‘हिंदुस्थान पेट्रोलियम’, ‘टायटन’, ‘रहेजा कॉर्पोरेशन’, ‘किसान’, ‘आयडीबीआय बँक’, ‘सेन्चुरियन बँक’ एवढंच नव्हे तर न्यूयॉर्क, बेल्जियम, लंडन, युगांडा येथील कंपन्यांसाठी त्यांनी शंभरावर लोगोंचं डिझाइन केलंय. पन्नास आंतरराष्ट्रीय मासिकांमधून त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळालीय. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा चाळीस पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेत. असा हा कलाकार आज ७७ व्या वर्षीही ‘ग्राफिक कम्युनिकेशन कॉन्सेप्ट’ या आपल्या कुलाब्यातील डिझाइन स्टुडिओत तितक्याच तन्मयतेने काम करताना दिसतो. ‘ग्राफिक डिझाइन’ या कलेतले भारतातील जनक मानल्या जाणाऱ्या सुदर्शन धीर यांच्याविषयी.

मी अमुक-अमुक ब्रॅण्डचेच कपडे वापरतो.. किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना मी आधी ब्रॅण्डचं नाव बघते.. अशी वाक्यं हल्ली प्रतिष्ठेची लक्षणं समजली जातात. हे ब्रॅण्ड जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या कामातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ब्रॅण्डचा चेहरा आणि हा चेहरा म्हणजे त्या कंपनीचा लोगो. साहजिकच एखाद्या कंपनीची व त्यायोगे तिच्या उत्पादनांची ओळख निर्माण करणाऱ्या लोगोचं अचूक डिझाइन करणारी व्यक्ती त्या कंपनीसाठी भाग्यविधाता ठरली नाही तरच नवल! असे लोगो तयार करण्यातलं एक माहीर नाव म्हणजे सुदर्शन धीर. अंगभूत प्रतिभा व जादुई हस्तस्पर्श या भांडवलावर ते गेली ५० वर्षे ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ या क्षेत्रावर राज्य करत आहेत.
‘हिंदुस्थान पेट्रोलियम’, ‘टायटन’, ‘द इसार ग्रुप’, ‘रहेजा कॉर्पोरेशन’, ‘किसान’, ‘आयडीबीआय बँक’, ‘सेन्चुरियन बँक’ एवढंच नव्हे तर न्यूयॉर्क, बेल्जियम, लंडन, युगांडा येथील कंपन्यांसाठी त्यांनी शंभरावर लोगोंचं डिझाइन केलंय. पन्नास आंतरराष्ट्रीय मासिकांमधून त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळालीय,  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा चाळीस पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेत. इतके सन्मान मिळूनही पाय जमिनीवर असलेला हा कलाकार आज ७७ व्या वर्षीही ‘ग्राफिक कम्युनिकेशन कॉन्सेप्ट’ या आपल्या कुलाब्यातील डिझाइन स्टुडिओत तितक्याच तन्मयतेने काम करताना दिसतो.
सुदर्शन धीर म्हणाले, ‘‘एखाद्या वस्तूची जाहिरात करणं आणि त्या वस्तूसाठी लोगो तयार करणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. जाहिरात म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग करण्याची कला, तर लोगो हे त्या वस्तूची बाजारात ओळख निर्माण करण्याचं साधन.’’
कधी कधी जाहिरात ही फसवी असू शकते. (आठवा- १५ दिवसांत टक्कल काळंभोर करण्याचा दावा करणारी तेलं किंवा आठवडाभरात गोरंपान करतो म्हणणारी क्रीम्स) पण लोगो हा त्या कंपनीची किंवा त्या उद्योगाची खरी प्रतिमा ग्राहकांसमोर उभी करतो. किंबहुना तसं करणं अपेक्षित असतं. आणखी एक, जाहिराती बदलतात पण लोगो आपल्या उद्योगाचं कायमस्वरूपी प्रतिनिधित्व करतो.
मुंबईला आपली कर्मभूमी मानणारे सुदर्शन धीर मूळचे कानपूरचे. कलेची पाश्र्वभूमी म्हणाल तर ‘वडील सोनार असल्याने दागिने घडवण्यापूर्वी त्यांची डिझाइन्स काढणे’ इतकीच. सुदर्शनला मात्र शाळेत असतानाच चित्रकलेविषयी ओढ वाटू लागली. त्यांच्या घराजवळच लाहोरहून आलेला एक चित्रकार राहायचा. त्याला चित्रं काढताना बघणं आणि त्याच्याकडून जमेल तेवढं शिकून घेणं हा सुदर्शनचा त्यावेळचा आनंद. एवढंच नव्हे तर रस्त्यावर तासन् तास उभं राहून सिनेमांची पोस्टर्स व बॅनर्स न्याहाळणं हाही त्याचा छंद होता. या वेडातूनच ९ वीत असतानाच त्याने सिनेमाची पोस्टर्स बनवण्याच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. या कामासाठी त्याला त्या काळी एका स्क्वेअर फुटामागे साडेबारा आणे मिळत. शालेय वयात केलेलं हे काम लाभदायी ठरलं. हे काम दाखवल्यामुळेच मॅट्रिकला जेमतेम पास होऊनसुद्धा त्याला मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सहज प्रवेश मिळाला. तेदेखील एकदम दुसऱ्या वर्षांला. आयुष्याच्या वेगळ्या वळणाला इथूनच सुरुवात झाली.
सकाळी ८ ते १० कॉलेज आणि त्यानंतर दिवसभर दादरच्या ब्रिलियंट स्टुडिओत काम असा दिनक्रम सुरू झाला. तिथे ते सिनेमासाठी शो कार्ड्स बनवण्याचं काम करत. एक दिवस अब्बास रेशमवाला नावाच्या सद्गृहस्थाशी त्यांची गाठभेट झाली. अन्नपदार्थाच्या वेष्टनावर खाण्याच्या वस्तूंची आकर्षक चित्रं काढण्याचं काम ते करत. सुदर्शन यांनी त्याच्याकडे काम करायला सुरुवात केली. पगारही बरा होता. (महिना ६० रुपये) आणि कामातही नावीन्य होतं. अर्थात त्या वेळी फोटोग्राफीने या क्षेत्रात प्रवेश केला नसल्यामुळे सगळा भर हस्तकौशल्यावरच होता.
पुढे नोकऱ्या बदलत बदलत मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड मार्केटिंग (एमसीएम) या कंपनीत आर्ट डायरेक्टर ही जागा मिळाली तेव्हाही सकाळी कॉलेज आणि दिवसभर काम हेच चक्र चालू होतं. फाइन आर्टची डिग्री मिळाल्यावर या महाशयांनी जे. जे. मध्येच कमर्शिअल आर्ट या एकदम वेगळ्या पद्धतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला त्याचं एकमेव कारण म्हणजे जे. जे.च्या हॉस्टेलमध्ये असणारी अत्यंत कमी खर्चात राहायची सोय. (महिना फक्त २० रुपये) अशा प्रकारे कॉलेज व नोकरी अशा दोन दगडांवर पाय ठेवत त्यांनी पुरी ९ वर्षे जे. जे.मध्ये काढली.
अभ्यास व काम यात दिवस गेला तरी सुदर्शन यांच्यासाठी संध्याकाळ मोकळी असायची. हा वेळ त्यांनी डिझाइन विषयातील मासिके (विशेषत: न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होणारी) वाचण्यात सत्कारणी लावला. ग्राफिक डिझाइन ही संकल्पना उदयास येणारा तो १९५० च्या अखेरीचा काळ. पॉल रॅण्ड (ढं४’ फंल्ल)ि सारख्या ख्यातनाम डिझायनर्सची मोहिनी त्यांच्यावर पडू लागली. त्या मासिकांमधून प्रसिद्ध होणारा डिझाइन्सचा अमूल्य ठेवा, स्वत:च्या संग्रही असावा म्हणून ते त्या मासिकांचे वर्गणीदार झाले. या घटनेला आज ६० वर्षे उलटून गेली तरी त्यांनी तो दस्तऐवज एखाद्या दागिन्यासारखा जपून ठेवलाय.
अमेरिकेत जन्माला आलेली ग्राफिक डिझाइन ही कला झपाटय़ाने इतर देशांत पसरली. सुदर्शनना १९७३ मध्ये जपानला जाण्याचा योग आला तेव्हा ते तिथल्या प्रसिद्ध डिझायनर्सना भेटले. त्यांनी सुदर्शन यांच्या कामाची प्रशंसा केली एवढंच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय मासिकातून त्यांच्या कामाला प्रसिद्धीही दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची पहिली ओळख उमटली ती ही अशी.
जाहिरात कंपनीत (एमसीएम) काम करताना ‘कॉर्पोरेट आयडेण्टिटी प्रोजेक्ट’वर काम करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी विचारपूर्वक नोकरी सोडली आणि १९७४ पासून स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ कंपनीचं काम हा त्यांच्या करिअरचा पहिला मोठा ब्रेक. ‘बॉम्बे हाय’मध्ये तेलाचे साठे सापडले तेव्हाची ही गोष्ट. साहजिकच ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ला स्वत:ची स्वतंत्र ओळख करून देणारा लोगो हवा होता. त्यांनी स्पर्धा जाहीर केली. त्या वेळी सुदर्शन धीर यांचा सेटअप म्हणजे हॅण्डलूम हाऊससमोर भाडय़ाने घेतलेली एका टेबलापुरती जागा व टेलिफोनची जोडणी इतकाच. या जागेत २ ते ३ आठवडे खपून त्यांनी आपल्या मनातलं डिझाइन ५० प्रकारे रेखाटलं. सादरीकरणाच्या वेळी त्यांच्याबरोबर नावाजलेल्या कंपन्या होत्या. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिली. सुदर्शन धीर म्हणाले, ‘‘खरं तर मी खूप घाबरलो होतो. माझं सादरीकरण अगदीच प्राथमिक दर्जाचं वाटत होतं मला आणि इंग्रजीही जेमतेम. पण ‘पृथ्वीच्या पोटातून जोरकसपणे बाहेर येणाऱ्या तेलासाठी दाखवलेले दोन पाइप्स (आऊटलेट्स) आणि त्या तेलाचं देशभरात समान वाटप दाखवणारं भोवतालचं वर्तुळ’ हा माझा साधा लोगो परीक्षकांना आवडला आणि मी स्पर्धा जिंकली.’’
 त्यानंतर मात्र सुदर्शन यांनी एका मागोमाग एक लोगो करणं सुरूच केलं. साधेपणा, ताजेपणा व अभिजात सौंदर्य ही सुदर्शन यांच्या डिझाइन्सची खासियत. सॉस, जाम..इ. बनवणाऱ्या किसान कंपनीचा लोगो हेच दर्शवतो. यामध्ये त्यांनी स्वादाची पहिली जाणीव करून देणारी जीभ इंग्रजी ‘के’ अक्षराचा एक हात लांबवून दाखवलीय. तसंच ब्रेडवर जाम पसरत नेण्याची क्रियाही त्यातून अभिप्रेत होते. ‘ऑल इंडिया अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’साठी त्यांनी केलेला लोगो तर बघताक्षणी हृदयाचा ठाव घेणारा. कुत्र्याचं एक गोजिरवाणं पिल्लू आणि त्याला कवटाळणारे दोन हात. बास! खाली एआयएडब्लूए ही संस्थेची आद्याक्षरं. प्राणिमात्रांवरचं प्रेम दर्शवणाऱ्या या लोगोला फेब्रुवारी २००७ मध्ये रशियात भरलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं.
कुठलंही डिझाइन बनवताना ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हा त्यांचा आग्रह असतो. ‘टायटन’चा लोगो बनवताना त्यांनी जेव्हा जेव्हा त्या कंपनीला भेट दिली तेव्हा तेव्हा त्यांना सर्वत्र अचूकतेला प्राधान्य दिलेलं दिसलं. कामगारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वाच्या बोलण्यातून तेच ध्वनित होत होतं. हेच परफेक्शन त्यांनी त्या लोगोतून दाखवलं.
मात्र हल्ली डिझायनर हा शब्द कशासाठीही (डिझायनर साडी, डिझायनर चपला) वापरला जातो यावर त्यांचा आक्षेप आहे. ते म्हणतात, ‘‘उत्स्फूर्तता (क्रिएटिव्हिटी) ही आतून येणारी जाणीव आहे. जर तसं होत नसेल तर तुम्ही आधी बघितलेली, पूर्वी केलेली गोष्टच पुन:पुन्हा करता.’’
बदलत्या तंत्रज्ञानाचा तुमच्या कामात किती उपयोग होतो यावर ते म्हणाले, ‘‘उपयोग निश्चित आहे पण पूरक म्हणून. मानवी प्रतिभेचा स्पर्श जास्त महत्त्वाचा. रंगांच्या बाबतीतही तेच. डिझाइन प्रभावशाली बनण्यासाठी रंगांचा हातभार जरूर लागतो. पण काळ्या-पांढऱ्या रेषांनीही तितकाच परिणाम साधायला हवा.’’
लोगो बनवणं हा सुदर्शन यांच्या कामाचा एक भाग झाला. खरं तर ग्राफिक डिझाइन्सच्या माध्यमातून   ग्राहकांना त्या उत्पादनाविषयी ओळख निर्माण करुन देण्यासंबंधीची सर्व कामं ते करतात. ‘एक्सपिरियन्स डिझाइन’ हा त्यातलाच एक प्रकार. याचा अर्थ ते डिझाइन तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे. मरीनलाइन्स येथील सैफी हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात याचं प्रत्यंतर पाहायला मिळतं. इथे सर्व जागी म्हणजे लेबर रूम, बेबी केअर रूम, कन्सल्टिंग रूम एवढंच नव्हे तर नर्सेसच्या युनिफॉर्मवरही त्यांनी डॉल्फिन मासा व शेजारी त्याचं पिल्लू ही थीम वापरलीय. डॉल्फिन हा माणसाप्रमाणे आपल्या पिल्लावर प्रेम करणारा मासा. हॉस्पिटलमध्ये शिरल्यावर जिथे तिथे दिसणारी ही आई पिल्लाची जोडी तुम्ही कुठे आला आहात हे न बोलता सांगत राहते.
एखाद्या भव्य मॉलमध्ये अथवा मोठय़ा हॉस्पिटलमध्ये किंवा विमानतळावर वा अशाच अन्य जागी गेल्यावर कोणालाही न विचारता इच्छित स्थळ गाठता यावं म्हणून जागोजागी सुलेखन पद्धतीने इंडिकेटर (पाटय़ा) लावलेले असतात. याला ‘साइन एज सिस्टीम’ म्हणतात. या कामातही त्यांचा हातखंडा आहे.
‘ग्राफिक डिझाइन’ या कलेचे ते भारतातील जनक मानले जातात. त्यांनी संपादित केलेली दोन पुस्तकं ‘द वर्ल्ड ऑफ सिम्बॉल्स/ लोगोज अ‍ॅण्ड ट्रेडमार्कस्,’ भाग १ व २ म्हणजे डिझायनर्ससाठी मूल्यवान खजिना आहे. आजही ते देश-विदेशात परीक्षक म्हणून जात असतात. त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्यानं म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंग (एनआयडी) व आयआयटीतील इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (आयडीसी) कलाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच असते. मात्र या व्यस्त जीवनक्रमात आपला पेंटिंग्जचा छंद मागे पडला याची त्यांना खंत वाटते.
‘झीरो टू हीरो’ या आपल्या प्रवासाच्या अनुभवातून शिकलेले काही कानमंत्र त्यांनी या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन पिढीसाठी सांगितले ते असे.. लोगो म्हणजे कंपनी व ग्राहक यांना जोडणारा पूल हे लक्षात ठेवून प्रत्येक डिझाइन ग्राहकाच्या दृष्टिकोनातून नवं, खास (युनिक) तर असावंच, शिवाय ते कंपनीच्या ध्येयधोरणांशीही सुसंगत असलं पाहिजे.. आपल्या निर्मितीतून ‘शब्देवीण संवादु’ साधला जायला हवा.. बाह्य़ जगासाठी काम करताना आपल्या अंतरंगात डोकावणं गरजेचं.. डिझाइन्स बनवण्याचा कोणताही फॉम्र्युला नाही. ती एक घडत जाणारी प्रक्रिया आहे, यात शॉर्टकट नाहीत.. ग्राफिक डिझाइन म्हणजे लॉजिक अधिक उत्स्फूर्तता, पण या प्रेरणेचा आवाज अंतर्मनातून यायला हवा.. अंतर्मनाची दारं उघडण्यासाठी त्यांनी ध्यानाची कास धरायला सांगितलं. ते म्हणाले, ध्यान म्हणजे शब्दांपलीकडचा अनुभव. आतमध्ये आपोआपच एक ज्योत प्रकटते आणि त्या उजेडात सारं काही लख्ख दिसू लागतं. सुदर्शन धीर यांचे धीरगंभीर शब्द ऐकताना मनात आलं, आपल्या कुसुमाग्रजांनीही हेच तर सांगितलंय..
अंतरीच तुझ्या आनंदाची गंगा, देवळात दंगा कशासाठी?    

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?