‘आपण ‘आहोत’ तसं ‘असणं’ खासच असतं. पसारा करणं तर आवश्यक असतं. तो नंतर आवरून टाकला की झालं. नवीन काही निर्माण करायचं तर थोडा पसारा, थोडा कचरा, थोडा चिकचिकाट होणारच!’ – अ‍ॅन सायर वाइजमनचं हे म्हणणं मुलांना कृतिशील बनवणारं आहे.

‘मुं लं हल्ली किती लहानपणापासून ‘बोअर’ होतात! नुसती टी.व्ही. बघत बसतात. लॅपटॉपला चिकटतात. मोबाइल घेऊन खेळत बसतात. आई-वडिलांना वेळ नाही, शाळेत मन रमत नाही, बाहेर सहज जाता येत नाही, काही अर्थपूर्ण करण्याचे मार्ग समोर नाहीत, समजून घेणारी माणसं नाहीत, अशा वेळी मुलं ‘बोअर’ होतील नाही तर काय?
 ‘बालभवनात’ आम्ही असं म्हणतो की, खेळायच्या निमित्तानं मुलं २-३ तास रोज टी.व्ही.पासून लांब राहिली तरी खूप झालं. मुलं टी.व्ही. बघतात ती त्यावरचे कार्यक्रम त्यांना खूप आवडतात म्हणून नाहीच, तर करायला काही चांगलं असतं याची त्यांना ओळख नाही, गोडी नाही म्हणून. काही मुलं अशीही बघते मी की, घरात टी.व्ही. लागलेला असला तरी त्याच्याकडे पाठ करून ती स्वत:चे आवडते उद्योग करीत बसतात.
टी.व्ही.पाहून नुसते डोळे बिघडतात असं नाही तर सतत मेंदूवर आदळणाऱ्या विविध चित्रांनी मेंदू सुन्न होतो. तो करमणुकीसाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहायला शिकतो. काही निर्माण करण्याची त्याची स्वत:ची शक्ती मारली जाते. दर अध्र्या मिनिटाला चॅनल बदलण्याची सवय लागलेली मुलं एक गोष्टदेखील सलग पाच मिनिटं ऐकू शकत नाहीत, मग अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता कुठून आणायची?
यासाठी तीन वर्षांपासूनच्या मुलांना प्रत्यक्ष कृती करण्याची गोडी लागेल अशा गोष्टींमध्ये गुंतवायला हवं. मुळात मुलं कृतिशीलच असतात. त्यांची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. माती, पाणी, वाळू, झाडं, पानं, दगड, काठय़ा, काटक्या, रंग यात मुलं इतकी रमतात की त्यातून त्यांना बाहेर काढणं कठीण असतं.
व्यायाम आणि खेळ या दोन गोष्टी तर रोजच्या रोज मुलांना मिळायलाच हव्यात, त्याही त्यातल्या आनंदासह. सध्या टी.व्ही.वर एक जाहिरात असते. त्यात आई उठल्या उठल्या संगीतावर व्यायाम करते. मुलांना, नवऱ्याला उठवून त्या व्यायामात सामील करून घेते. तसं दृश्यं घराघरांत दिसलं तर छानच. पण तसं होत नाही. मग निदान शाळा सुटल्यावर संध्याकाळी तरी मुलांना एक-दीड तास मदानावर खेळायला मिळावं.
मदानी खेळांबरोबरच कल्पक खेळांचाही चांगला उपयोग असतो. काही खेळ मुलांना चटपटीत बनवतात, काही समूहात काम करायला शिकवतात, काही झटपट निर्णय घ्यायला लावतात, तर काही खेळांमुळे मुलं विचार करायला शिकतात, सहकार्य करायला शिकतात, हरणं पचवून जिंकणाऱ्याचं कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा शिकतात. खेळणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्त्वच वेगळं दिसतं. ते अधिक आनंदी, खेळकर, मत्रीपूर्ण, उमदं, संवेदनक्षम असतं. त्यामुळे खेळ ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
व्यायाम आणि खेळांबरोबरच चित्रकला, हस्तकला, गोष्टी, गाणी, नृत्य आणि अभिनय या क्षेत्रांतले अनुभव मुलांना लहानपणापासून मिळायला हवेत. मुलांना भरपूर चित्रं काढू द्या. कला हा स्वातंत्र्याचा पासपोर्ट आहे, असं म्हणतात. कलांनी मुलांचं मन स्वतंत्र होतं, मोकळं होतं, संवेदनशील होतं. कधी कधी मुलं चित्रकलेतून स्वत:च्या भीतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ती भुतांची चित्र काढतात, राक्षसांची काढतात, भयानक प्राण्यांची काढतात, समुद्री माशांची काढतात आणि मनातल्या भीतीपासून मुक्त होतात. मुलांनीच काय, आई-वडिलांनीही चित्रं काढण्याची सवय ठेवायला हवी. मुद्दाम वडिलांनाही असे म्हणतेय. त्यात गंमत तर येतेच, पण ताणलेलं मन सुखावतं, सल होतं.
माणसाचे हात जर काही निर्मिती करू शकत नसतील तर त्यांचा उपयोग काय? मुलांना हातांनी करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. लहानपणी तर हातांच्या बोटांच्या हालचालीचा संबंध न दिसणाऱ्या मेंदूच्या विकासाशी असतो. मुलांनी विविध पोताच्या वस्तू हाताळायला हव्यात. कागदकाम, मातीकाम, चिकटकाम, कोरीव काम, ओरिगामी, कात्रीने कापणं, शिवणं, कुटणं, किसणं, मळणं, पुसणं, धुणं, घासणं, खरवडणं अशा किती तरी कृती करीत राहिल्या पाहिजेत. कामांनी खरखरीत झालेले हात जपलेल्या मऊ हातांपेक्षा अधिक चांगल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख दाखवतात. मुलं उद्योग करीतच असतात, त्यांना हे आश्वासन पालकांनी दिलं तर किती छान होईल!
आपण मुलांना सारखी घाई करीत असतो- चल, आटप लवकर, उशीर होतोय, पळ, लवकर खा, भरभर आवर. आमच्या मत्रिणीच्या लहान मुलीने एकदा रिक्षात बसल्या-बसल्या निरागसपणे विचारलं, ‘‘आई, आज आपल्याला कुठे जायला उशीर होतोय?’’ शक्य तिथे तरी हे ताण कमी करायला हवेत. मुलांचे आणि आपलेही.
अ‍ॅन सायर वाइजमन या अमेरिकन बाईंनी आयुष्यभर असंख्य गोष्टींची निर्मिती केली. कपडे वाळत घालायच्या चिमटय़ांची माणसं, प्राणी करून त्यांच्यातून सबंध सर्कस निर्माण केली. त्या सतत लिखाणाबरोबर चित्रंही काढत. स्वप्नांचे अर्थ लावत, वाया गेलेली भांडी, पाइप्स यांना ओळीने टांगून सुंदर वाद्य निर्माण करीत. त्यांचे हात अखंड चालू असायचे. त्या पुण्यात आल्या होत्या तेव्हा त्यांनी चित्रं काढून स्वत:चे प्रश्न सोडवण्याची सुंदर कार्यशाळा घेतली होती.
 बालभवनात मुलं जे करतात ती संधी सर्वच मुलांना मिळायला हवी. सणांच्या निमित्तानं मुलं हंडय़ा रंगवतात, राख्या तयार करतात, रांगोळय़ा काढतात, मातीचे गणपती करतात, किल्ले करतात, पणत्या रंगवतात, आकाशकंदील करतात, मुलांच्या निर्मितीत सर्वात सुंदर असतात त्यांच्या चुका. त्यांना चुका तरी का म्हणायचं? ती निर्मितीच असते त्यांची!
मुलं सहलीला वर्षांतून २५ ठिकाणी तरी जाऊ शकतात. पुण्यातल्या सर्व टेकडय़ा, सर्व बागा, ऐतिहासिक ठिकाणं, सामाजिक संस्था, विशेष देवळं, नद्यांचा संगम.. मुलं जातात ती ठिकाणं अनेकदा मोठय़ांनाही माहीत नसतात. मुलं पक्षीनिरीक्षणाला जातात, ट्रेकिंगला जातात, विविध कारखाने बघतात. एप्रिल-मे महिन्यात तर त्यांना अनेक शिबिरांचा अनुभव मिळतो. ‘खुल जा सिम सिम’ असं पंधरा दिवस अनेक वेगळे अनुभव देणारं शिबीर असतं, ‘चालत-चालत पुणे बघू’ हे पुण्याची ओळख करून देतं, वाचनाचं प्रेम पुस्तकांची गोडी लावतं, ग्रामीण भागात निवासी शिबीर असतं. छोटय़ांसाठी ‘ज्युनिअर गडबड शिबीर’ असतं, गंमत शिबीर असतं, मुलं स्केटिंग करतात, योगासनं करतात आणि पालकांसाठीही पालक शिबिरं असतात. संमेलन, गंमतजत्रा, माध्यमजत्रा, शेकोटी अशा अनेक उपक्रमांनी मुलांसमोर सुंदर अनुभवांचं, डोळे उघडणाऱ्या अनुभवांचं, धीट बनवणाऱ्या अनुभवांचं समृद्ध दालनच उघडतं.
टागोरांच्या एका गाण्यावर नाच करायचा तर मुलं अनेक गाणी ऐकतात, अर्थ समजून घेतात, शांतिनिकेतनात असतील असे फुला-पानांचे दागिने तयार करतात आणि काही काळ ‘टागोरमय’ होतात.
वसंतोत्सवात मुलं झाडांना प्रेमाने भेटतात, गरजेपेक्षा जास्त वस्तू आपण वापरतो तेव्हा आपणही लाकूडतोडय़ाच असतो हे समजून घेतात आणि झाडं तोडायला कारण व्हायचं नाही असं ठरवतात. शेती म्हणजे तर निर्मितीचा उत्सव असतो आणि कधी निराशेचा फटका असतो. स्वत: काढलेल्या भाज्या घरी नेणं किंवा बालभवनातच त्या करून सर्वानी खाणं याचा आनंद मुलांना खूप शिकवणारा असतो. बालभवनने मुलांसाठी खूप मित्र-मत्रिणींचा परिवार जोडलेला आहे. त्यातले कुणी ना कुणी येऊन मुलांना नवे अनुभव देतात. विष्णुपंत चिंचाळकर, अरिवद गुप्ता, एव्हेलिन मेटकाफ, नाओको कामिकाडो अशांसारखी मंडळी तर मुलांना वेगळय़ा विश्वातच घेऊन जातात.
खरंच! सर्वच मुलांचं बालपण अशा विविध अर्थपूर्ण संवेदनक्षम अनुभवांनी समृद्ध झालं तर ती कधीच बोअर होणार नाहीत, निराश होणार नाहीत, आनंदी राहतील! आपल्याला तरी आणखी काय हवं आहे?    

काही तरी नवीन करून बघायला काहीच
हरकत नाही
आणि चुका करायला घाबरायचं कारण नाही
चुकांमधून तर खूप शिकत जातो आपण
धोके पत्करायला काहीच हरकत नाही
आणि घाई करण्याचं काही कारण नाही

आपली स्वत:ची गती शोधून काढावी..
आणि आपल्याला मनापासून वाटतं
तसंच करावं..
नापास झालं तर काहीसुद्धा बिघडत नाही..
न घाबरता पुन्हा प्रयत्न करता येतोच.
   
 कुणाला आपण मूर्ख वाटलो तरी हरकत नाही
 इतरांपेक्षा वेगळे असलो तरी काहीच
बिघडत नाही
आपल्या मनाची तयारी होईपर्यंत थांबलं
तरी चालतं
 नवे प्रयोग केले तर छानच असतं,
काळजी मात्र घ्यायची  हे असंच का?
असं विचारायचं..आपण ‘आहोत’ तसं ‘असणं’ खासच असतं..

पसारा करणं तर आवश्यक असतं
तो नंतर आवरून टाकला की झालं
नवीन काही निर्माण करायचं तर
थोडा पसारा, थोडा कचरा,
थोडा चिकचिकाट होणारच!
    – अ‍ॅन सायर वाइजमन