कट्टय़ावर ज्येष्ठांमध्ये चाललेला एक संवाद ऐकू येत होता. संवादातील तात्पर्यानुसार, ‘आयुष्यभर सगळ्यांसाठी केले, पण कुणालाच त्याबद्दल कृतज्ञता वाटत नाही’ याची खंत तिथल्या आजींच्या मनात होती. इंग्रजीत एक म्हण आहे,  god gives and forgives, but man gets and forgets.. अहो, मानवी स्वभावाचाच हा मूळ दोष आहे म्हटल्यावर तक्रार कोणाबद्दल व कोणाकडे करायची? मुळातच तक्रार करायची तरी कशासाठी?
 ‘अहंकार विमूढात्मा कर्ताहंइति मन्यते’ असं परमेश्वरच गीतेत सांगतात. ‘मी केले’ हा अहंकार अतिशय वाईट. आपल्या हातून घडणाऱ्या कृतीपेक्षा त्यावरची प्रतिक्रिया वाईट फळ देते (sin is never in action but in reaction) असे चिन्मयानंद म्हणतात. आपल्याला व्यक्त करण्याचे जितके स्वातंत्र्य आहे तितकेच व्यक्त न करण्याचे स्वातंत्र्यही आहे, असे योगाचार्य व्यवहारे म्हणतात.
या वृत्ती जोपासण्याने बऱ्यापकी अहंकार त्याग करता येतो. अहंकार कमी झाला तरच खरी ज्ञानी वृत्ती वाढीला लागेल. तरच हातून खरा कर्मयोग घडेल. त्यातूनच अंत:करणाचे पावित्र, शुद्धी वाढीला लागेल. खरी शुद्धी, सात्त्विकता, शुचिता मौनातच जन्माला येते. दिवसभरात थोडा वेळ तरी मौन बाळगणे हे आपल्या व इतरांच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
पादसंचालन
थोडे अधिक अंतर्मुख होत आज आपण शयनस्थितीत पादसंचालन करू या. शयनस्थितीतील विश्रांती स्थिती घ्या. दोन्ही हात शरीराच्या बाजूला जमिनीवर ठेवा. आता शक्य असल्यास दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवा. शक्य नसल्यास एक पाय गुडघ्यात दुमडून पाऊल दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवा. आता सरळ असलेला पाय गुडघ्यात दुमडून गुडघा छातीजवळ आणा. पुन्हा पाय सरळ करा. सायकलिंग केल्याप्रमाणे खालून वर, वरून खाली अशाप्रमाणे फिरवा. पाय सरळ करताना श्वास घ्या. पाय छातीशी आणताना श्वास सोडा. दोन्ही पायांनी ही कृती करा.

खा आनंदाने! – निंबोणीच्या झाडामागे..  
वैदेही अमोघ नवाथे  – आहारतज्ज्ञ
गेल्या अंकात (१९ एप्रिल) आपण झोप न येण्याची कारणे पाहिलीत.
१. जशी आपली दिनचर्या ठरलेली असते तशी झोपेची ‘पूर्व’तयारीसुद्धा सवयीमध्ये बसवून घेतली पाहिजे. म्हणजे उदा. ९ वाजले, हळदीचे दूध पिऊन झालं, तोंड धुतलं आणि ९.१५ पर्यंत बिछान्यावर आडवं झालं, देवाचं नाव घेत किंवा चांगला विचार करत डोळे मिटले.- हा क्रम झाला की मनाला सवयीने कळतं की आता झोपायचं आहे!
२. शांत झोपेसाठी आवश्यक असलेले संप्रेरक म्हणजे मेलाटोनीन शरीराला पुढील पदार्थामधून मिळतं – केळं, हळद घातलेले कोमट दूध, पालक, सोयाबीन, अक्रोड, भिजवलेले बदाम, अननस, संत्र, ओट्स, मका, टोमॅटो, चेरी, मध वगरे.
३. सोसत असेल तर झोपेच्या दीड तास आधी गुलाबपाणी घातलेल्या कोमट पाण्याने आंघोळ करावी.
४. झोपायच्या आधी आजूबाजूला शांतता असेल, मनात विचार नसतील, मानसिक तणाव वाढवणाऱ्या मालिका नसतील आणि प्रखर प्रकाश नसेल याची काळजी घ्यावी.
५. पचायला जड किंवा शिळं अन्न रात्री खाऊ नये. झोपायच्या किमान ३ तास आधी जेवावे.
६. रात्री चहा/ कॉफीसारखी उत्तेजक पेये घेऊ नयेत.
७. उपाशी झोपू नये, कारण रात्री रक्तातील साखर कमी झाली की झोपेतसुद्धा अस्वस्थता जाणवते.
रात्रीचा मेनू :
१ लहान आकाराची ज्वारी किंवा बाजरी किंवा नाचणीची भाकरी (सातूचे पीठ, पालक घालून)
सोबत १ वाटी मुगाचे साधे वरण, अळशी चटणी
किंवा
लापशी-मूग-पालक खिचडी
ताक + अळशी चटणी
किंवा
दूध-पोहे / ओट्स
अक्रोड-बदामाचे तुकडे घालून, केळं
खास उन्हाळ्यासाठी – टोमॅटो रस
साहित्य-३ कप चिरलेला टोमॅटो, पाव जुडी कोिथबीर , १ काकडी, अर्धा चमचा मध (पर्यायी), अर्धा चमचा समुद्र मीठ, मिरपूड, तुळस पाने – पर्यायी
सर्व साहित्य ज्युसरमध्ये मिक्स करा आणि प्या.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

आनंदाची निवृत्ती – संगीतामुळे आयुष्याला अर्थ
संध्या बोके
निवृत्तीच्या साधारणत: दोन वर्षे आधीपासूनच शास्त्रीय संगीताचे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे मनाशी पक्के केले होते. संगीत क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ गुरू प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांत अ.भा.गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद परीक्षा मी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. त्यानंतर तिथेच न थांबता विद्यापीठाची एम.ए.संगीत पदवी प्राप्त करण्यासाठी आधी संगीतामध्ये अ‍ॅडिशनल बी.ए. व आता एम.ए. भाग- १ परीक्षा देते आहे.
 या परीक्षांच्या फायदा हा झाला की विविध प्रसंगी मी जी भक्तिगीते, देशभक्तीपर गाणी गायची त्याला एक शास्त्रीय बैठक मिळाली. दुसरा फायदा हा झाला की त्या निमित्ताने भारतीय शास्त्रीय संगीताची शेकडो नव्हे तर काही हजार वर्षांपासूनच्या परंपरेची ओळख करून देणारे साहित्य वाचनात आले. शास्त्रीय संगीत टिकवून ठेवण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी कोणी कोणी व कसे योगदान दिले याची सखोल माहिती मिळत गेली व त्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हायला झाले.
आपण जे ज्ञान मिळवीत आहोत ते आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्याची नवीन पिढीला ओळख व जाणीव करून देण्यासाठी फक्त मुलींसाठी मर्यादित स्वरूपात फक्त शास्त्रीय गायनाचा वर्ग प्रयोगात्मक स्वरूपाचा सुरू केला. पुढे संगीतात एम.ए. पूर्ण करून पीएच.डी. करण्याचाही माझा मानस आहे. निवृत्तीमुळे या माझ्या आवडत्या छंदाला आता मी पुरेसा वेळ देऊ शकते व त्यामुळे आयुष्याला अर्थ देऊ शकले याचे समाधान वाटते. याशिवाय वाचन, लेखन, प्रवास, सामाजिक व कौटुंबिक समारंभांना व पुस्तक प्रदर्शनाना हजेरी असतेच.

चित्रकलेचा ध्यास
रवींद्र चपाले
१९७३-७४ साली कोल्हापुरातील प्रसिद्ध महाविद्यालय ग्रंथपाल या पदापर रुजू झालो व २००५ साली सुमारे ३० वर्षांच्या सेवेनंतर नोकरीतून मुक्त झालो.
माझी प्रकृती उत्तम असल्याने छंद जोपसण्यासाठी वेळ देण्याच्या संकल्पात काहीच अडचण आली नाही. शिक्षण सुरू असतानाच मला चित्रकलेची आवड होती, नव्हे तो माझा ध्यास होता. त्या वेळी माझ्या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करण्याची आमच्या शहराची व घरच्या परिस्थितीची अवस्था नसल्याने मी ग्रंथशास्त्रात पदविका घेऊन अखेपर्यंत तेच माझे चरितार्थाचे साधन बनविले.
निवृत्तीनंतर मात्र मी पुन्हा चित्रकलेकडे ओढले गेलो. आणि आज वयाच्या ६६व्या वर्षी मी पेन्सिल व चारकोल यांचा वापर करून माझे स्वप्न सत्यात उतरवतो आहे. त्याचे धडे गिरवतो आहे. ‘पावडर शेडिंग आर्ट’मध्ये मास्टरी करत आहे. पोट्रेट पेंटिंगचा अभ्यास, त्यातील बारकावे शिकण्याचा व ते आत्मसात करण्याचा प्रयत्न मनापासून करतो आहे. वेळ कसा घालवावा, हा प्रश्न त्यामुळे मला तरी अजून पडलेला नाही.
क्रायलीन कलर या साडय़ांवरील नक्षी रंगवण्यासाठीच्या कलरचा कलात्मकतेने वापर करूनही चित्रांची शोभा वाढवतो आहे. कधीकधी पहाटे पाच वाजता उठूनही चित्रांवर शेवटचा हात फिरवत बसतो. यातून जे समाधान मिळते आहे ते खरोखरीच शब्दातीत आहे.

औरंगाबादमध्ये २४ तास हेल्पलाइन
संकलन – गीतांजली  राणे – rane.geet@gmail.com
औरंगाबाद जिह्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्य़ाच्या पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केलेली आहे. ९७६७३३११०० हा या हेल्पलाइनचा क्रमांक आहे. या हेल्पलाइनचे वैशिष्टय़ म्हणजे ही २४ तास चालणारी असून ज्येष्ठ नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर ७ ते ८ मिनिटांत त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहचविण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जातो.
या ज्येष्ठांकडून घरातले लोक जेवायला देत नाहीत, त्रास देतात अशा तक्रारी करणारे फोन मोठय़ा संख्येने येतात. अशा वेळेस त्या ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाते. समुपदेशनाची आवश्यकता असेल तर समुपदेशनही केले जाते. या हेल्पलाइनवर अनेकदा एकाकी असलेल्या आजारी वृद्धांचे फोन येतात, तेव्हा तातडीने आवश्यक असलेली वैद्यकीय मदतही पोलिसांमार्फत मिळवून दिली जाते. परंतु या वैद्यकीय मदतीचा खर्च त्या वृद्धाने स्वत: करायचा असतो. ही हेल्पलाइन २४ तासांची असल्यामुळे औरंगाबादमधील ज्येष्ठांना एक मोठा आधार झाला आहे.

कायदेकानू – फिर्यादीनंतरची प्रक्रिया
अ‍ॅड. प्रितेश सी. देशपांडे – pritesh388@gmail.com
पोलिसांकडे तक्रार देताना कोणती माहिती हवी, याची माहिती आपण घेतली ( १९ एप्रिल) आता फिर्यादीनंतरची प्रक्रिया पाहू. एखाद्या गुन्ह्याबद्दल संबंधित पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्या गुन्ह्याचे स्वरूप पाहिले जाते. गुन्ह्याचे दोन प्रकार असतात, दखलपात्र गुन्हा व अदखलपात्र गुन्हा. गंभीर स्वरूपाचे नसणारे गुन्हे हे स्वाभाविकत: अदखलपात्र स्वरूपाचे असतात. साधी इजा, शिवीगाळ या स्वरूपाचे गुन्हे अदखलपात्र असतात. या गुन्ह्यांमध्ये व्यक्तीस अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नसतो. अदखलपात्र गुन्ह्याचा तपास व इतर प्रक्रिया हे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशांशिवाय पोलिसांना करता येत नाही.
इतर स्वरूपाचे गुन्हे दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे असतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस हे प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) तयार करतात व फिर्यादीने दिलेली माहिती त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यात नोंदविली जाते. सदर अहवालाची प्रत फिर्यादीस मोफत दिली जाते. या अहवालानंतर पोलीस दखलपात्र गुन्ह्यांमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय तपास करू शकतात व संबंधित आरोपी व्यक्तीस अटक करू शकतात.
भारतीय दंडसंहितेमध्ये प्रत्येक कलमाखाली त्या गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याच्याबाबत माहिती दिलेली असते. अनेकदा तपास टाळण्याकरिता दखलपात्र गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा दर्शवून तक्रार दाखल करून घेतली जाते. अनेकदा आपणास फक्त एनसी (ठ/उ) नोंदविली, असे सांगितले जाते. एनसीचा अर्थ अनेकदा वृद्ध व्यक्तीस माहीत नसतो. वास्तविक एनसी म्हणजे अदखलपात्र गुन्ह्यातील तक्रार. त्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार देताना त्याबाबत नीट तक्रार घेतली जाते का, याबाबत जागृती असणे गरजेचे असते, आणि तक्रार नीट घेतली गेली नसेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांस लेखी स्वरूपात तक्रार नोंदविणे गरजेचे आहे.
गुन्ह्यांबाबत दोन भाग पडतात. जामीनपात्र गुन्हा व अजामीनपात्र गुन्हा. जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये आरोपी जामीन हक्काने जामीन देण्याची मागणी करू शकतात, तर अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जामिनाचे आदेश केले जातात. जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरही जामीन देता येतो. त्यालाच ‘गेट बेल’ (गेट जामीन) असे म्हटले जाते.
 पुढील भागात : न्यादंडाधिकाऱ्यांसमोर तक्रारीचा अधिकार