पद्मावतीबाई शंभर वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार होत्या. महात्मा गांधींच्या पहिल्याच भाषणाने प्रभावित होऊन त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले होते. व्यंकटेश हरोलीकर या स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांला महारोग झाल्यानंतर त्यांची सेवा करताना लोकांनी नावं ठेवू नयेत म्हणून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या, ‘तरुणांनो, खेडय़ात चला’ हा गांधीजींचा आदेश प्रत्यक्षात आणणाऱ्या, सामान्य स्त्रीला चळवळीत आणण्यासाठी ‘राष्ट्रीय युवती संघ’ स्थापन करणाऱ्या, १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात ‘महाराष्ट्रातील पहिली सत्याग्रही’ म्हणून निवड झालेल्या, तत्त्वनिष्ठ स्वातंत्र्यसैनिक पद्मावतीबाई हरोलीकर या तेजस्वी शलाकेविषयी..
पुण्यात भिकारदास मारुतीजवळ राहणाऱ्या पद्मावतीबाई हरोलीकर यांना त्यांची मुलाखत घेण्यासाठी भेटले, ते साल होतं, १९७६. माझ्या भेटीचे कारण कळल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मुली, आलीच आहेस तर एक कप चहा पी व जा. मी कोणाला मुलाखत देत नाही. मी महात्मा गांधीवादी आहे. आणीबाणीवाली गांधीवादी नाही. मुलाखत मिळणार नाही.’’ मी म्हटले, ‘‘मी स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची विद्यार्थिनी आहे. गांधीजी माझेही दैवत आहेत. तुम्ही मुलाखत दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तुम्ही इंग्रजांसमोर सत्याग्रह केला, मी तुमच्यासमोर करते.’’ सकाळी १० ते १ मी हातातले पुस्तक वाचत व त्या ८५ वर्षांच्या बाई व घरातली माणसे आपापली कामे करीत होती. दुपारी एकनंतर त्यांची जेवायची वेळ झाली. ‘‘तू घरी जा,’’ त्यांनी पुन्हा सांगितले; पण मी हलले नाही. ज्या अर्थी मुलाखत देण्याचे ही आजी नाकारते त्या अर्थी ती अत्यंत तत्त्वनिष्ठ व ध्येयनिष्ठ असली पाहिजे ही माझी खात्री झाली. मी स्वातंत्र्यसैनिकांच्या कोशातून त्यांचे नाव निवडले होते. तिथे ५/६ ओळींत त्यांची माहिती होती. शेवटी त्यांनीच माघार पत्करत ‘‘हे दोन आंबे खा व बोल बये, विचार काय ते,’’ म्हणत मुलाखतीला सुरुवात केली आणि ती अपूर्व मुलाखत रंगली दुपारी साडेचार-पाचपर्यंत. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकांचे स्वभाववैशिष्टय़ वाचकांसमोर यावे.
मुंबईत टिळकभक्त पित्रे कुटुंबात पद्मावतीबाईंचा जन्म १८९२ साली झाला. रमा त्रिंबक पित्रे अकरा वर्षांची झाल्यावर तिचे लग्न पुण्याच्या प्रसिद्ध कुवळेकर घराण्यातील मुलाशी झाले. दुर्दैवाने सत्यभामा नावाने कुवळेकर कुटुंबात आलेल्या या रमा पित्रेला वैधव्य आले. कुवळेकरांचे दोन्ही मुलगे गेल्यामुळे ते निराश झाले. ते नवमतवादी होते. आपल्या मोठय़ा सुनेला सोवळी होण्यापासून परावृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न व्यर्थ झाले. आता सत्यभामेला रमाबाई रानडेंच्या सेवासदनात पाठवून शिकवायचेच, असे त्यांनी ठरविले. केशवपन सोडाच, पण विधवेला दागिने वापरण्याचा अधिकार नाकारणाऱ्या त्या समाजात त्यांनी आपल्या सुनेला रोज वापरीत असलेले सर्व दागिने वापरण्याची उलट सक्ती केली. रमा ऊर्फ सत्यभामा केतकी रंगाची, तेजस्वी व करारी डोळ्यांची व धारदार नाकाची सुंदर मुलगी होती. ८५ वर्षांच्या तेजस्वी पद्माबाई त्यांच्या तरुणपणाच्या सौंदर्याची साक्ष देत होत्या. सत्यभामा सेवासदनमध्ये इंग्रजी ६ वीत शिकत असताना महात्मा गांधींनी पुण्याला भेट दिली. १९२० साली किलरेस्कर नाटय़गृहात झालेल्या गांधीजींच्या सभेला सत्यभामाबाई सेवासदनमधील मैत्रिणींबरोबर गेल्या होत्या. त्या सभेत जमलेल्या स्त्रियांकडे वळून गांधीजी म्हणाले, ‘‘माझ्या सत्य व अहिंसेवर आधारलेल्या या लढय़ात भाग घेण्यास तुम्ही समर्थ आहात. यासाठी स्त्री वर्गात जागृती करण्याची शिकस्त करा.’’ महात्माजींच्या या भाषणाचा सत्यभामाबाईंवर फारच खोल परिणाम झाला. सभा संपल्यावर आपल्या अंगावरचे दागिने उतरून त्यांनी गांधीजींच्या हातात दिले. ‘‘स्त्रीचे सौंदर्य दागिन्यात नसून तिच्या सुदृढ प्रकृतीत, करारी चेहऱ्यावर व कर्तव्यनिष्ठेत आहे,’’ हे गांधीजींचे विधान पटले असून आपण यापुढे दागिन्यांचा स्पर्शही शरीराला होऊ देणार नाही अशी शपथ घेतली व ती आजन्म पाळली.
महात्मा गांधींच्या भेटीनंतर त्यांनी हळूहळू गांधीप्रणीत विधायक कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली. सेवासदनच्या शिक्षणात प्राथमिक परिचारिका शिक्षणही त्यांना मिळाले होते, त्याचा त्या उपयोग करीत. त्यांनी डॉ. इंदुमती नाईक यांच्या सूतकताई वर्गात सूतकताईचे शिक्षण घेतले. आनंदीबाई जोगळेकर नावाच्या बाईंना बरोबर घेऊन सूत कमिटी स्थापन केली. त्यात शेकडो बायका सहभागी झाल्या. त्यांना सूत विकून किंवा त्याची खादी विणून कमाई करता येई. खादी प्रदर्शनात पुणे सूत कमिटीच्या सुताला पहिला नंबर मिळाला. या शंभरनंबरी सुताचे नऊवारी विणलेले लुगडे बालगंधर्वानी स्वत:साठी विकत घेतले होते. ‘मानापमान’ नाटकातील गरीब वेशातील ‘भामिनी’ची भूमिका करताना अनेकदा तेच लुगडे गंधर्व नेसत, असे जुनी मंडळी सांगत. सत्यभामाबाई सूतकताई कामात पूर्ण बुडून गेल्या होत्या.
१९२७ साली देशभक्त शंकरराव देव यांनी ‘स्वराज्य’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शंकरराव स्वत: संपादक होते. मुद्रक व प्रकाशक व्यंकटेश हरोलीकर होते. त्यामधील ‘निदान धर्मयुद्ध करा’ या अग्रलेखावर एक संस्कृत वचन छापले होते. ‘मी तुमचा रक्षणकर्ता आहे, असे सांगून जो राजा रक्षण करीत नाही त्याला, पिसाळल्यामुळे अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ठार मारावे,’ असा त्या वचनाचा भावार्थ होता. भारतीय दंड संहितेच्या १२१ व १२४ या कलमान्वये त्यांच्यावर राजद्रोहाच्या व खुनाला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली खटला चालला. दोघांनीही वकील न देता न्यायालयात आपले लिखित निवेदन वाचून दाखविले. १९२८ साली दोघांनाही दोन दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगात हरोलीकरांना कुष्ठरोग झाल्याचे आढळले. तुरुंगात योग्य ती मदत न मिळाल्यामुळे त्यांचा आजार बळावला. त्यानंतर त्यांना शिक्षा पूर्ण होण्याआधीच सोडून दिले. व्यंकटेशराव एकटेच राहात. नशिबाने एका वाडय़ात एक खोली त्यांना भाडय़ाने मिळाली, कारण त्या काळात राजद्रोही कार्यकर्त्यांसारखे जळते निखारे घरात ठेवून घेणारा महाभाग मालक मिळणे विरळाच होते.
सत्यभामाबाईंना व्यंकटेशरावांच्या सुटकेबद्दल व आजारीपणाबद्दल काँग्रेस कमिटीत कळले. त्या त्यांना भेटायला गेल्या. व्यंकटेशराव हरोलीकर जखमा झालेले हातपाय स्वत:च साफ करून मलमपट्टी करीत. स्वत: स्वयंपाकपाणी, केरवारे, स्वत:ची भांडीधुणी स्वत: करीत. सत्यभामाबाईंचे परिचारिकेचे जुजबी शिक्षण झाले होते. त्या रोज जाऊन व्यंकटेशरावांची सर्व कामे व शुश्रूषा करू लागल्या. सर्व वाडा कधी कुजबुज करून, तर कधी टोमणे मारून व्यंकटेशरावांना सतावू लागला. आठ-दहा दिवस हा प्रकार पाहून व्यंकटेशरावांनी सत्यभामाबाईंना म्हटले, ‘‘आपण माझी सेवा केली याबद्दल मी आभारी आहे. आपण एक कुलीन विधवा आहात. आपले माझे नातेगोते नाही. अशा परिस्थितीत आपण माझी सेवा करता यामुळे आपली बदनामी होत आहे. माझ्या बदनामीला मी घाबरत नाही. तरी कृपा करून आपण उद्यापासून येऊ नये.’’ दुसरे दिवशीही बाई परत आलेली पाहून हरोलीकर पुन्हा आपले म्हणणे मांडू लागले. सत्यभामाबाई म्हणाल्या, ‘‘समजा, मी तुमची नातेवाईक असते, तर तुम्ही मला तुमचे काम करायला परवानगी दिली असती का?’’ त्यांचे होकारार्थी उत्तर आल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘इतकीच अडचण असली तर तुमच्याशी लग्न करून नाते जोडायला मी तयार आहे. तुमच्यासारखा देशभक्त आणखी काही र्वष माझ्यामुळे जगला व देशकार्य करू शकला तर त्यासारखे पुण्य काम दुसरे नाही. तेव्हा आता निदान तुमच्याशी लग्न करायला मला परवानगी द्या. माझ्या स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी मला संसार मांडायचा असता, तर माझ्या सासऱ्यांच्या इच्छेलाच मी मान दिला असता. तुम्ही देशाचा संसार मांडला आहे. त्यासाठी तुम्ही जगणे भाग आहे व म्हणूनच तुम्हाला जगविणे माझे कर्तव्य आहे.’’ निरुत्तर झालेल्या हरोलीकरांनी सत्यभामेच्या सासऱ्यांच्या संमतीने तिच्याशी विवाह केला व सत्यभामाबाईंनी पद्मावती व्यंकटेश हरोलीकर या नावाने संसार सुरू केला. व्यंकटेशरावांना परिश्रमपूर्वक बरे केले. पुढे दोघांनी मिळून सुमारे पंधरा वर्षे चळवळीला पूर्ण वाहून घेतले. विधायक कार्यक्रम राबविला व ग्रामसुधारणेचे काम केले.
१९३० मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सभेत वाचल्याबद्दल बाईंना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सुटून आल्यावर त्यांनी ‘तरुणांनो, खेडय़ात चला’ या गांधीजींच्या आदेशाप्रमाणे खेडय़ात जाऊन काम करायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्य़ातली एखडपूर, मंगेवाडी ही सांगोला तालुक्यातली खेडी निवडली. सांगोला तालुका तर कायमच दुष्काळी तालुका म्हणून नोंद होती. ग्रामसुधारणेचे काम सामान्य खेडय़ापेक्षा दुष्काळी खेडय़ात करणे अधिक जरुरीचे होते, तसेच अधिक मेहनतीचेही होते. सरळसोट काम कोणीही करेल. गांधीजींनी जो आदेश दिला होता तो शहराजवळची सुधारणेची वाट चटकन पकडू शकतील अशा खेडय़ांपेक्षा दूरवर पसरलेल्या खेडय़ातच समाज, स्वातंत्र्य, अहिंसा इत्यादी विचार पोहोचणे जरुरीचे होते. ग्रामविकास म्हणजे फक्त रस्ते, पाणी, शाळा, वीज अशा सुधारणा गावात होणे, असा मर्यादित अर्थ नाही. एक सुदृढ, समंजस, देशप्रेमी समाज बनविणे हे अधिक महत्त्वाचे होते. प्रत्येक गाव स्वावलंबी होणे इत्यादी गोष्टी ग्रामसुधारमध्ये अध्याहृत होत्या. हरोलीकर दाम्पत्याने एखडपूर व मंगेवाडी ही दोन्ही खेडी त्याच धर्तीवर बनविण्याचा सफल प्रयत्न केला. सामान्य स्त्रीला या चळवळीत ओढण्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रीय युवती संघ’ स्थापन केला होता. या युवती संघाच्या स्वयंसेविका नित्यनियमाने सूतकताई करीत व निदर्शने, प्रभातफे ऱ्या, व्याख्याने घडवून आणणे इत्यादी विधायक कार्यात भाग घेत.
१९३७ पासून व्यंकटेशरावांची प्रकृती खालावत गेली. ते अंथरुणाला खिळून होते. त्याचा परिणाम पद्मावतीबाईंच्या कामावर होणे साहजिकच होते. १९३७ साली प्रांतिक स्वायत्तता कायद्यानुसार पद्मावतीबाईंना स्त्रियांसाठी राखीव जागा असलेल्या मतदारसंघाने उमेदवारी द्यावी, असे अनेक कार्यकर्त्यांनी प्रांतिक व मध्यवर्ती काँग्रेसला सुचविले; पण ही सूचना दोन्ही पातळ्यांवर फेटाळली गेली. ज्या बाईंने अत्यंत निष्ठेने काँग्रेसच्या चळवळीत झोकून दिले, तिला नेत्यांनी अशी वागणूक द्यावी याचे आज आश्चर्य वाटत नाही, कारण आज तो नियमच झाला आहे. हरोलीकर दाम्पत्यासही त्याचे विशेष वाईट वाटले नाही, कारण १९२० ची काँग्रेस व १९३२ ची काँग्रेस यात फारच मोठा फरक पडला होता. हळूहळू त्यात स्वत:चे महत्त्व वाढवून घेणारे व आपला स्वार्थ साधणारे लोक काँग्रेसचे दिखाऊ सभासद होत गेले व अशांचीच संख्या वाढू लागली ती आजपर्यंत. १९३९ साली व्यंकटेश हरोलीकर यांचा मृत्यू झाला व पद्मावतीबाईंच्या नशिबी दुसऱ्यांदा वैधव्य आले.
पद्मावतीबाई १९२१-२२ साली महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसच्या सभासद व १९२३-२४ साली अखिल भारतीय काँग्रेसच्या कमिटीवर निवडून गेल्या होत्या. १९३० ते ३२ दोन वर्षे त्यांना कारावास घडला. १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांची ‘महाराष्ट्रातील पहिली सत्याग्रही’ म्हणून निवड झाली होती. त्या सत्याग्रहात त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास सोसावा लागला. १९४२ च्या ‘चले जाव’च्या चळवळीत त्यांना दहा महिने स्थानबद्ध केले होते.
१९४४ पासून त्या परत सोलापूर जिल्ह्य़ात काँग्रेसचा कार्यक्रम राबवीत होत्या. १९४६ ते १९४८ पर्यंत सोलापूर नगर परिषदेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी लक्षणीय होती. स्वातंत्र्यानंतर त्या सवरेदय गटाबरोबर काम करू लागल्या. सवरेदयाच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी गाव सुधारण्यासाठी त्यांनी अविश्रांत काम केले. जयसिंगपूर व कोल्हापूर येथेही गांधीजींच्या विधायक कार्याचा प्रचार त्यांनी केला. वयाची ६१ वर्षे झाल्यावर प्रकृतीची अस्वस्थता जाणवू लागली. विधायक कार्यासाठी लागणारे श्रम वयपरत्वे झेपेनासे झाले. त्यामुळे त्यांच्या कामाचा आवाका एकदम संकुचित झाला व ते साहजिकच होते.
१९३९ साली बाळासाहेब खेर मुख्यमंत्री असताना पद्मावतीबाईंना शोकसांत्वनाकरिता भेटायला गेले होते. हरोलीकरांची सर्व संपत्ती इंग्रजांनी जप्त केली होती. ती परत मिळविण्यासाठी सरकारकडे अर्ज केल्यास त्यांना परत
मिळू शकेल म्हणून तातडीने तसा अर्ज करण्याची विनंती
त्यांनी पद्माबाईंना केली. ‘‘आर्थिक बाबतीत कुणाकडे
हात पसरून माझ्या पतीने उच्च ध्येयाने प्रेरित होऊन केलेल्या त्यागाला मी कमीपणा आणणार नाही,’’ असे बाणेदार उत्तर
त्यांनी दिले.
पद्मावतीबाई शतायुषी होत्या. त्यांनी स्वातंत्र्याची ४०-४२ वर्षे पाहिली. ‘चले जाव’ची सुवर्णजयंतीही पाहिली व त्यानंतर एक महिन्यातच त्यांचे निधन झाले. स्वातंत्र्यसैनिकांची कोणतीही मानपत्रे त्यांनी स्वीकारली नाहीत. मानधनासाठी अर्जही केला नाही. आपल्या कामाची पैशात किंमत करणे त्यांना मंजूर नव्हते. पद्मावतीबाई शंभर वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार होत्या. आणीबाणीपासून त्यांचे मन राजकारणाला पूर्ण विटले. आपल्या सभोवतालच्या कार्यकर्त्यांच्या मुलाबाळांची आईवडिलांच्या ध्येयासाठी झालेली होरपळ त्यांना खिन्न करे. गांधीजींची उच्च तत्त्वे त्यांच्याच चेल्यांनी धुळीला मिळविली, मग तरुण पाहाणार तर कुणीकडे, हा त्यांनी मला विचारलेला प्रश्न आजही कानात घुमतो आहे.
gawankar.rohini@gmail.com

ajit pawar warns his siblings
“गप्प बसतोय म्हणून वळवळ करु नका”, अजित पवार यांचे भावंडांना प्रत्युत्तर
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले