बाग फुलवण्यासाठी मातीच्या कुंडय़ा हा सर्वोत्तम पर्याय आहे. या दृष्टीने पर्यावरणीय हित लक्षात घेता बांबूचे, वेताचे करंडे वापरणे हे सर्वोत्तम आहे. यात पाण्याचा निचरा चांगला होतो व सर्व बाजूने वायू विजन होत असल्यामुळे करंडय़ातील बायोमासचे छान खतही तयार होते. करंडय़ाचे, टोपलीचे आयुष्यमान हे वर्षभराचे असले तरी कालांतराने त्यात तयार होणारी माती ही रोपांसाठी उपयुक्त असते.
या प्रकारात गव्हांकुरासाठी छोटय़ा-मोठय़ा टोपल्या, पसरट टोपल्या, पानाच्या किंवा फळांच्या दुकानात मिळणारे खोलगट करंडे उपलब्ध असतात. तसेच हे करंडे तेलाच्या डब्यावर किंवा पत्र्याच्या पन्हाळीवर ठेवल्यास नितरून आलेले पाणी पुन्हा वापरू शकतो. हे करंडे किंवा टोपल्या वापरताना करंडे जुन्या साडय़ांनी आतून बाहेरून गुंडाळून घ्यावी म्हणजे सूक्ष्म मातीचे कण वाहून जात नाही. या प्रकारात रताळी, गाजर, मुळा यासारखी कंदमुळे चांगली पोसली जातात म्हणजेच अधिकचे उत्पादन आपल्या हाती येते. तसेच परिसरातील उपलब्ध वस्तूंचाही वापर अनायासे होत असतो. वेताच्या अशा करंडय़ांसोबतच, घरातल्या वापरानंतर तुटले-फुटलेले प्लॅस्टिकचे टब, बादल्या तसेच रंगांच्या बादल्यांतही फुलांचा व भाजीपाल्याचा बगीचा फुलवता येतो. ते भंगारात देण्याऐवजी बागेसाठी वापरले तर बगीचा चांगला फुलवता येतो. प्लॅस्टिकचे टब ऊन्हात तापतात. त्यामुळे ते जीर्ण होत असले तरी दोन टब एकमेकांत टाकावेत म्हणजे आतील टब दीर्घकाळ टिकतो.  नेहमीच्या प्लॅस्टिक कुंडय़ांपेक्षा घराला लावल्या जाणाऱ्या रंगाच्या बादल्या स्वस्त असतात, रंगाच्या बादल्या या लाल, पांढऱ्या रंगात असतात. त्यांना छान काळा, गडद हिरवा रंग देऊन त्यावर रंगीबेरंगी फुले, वेली, नक्षी ऑईलपेंटने चितारता येईल.  या बादल्या वर्षांनुवर्षे टिकतात. अर्थात या वस्तूचा वापर म्हणजे ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या उक्तीचा संदेशही देतात. तसेच प्लॅस्टिक रिसायकलमुळे होणारे प्रदूषणही टाळता येते. पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी छिद्र पाडणे गरजेचे असते.
संदीप चव्हाण -sandeepkchavan79@gmail.com