अलीकडेच घडलेली गोष्ट. आमच्या घरी आमची मोलकरीण वत्सलाबाई बर्फी घेऊन आल्या. त्यांना नात झाली होती. कोणी म्हणेल, ‘त्यात काय विशेष आहे?’ खरं म्हणजे त्यांत खूपच विशेष आहे.  कारण हा सर्वसामान्यांच्या जीवनात घडतो, तसा सर्वसाधारण स्वरूपाचा प्रसंग नव्हता. दोन वर्षांपूर्वी वत्सलाबाईंचा लग्न झालेला मोठा मुलगा आजाराने वारला. घटना अत्यंत दु:खदच, त्यातही नुकतीच विधवा झालेली तरुण सून घरात अश्रू ढाळत बसलेली, तिला सतत दिसत राहायची. त्यामुळे ती मनाने फारच खचून गेली होती.
वत्सलाबाईंनी दिलेल्या नातीच्या बर्फीचा आस्वाद घेताना मला  दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंग आठवला, त्या दिवशी वत्सलाबाई नेहमीप्रमाणे कामावर आल्या आणि निमूटपणे काम करू लागल्या. वत्सलाबाई तशा बोलघेवडय़ा स्वभावाच्या, पण नुकत्याच घडलेल्या पुत्रनिधनाच्या दु:खाने अबोल झाल्या होत्या. आज तर तिचा चेहरा खूपच उदास दिसत होता. मला राहवेना. मी विचारलं, ‘वत्सलाबाई, तुमची तब्येत बरी नाही का? राहू दे ती कामं. मी चहा करून देते. गरम चहा घ्या आणि घरी जाऊन आराम करा’ माझ्या आत्मीयतेनं त्या भारावल्या. म्हणाल्या, ‘ताई! माझ्या सुनेचे वडील तिला न्यायला येणार आहेत.’
‘ते तिचे वडीलच आहेत. त्यांनाही नसेल का वाटत दु:खाने पोळलेली आपली मुलगी दोन दिवस घरी यावी असं? वातावरण बदललं की दु:खाची तीव्रता कमी होते. काही दिवस ती तिच्या माहेरी राहील आणि येईल की परत!’
‘ताई! तसं नाही. ते तिला कायमची घरी नेणार आहेत. ते म्हणाले की ‘मुलीला तुमच्याकडेच तसंच ठेवणं काही बरं वाटत नाही. मी तिला घरी नेतो. मुलगी तरुण आहे. जेमतेम तिचा संसार सुरू झाला आणि हे असं घडलं. वडील या नात्यानं नवीन संसार उभा करून देण्याची खटपट करावी लागणार आहे. तिला मी घरी घेऊन जातो.’’
‘बरोबर आहे की त्यांचं म्हणणं. ते मुलीचे वडील आहेत. आपल्या मुलीच्या नवीन संसाराची घडी बसवून देणं, ही आता आपली जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य आहे, असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. तू किती दिवस तुझ्या सुनेची जबाबदारी पेलू शकणार आहेस? जाऊ दे की तिला तिच्या माहेरी?’
‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण सुनेनं मला खूप लळा लावला आहे. गुणाची पोर आहे.  स्वभावानं खूप चांगली आहे. दुखलंखुपलं पाहते. घरचं सगळं व्यवस्थित सांभाळते. तिच्या भरवशावरच मी बाहेरची कामं करू शकते.’
‘ते सगळं खरं! पण तेवढय़ाकरिता तिला कायमचं तुमच्या घरी ठेवून घेणं, हे स्वार्थीपणाचं आहे. तिलाही तिचं भविष्य आहे. तिचे वडील जो तिच्या लग्नाचा प्रयत्न करणार आहेत, ते तिच्या भल्याकरिताच असणार आहे. घरी ती तशीच खितपत राहिली तर आहे का तिला काही भविष्य?’ चहा घेऊन न बोलता वत्सलाबाई निघून गेल्या.
आणि माझं विचारचक्र सुरू झालं. कोण कुठली वत्सलाबाईची सून, पण तिनं माझं भावविश्व ढवळून काढलं. काही करता येईल का तिच्याकरिता? काहीतरी करायला हवं. आणि विचार करता करता मला एक कल्पना सुचली. वत्सलाबाई माझ्या घराजवळ राहत होत्या. मी ताबडतोब त्यांना बोलवून घेतलं.
‘‘काय काम काढलं बाईजी!’’
‘‘अहो! सकाळी तुम्ही म्हणालात ना की सुनबाईचे वडील तिला न्यायला येणार आहेत म्हणून?’’
‘‘हो! बाईजी! पण सुनेचा पाय काही घरातून निघायला तयार नाही.  ती म्हणते, ‘मी इथेच राहते. तुमची सेवा करते. पुढे माझं जसं होईल तसं होईल,’
 मग मी तिला माझ्या डोक्यातला विचार बोलून दाखवला,  
‘‘तुझ्या मोठय़ा मुलापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला एक भाऊ आहे ना?’’
‘‘हो बाईजी, पण त्याचं काय?’’
‘‘म्हणजे तसा तो लग्नाचा आहे.’’
‘‘व्हय बाईजी! आता त्याच्याकरितापण सोयरिकी पाहायच्या आहेत. एका वर्षांत त्याचं लग्न नाही केलं तर तीन वर्षे नाही करता येत असं म्हणतात.’’
‘‘अगं! हो, पण मग तू तुझ्या या मुलाचंच लग्न या तुझ्या सुनेशी का नाही लावून देत?’’
‘‘असं कसं म्हणता बाईजी!’’
‘‘सुनेचे वडील तिला त्यांच्या घरी नेल्यावर तिच्या लग्नाची खटपट करणार आहेतच ना?’’
‘‘व्हय ते खरं आहे, पण बाईजी! या सुनेचा पायगुण चांगला नाही. तिच्यामुळे मोठय़ा मुलाचं असं झालं. लहान मुलाचंपण तसं काही झालं, तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहू?’’
‘‘अहो! पायगुण वगैरे भाकड समजुतीत काहीच अर्थ नसतो.’’ मी तिला अनेक उदाहरणं देऊन तिच्या मनातली ती अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिला म्हटलं, ‘‘बघ! बाई! माझ्या मनात जो चांगला विचार आला, तो मी बोलून दाखवला. पटला तर ठीकच आहे. नाही पटला तर सोडून दे.’’
त्यानंतर दोन-तीन दिवस निघून गेले. आणि वत्सलाबाई म्हणाल्या, ‘‘बाईजी. मला तुमचा विचार पटला, पण तुम्ही माझ्या सुनेला आणि मुलाला अलग अलग बोलावून त्यांना समाजावून सांगा. त्यांचापण विचार घ्यायला पाहिजे.’’ मी त्या दोघांना घरी बोलावून घेतलं. आणि त्यांच्यासमोर माझ्या मनातला विचार मांडला. प्रथम त्या दोघांनाही ती कल्पना कशीशीच वाटली. मी त्यांना परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि अखेर माझ्या प्रयत्नांना यश आले. त्यांची समजुत पटली. त्यानंतर त्या दोघांचा विवाह झाला. आणि आता तर त्यांना कन्यारत्न झाले.
 वत्सलाबाईंनी त्याच आपल्या नातीची बर्फी आणली होती. खऱ्या अर्थाने ती होती अमृततुल्य चवीची बर्फी. ती खाताना माझ्या मनात विचार आला, ‘कोणाचं भलं करायचं असेल, तर त्याकरता खूप काही करावं लागत नाही. थोडा चांगला विचार, थोडी कळकळ, थोडा प्रयत्न आणि थोडा वेळ खर्ची घातला, तर अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणता येतात.’