शाळा विचार करत होती, ‘मुलं त्यांचं ‘मन’ घेऊन शाळेत येतात. समोर पुस्तक असतं, शिक्षक शिकवत असतात, मधेच ‘समजलं का?’ विचारत असतात, मुलं माना डोलवतात आणि मनातल्या विचारात बुडून जातात. यानं खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. मुलांच्या मनाला वाट करून द्यायला हवी. काहीतरी केलं पाहिजे.’ त्यावर शाळेला एक कल्पना सुचली. तिने पेटी ठेवली प्रत्येक वर्गात. ‘मला सांगा मनातलं’ विचारणाऱ्या या जादूच्या पेटीची ही गोष्ट..
शाळा विचार करत होती.. ‘किती गंमत आहे नाही! मी एकच अशी वास्तू आहे जिथं इतक्या प्रकारची मुलं जमतात. इतक्या घरातून मुलं येतात. प्रत्येक घर वेगळं. दिसायला सर्व माणसं सारखी दिसतात. कदाचित घरंही थोडय़ाफार फरकानं सारखीच असतात. पण प्रत्येक मूल आपापलं घर ‘घेऊन’ शाळेत येतात..’
शाळा मुलांना पहात होती. मुलांचं बोलणं ऐकत होती. मुलं मुलांचं ‘मन’ घेऊन शाळेत येतात. समोर पुस्तक असतं, शिक्षक शिकवत असतात, मधेच ‘समजलं का?’ विचारत असतात, मुलं माना डोलवतात आणि मनातल्या विचारात बुडून जातात. यानं खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. मुलांच्या मनाला वाट करून द्यायला हवी. काहीतरी केलं पाहिजे. किती प्रकारच्या शंका मनात येतात मुलांच्या! आणि मुलंही किती वेगवेगळ्या प्रकारची, किती वेगवेगळ्या घरांतून येणारी. कुणाचे घर कुडाचे, कुणाचे सिमेंटचे, कुणाचा बंगला, कुणाची झोपडी, कुणी रस्त्यावर, कुणी प्लॅटफॉर्मवर.. तरी मुलंच! कुणाला खूप आहे जेवायला, कुणाला दोन वेळचं आहे, कुणी एक वेळच जेवतं, कुणाला तर अजिबात नाही मिळत. शाळेच्या मनात हे सारं खदखदत होतं नि हे इथे असणाऱ्यांना समजून कसं द्यायचं? हा प्रश्न पडून शाळेला चटके बसत होते नि भिंती थरथरत होत्या.
एक दिवस वर्गावर्गात एक पेटी आली. साधीच पुठ्ठय़ाची. मुलं आश्चर्यानं पेटीकडं पाहात होती. पेटीवर लिहिलं होतं, ‘सांगा तुमच्या मनातलं.. विचारा मला, सांगेन तुम्हाला’ मुलांना कळेना. काय करायचं नि काय विचारायचं? मुलांची चुळबुळ. आपापसात चर्चा. सगळ्या शिक्षकांना हे गृहीत होतं. पण नवीन काही सुरू करण्यापूर्वी इथले सगळे शिक्षक एकत्र बसून चर्चा करायचे. सर्व शक्यतांचा विचार व्हायचा. काय करत आहोत नि का करत आहोत पक्कं ठाऊक असायचं. कदाचित कसं करायचं याचं उत्तर थोडंफार वेगळं असेल. मात्र हेतू स्पष्ट असायचा. त्यामुळे केवळ पेटी वर्गात ठेवून काम संपले नाही तर काम सुरू झाले. इथे राबणं नव्हतं तर मनापासून काही करणं होतं, त्यात प्रत्येकजण आपलं काही देत होता, टाकत होता.
 शिक्षक आपापल्या वर्गात सांगू लागले एक दिवस! ‘‘तुमच्या अनेक शंका असतात. काही विचार असे असतात जे सांगायला तुम्हाला भीती वाटते. अनेक गोष्टी पाहता, ऐकता. त्याबद्दल तुम्हाला काही विचारायचे असते. आपल्या नि इतरांच्या शरीराबद्दल जाणून घ्यायचे असते. वेगळं काही करावंसं वाटतं, पण सुरुवात कशी करायची ते समजत नसतं. निसर्गात घडणाऱ्या, पक्षी प्राण्यांच्या अनेक घटना तुम्ही पाहता, मुख्य म्हणजे तुमच्या मनात खूप काही असतं पण त्याला बाहेर पडायला संधी मिळत नाही. ‘मला अमुक करावंसं वाटतं. कसं करू?’ ‘मुलगा-मुलगी याचं शरीर वेगळं कसं असतं?’ ‘माझ्या घरी हे हे प्रॉब्लेम्स आहेत.’ ‘अभ्यास करताना हे..हे.. समजत नाही,’ असे कितीतरी प्रश्न मनात असतात. तुमच्या चिंता, समस्या, अडचणी, काळजी हे सारं या पेटीत तुम्ही पोचवलं तर त्यावर काही करता येईल. नेहमीचा अभ्यास सोडून हे सारं करायचं. तुम्ही लिहायचं आणि पेटीत टाकायचं.. न घाबरता अगदी काहीही लिहा. त्याची उत्तरं कशी शोधायची याविषयी आम्ही सांगू. काही उत्तरं सगळ्यांना समजायची आवश्यकता असेल तिथं सगळ्यांसमोर ती सांगितली जातील.’’
सुरुवातीला मुलं गोंधळतील असं शाळेला वाटलं. तसं काहीच घडलं नाही. शेवटी मुलंच ती! त्यामुळे काहींनी नुसतेच कोरे कागद टाकले. माणसात जसं ‘अर्था’वरून स्तर पडतात तसे आपल्यातही स्तर आहेत. या वेगवेगळ्या स्तरावर अनेक गोष्टी मुलांना टोचत असतात, खुपत असतात. दरवेळी फक्त दु:खच असतं असं नाही आनंदही असतो. त्याच्यामुळे पुढं जाता येतं, पण ज्या दु:खामुळे पावलं मागं येतात त्या दु:खाची कारणं शोधायला हवी. हेच तर शिक्षकांनी, पालकांनी आणि एकूण समाजाने निरीक्षण करायला हवं..
इतक्यात शाळेला दुसऱ्या शाळेचा फोन आला, ‘‘एवढी ‘सेन्टी’ होऊ नकोस बरं का. फार ‘सेन्टी’ होणंही आजकाल परवडणारं नाही..’’ ही शाळा फक्त हलकेच हसली. इथं ही चिमुकली भविष्याच्या स्वप्नांच्या आशा घेऊन येतात, मग त्यांच्या निराशेचा शोध लावायला हवा, शोध घ्यायलाच हवा.. तिने ठाम ठरवलं.
किती किती तऱ्हा मुलांच्या! रोज नवे प्रश्न रोज प्रश्नांचं बदलतं स्वरूप. अनेक प्रश्न घेऊन मुलं शाळेच्या कुशीत शिरायची, मुलांच्या डोळ्यातली चमक पाहून तिनं मुलांना एक नाव दिलं होतं, ‘चकित.’ शाळा म्हणजे कणाकणातला चकितपणा हे शाळेला कळत होतं, पण इतरांचं काय?
शाळा म्हणते, ‘मी म्हणजे तारांगण.’ कधी शाळा कुणाला रडताना पाहात होती, कुणाला कुढताना पाहत होती, कुणाला घुसमटलेली पाहात होती. कुणी मनातून खूप घाबरलेलं असायचं. कुणाला खूप काही विचारायचं असायचं. कुणी चिडचिड करायचं. कुणी खूप शांत. अबोल असायचं. वर्गात सगळ्या तऱ्हेची मुलं. कुणाच्या चेहऱ्यावर कसलीशी चिंता व्यापून असायची आणि कधी हसण्याची हलकीशी सर येऊन जायची. कधी आई नसलेली मीनाक्षी, कधी कोमात गेलेल्या वडिलांचा अमोल, घटस्फोटित आईवडिलांचा सुशांत. पैशाच्या मागे धावणाऱ्या आईवडिलांची रंजना. एकांत पाहून त्रास देणाऱ्या नातलगांचा शारीरिक त्रास सोसणारी रमणी. सतत शिव्या देणाऱ्या वडिलांचा आदित्य. कुठं तरी प्रेमाची ऊब शोधणारी ही कोवळी मुलं. प्रत्येकाची गोष्टच वेगळी. प्रत्येक मुलाचा भावनिक, शारीरिक, मानसिक विकास व्हायला हवा, असे भाषणात सांगाणाऱ्या माणसांना शाळेला काहीतरी सांगायचे होते. तशा संधी तरी इथली माणसं उपलब्ध करून देतात का? मग मुलांनी कुणाला सांगायचं हे सगळं? शरीराच्या रचनेचे प्रश्न आहेत मुलांना! लैंगिकतेविषयी अपुरी-अर्धवट माहिती आहे. समजून घेताना अडचणी आहेत. संकोच मनात आहे. कुणाला स्वत:बद्दल न्यूनगंड वाटतो. कुणाला अहंगंड. कुणी आक्रमक. शिकण्याच्या प्रक्रियेतले असे कितीतरी अडथळे, बांध. कोण फोडणार? कळलेच नाहीत तर प्रयत्न कसा करायचा?
यासाठी काहीतरी केलंच पाहिजे या ध्यासानं शाळा कामाला लागली. याविषयीची शास्त्रीय माहिती शिक्षकांना मिळायला हवी. समस्या, मानसिक, भावनिक समस्यांची उकल कशी करायची हे समजून घ्यायला हवं.. विचार केला तर मग पुस्तकं व परीक्षा या गोष्टी फारशा महत्त्वाच्या राहात नाहीत. एकदा शाळा मुलांना म्हणाली, ‘तुम्ही मुलं म्हणजेच एक पुस्तक आहात. प्रत्येक पानावर नवा आशय.’ मुलांना यातलं काही कळलं नाही फारसं. काहीतरी वेगळं ऐकतोय हे मात्र लक्षात आलं.
शाळा विचारच करत होती, ‘‘एकमेकांना समजून घेणं, वाचणं, मदत करणं, शब्दांचा आधार देणं, पाठीवर थाप मारणं अशा अनेक गोष्टी हरवत चालल्या नाहीत ना? पालक कधी मुलांना काहीतरी वेगळंच सांगतायत. ‘पुस्तक घ्यायची नाहीत,’ तुझ्याकडे असलेलं मटेरियल इतरांना द्यायचं नाही मग त्यांना जास्त मार्क्स पडतील, सांगायचं त्यांना, ‘अभ्यास झाला नाही’‘यातून काय मिळतंय मुलांना! मुलांच्या सोशल कोशंटचं काय?’’ प्रश्न प्रश्न प्रश्न.
त्यालाच उत्तर होतं ती पेटी. ‘सांगा तुमच्या मनातलं.. विचारा मला, सांगेन तुम्हाला’ म्हणणारी.
पेटी उघडली गेली आणि ‘ती माझ्याकडे बघते याला मी काय करू,’ ‘तो मला आवडतो मी काय करू,’ ,‘घटस्फोट का घेतात?’, ‘बाळ कसं होतं?’, ‘अभ्यासात लक्ष का लागत नाही?’ ‘बाहेरचे संबंध म्हणजे काय?’ असे वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक प्रश्न होते. वयानुसार पेटीतल्या ५ प्रश्नांचं स्वरूप बदलत होते. या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिक्षकांनी शोधल्या नि याचं भान पालकांनाही दिलं. मुलांच्या मनात डोकावण्याचा एक वेगळा मार्ग शाळेला सापडला होता. आता त्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं यावर विचार होणार होता.