची, हास्यविनोदाची ओढ वाटे. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मला हे सर्वजण मैत्रीण मानतात. हा मैत्रीभाव लक्षात आला, उत्फुल्ल वाटू लागलं.
मी घरी पोचल्याबरोबर ‘आम्ही विद्यार्थी व आमच्या दंगली’चा लगेच ओळन्ओळ वाचून पिट्टा पाडला. मजकुरावर खुणा केल्या, प्रश्न काढले. मेडिकलचा विद्यार्थी असूनही कुमारची बुद्धी वेगळ्या पद्धतीने विचार करते हे मला जाणवलं. त्या क्षणी मनात कुमारबद्दलच्या आकर्षणाची ठिणगी पडली. आजूबाजूला बरेच तरुण असताना कुमारविषयी वेगळंच आकर्षण वाटत होतं. तो वैचारिक भूमिका घेऊन कुठल्याही विषयाचे मुद्दे ठामपणे मांडत असे. समोरच्या कोणाही व्यक्तीशी तो न चिडता, शांतपणे व समजूतदारपणे कोणत्याही विषयावर बोलू शकत असे, याचं मला नवल वाटे. परीक्षेचा अभ्यास हा शेवटच्या पंधरा दिवसांत करणं हा त्याचा खाक्या होता. बाकी सर्व वेळ सामाजिक कामं करणं, मित्रांच्या अड्डय़ावर वेळ देणं, लहान-थोर माणसांना महत्त्व देणं, लोकांना भेटणं हे त्याचं आवडतं काम. या त्याच्या आवडीमुळे तो घरातून तुटू लागला होता. मला हे जाणवू लागलं होतं. हा मुलगा मला वेळ देण्यास धडपड करतो, याने बरं वाटे. पण तो सर्वानाच जवळचं मानून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो.. अथकपणे, याचं मला आश्चर्य वाटे.  गप्पा, कंपनी, मैत्री याबाबतीत मी फार चूझी आहे हे एव्हाना त्यालाही कळलं असावं. मी जेव्हा त्याच्या सहवासात गप्पा मारण्यात जास्त वेळ घालवू मागत असे, तेव्हा तो इतरांना न दुखवता हळुवारपणे कटवीत असे. ही जाणीव सुखद वाटू लागली.
मैत्रीच्या किंवा जवळ जाण्याच्या नादात चार-पाच वर्षे सरून गेली. कामं चालू होती. शिक्षण चालू होतं. ‘हिंदविजय’ सिनेमागृहात होणाऱ्या प्रा. रजनीशांच्या आध्यात्मिक भाषणांच्या वेळीही आमची भेट व्हायची. ती भाषणे ऐकायला मी एकटीच सायकलवरून जात असे. व्याख्यान संपल्यावर कुमार, अनिल, मोना (कुलकर्णी) सगळे दिसायचे. तिथं मला पाहून त्यांना आश्चर्य वाटे. मला आध्यात्माच्या बाबतही बरेच प्रश्न असायचे. रजनीशांच्या व्याख्यानातून थोडे तिढे सुटताहेत वाटायचं. रजनीशांची व्याख्याने ऐकणं, त्यांची पुस्तकं वाचणं, रक्तदान शिबिरं, कोयना भूकंपग्रस्तांसाठीची कामं, खेडय़ापाडय़ातून औषधं वाटणं, श्रमदानाने रस्ते बांधणं, ‘माणूस प्रतिष्ठान’बरोबर दलितांच्या विहिरींमधील गाळ काढणं, बाबा आमटे यांचा सुरुवातीचा सोमनाथ प्रकल्प इ. अनेक कामांतून मी कुमारबरोबर राहण्याचा व या सर्व कामांमध्ये सहभागी होण्याचा सपाटा लावला. त्या वयात पडणाऱ्या अनेकविध प्रश्नांची उत्तरं त्यातून मला मिळू लागली. रजनीशांचं व्याख्यान झाल्यावर कुमारबरोबर आध्यात्मिक चर्चा करताना अनेक प्रश्नांची गुंतावळ उलगडू लागली. रजनीश तेव्हा ‘भगवान’ झाले नव्हते. या सर्व कामांतून व चर्चामधून नकळत आमच्या मैत्रीची वीण विणली जाऊ लागली. मैत्रीचे बंध केव्हा घट्ट होत राहिले ते कळलेच नाही. तो काळ छान वाटायचा. आपले व्यक्तिमत्त्व, आपली बुद्धी, आपल्या जाणिवा, आपल्या नेणीवा, सर्वाचाच साक्षात्कार होत होता. तशी मी हुजूरपागेची विद्यार्थिनी, कायम पहिल्या क्रमांकावर राहणारी. खेळ, नाटक सर्वच क्षेत्रात मी अ‍ॅक्टिव्ह असे. पण हा अनुभव मात्र वेगळा होता. करिअरसाठीचा बुद्धीचा वापर व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठीचा बुद्धीचा वापर यातला फरक मला एक वेगळीच दृष्टी देत होता. मला हे मनापासून भावत होतं. एक गोष्ट मात्र मला नक्की कळली होती, की हा मुलगा, ज्याची मैत्री आपल्याला भावतेय तो बुद्धिमान आहे. पण त्याला रूढार्थाने अभ्यास करण्यात रस नाही. तो प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतो. प्रश्न वैयक्तिक वा सामाजिक असोत, बुद्धीच्या आविष्काराचे हे दर्शन होते.
या माणसाला जरा भावना कमी आहेत की काय म्हणून मी शोध घेत राहिले. आपल्या भावनांना छातीशी घट्ट आवळून ठेवण्याची कला त्याला अवगत होती असं लक्षात आलं. पुढे तुरुंगाच्या वाऱ्या करताना त्याला याचा उपयोग झाला. मी तुरुंगाबाहेर तशी एकटीच असे. तो तुरुंगात असताना माहेर, नातेवाईक किंवा मित्रमंडळींची मदत न घेता जगण्याची कला मला आध्यात्मिक वाचनातून अवगत झाली. कुमार आत व मी बाहेर हा अनुभव अनपेक्षित नव्हता, फार सुखावहही नव्हता, पण जगलो, तरून गेलो.
सामाजिक कामांची याला हृदयापासून आवड. तेच कुमारचं पहिलं प्रेम. त्यातून तो विविध तत्त्व प्रणालींचा अभ्यास करीत राहिला. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात आवडलेल्या कॉलेज क्वीनवरील प्रेमाला त्याने हळुवारपणे तिलांजली दिली. मेडिकल प्रॅक्टिकल आदी रुटीन जीवन त्याला जमणारं नव्हतं. भावनांचा निचरा करून आत्मपरीक्षण करायला हा तरुण एकटाच भणंगासारखा, पैसे जवळ न घेता हिमालयात उंच पर्वतांच्या सहवासात हिंडत राहिला. वयाच्या मानाने तो अधिक गंभीर होता. पण मी भेटले की खूश असे. गर्दीला कटविणं व दोघांनी एकांतात गप्पा मारत बसणं याची त्याला ओढ असे. आमचं शेअरिंग वाढत गेलं. एकमेकांच्या घरातील वातावरणाचं पण शेअरिंग होई. माझ्या घरात गुजराथी वातावरण, पण पुढारलेलं. गांधीवादी, काँग्रेसमय, स्वातंत्र्य सैनिकांचं घर, आई-वडील दोघंही तुरुंगात गेलेले. त्यांनी मला पाच भावंडांमध्ये स्वतंत्र मुलासारखंच वाढविलं. सर्व पुढाऱ्यांची भाषणं ऐकणं, सामाजिक कामात भाग घेणं याला आडकाठी नव्हती. माझ्याभोवती मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं असे. सर्व मित्रही घरी मुक्तपणे येत. हा मोकळेपणा त्यावेळी क्वचितच मुलींच्या वाटय़ाला येई. कुमारला त्यामुळे माझ्याविषयी फारशी खात्री नसे. ही श्रीमंत, दिसायला चांगली, आधुनिक पेहराव करणारी, पुढारलेल्या विचारांच्या माणसांच्या घरातली, कोणताही प्रश्न आहे असं वाटत नसलेली, सतत खिदळणारी, रजनीश ऐकणारी, बाबा आमटेंकडे येणारी, ‘आम्ही विद्यार्थी व आमच्या दंगली’ वाचून चर्चा करणारी, व्रतवैकल्यं, स्वयंपाकपाणी व घरकामं बाईला जखडून ठेवतात म्हणणारी, अंधश्रद्धा नसणारी व देव न मानणारी, त्यावर ठामपणे स्त्री-किलरेस्करमधून लेख लिहिणारी ही मुलगी आपल्याला कशी रिअ‍ॅक्ट होईल याविषयी त्याला कदाचित खात्री नसावी. त्या काळातला माझा फॉर्म कदाचित त्याला अचंबित करीत असावा (त्याने ते अजून कबूल केलेलं नाही.) पण त्याला माझ्याविषयी आकर्षण वाटू लागलं आहे याची मला खात्री पटली होती. त्याला कदाचित प्रेम व्यक्त करण्याचं धाडस होत नसावं. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार कामं मार्गी लावून फत्ते करण्याच्या इराद्याने मीच मग त्याच्यासमोर धाडकन लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
असं झालं की, २० मार्च १९६७ ला माझ्या घराखालून माझ्या नावाने जोरजोरात हाका ऐकू आल्या. भरदुपारी. मी कायद्याच्या परीक्षेचा अभ्यास करीत होते. पाहिलं तर कुमार व अनिल सायकलवर एक टांग जमिनीवर-रस्त्यावर ठेवून उभे होते. ‘ऊर्मिला येतेस का- सभेला? बिहारहून जयप्रकाश नारायण आलेत’ असं विचारत होते. मी पुस्तक फेकून उडय़ा मारीत सायकल काढली व त्यांच्याबरोबर सभेस गेले. मला प्र. के. अत्रे, एसेम अण्णा, मधु लिमये, डॉ. लोहिया, जॉर्ज अशा सर्वाच्याच सभा ऐकायला आवडायच्या. बरेच मुद्दे समजत. डोक्यातल्या प्रश्नांचा उलगडा व्हायचा, बरं वाटायचं. जयप्रकाशजींची छोटीशी बैठक होती. बिहारच्या दुष्काळातील कामाबद्दल. बैठक संपली. आम्ही निघालो. मी व कुमार मागे मागे रेंगाळून सटकलो. एसपी कॉलेजच्या मागे चार आण्याचा उसाचा रस पिऊन (पैसे मी दिले), सायकली हातात घेऊन चालत चालत टाइमपास करीत निघालो. मी धीराने रेटून कुमारला लग्नाबद्दल मत विचारलं. खरं म्हणजे साधा प्रश्न होता. तो फारच फाफटपसाऱ्याने सांगू लागला. मी अडवलं आणि म्हटलं, ‘‘आपली ही मैत्री आपण कशी टिकवायची?’’ तुझं कोणाशी तरी, माझं कुणाशी तरी अनोळखी व्यक्तीशी लग्न होईल कदाचित. मग आपण आपल्या मैत्रीचं काय करायचं? कविता की लोणचं? आपलं मैत्र टिकवायला चोवीस तास एकत्र राहणं, प्रत्येक काम, विचार,एकमेकांसोबत राहून शेअर करणं हे आपण दोघांनी एकमेकांशी लग्न केलं नाही तर कसं शक्य आहे? मग करायचं का आपण लग्न?’’ कुमारवर एकदम बॉम्ब पडला होता.
त्याच्या प्रेरणा राजकीय आहेत. तो प्रस्ताव सहज मान्य कसा करणार?  म्हणाला, ‘‘एक महिना आपण भेटू या नको, तू नीट विचार कर. तरीही वाटत राहिलं तर करू या. पण माझ्याशी लग्न म्हणजे वादळाशी झुंज आहे. मी सामाजिक, राजकीय कामं करणार. डॉक्टर असलो तरी प्रॅक्टिस करणार नाही, तुला आर्थिक व एकूणच सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. एकखांबी संसार करावा लागेल. मी संसारात पाहुण्यासारखा असेन.’’ मी हसून म्हटलं, ‘‘अरे, मी हा विचार गेले दोन महिने करून ठेवला आहे. मी जात मानत नाही. हुंडा, लग्नविधी, देवधर्म मानत नाही. मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे? तुलाही माझ्याशिवाय कुणी नाही(!) मी तुला तुझ्या आवडीच्या कामाकरिता पूर्ण स्वातंत्र्य देऊ शकेन, मग तू पण मला माझ्या कामासाठी, वाचनासाठी, आवडीसाठी स्वातंत्र्य द्यायला हवं. जे स्त्रीला कधीच शक्य होत नाही.. मी स्त्रियांनी करण्याच्या टिपिकल कामात वेळ घालवणं अर्थहीन मानते, तेव्हा बघ, तूच विचार कर.’’
कुमार मनातून खूश झालेला. पण पठ्ठय़ाने तसं दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी भेटला तेव्हा, ‘वठलेल्या झाडाला तुझ्यामुळे पालवी फुटली’ म्हणाला. त्यानंतर जवळ जवळ चार वर्षांनी आम्ही लग्न केलं. लग्न सातशे रुपयांत केलं. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार रजिस्टर्ड लग्न झालं. युक्रांदीय न बोलवता आले. नागपूरच्या कमलाताई होस्पेट आजी, नानासाहेब गोरे, एसेम अण्णा, माझे आजोबा चोपडय़ाचे मगनलाल गुजराथी, मुकुंदराव किलरेस्कर, भाई वैद्य, बाबा आढाव, असे खूपच लोक आले. बाबा आढावांनी तर माझ्या मंगळसूत्राकरिता कुमारला पैसे दिले होते. दोनशे रुपये. एक तोळ्याचं मंगळसूत्र होतं. मी सुरुवातीला ते आवडीने घालत होते. नंतर सोडून दिलं.
१० मे १९६९ ला लग्न केलं. लग्न झाल्याबरोबर दिल्लीत कुमारला नोकरीत रुजू व्हायला माझ्यासह जायचं होतं. राजकीय कामामुळे नोकरीवर रुजू होऊ नये म्हणून तार आली. दिल्लीत एसेम अण्णांकडे राहणार होतो. पुढय़ात प्रश्न होता. हार मानेल तो कुमार नाही. कुमारने चाळीस मित्रांना प्रश्न सांगितला. प्रत्येकी पाचशे रुपये जमा केले, नंतर ते परत केले व सध्या आम्ही राहतोय तेथे डॉ. आनंद नाडकर्णीना भेटून फ्लॅट बुक केला. कै. डॉ. काशीनाथ गावसकर सर, मे. पु. रेगेसर या सर्वाचा खूप आधार असे. ते युक्रांदवर माया करीत. म्हणजे आमच्यावरही त्यांचा जीव असे. हा फ्लॅट कुमारने माझ्या नावावर करून दिला. ‘‘मी आता कामाला मोकळा झालो’’ म्हणाला. कै. मा. अण्णासाहेब सहस्रबुद्धे, मा. बाळासाहेब भारदे या पितृतुल्य मंडळींनी ऊर्मिलाच्या कार्यक्षेत्रात तिला राहू दे व तू नंतर फिरत बस, असा सल्ला दिला होता.
कुमारच्या  क्रांतिकारी, युक्रांदीय कामामुळे, आंदोलनामुळे त्याच्या तुरुंगवाऱ्या वाढल्या होत्या. प्रचंड आत्मविश्वास, बौद्धिक बळ याच्या जोरावर कष्ट सहन करीत तो ही वाट चालत होता. मला तो तुरुंगातून घरी आला, आंदोलनानंतर घरी आला तर फार उत्सुकता असे. सर्व गोष्टी तपशीलवार सांगणं, प्रत्येक घटनेतील किस्से, त्यामागील राजकारण, त्यातील विनोद, त्याने केलेल्या गमतीजमती यात धमाल यायची. अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून तो प्रत्येक घटनेची समीक्षा करीत असे. एवढय़ा विचित्र व वैविध्यपूर्ण, धाडसी, असुरक्षित अशा जगण्यातून त्याला मौज वाटत असे. त्यातच त्याला जीवनाचा अर्थ लागत असे. माझा जीव मात्र टांगणीला लागलेला असे. तेव्हा त्याचे शब्द आठवायचे की माझ्याबरोबर जीवन म्हणजे वादळाशी झुंज असेल. मी पण शिकले वादळांशी सामना करण्याचं. माझ्या मनात आत्मिक सोशिकतेचं एक आंतरिक तंत्र निर्माण झालं. एकमेकांना खूश ठेवायचं तंत्रही साध्य झालं. त्यामुळे आता भावनात्मक किंवा असुरक्षितता वाटेनाशी झाली. कामातून निर्माण झालेल्या मित्रमंडळींशी एक आत्मीय नातं निर्माण झालं. नवीन नाती जोडली जात होती.
कुमारच्या अस्थिर व वेगवान जीवनशैलीमुळे आम्ही मूल होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर टाकत होतो. मुख्य म्हणजे तो कुमारने माझ्यावर सोपविला होता. मला ज्या वेळी सुरक्षित व विश्वास वाटेल तेव्हा आई व्हावं, असं मी ठरविलं होतं. ध्येयासाठी आईपण राहिलं तर मला न्यून वाटत नव्हतं. कुमारला ते मान्य होतं. तसंच प्रकर्षांने वाटलं, तर एखादी गरिबाची पोर दत्तक घ्यायचा माझा विचार होता. २६ जानेवारी १९७७ रोजी कुमार जेलमधून अचानक सुटला. सर्वच जण सुटले होते. नंतर जनता पक्षातर्फे अहमदनगर (घरून) मधून आमदार म्हणून निवडून आला. आता जरा स्थिरता वाटू लागली होती, कबीरचा जन्म २३ जानेवारी १९७९ रोजी झाला. संत कबिरांचे दोहे मला आवडत. एका पहाटे कबिराचा दोहा ऐकताना मी किंचाळले, आईला म्हटलं, ‘याचं नाव कबीर ठेवू या’. कुमारलाही नाव आवडलं. पुढे त्याला आडनाव न लावता (कारण त्यावरून जात कळते) ‘कबीर उमाकुमार’ असं नाव नोंदविलं. नोंदणी अधिकाऱ्यांनी खूप डोकं खाल्लं, मला त्याच्याशी झगडावं लागलं. वडिलांचं नाव व आडनाव लावणं हा कायदा नसून कस्टम आहे. पुरुषप्रधान मानसिकतेतून रूढ झालेला तो वापर आहे, असं सांगूनही व्यर्थ होतं. पण मी तसंच नाव रजिस्टर करा, त्यास आम्ही जबाबदार आहोत असं सांगितलं. कबीरने ते नाव तसंच चालू ठेवलं आहे. आपल्या नावापुढे आई-बाबांचं नाव ही कल्पना तो जो विचारेल त्याला समजून सांगत असे. आवडते आई-बाबा सतत बरोबर आहेत असं वाटतं, असं तो म्हणतो. तो हार्टसर्जन (टइइर टर (ॅील्ल) ट.उँ (उं१्िरूं) असून, लिव्हरपूल येथे हार्ट इन्स्टिटय़ूटमध्ये कार्डियाक सर्जन म्हणून कार्यरत आहे. डिसेंबर २०१४ पर्यंत मायदेशी परत येणार आहे.
कुमारचा राजकीय, सामाजिक कामांचा झपाटा चालूच आहे. वाढलेलं वय किंवा काही मोठे जीवघेणे आजार याची त्याला तमा वाटत नाही. आमच्या सहजीवनाला १० मे २०१४ रोजी आता पंचेचाळीस (४५) वर्षे पूर्ण होतील व आमच्या मैत्रीला पन्नास (५०) वर्षे पूर्ण होतील. एवढी वर्षे कशी सरली हे समजलंच नाही. आमचं जीवन गाणं चालूच आहे. नवनवीन तालसूर येऊन मिळत आहेत. तरुण मुलं-मुली अजूनही आमच्या सहवासाची ओढ घेऊन भेटायला येतात, यासारखा साफल्याचा दुसरा भाव नाही.
खिशात दमडी नसताना कुमार जे काम करतोय त्याची किंमत नंतर कळणार आहे, त्याच्याविषयी काहीही तक्रार करायची नाही, असं माझे बाबा मला नेहमी म्हणायचे. आम्ही अजूनही वादविवाद, भांडणं, अगतिकता, सहवासाची ओढ, एकमेकांच्या टिंगल टवाळ्या, यातून मुक्त नाही; ते पाहून माझी ९५ वर्षांची आई मला, माझे बाबा काय म्हणायचे ती आठवण करून देत असते.
कुमार सामाजिक, राजकीय कामांसाठी लोकवर्गणी- देणग्या उभ्या करतो व लगेच त्या कामासाठी वापरून टाकतो. हिशेब तयार असतो. सत्याग्रही विचारधारा मासिक, खेडनगर येथील शाळा, महाविद्यालय हा आमचा शैक्षणिक ट्रस्ट, इ. सगळीकडे तो पैसे साठवत नाही. वापरत राहतो. संस्था वाढवत राहतो, निराश होत नाही. पैसे संस्थेत साठवले तर त्यांना मुंगळे लागतात असं म्हणतो. राजकारणाशिवाय काही नाही- माणसं, त्यांचे आपापसातील हितसंबंध, कौटुंबिक संबंध सगळीकडेच राजकारण असतं. त्या राजकारणाचा वापर चांगल्या बदलासाठी करून घेण्याचं कौशल्य असलं पाहिजे, असं तो म्हणतो. सर्वसामान्य माणसापासून अगदी खेडय़ातल्या बैलगाडीवाल्यापासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंतच्या माणसाबरोबर तो एकाच आत्मीयतेने गप्पा मारतो. तो माणसांचा लोभी आहे, पैशाचा नाही. सतत काम, लिखाण, विश्लेषणात्मक गप्पा किंवा गप्पांचा अड्डा. वेळ असला की ‘माझ्या’ कंपनीबरोबर नाटक, सिनेमे व गमतीजमती, विनोद शेअर करणं- त्या वेळी तो राजकीय व्यक्तीनसतो. कुमार आजारी व स्वस्थ बसलेला मी पाहिलेला नाही. या अस्वस्थ आत्म्याबरोबर जगण्याची मलाही सवय झाली आहे.
अशा आमच्या नात्यातून घराला घरपण राहतंच, शिवाय घरात ऊब आणि ओढ असते. त्या ओढीने आमची पोरं-     डॉ. दीप्ती (सून) व कबीर सतत आमच्याबरोबर गप्पा मारायला उत्सुक असतात- यापेक्षा वेगळी तार कोणती छेडायची?    

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा