‘शोभना जो भी करती है, शोभनीय होता है’ हे विनोबा भावे यांचे त्यांच्याबद्दलचे उद्गार. शोभना रानडेंनी हे आपल्या कार्यकर्तृत्वाने मिळवलेले. शैक्षणिक क्षेत्रात आणि स्त्रीसक्षमीकरणात मोलाचं काम केलेल्या पद्मभूषण डॉ. शोभना रानडे आज वयाच्या नव्वदीमध्येही तेवढय़ाच सक्रिय आहेत. त्यांच्याविषयी-

तेल नाही, वात नाही
आधाराचा हात नाही
त्याच्या घरी
एकदा तरी
एक दिवा लाव..
विनोबा भावे यांच्या या शिकवणीनुसार दुर्बल गटातील स्त्रिया व मुलं यांच्या अंध:कारमय जीवनात केवळ एक दिवा नव्हे तर लखलखत्या प्रकाशाच्या असंख्य दीपमाळा लावून हजारो दु:खितांचं आयुष्य उजळणाऱ्या पद्मभूषण डॉ. शोभनाताई रानडे यांचं जीवन म्हणजे एका समर्पणाची कथा आहे. ताई आज ९० वर्षांच्या आहेत. वयाच्या १४/१५व्या वर्षांपासून अंगीकारलेलं सेवेचं व्रत आजही तितक्याच जोमाने व निष्ठेने सुरू आहे. ‘कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’, ‘गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी’ व ‘बालग्राम महाराष्ट्र’ या तीन सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून महिला व बाल कल्याणासाठी त्यांनी केलेलं काम पाहताना आपली मती कुंठित होते.
पुण्यातील नगर रोडवरील आगाखान पॅलेसच्या निसर्गरम्य परिसरात ‘गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी’चं कार्यालय आहे. या ठिकाणी त्या आजही सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात नियमितपणे जातात. कामासाठी काश्मीर ते कन्याकुमारी फिरत असतात. टवटवीत गोरा रंग, केसाचा बॉबकट, नियमित व्यायामाने राखलेलं निकोप आरोग्य व चापूनचोपून नेसलेली खादीची साडी अशा सदाबहार ताईंकडे पाहताना वार्धक्य त्यांच्यापासून चार हात (की कोस) लांब का आहे ते समजतं. नव्वदीतील त्यांची तेज स्मरणशक्ती, तल्लख बुद्धी, अफाट कार्यशक्ती आणि ओसंडून जाणारा उत्साह.. सगळंच कल्पनातीत!
ताईंचा जन्म समाजसेवा हा त्यांचा स्वयंभू गुणधर्म असलेल्या घरात झाला. गांधीजींच्या साहित्याने त्यांना घडवलं. कामाची प्रेरणा दिली. शाळेत असल्यापासूनच त्यांनी स्काऊट-गाईडस्तर्फे ग्रामस्वच्छता, साक्षरता.. अशा शिबिरांसाठी खेडय़ापाडय़ांत जायला सुरुवात केली.
त्या वेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे १५व्या वर्षीचं त्यांचं लग्न झालं आणि त्या पालघरहून पुण्याला आल्या. सासरी रानडय़ांचं एकत्र कुटुंब, पण त्यांच्या सासऱ्यांनी आपल्या या सूनेची बुद्धिमत्ता हेरली व तिला शिक्षणासाठी उत्तेजन दिलं. ताईंना ते रोज इंग्रजी दैनिकातील अग्रलेख वाचून दाखवायला सांगत. त्यातील कठीण शब्दांचा अर्थ कळावा म्हणून त्यांनी ऑक्सफर्डची डिक्शनरीही त्यांना आणून दिली. आज ताईंचं इंग्रजीवर जे प्रभुत्व आहे त्याचं श्रेय त्या आपल्या सासऱ्यांना देतात.
ताई म्हणाल्या, ‘मी मॅट्रिक लग्नानंतर झाले. या पदवीबरोबर रानडय़ांची सून ही उपाधीही मिळाल्याने नंतर एस. पी. कॉलेजमध्ये शिकताना मला नऊवार साडी, अंगभर पदर, घट्ट अंबाडा आणि नखशिखांत दागिने अशा वेशात बाहेर पडावे लागे.’ शिकत असताना पाठोपाठ ३ मुली झाल्या. त्यांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, घरच्या जबाबदाऱ्या आणि सासऱ्यांच्या दुपारच्या वरणभातावर तूप घालायची वेळ हे सगळं सांभाळून त्यांनी बी.ए., डबल एम.ए. व पीएच.डी.देखील केलं.
कॉलेजमध्ये असताना मादाम माँटेसरी यांच्या विचाराने त्या प्रभावीत झाल्या. परिपूर्ण माणूस घडण्यासाठी त्याच्या पंचेंद्रियांचा विकास लहानपणीच घडणे गरजेचं आहे हे जाणून लेडी माँटेसरींनी लहान मुलांसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमाची उपयुक्तता त्यांना पटली आणि त्यांनी ‘पूना वूमन्स कौन्सिल’तर्फे या प्रशिक्षणाचा ३ महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. एस. पी. कॉलेजात स्वत: माँटेसरी मॅडमनी दिलेल्या या ट्रेनिंगला ताईंनी उद्युक्त केल्यामुळे तब्बल ३१७ विद्यार्थी हजर होते. लगेचच ताईंची पहिली बालवाडी पुण्यात ‘बॉम्बे सॅपर्स’ या आर्मी सेंटरला सुरू झाली. नंतर त्या जिथे जिथे गेल्या तिथे तिथे त्यांनी कस्तुरबा ट्रस्टमार्फत बालवाडय़ा सुरू केल्या. आजही त्यातील बहुसंख्य बालवाडय़ा ‘अंगणवाडी’ नावाने मुलांवर संस्कार करत आहेत.
ताईंचे यजमान कै. सीताराम यशवंत रानडे हे नागरी अभियंता होते. १९५४ मध्ये त्यांनी आसामच्या तेल कंपनीत नोकरी स्वीकारल्याने ताई आसामला गेल्या. गेल्या-गेल्या त्यांनी दिगबोईला एक शिशूनिकेतन सुरू केलं, ज्याची नोंद पुढे आसाममधील पहिलं बालशिक्षण केंद्र म्हणून झाली.  संपूर्ण नेफा भागात पुढे बालवाडय़ांचं जाळं पसरलं.
विनोबा भावे यांच्या आसेतू-हिमाचल या भारत पदयात्रेच्या मोहिमेतील पश्चिम बंगाल ते आसाम हा शेवटचा पडाव. ताईंनी या पदयात्रेत सामील होण्यासाठी विनोबांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले, ‘फक्त एक अट आहे. पदयात्रेच्या दर चौथ्या दिवशी चार हजार रुपयांची पुस्तकविक्री व्हायला हवी. ताईंनी हे आव्हान स्वीकारलं. पुस्तकांच्या किमती किती तर चार किंवा आठ आणे. तरीही वाटेतलं घर न् घर पिंजून काढत त्यांनी विनोबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. याचा एक फायदा असा झाला की, ‘लोकांशी बोलून बोलून त्यांना आसामी भाषा येऊ लागली.’
या एक महिन्याच्या पदयात्रेपासून त्यांच्या कामाला दिशा मिळाली. जंगलातून जाताना त्यांनी विनोबांना विचारलं, ‘मी कोणतं काम करू?’ ते म्हणाले, ‘हे जंगल बघ, इथे मोठे वृक्ष आहेत, तशी छोटी झाडंही आहेत. मोठय़ा झाडांच्या छायेत छोटी झाडं वाढताहेत. त्यांच्यात वेली गुरफटून गेल्यात. सगळा निसर्ग कसा एकरूप झालाय. हाच आदर्श ठेवून तू आसाममधील विविध जातीजमातींना एकत्र जोडण्याचं काम कर. स्त्रिया , लहान मुले यांच्या समस्या सोडवून त्यांना समर्थ बनव.’
विनोबांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांची वाटचाल सुरू झाली. पदयात्रेमुळे त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. सेवा हेच आयुष्याचं ध्येय ठरलं. पदयात्रा संपली त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावरील ‘लखिमपूर’ येथे विनोबांनी त्यांचा ६वा ‘मैत्री आश्रम’ स्थापन केला आणि त्याची सर्व जबाबदारी ताईंवर टाकली. ताईंनी तिथे घेतलेल्या ‘मैत्रीची साधना’ या पहिल्याच शिबिराला मुंबईहून बोगी भरून माणसं आली होती.
नागालँडमध्ये फिरताना नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे पीडित झालेल्या अनेक स्त्रिया त्यांना भेटल्या. त्यांची एकजूट करत त्यांनी त्या त्या गावी दारूबंदीचे प्रयोग केले. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं म्हणून खादी विणायला शिकवलं. त्यांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री केली. त्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केलं. मुलांचे कॅम्प्स घेतले. दरवर्षी ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरील गावच्या गाव उद्ध्वस्त होत, त्यांच्या पुनर्बाधणीसाठी त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांची धडाडी व लोकसंपर्क पाहून त्यांना प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांकडून दिब्रुगड येथील आमदारकीची ऑफर आली, पण विनोबांनी निक्षून सांगितलं, ‘परप्रांतात राहून तिथल्या जनतेची फक्त सेवाच करायची. कुठलंही अधिकाराचं पद घ्यायचं नाही.’ त्यांचा हा सल्ला शिरोधार्य मानून सत्तेच्या राजकारणापासून ताई कायम दूर राहिल्या.
१९७२ मध्ये पतीच्या निवृत्तीनंतर पुण्यात परत आल्यावर ‘कस्तुरबा ट्रस्ट’च्या माध्यमातून स्त्रिया व मुलांच्या सबलीकरणाचं काम त्यांनी सुरूच ठेवलं. महाराष्ट्रातील १० खेडय़ांत त्यांनी साक्षरता, सकस आहार, गरोदरपणात व प्रसूतीनंतर घ्यायची काळजी, सेविकांचं काम या संबंधीचे वर्ग सुरू केले. ‘वर्ल्ड लिटरसी ऑफ कॅनडा’ या संस्थेकडून मदत मिळवून अमरावतीतील ‘अंजनगाव सुरजी’ या गावच्या सर्वच सर्व महिलांना (१०० टक्के) साक्षर केलं. टाटा स्कूल ऑफ सोशल सायन्सने त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत त्यांचा विशेष गौरव केला.
विनोबांना भेटण्यासाठी ताईंची मधूनमधून पवनारला फेरी असायची. असंच एकदा त्या तिथे गेल्या असताना गांधी निधीची अखिल भारतीय समिती विनोबांकडे आली होती म्हणून त्या बाहेरच्या बागेत फिरत बसल्या. थोडय़ा वेळाने विनोबांची हाक आली व त्यांनी निर्णय सांगितला, ‘आज से आगाखान पॅलेस से गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी का काम शोभना करेगी।’ कोणते काम विचारल्यावर उत्तर मिळालं, ‘मी काही सांगणार नाही. गांधीजींनी त्यांच्या आत्मचरित्रात जे लिहून ठेवलंय ते वाचायचं, मनन करायचं आणि कामाला लागायचं.’
ताई म्हणाल्या, ‘आगाखान पॅलेस’च्या परिसरात कस्तुरबांची समाधी असल्यामुळे तिथून स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग सुरू होईल हे गांधीजींचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले.’ यासाठी त्यांनी प्रथम महिलांच्या नॅशनल ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटची स्थापना केली. घरकामातील मदतनीस, सोशल वर्कर, आदिवासी पाडय़ांवर काम करणाऱ्या स्वयंसेविका.. अशा सेवांसाठी स्वत:च अभ्यासक्रम आखला आणि प्रशिक्षण सुरू झालं. आतापर्यंत या माध्यमातून ५०० महिलांनी ‘सोशल वर्कर’ हा अभ्यासक्रम पूर्ण केलाय व त्यातील ६० टक्क्य़ांवर महिला ग्रामीण भागात कार्यरत आहेत, त्यांच्या क्षमतेनुसार बदल घडवत आहेत.
कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालयाची स्थापना (१९८८) हे गांधी नॅशनल मे. सो.चं पुढचं पाऊल. या विद्यालयातून शिकलेल्या स्त्रिया पुढे खादीचं उत्पादन, त्यावरील प्रक्रिया आणि विक्री अशा विविध उद्योगात स्थिरावल्या. १९९७ पासून इथे मसाला बनविणे, रेडिमेड कपडे, फळेभाज्या टिकविणे, मेणबत्त्या, अत्तर, लोणची, पापड इ. बनविणे असे २८ प्रकारचे वर्ग सुरू झाले. या वर्गाचा दरवर्षी साडेतीन ते चार हजार स्त्रिया लाभ घेत आहेत. त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी ठिकठिकाणी केंद्रं उघडली आहेत.
विश्वबंधुत्व ही गांधीजींची संकल्पना साकार करणारा ‘संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चालय’ हा प्रकल्प १९९७ पासून ताईंनी गांधी नॅ. मे. सो.च्या देखरेखीखाली आणला. या प्रकल्पाद्वारे सोमालिया, इथिओपिया, सुदान, अफगाणिस्तान.. अशा देशांतील असुरक्षित नागरिकांना वेगवेगळ्या देशात पाठवलं जातं. महाराष्ट्रात असे ३०० शरणार्थी आहेत. त्यांची सर्व प्रकारची काळजी घेण्याचं काम (मानसिक गरजांची पूर्तीदेखील) इथे केलं जातं. ताई व त्यांचे २५ सहकारी त्यांचे मायबापच आहेत. महात्मा गांधी, कस्तुरबा, विनोबा भावे व मादाम माँटेसरी या चौघांइतकाच प्रभाव ताईंवर टाकणारी ५ वी व्यक्ती म्हणजे डॉ. हार्मन मायनर. एस. ओ. एस. (सेव्ह अवर सोल) या मुलांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते संस्थापक. ताईंची कीर्ती ऐकून ते त्यांना भेटायला पुण्याला आले. त्यांच्या कार्यप्रणालीपाठचं तत्त्व असं की, ८ ते १० मुलं आणि एक आई असं कुटुंब एका छपराखाली ठेवलं तर त्यांना बरंचसं घरासारखं वातावरण, माया, प्रेम मिळेल. ताईंनी ही योजना महाराष्ट्रात ‘बालसदन’ या नावाने सुरू केली. त्यांचं पहिलं बालसदन खोपोलीजवळील ‘गागोदे बुद्रुक’ या गावी विनोबांच्या पूर्वाजित घरात सुरू झालं. पुढे बालग्राम महाराष्ट्र या नावाने ही चळवळ फोफावली.
बालग्राममुळे आज २००० अनाथ मुलांना हक्काचं घर मिळालंय. त्यातील ४० मुली लग्न होऊन सुखाने नांदत आहेत. १००० मुलं आपल्या पायावर उभी आहेत आणि दहा मुलं तर उच्चशिक्षण आणि नोकऱ्यांसाठी परदेशात झेपावलीत. समाजात ताठ मानेने वावरणाऱ्या या मुलांना ‘बालग्राम’ हे आजही आपलं घर वाटतं हे विशेष. ‘मुलांची काळजी’ हा निकष ठेवून मध्यंतरी भारत सरकारने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ३४ केंद्रांमधून ‘एसओएस’ बालग्रामला अव्वल नंबर मिळाला.
बालग्रामच्या विस्तारीकरणाचा एक भाग म्हणजे ताईंनी रस्त्यात भटकणाऱ्या मुलांसाठी मुंबई (कांदिवली) व पुणे (शिवाजीनगर रेल्वे स्टेशनसमोर) इथे सुरू केलेली २ आधारगृहं. लोकसहभागातून चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात रोजचं स्नान, दोन वेळचं गरम जेवण, महानगरपालिकेच्या शाळेत अनिवार्य शिक्षण याबरोबर नेहमीच्या आचरणातील जीवनमूल्यं मुलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.
विविध संस्था चालविण्यासाठी सेवाभावी व कार्यक्षम माणसं हेरणं आणि त्यांना सांभाळून ठेवणं हा ताईंचा स्वभावविशेष. कस्तुरबा ट्रस्टचं ‘सासवड’ केंद्र सुरू करताना त्यांना शेवंता मिळाली. ही तिथल्या सरपंचांची मुलगी. ताईंना ती पहिल्याच भेटीत आवडली. तिच्या वडिलांना विचारताच त्यांनीही अत्यंत विश्वासाने आपली ही १५/१६ वर्षांची मुलगी ताईंच्या झोळीत टाकली. शेवंताने ताईंची निवड सार्थ ठरविली. आज ६० वर्षांच्या शेवंताबाई चव्हाण सासवड केंद्राच्या आधारवड बनल्या आहेत.
७५ वर्षांच्या निरलस, निस्वार्थी सेवेचं फळ ताईंना अनेक पुरस्कारांच्या रूपात मिळालं. या बक्षिसांची रक्कमही त्यांनी गांधी नॅ. मे. सो.ला दान केली. सिंबॉयसिस विद्यापीठातर्फे मिळालेली डी.लिट, रिलायन्स फाऊंडेशन व सीएनएन आयबीएन टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने दिलेला जीवनगौरव पुरस्कार तसंच भारत सरकारने दिलेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार.. अशा एक से एक सन्मानांपेक्षा विनोबाजींनी विश्व महिला संमेलनाच्या निरोपाच्या भाषणात काढलेले गौरवोद्गार ‘शोभना जो भी करती है वो शोभनीय होता है..’ त्यांना अधिक मोलाचे वाटतात.   

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?