आपल्या पगारातला पै न् पै समाजकार्याला देणारे, इतकंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर आलेले दहा लाख रुपये आणि पुरस्काराचे ३० कोटी रुपयेसुद्धा समाजाच्या विकासासाठी देणारे पालम कल्याणसुंदरम. आज त्यांची ‘पालम’ (पूल अथवा दुवा) ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते आहे. त्या दानशूर अवलियाविषयी..
दानाची सर्वसंमत व्याख्या म्हणजे आपलं पोट भरल्यावर उर्वरित संपत्तीतील cr11छोटा-मोठा भाग समाजासाठी देणं. या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत आपल्या ३५ वर्षांच्या नोकरीत दरमहा कमावलेली पै न् पै समाजासाठी देणारा एक देवदूत म्हणजे पालम कल्याणसुंदरम. चेन्नईजवळील सैदापेट या भागातल्या या अवलियाने दर महिन्याच्या पगाराबरोबरच निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचे दहा लाख रुपये आणि त्यावरही कडी म्हणजे पुरस्कारांचे ३० कोटी रुपयेही समाजाच्या विनियोगासाठी दिले आहेत. अभिनेता रजनीकांत यांनी तर त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं असून बिल क्लिंटन यांनाही भारतात आल्यावर त्यांची भेट घेण्याचा मोह आवरला नाही.
याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या पगारातला सर्व पैसा दानासाठी देणाऱ्या पालम यांनी आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे दोन वेळचं जेवण आणि इतर अल्प गरजांसाठी आयुष्यभर एका हॉटेलात वेटर म्हणून पार्ट-टाइम काम केलं, इतकंच नव्हे तर आपल्या मिळकतीला अन्य वाटा फुटायला नकोत म्हणून लग्नही केलं नाही. सानेगुरुजींच्या श्यामच्या आईचं मातृत्व आणि कर्णाचं दातृत्व एकवटलेल्या या संताची ही स्फूर्तिदायी कहाणी.
तिरुनेलवेल्ली जिल्ह्य़ातील मेलाकारू वेलांगुलम या छोटय़ाशा खेडय़ात त्यांचं बालपण गेलं. हे गाव जेमतेम ३० उंबऱ्यांचं. वीज नाही.. रस्ते नाहीत.. शाळा नाही.. साधं काडेपेटीचंही दुकान नाही. सगळय़ात जवळची शाळाही १० कि.मी. दूर. हे जाऊन-येऊनचं २० कि.मी.चं अंतर रोज एकटय़ाने चालण्याचा त्यांना खूप कंटाळा येई. अशा वेळी एकदा त्यांच्या मनात आलं, ‘गावातील मुलं जर आपल्याबरोबर शाळेत आली तर हा प्रवास हसत खेळत संपेल. बाकीची मुलं शाळेत न जाण्याचं कारण होतं गरिबी. त्या वेळची महिना ५ रुपये फीदेखील कोणाला परवडणारी नव्हती. तेव्हा कल्याणसुंदरम या ९-१० वर्षांच्या मुलाच्या मनात एक वेगळाच विचार आला आणि त्याने आईकडे त्या मुलांच्या फीच्या पैशासाठी हट्ट धरला. कल्याणसुंदरम यांचे वडील ते दहा महिन्यांचे असताना निवर्तले होते. त्यामुळे आईचा आणि आजीचा या बापविना लेकरावर भारी जीव. त्या दोघींनी आपल्या मुलाचा हा जगावेगळा हट्ट तर पुरवलाच, शिवाय त्या मुलांच्या युनिफॉर्मची व वह्य़ा-पुस्तकांची सोय केली. कल्याणसुंदरम यांनी पुढे जो दानाचा इतिहास रचला, त्याचा पाया हा असा रचला गेला असावा.
मात्र यावर त्यांचं म्हणणं, ‘माझ्या त्या कृत्याला स्वार्थाचा वास होता. मात्र दुसऱ्यासाठी काही तरी करण्याची खरी जाणीव मला झाली ती पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारत-चीन युद्धाच्या वेळी राष्ट्राला उद्देशून घातलेली साद ऐकली तेव्हा. कल्याणसुंदरम त्या वेळी कॉलेजात शिकत होते. नेहरूंनी रेडिओवरून संरक्षण निधीसाठी केलेलं आवाहन ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या गळय़ातली सोन्याची चेन त्या वेळचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कामराज यांना नेऊन दिली. एका तरुण मुलाने देशसेवेसाठी उचललेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि त्यांनी या देशभक्ताचा खास गौरव केला.
बी. ए. नंतर कल्याणसुंदरम यांना तमिळ साहित्यात एम. ए. करण्याची इच्छा होती, परंतु या विषयासाठी दुसरा विद्यार्थी नसल्याने कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना अन्य विषय घेण्यास सुचवलं. पण त्यांनी तमिळचा आग्रह सोडला नाही. त्यांच्या या मातृभाषेवरील प्रेमाने एम.टी.टी. कॉलेजचे संस्थापकही प्रभावित झाले आणि त्यांनी या एका मुलासाठी ती सोय उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. तमिळ साहित्यातील मास्टर्स डिग्रीबरोबर त्यांनी लायब्ररी सायन्समध्ये सुवर्णपदक मिळवले आणि गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरवला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर कल्याणसुंदरम यांनी कुमारकारुपा आर्ट्स कॉलेजमध्ये सलग ३५ वर्षे ग्रंथपाल अर्थात लायब्ररियन म्हणून नोकरी केली आणि पहिल्या पगारापासून शेवटच्या पगारापर्यंतचा एकूण एक पैसा समाजाच्या सेवेसाठी अर्पण केला. वयाबरोबर त्यांची देण्याची मनोकामना अधिकच तीव्र होत गेली. वडिलोपार्जित घर विकून आलेले पैसे असोत की पगारवाढीमुळे मिळणारी थकबाकी असो किंवा फंडाची एकहाती मिळालेली दहा लाख रुपयांची रक्कम असो, सगळा ओघ गोरगरिबांच्या, अनाथांच्या उद्धाराच्या दिशेने जात राहिला. गरिबांचा त्यांना एवढा कळवळा की त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ते रेल्वे फ्लॅटफॉर्मवर आणि दुकानांच्या पायऱ्यांवरही झोपलेले आहेत.
कल्याणसुंदरम यांच्या परोपकारी विचारसरणीचा उगम त्यांच्या आईच्या संस्कारात आहे. सुखी होण्यासाठी आईने सांगितलेले तीन नियम त्यांनी हृदयावर कोरून ठेवलेत. पहिली गोष्ट म्हणजे कशाचाही लोभ धरू नकोस. दुसरं म्हणजे जे काही तुझ्या हातात आहे त्याचे दहा समान भाग कर आणि त्यातील एक भाग सत्कार्यासाठी दे आणि आईचं तिसरं सांगणं म्हणजे किमान एका जिवाला आनंद दिल्याशिवाय रात्री झोपू नको. त्यांची आई म्हणायची एवढय़ा तीन गोष्टी जरी तू आचरणात आणल्यास तरी कोणत्याही परिस्थितीत सुखी राहशील आणि खरंच आज जगात कल्याणसुंदरम यांच्याइतका सुखी व समाधानी माणूस दुसरा कोणी नसेल!
एवढं उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करताना त्यांच्या वाटय़ाला दु:ख आलंच नाही, असं मात्र नाही. आपल्या किनऱ्या, चिरक्या आवाजाच्या न्यूनगंडाने त्यांना एके काळी एवढं पछाडलं होतं की आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात घोळत होता. परंतु व्यक्तिमत्त्व विकासावर पुस्तकं लिहिणारे थामिझवानम त्यांना भेटले आणि त्या लेखकाने कानमंत्र दिला, ‘आपल्या बोलण्याची चिंता करण्यात तू वेळ दवडू नकोस. त्यापेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल चांगलं बोलावं यासाठी प्रयत्नांची शर्थ कर.’ त्यानंतर मात्र तो न्यूनगंड त्यांनी मनाआड करून टाकला.
मानवतेच्या या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने देशातील सर्वोत्तम ग्रंथपाल म्हणून त्यांना गौरवलं. ‘युनो’ने २०व्या शतकातील एक असामान्य व्यक्ती या शब्दात त्यांचा सन्मान केला. इंटरनॅशनल बायोग्राफिक सेंटर, केंब्रिजतर्फे त्यांना जगातील सर्वात दयाळू व्यक्ती म्हणून घोषित केलं. एका अमेरिकन संस्थेने तर त्यांना ‘मॅन ऑफ मिलेनियम’ ही पदवी बहाल केली तर रोटरी इंटरनॅशनलने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. ‘मॅन ऑफ मिलेनियम’ या पुरस्कारांपोटी मिळालेली ३० कोटी रुपयांची गंगाजळी समाजार्पण झालीच.
आणखी एक विशेष सन्मानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी दोन भारतीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातील एक म्हणजे डॉ. अब्दुल कलाम आणि दुसरे पालम कल्याणसुंदरम. क्लिंटन यानी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रातील शब्द असे होते.. ‘एक मध्यमवर्गीय माणूस ज्याने संपूर्ण हयातीत कधीही एक कोटी रुपये बघितलेले नाहीत, त्याने मिळवलेले ३० कोटी रुपये सहज दान केले, अशा त्या व्यक्तीला मला भेटायचंय.’ ही भेट कल्याणसुंदरम यांच्या मनात चांदणं बनून राहिलीय.
त्यांचा दानाचा केंद्रबिंदू गरीब व अनाथ मुलांचं शिक्षण हा होता. आहे. त्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर (१९९८) ‘पालम’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते. (पालम या शब्दाचा अर्थच पूल अथवा दुवा) इथे फक्त पैशांची मदत मिळते असं नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गरजूंना वैद्यकीय सल्ला दिला जातो. रक्तदान शिबिरं भरवण्यात येतात. वृद्ध, आजारी, बेरोजगार व अपंग व्यक्तीचं पुनर्वसन केलं जातं. चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पालमचा मदतीचा हात नेहमी पुढे असतो. निराधार गरीब मुलांच्या मदतीसाठी त्यांनी ‘अ‍ॅन्ड्रय़ू पालम’ नावाचं मासिक सुरू केलंय. ज्यात सामान्यातील असामान्यांच्या कथा/बातम्या दिल्या जातात. ७३ वर्षांचे कल्याणसुंदरम आजही चेन्नईतील अडयार येथील आपल्या कार्यालयात रोज येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या कार्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं हे पालम यांचं ध्येय आहे. म्हणूनच या संस्थेची महिना सभासद वर्गणी आहे रुपये १ ते १०. (ज्याला जशी परवडेल तशी) आणि आजीव सभासत्वाची फी शंभर रुपये. ‘पालम’ने सर्वसामान्यांनाही प्रेरित केलंय याचं एक उदाहरण म्हणजे अरुप्पु कोत्ताई या गावातील एका अशिक्षित, रोजंदारीवर काम करणाऱ्या तमिळ मणी नावाच्या माणसाने ‘पालम’साठी गेल्या १५ वर्षांत २० लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे हा माणूस त्या छोटय़ा गावाच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता आणि त्या गावातील कोणाचीही दहा रुपयांच्या वर देण्याची ऐपत नव्हती तरीही.
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत तर कल्याणसुंदरम यांच्या निरपेक्ष सेवेने एवढे भरावले की या अभिनेत्याने त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं. पण त्यांच्या आलिशान बंगल्यात, तिथल्या उच्च जीवनशैलीत ते रमू शकले नाहीत. त्यामुळे दोनच महिन्यात ते पुन्हा आपल्या आठ-बाय-आठच्या खोलीत राहायला आले. मात्र या दोघांमध्ये एक जिव्हाळय़ाचा बंध निर्माण झालाय एवढं खरं!
३० कोटी रुपयांचं दान केल्याच्या बातमीने कल्याणसुंदरम एकदम प्रकाशझोतात आले. ३०० मासिकांतून आणि १५ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. पण त्यांचे पाय मात्र कायम जमिनीवरच राहिले.
जाताना माणूस काहीच बरोबर घेऊन जात नाही, हे माहीत असलं तरी मिळवलेल्या सर्वस्वाचं दान करणारे पालम कल्याणसुंदरम यांच्यासारखा एकमेवच. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष असं म्हटलं जातं. यानुसार इहलोकातच मोक्ष मिळवणाऱ्या या तपस्व्याकडे पाहताना कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात..
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी
http://www.anbupaalam.org
mail@anbupaalam.org
संपदा वागळे – waglesampada@gmail.com

 

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान