चूक करणे/होणे हे माणूसपणाचे लक्षण असले तरी चुकांची पुनरावृत्ती न करणे आणि केलेल्या चुकांच्या परिणामांची जबाबदारी उचलणे हे गुणी माणसाचे लक्षण आहे.
प्रत्येक माणसांत गुण आणि दोष हे असतातच. कदाचित एकाकडे गुण जास्त असतील तर दुसऱ्यात ते कमी प्रमाणात असतील. काहींचे दोष डोळ्यावर येतील तर काहींचे दोष छुपे राहतील. हे सगळं डबोलं अंगावर घेऊनच आपण जगत असतो. त्यामुळे काही फायदे होतात तर काही तोटे, पण सर्व फायदे-तोटे भोगत जगणं हा आपला स्वभावधर्म होऊन बसतो आणि आपण आपल्याकडे शांतपणे बघतच नाही. एखादवेळेस आजार झाला, अपघात झाला तर नाइलाजास्तव का होईना, आपल्या सवयी, जीवनशैली यात थोडा बदल करतो. पण तेसुद्धा अगदी मनापासून केलेलं नसतं.
मला नेहमी वाटतं, दुनियेतले कोटय़वधी लोक असंच जगत असतात. मागील पान उलटून त्याच वाटेने नवा दिवस व्यतीत करीत असतात. यालाच आम माणसाचं जीवन म्हणतात. जर उगवणारा प्रत्येक दिवस नवा असेल तर जे आतापर्यंत करत आलो त्यात चांगला बदल व्हावा असे अगदी थोडय़ा माणसांना का वाटते? जगात चांगला माणूस म्हणून जगणे थोडय़ा माणसांना का बरं जमते? आणि आपण बहुसंख्य जसे आहोत तसेच वर्षांनुवर्षे का जगत राहतो. का रुटीनमध्ये जगणं हीच आपण आपली नियती मानतो? म्हणजेच एक प्रकारे आपल्या आयुष्याचे दोर नियतीच्या हातात देऊन तिच्या तालावर पावले टाकत राहतो?
दुर्दैवाने आम आदमीच्या जीवनात हेच घडत असतं आणि त्याचं कोणतंही वैषम्य वाटत नाही. त्यातून अनेक संधी हातातून निसटून गेल्या असतील. कित्येकांना ही संधी आहे/ होती हेच समजले नसेल. आणि आपण संधी गमावली याची उगाचच हुरहूर असेल. पण मग पुन्हा मागील पानावरून पुढे चालू असे हे प्रकरण पुढे चालू राहते आणि माणसं नशिबाला दोष देत राहतात.
एकदा आमची ‘नांदू या सौख्यभरे’ ही कार्यशाळा होती. कार्यक्रम संपल्यावर एक पन्नाशीचे गृहस्थ आले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही जे सांगत होतात तेच मी माझ्या ‘सौ’ला सांगत आलोय. पण तिच्यात काही बदल होत नाही.’’ माझ्या मनात आलं, हे चारचौघात सांगितल्याने त्याच्या पत्नीला किती लाज वाटली असेल? तू बदल, असे त्याने सौम्य शब्दात सांगितले असेल का? ज्या अर्थी आमच्याभोवती जमलेल्या कोंडाळ्यात तो पत्नीची जाहीर तक्रार करत असेल तर तो तिला घरात कसा वागवत असेल? मला प्रश्न पडला, त्याचं वागणं हेच तिच्या न बदलण्याचं कारण असेल का? कारण माझ्या सध्याच्या परिस्थितीला ती/तो/ते जबाबदार असतात, तर कधी बदलती परिस्थिती जबाबदार असते तर कधी नियती. कारण माझं जे काही आत्ता चाललं आहे त्याला काही प्रमाणात मी स्वत: जबाबदार असतो हे भानच थोडय़ा लोकांना असते. आणि आपण आम आदमी असल्याने आपण कोणी ग्रेट होऊच शकत नाही, हे मनात पक्के असते. त्याचप्रमाणे जी माणसे अगदी सामान्य परिस्थितीतून मोठी झाली त्यांची चरित्रे वाचल्याने प्रेरणा मिळते म्हणावं तर उत्तर तयार असतं- मी काही सचिन नाही, मी काही गावसकर नाही, मी काही टिळक नाही की गांधी नाही, अशी उत्तरे तयारच असतात.
हे सगळे अनुभव लक्षात घेऊन मी ज्या माणसांकडे भरपूर गुण होते ते नक्कीच यशस्वी होतील असे वाटत होते, परंतु ते काही काळ चमकले आणि नंतर त्यांचे नावही लोक विसरून गेले अशी माणसे अभ्यासायचा प्रयोग सुरू केला. सुरुवात केली विनोद कांबळीपासून आणि अनेक अयशस्वी माणसांच्या जीवनपटाचा अभ्यास सुरू केला. आणि आम आदमी ते चांगला माणूस या प्रक्रियेसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या होत्या आणि त्या न केल्याने ते ग्रेट वगैरे झाले नाहीत हे मला हळूहळू समजू लागले आहे.
खरं तर प्रत्येक आम माणसाने, माझा मित्र जयप्रकाश साठे वारंवार सांगतो त्याप्रमाणे, नवीन उजाडणारा प्रत्येक दिवस एका साध्या प्रार्थनेने सुरू करता येणं शक्य आहे. मी प्रार्थना म्हणतो याचे कारण मनोभावे केलेली प्रार्थना, परमेश्वराला घातलेले आर्त साकडे, ही परमेश्वराकडे केलेली मागणी नसून, स्वत:ला दिलेली जोरकस स्वयं-सूचना आणि ती गोष्ट अमलात आणेन म्हणून परमेश्वराला दिलेली हमी असते. तर सकाळची प्रार्थना काय असावी? उदाहरणार्थ- हे परमेश्वरा, आजचा हा नवीन दिवस पूर्वी केलेल्या चुकांना टाळून, कमीतकमी चुका करीत, कालच्यापेक्षा अधिक कार्यक्षम बनण्याचा, नातेसंबंध अधिक समृद्ध करण्याचा आणि मला जे साध्य करायचे आहे त्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्याची मला ऊर्जा दे. माझे सामथ्र्य अधिकाधिक वापरत, माझ्या मर्यादांचे भान ठेवत आज जे करणे आवशयक आहे आणि जे टाळणे आवश्यक आहे यातील भेद जाणून स्वहिताची कृती करण्याचे शहाणपण दे.”
प्रत्येकाला स्वत:ची प्रार्थना बनवायचा अधिकार आहे. अट फक्त एकच- रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे बसून आजच्या दिवसात काय-काय झाले याचा आढावा घेत परमेश्वराला सांगायचे, ‘‘हे परमेश्वरा, तू दिलेल्या शहाणपणामुळे आज माझ्या हातून काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे श्रेय तुझेच आहे. परंतु ज्या काही चुका झाल्या, करायचे राहून गेले ते निव्वळ माझ्यामुळे. असे परत न घडण्याची मी जास्तीत जास्त काळजी घेईन, पण जे घडले त्याबद्दल मला क्षमा कर!’’  
दुसरी करण्यासारखी मूलभूत गोष्ट म्हणजे अनुशासन. शिस्त हा शब्द मी जाणूनबुजून टाळला आहे. अनुशासन हे नेहमी स्वत: स्वत:साठी केलेल्या नियमांच्या पालनाशी निगडित आहे. अनुशासनात येते कृतीतील सातत्य, उक्तीप्रमाणे कृती, मूल्यांशी सुसंगतता, जीवनशैलीतील सातत्य आणि वागण्यातला निश्चितपणा. हे अनुशासन कुठल्या कायद्याने लादलेले नाही. हे शिक्षेच्या भीतीने अमलात आणायचे नाही. हे दुसऱ्या कोणीतरी आखून दिलेले नाही तर मी स्वत: माझ्यासाठी घालून घेतलेली बांधीलकी आहे. माझ्यासारखा आम आदमी इथेच पहिली गडबड करतो. मीच माझ्या वागण्याचे नियम केले असतील तर एखादवेळी ते मीच मोडले तर फारसे काही बिघडत नाही असा विचार अनाहूतपणे करतो आणि बदलाच्या प्रक्रियेतून स्वत:ला अलग करण्याची सुरुवात करतो.
अगदी नुकतेच घडलेले उदाहरण देतो. माझ्या मित्राचा एक मुलगा अतिशय आदर्शवादी वगैरे आहे. पुण्यात पर्यावरण, वाहतूक प्रश्न, स्वच्छता अभियानसारख्या युवकांच्या काही चळवळीत पुढाकार वगैरे घेतो. पुण्यात सध्या वाहतूक आणि हेल्मेट हे चर्चेचे विषय आहेत. अपघाताच्या शक्यता असलेले सिग्नल तोडले जाऊ नयेत म्हणून त्याच्या सहकाऱ्यांनी शांततामय अनुशासन आंदोलन सुरू केले. पाच-पाच मुला-मुलींचे गट सिग्नलपाशी उभे राहून वाहनांना पदपथावर वाहने थांबवून ठेवीत. ऐन गर्दीच्या ठिकाणी हे काम काही दिवस मुलांनी केले. जरा काही दिवस त्याचा परिणाम दिसला. मग हळूहळू मुला-मुलींची संख्या घटली. बहुधा तमाम पुणेकरांना वाहतूक शिस्तीचे धडे देऊन त्यांचे आंदोलन संपले. एक दिवस एका सिग्नलवर त्याला त्याच्या बाईकसह अडवले असल्याचे मला दिसले. मी गाडी पुढे जाऊन थांबवली आणि त्याला काही मदत हवी का विचारायला त्याच्या दिशेने चालू लागलो. मला पाहताच त्याचा चेहरा थोडासा ओशाळला. ‘‘काय रे काही प्रॉब्लेम?’’ मी विचारले. तसा खाली मान घालून म्हणाला, ‘‘काका, काही नाही हो नेमकं सिग्नल तोडला आणि मामा समोर. केलंय मॅनेज.’’ असे म्हणून बाईक सुरू करून निघून गेलासुद्धा. माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले-वाहतूक प्रश्नावर हिरिरीने चळवळ करणारा माणूसही जर रीतसर गुन्हा कबूल करून पावती फाडण्याची तसदी का घेत नाही? आपल्या हातून चूक झाली तर त्याच्या कायदेशीर परिणामांना तोंड का देत नाही? आपली चुकीची बाजू लोकांपासून लपून राहावी असं त्याला वाटलं असेल का? माझ्यासारख्या आम माणसाचं असं होतं आणि आपण सारे आमच राहतो.
यावर एक सोपा उपाय आहे. सकाळच्या प्रार्थनेत उल्लेख केल्याप्रमाणे माझे चांगले वागण्याचे अनुशासन फक्त आजच्या दिवसापुरते ठेवायचे. म्हणजे आजन्म वाहतुकीचे नियम पाळीन अशी भीष्मप्रतिज्ञा करण्याऐवजी आपली बांधीलकी फक्त एक दिवसापुरती मर्यादित करायची. त्याहून महत्त्वाचे म्हणजे चूक समजा झाली तर परिणामांची जबाबदारी स्वीकारायची. माझ्या मित्राच्या मुलाने सिग्नल तोडण्याची चूक केलीच, पण पुढे जाऊन रीतसर पावती फाडण्याची तसदी न घेता मॅनेज करून स्वत:च्याच मूल्यांशी तडजोड केली.
चूक करणे/होणे हे माणूसपणाचे लक्षण असले तरी चुकांची पुनरावृत्ती न करणे आणि केलेल्या चुकांच्या परिणामांची जबाबदारी उचलणे हे गुणी माणसाचे लक्षण आहे.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा