एका अनोळखी मुलीला घरात घेऊन मी फक्त स्वार्थ बघितला होता, हे मनाशी कबूल केले. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत ती थांबणार होती. दिवसभर तिला व्यग्र ठेवणं कठीण! शिवाय ही मुलगी कशी असेल? चोर असेल का? हिच्या घरी कोण कोण आहेत ? असे अनेक प्रश्न सतावायचे खरे!
मी पण कंटाळले होते. हौसेकरता मोठं घर घेतलं खरं, पण नीटनेटकं ठेवायचं म्हणजे.. त्यात कंबरेचा असहकार! अशातच दाराशी काम मागायला आलेली मुलगी देवदूतासारखी वाटली. ‘काम द्या काकू, छान काम करीन मी.’ नीता..नीतू.. खूप केविलवाणी दिसत होती सांगताना.
नीतू कामाला यायला लागली. एका अनोळखी मुलीला घरात घेऊन मी फक्त स्वार्थ बघितला होता, हे मनाशी कबूल केले. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत ती थांबणार होती. दिवसभर तिला व्यग्र ठेवणं कठीण! शिवाय ही मुलगी कशी असेल? चोर असेल का ? हिच्या घरी कोण कोण आहेत ? असे अनेक प्रश्न सतावायचे खरे! तुला आपल्या पद्धतीने काम करायची सवय नव्हती. पण शिकायची आवड होती, हे माझ्या लक्षात आले. तिला सतत काम हवं असायचं. कधी तिच्या बरोबरीने काम करताना मी तिच्याकडून तिच्या घरी कोण कोण आहे हे काढून घेतले. तिची आई जळून मेली होती. बाप मजूर , दारू प्यायचा. पोटाच्या खळग्यांत अन्न भरायला नीतू घराबाहेर पडली. शेतातले दगड-धोंडे वेचायचे काम मिळाले. एकदा बापाने ते पैसे हिसकले. नीतू, तिची धाकटी बहीण आणि भाऊ दोन दिवस उपाशी राहिले. संतापाच्या भरात बाबाशी भांडून तिनं घर सोडलं आणि मावशीकडे आली. मावशीने थारा दिला. पण दुकानात (कपडय़ांच्या) नोकरी लागल्यावर मामाने भांडून तिला आपल्या घरी नेले. मामाच्या मुलीचं लग्न ठरलं. त्याने लग्न मंडपात एक मुलगा बघून नीतूचं लग्न ठरवलं.
 काय खूश होती नीतू! मामाच्या घरी खाण्याची आबाळ व्हायची, पण सगळं विसरली. साखरपुडय़ाला या, म्हणून आम्हाला आग्रह करीत होती. १६ वर्षांचं निरागस वय.. मनातली स्वप्नं डोळय़ांत दिसण्याचं वय! उंच, सावळी (काळय़ातला थोडा उजळ रंग), नाकीडोळी नीटस्, काळे लांब केस. माझ्या सुनेचे कपडे तिला फिट्ट बसत. तयार होऊन हिल्सच्या चपला घालून चालायची तेव्हा आमच्या सोसायटीतल्या बायकासुद्धा तिला बघत राहायच्या. ‘ब्लॅक ब्युटी’ म्हणून कौतुक करीत. पण.. ज्या मुलाशी लग्न ठरलं तो वाईट चालीचा म्हणून कळलं, खोटं तिला पचत नव्हतं. त्या मुलाला भेटून कपडे वगैरे परत करून नीतूने लग्न मोडलं. मामा चिडला. त्याने घराबाहेर काढलं. मग ही पुन्हा मावशीकडे राहू लागली.
हळूहळू नीतू खुलत होती. तिला घरच्या कामांची सवय झाली. कोणत्या वेळी कोणतं काम करायचं ते कळू लागलं होतं. तिच्यातील बदल लक्षणीय होता. एका दगडाचं शिल्प तयार व्हावं आणि पैलू नजरेत भरावेत तसं झालं होतं. जिला कणीकपण भिजवता येत नव्हती ती उत्तम फुलके करायला २-४ दिवसांत शिकली. ओळखीचे लोक आले की तिच्या गरम फुलक्यांची तारीफ करायचे. ती पण अगत्याने बोलायची. भांडी लावायची, त्यात कलात्मकता दिसायची. कपडय़ांच्या घडय़ा इतकी सुरेख करायची जणू इस्त्री करून कपडे ठेवले आहेत. मला म्हणायची, ‘तुम्ही राहू द्या. तुम्हाला नाही जमायचं.’ काय संपलंय, काय आणायचं यावर बारीक लक्ष! आपलं महाराष्ट्रीय जेवणाचं ताट कसं वाढायचं, तिच्याकडून शिकावं. दुपारी मशीनवर उसवलेलं शीव, कुणाच्या ड्रेसची बटणं तुटली आहेत ती आल्यानंतर मला कधी बघावं लागलं नाही. पार्टी असली की अमाप उत्साह. भिरभिर हिंडायची घरात. तिने खरंच जीव लागला. मी म्हणायची, ‘‘नीतू ज्या घरी जाशील तिथे तुझं कौतुक होईल. संसार छान करशील!’’ ती एखादं दिवस आली नाही की हात सारखा अडायचा. मला म्हणायची, ‘‘मला २४ तास ठेवा, रहाते.’’ पण मन बिचकायचं.
दोन वर्षे आमच्याकडे होती. पण असं वाटलं ही तर कधीची आपल्याकडेच आहे. आणि एक दिवस सुट्टी घेऊन ती गेली. बहीण आली राजस्थानमधून म्हणून. तिने नीतूच्या धाकटय़ा बहिणीचं लग्न ५० हजार रुपये घेऊन करून दिलं. आता ती नीतूला चल म्हणत होती. संकटाची तिला जाणीव झाली. आपल्याला ही विकणार.. हेच सत्य होतं. एक दिवस धावतपळत आली आणि मला बिलगली. ‘‘मला जायचं नाही तिकडे. इथेच लग्न करून संसार करायचाय.’’ खूप रडली ती. मी फक्त थोपटलं. काय करू शकणार होते मी?  समजावलं.. अ गं,बहीण आहे तुझी. वाईट का करेल तुझं? चांगला असेल मुलगा!’’ विषण्ण हसली. ‘‘तो ड्रायव्हर आहे. मला आणखी काय मिळणार?’’  तिची वेदना बघवत नव्हती. तिला ऑफिसवाला पाहिजे होता. ती तिच्या घरी परतली, पण माझ्या मनात प्रश्न ठेऊन!
दोनच दिवसांनी तिची मावशी आणि बहिणीचा नवरा आले. नीतूला घेऊन गेले. स्टेशनवर तो तिकीट काढायला गेला आणि या दोघी बहिणी तिथून पळाल्या. केवढी हिंमत!! या मुलीनं आटोकाट प्रयत्न केला न जाण्याचा पण मामा, मावशी कुणीच ठेऊन घ्यायला तयार नव्हतं. जावंच लागलं तिला. आणि माझ्या काळजात गलबलून आलं. कसे आहोत आम्ही! तिला सोडवणं, ठेऊन घेणं म्हणजे एका संकटाला आव्हान असंच गृहीत धरून चालत होतो का? पोलीस केस झाली असती म्हणून मी घाबरले का? तिच्यातील गुण, तडफदारपणा, अन्यायाविरुद्धचा लढा, कसलाही उपयोग झाला नाही. का घाबरले मी इतकी?
आमच्यात सामावलेली ‘ती’ आम्हीच आपलेपणा दाखवायला कमी पडलो याची खंत वाटते.
तिचं पुढे काय झालं अद्याप कळलं नाही. पण तिला मदत न करण्याचा त्यावेळचा निर्णय अजूनही बोच बनून सलतो आहे.