ch18‘‘एका झोपडीवजा घरात जन्मलेली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगलेली मी.. आज कोटी कोटी रुपयांची उलाढाल करते आहे. माझं सगळं आयुष्य एका चमत्कारापेक्षा कमी नाही. चमत्कार होतात यावर माझा विश्वास आहे, पण कष्ट करण्यावरही. आज ‘कमानी टय़ुब्ज’ची मी अध्यक्ष असून सरकारनेही ‘पद्मश्री’ देऊन माझ्या यशावर शिक्कामोर्तब केले आहे.’’

अकोला जिल्ह्यातील रिपाट खेडय़ातली माझी शाळा! उत्साहाने अभ्यास करणारी आणि कुठल्याही प्रश्नाला उत्तरादाखल चटकन हात वर करणारी मी, एक परकरी पोर. आमचे खराटे सर इतर मुलांना चिडवतही, ‘‘पाहा जरा, पोट्टेहो.. आपली ‘कल्पी’ कशी ‘लाही’सारखी तडतडते.. नाय तर तुम्ही लेको. नीरे भोने पोट्टे.’’
माझं सरांकडून होणारं हे कौतुक अनेकांच्या पोटदुखीचं कारण का होतं हेही मला लवकरच कळलं. माझं असं इतरांपेक्षा वरचढ असणं हे सहज स्वीकारलं जाण्याचा तो काळ नव्हता. जातीपातींच्या अस्मितेचा प्रचंड पगडा असलेल्या आपल्या भारतात आजही ज्या सामाजिक स्तरात (खरं सांगायचं तर जातीत) मी जन्मले त्या स्तरातून विकासाच्या संधींपासून वंचित असल्याचा भाव प्रबळ आहे. मात्र माझ्यासारख्या अनेकांनी यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडत, प्रचंड संघर्ष करून स्वत:ला मोकळं केलं.
तुमची चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर तुम्हाला लढावं लागणारच. जिला शिक्षणाचा मूलभूत हक्कदेखील समाजाने त्या काळी नाकारला त्याच समाजाने आज ‘कमानी टय़ुब्ज’सारख्या दिग्गज कंपनीची प्रमुख म्हणून मला सन्मानाने स्वीकारले. माझ्यावर विविध पुरस्कारांचा वर्षांव केला आणि सरकारने मला ‘पद्मश्री’ सन्मान बहाल केला. हे त्याच लढय़ाचं यश आहे.
हा सगळा प्रवास कसा होता? खरं सांगते, आत्यंतिक संघर्ष पाचवीलाच पुजलेला असावा माझ्या! पण मला असंही वाटतं की, शेवटी तुमची इच्छाशक्तीच तुम्हाला कुठल्याही बिकट परिस्थितीतून बाहेर काढू शकते. माझा जन्म झाला १९५८ साली. तोही विदर्भातील मूर्तिजापूरजवळ रिपाट खेडा या छोटय़ाशा गावी! सुधारणांचं, आधुनिक विचारांचं वारं तसं खेडय़ापाडय़ांत उशिराच पोहोचतं. मूर्तिजापूरही याला अपवाद नव्हतं. मी चार-पाच वर्षांची असेन, आपली ‘जात’ काय, याची जाणीव माझ्यासारख्या लहानगीलादेखील करून दिली जात होती. एक प्रसंग अगदी ठळकपणे आठवतो. आमच्या विदर्भात भाद्रपद महिन्यात घरोघरी ‘भुलाबाई’ येतात. शेजारपाजारच्या सगळ्या मुली संध्याकाळी घरोघरी जाऊन भुलाबाईची गाणी गात आणि शेवटी खिरापत खात, हसत-खिदळत दुसऱ्या घरी गाणी म्हणायला पळत. माझ्याही घरी खूप उत्साहाने माझ्या तायांनी भुलाबाईची छान आरास केली, आईने खिरापत बनवली होती. मैत्रिणीचा घोळका घरी थडकला, आनंदात गाणी गाऊन झाली. आता खिरापतीचे वाटप होणार तेवढय़ात अनेक मैत्रिणींच्या आया माझ्या घरी पोहोचल्या आणि आपापल्या मुलींना खस्स्कन ओढून घरी घेऊन गेल्या. मला रडूच फुटलं! असं का म्हणून? आईने समजूत घातली की, बेटा आपण दलित आहोत ना, म्हणून हे लोक आपल्या घरचं काहीही खाणार-पिणार नाहीत. माझी जात, माझं दलित असणं हे खरंच का इतकं वाईट होतं?
मी कुठंसं वाचलंय की जन्म कुठल्या कुळात होईल हे दैवाधीन असलं तरी कर्तृत्व गाजवणं हे आपल्या आणि आपल्याच हातात असतं. माझ्या आई-वडिलांचाही यावरच विश्वास असावा. ‘बुद्धीचा विकास हे मानवाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे’ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी आचरणात आणले होते. माझे वडील पोलीस दलात हवालदार होते. एका खोलीच्या सरकारी क्वार्टरमध्ये आम्ही राहत होतो. परिस्थितीमुळे ते शिकू शकले नाहीत तरी आपली मुले शिकली तरच या गर्तेतून बाहेर पडतील यावर त्यांचा विश्वास होता. पण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, समाज यांचा वरचष्मा आमच्या घरातही सतत जाणवायचा. मुली किंवा बायकांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात असे. मी जेमतेम बारा वर्षांची असेन तेव्हा माझे मामा माझ्यासाठी एक स्थळ घेऊन आले. मुलगा मुंबईला असतो. त्यामुळे हे उत्तम स्थळ हाताचं सोडू नये, असा धोशा त्यांनी वडिलांकडे लावला. हे मामा होते सरपंच, अर्थातच त्यांच्याविरोधात काही बोलण्याची हिंमत कोणातच नव्हती. माझी सातवीची परीक्षा आटोपली आणि शेवटी दहा-अकरा वर्षांनी मोठय़ा असलेल्या मुलाशी माझं लग्न लावलं गेलं.
मी उल्हासनगरला आले. तसे माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघं, सासू, दीर, जाऊ असे सर्वच जण मिळून एका वस्तीत एका लहान खोलीत राहत होतो. वयाला न झेपणारी सारी कामं मी करीत असे. नवरा कुठं तरी हेल्परचं काम करायचा. दीर हमाल होता आणि जाऊ चार घरी भांडी घासत होती. नवीन आलेल्या सुनेला ताब्यात ठेवायचा एकच मार्ग या सर्वाना माहिती होता तो म्हणजे तिला सतत क्रूरपणे मारहाण करणं. माझ्या माहेरी गरिबी असली तरी रोज आंघोळ करीत होतो. इथं तेही नाही. डोक्याला तेल लावून केस नीटनेटके ठेवणं यासाठीही मी मार खात असे. शेवटी मी सगळं सोडून दिलं. माझ्या केसांत जटा झाल्या आणि जेमतेम सहा महिन्यांतच माझ्या हाडांचा सापळा तेवढा उरला.
त्या वेळी पत्राने माहेरी आपली हालत कळवणं तर दूरच, पण आमच्या समाजात मुलीला माहेरच्यांनी भेटणंसुद्धा कठीण होतं. पण माझ्या वडिलांना राहवलं नाही आणि ते आमच्या घरी येऊन थडकले. अंगावर फाटक्या चिंध्या, केसांच्या जटा आणि हाडांचा सापळा. ही माझी अवस्था त्यांना बघवली नाही. तडक मला घेऊन ते आमच्या गावी आले.
पण गावी तर त्याहूनही असह्य़ असं जीवन वाटय़ाला आलं. वडिलांनी पुन्हा शाळेत टाकलं खरं, पण नवरा सोडून आलेली म्हणून गावातल्या लोकांनी माझी टिंगलटवाळी सुरू केली. पूर्वी शाळेत अतिशय हुशार म्हणून गणल्या गेलेल्या मला आता शाळेत जागा नव्हती. मला हिणवणं, माझा आणि माझ्या आई-वडिलांचा सतत अपमान करणं, ऐकवणार नाहीत अशा शिव्या देणं हा एककलमी कार्यक्रम गावात सुरू झाला. आईलाही हा ताण सोसेना! मी आता माहेरी एक ओझं आहे ही जाणीव मला नकळत का होईना करून दिली जाई. मी व्यथित झाले आणि आत्यंतिक निराशेने मला घेरलं. माझी जगण्याची इच्छा हळूहळू नष्ट होऊ लागली. एक दिवस जवळच राहत असलेल्या आत्याच्या घरी जाऊन मी कीटकनाशकाच्या तीन बाटल्या तिच्या नकळत रिचवल्या. पण तिथंही नशिबाने दगा दिला आणि आत्याच्या प्रयत्नाने वेळीच उपचार मिळाला आणि मी वाचले. त्या वेळी मी पंधरा-सोळा वर्षांची असेन. मी स्वत:चं पोट स्वत: भरलं नाही तर कठीण आहे हे मला दिसत होतं. दरम्यान मी टेलरिंग शिकत होते. पोलिसातही नोकरीसाठी प्रयत्न केला, पण वय आणि शिक्षण दोन्हीही पुरेसं नव्हतं. इथं आता माझं मन लागेना. आता या गावात मला राहायचं नव्हतं.
माझे काका मुंबईला, दादरला बापट मार्गच्या एका वस्तीत राहायचे. त्यांच्याकडे मला पाठवावं, मी मुंबईत नोकरी करीन असा धोशा मी वडिलांकडे लावला. शेवटी एकदाचं मला बाबांनी इथं आणून सोडलं. काका अविवाहित असल्याने ही नसती धेंड माझ्या घरी नको, मी कुठं तिच्याकडे लक्ष देऊ , असं काकांनी वडिलांना सांगितलं.
शेवटी एका गुजराती कुटुंबाने मला आधार दिला. ते काका रेल्वेत ड्रायव्हर होते आणि मावशी लीलावतीमध्ये नर्स होत्या. त्यांच्या तीन मुलींबरोबर मी एक, चौथी असं म्हणत त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. कसं असतं ना.. एकीकडे काही माणसं माझं जगणं नकोसं करून सोडत होती आणि इथं माणसातली माणुसकी जपणारं हेही कुटुंब मला भेटलं. जगात सर्वच माणसं वाईट नसावीत, काही चांगलीही असतात हे मला पहिल्यांदा जाणवलं. मला जगावंसं वाटू लागलं.
लवकरच एका होजिअरी कंपनीत दोन रुपये रोजावर मला काम मिळालं. माझा साठ रुपये पगार निव्वळ शिल्लक राहत असे. गुजराती मावशी माझं खाणं-पिणं, कपडेलत्ते सर्व बघत. माझ्याकडून एक नवा पैसाही त्यांनी कधी घेतला नाही. काही काळानंतर माझा पगार २०० रुपयांपर्यंत पोहोचला. माझ्याजवळ बरीच शिल्लक जमा झाली होती. पण त्याच काळात काही कारणाने माझ्या वडिलांची नोकरी गेली. माझं कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आलं. साहजिकच ते आता मुंबईला माझ्याकडे आले. आईवडील, भाऊ आणि तीन बहिणी असा सर्व कुटुंबाचा भार आता माझ्यावर येऊन पडला.
मग ४०० रुपये डिपॉझिट भरून मी कल्याणला एका चाळीत एक रूम भाडय़ाने घेतली. भाऊ -बहिणी छोटय़ा नोकऱ्या करू लागले. नोकरी गेल्याने अपमानित झालेले माझे वडील तो तणाव सोसू शकले नाही. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या उपचाराचा तेवढाही खर्च झेपेना! कसंबसं ते त्यातून बरे झाले. इतकं कमी होतं की काय, पण माझी एक बहीणही याच दरम्यान खूप आजारी झाली. तिच्या निरनिराळ्या तपासण्या कराव्या लागणार होत्या, पण इथंही पैशाशिवाय सारंच अडत होतं. आमच्या डोळ्यादेखत तडफडत तिने प्राण सोडला. ही माझी सर्वात मोठी हार होती. पैसा कमावला नाही तर आपण हळूहळू असेच एकेकाला गमावून बसू, हा विचार मला अस्वस्थ करीत होता आणि त्यातूनच मी मग नोकरीसोबतच टेलरिंगचा व्यवसायही सुरू केला.
महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत ५०,००० रुपयांचं कर्जही मी घेतलं. कशी गम्मत असते बघा, हे एवढंसं लोन मिळवण्यासाठी मी दीड-दोन र्वष बँकेत खेटे घातले. आज मी भारतीय महिला बँकेची संचालक आहे, जिथे मी करोडो रुपयांचं कर्जवाटप करू शकते. दरम्यान, माझा विवाह समीर सरोज यांच्याशी झाला. यांचाही एक छोटासा व्यवसाय होता. पण यात फारसा फायदा होईना. मग मी स्टीलची कपाटे बनवण्याचा व्यवसाय पुढे चालू केला. यात मात्र मला भरपूर फायदा झाला आणि बरीच शिल्लक माझ्याजवळ जमा झाली. कल्याणमध्येच एक प्लॉट स्वस्तात मिळाला म्हणून मी खरेदी केला. पूर्ण व्यवहार झाल्यावर काही दिवसांनी लक्षात आलं की तो सिलिंग अँक्ट अंतर्गत अडकला आहे. मग कायदेशीर लढाई लढून मी तो सोडवला. आता त्याची किंमत हजार पटीने अधिक झाली. एक सिंधी बिल्डर यांना पार्टनर म्हणून घेऊन मग तिथे २००० साली इमारत बांधली. यातही खूप फायदा झाला.
कुठूनशी आलेली ही बाई चकाचक भली मोठी इमारत उभारते म्हणजे काय? स्थानिक बिल्डर, राजकारणी यांना काही ते सहन होईना. मला धमक्या येणं सुरू झालं. माझी चक्क सुपारी दिली गेली. माझ्या हे कानावर आलं. मी तडक तत्कालीन पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते यांना भेटले आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच चौकशी करून त्या मंडळींना ताब्यात घेतलं आणि २४ तासांत मला स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्वर लायसेन्स दिलं गेलं.
नंतर एक स्थानिक राजकारणी मला या ना त्या निमित्ताने सतत त्रास देई. सर्व प्रयत्न थकल्यावर मी थेट सोनिया गांधींना भेटले आणि त्याची तक्रार केली. त्याला लगेच पक्षातून काढून टाकण्यात आलं. मी आता कन्स्ट्रक्शन व्यवसायात स्थिरावत चालले होते. पण एकटीने मोठं होण्यात आनंद तो कसला? समाजातली अनेक तरुण मुलं-मुली केवळ अज्ञानापायी अतिशय वाईट जिणं जगत होती. मी त्यांना एकत्र करून ‘सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना’ बांधली. सरकारी योजनांचा अभ्यास सुरू केला आणि सर्वाना त्याचा लाभ कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. मला सरकारी तसेच बँक अधिकाऱ्यांनी यात खूप मदत केली. रोजगार मिळाल्यामुळे आता अनेकांची चूल पेटू लागली.
तुमचे उद्देश प्रामाणिक असले की तुम्हाला मदतीचे अनेक हात पुढे येतात. कल्याण शहराचा विकास आराखडा तयार होत असताना माझ्या मालकीच्या जागेसंबंधात मला त्रास कसा देता येईल याबाबत अनेकांनी प्रयत्न सुरू केले. त्या वेळी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. मी त्यांच्याकडे मदत मागितली. माझी बाजू कायदेशीर होती, त्यामुळे त्यांनी सर्वतोपरीने मला साहाय्य केलं आणि माझ्या जागेवर अकारण बनवलेला रस्त्याचा प्लान रद्द करवला. नंतर काही वर्षांतच एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी माझी नेमणूक झाली. या दरम्यान मी अनेक मुलींना ब्युटी पार्लरचं तर मुलांना सलूनचं मोफत प्रशिक्षण देणं सुरूकेलं. माझी आर्थिक स्थितीही आता चांगली सुधारली होती.
याच दरम्यान ‘कमानी टय़ुब्ज’ या बंद पडलेल्या कंपनीतल्या काही कर्मचाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. या अडचणीत आलेल्या कंपनीला बाहेर काढावं आणि आमची नोकरीही वाचवावी असा त्यांचा आग्रह होता. मी या कंपनीचा अभ्यास सुरू केला. नेहरू आणि गांधी यांचे सहकारी असलेल्या रामजीभाई कमानी यांनी कुल्र्यामध्ये २२ एकर जागेवर स्वातंत्र्योत्तर काळात उभारलेला हा उद्योग होता. कमानी टय़ुब्ज, कमानी इंजिनीयरिंग आणि कमानी मेटल्स अशा त्यांच्या तीन उपकंपन्या होत्या. १९८७ साली रामजीभाईंच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये काही वाद झाले आणि एके काळी ३५०० कामगार असणारी, जगभर व्यवसाय असणारी बलाढय़ कंपनी बंद पडली. गेल्या २५ वर्षांपासून या कंपनीत कामाला असणारी कुटुंबं देशोधडीला लागली होती. ११६ कोटींचं कर्ज आणि १४० वेगवेगळे लिटिगेशन्स या कंपनीवर होते.
त्या काळात फ्रान्स, जर्मनी आणि जपानसारख्या देशांत क्रांतीचे वारे वाहत होते. त्यापासून प्रेरणा घेत या कंपनीच्या कामगारांनी मग कोर्टात मालकीसाठी दावा केला आणि सर्वोच्च न्यायालयाने अभूतपूर्व निकाल देत कंपनी कामगारांच्या स्वाधीन केली. कामगारांना अशा प्रकारचा मालकी हक्कदेणारी ‘कमानी’ ही पहिली भारतीय कंपनी ठरली. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीदेखील या नव्या विचाराचं स्वागत आणि समर्थन केलं. भारतात क्रांतिकारी म्हणून गणल्या गेलेल्या या प्रयोगाला बँकांनी भरपूर कर्ज देत आपलं समर्थन जाहीर केलं. पण हा प्रयोग सपशेल फसला. कामगारच मालक म्हटल्यावर काम करणार कोण? त्यात दोन युनियन्स तयार झाल्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये वाद वाढू लागले. १९८७ ते १९९७ पर्यंत कशीबशी रखडत चाललेली ही कंपनी शेवटी बंद पडली. कंपनीचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात आला. हळूहळू ओसाड झालेल्या या प्लॉटमधील अनेक भाग चोरी झाले आणि जे शिल्लक होते ते गंजून गेले.
‘आयडीबीआय’ने मग या कंपनीचं सर्वेक्षण केलं आणि यावर नवीन प्रमोटर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हा मी अनेक कायदेशीर बाबी तपासून बघण्यासाठी १० सल्लागार नेमले. उघडय़ावर पडलेली ५४६ कुटुंबं मला दिसत होती. पूर्ण अभ्यासांती मी या कंपनीची प्रमोटर म्हणून जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. बँकेने कंपनीवर असलेल्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी व कंपनीवर असलेल्या केसेससाठी लढण्याची हमी मागत २००० साली कंपनीची अध्यक्ष म्हणून मला नियुक्त केलं. २००० ते २००६ ही र्वष आम्ही फक्त कोर्टकचेऱ्या करीत होतो. कंपनीवर दंड आणि करांचा बोजा यामुळे देय रक्कम वाढली आहे, हे माझ्या लक्षात आलं. तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्र्यांना मी विनंती केली की, कंपनी लिक्विडेशनमध्ये गेली तर कोणाचाच फायदा होणार नाही, त्यापेक्षा मला या दंड आणि कर्ज व करांच्या रकमेत सूट दिली जावी. त्यांनी सर्व बँकांशी चर्चा करून आम्हाला भरपूर सूट दिली. मी जवळजवळ सर्व कर्जे, कामगारांचे पीएफ आदी दिल्यानंतर २००६ साली न्यायालयाने ‘कमानी टय़ुब्ज’ची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
‘अल कमानी’ आणि ‘कल्पना सरोज एलएलसी’ हे आमचे दोन ब्रँन्ड्स आता दुबईत प्रसिद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे ‘खैरलांजी’ या सिनेमाद्वारे मी सिनेनिर्मितीतही उतरले आहे. बॉक्साइटच्या खनन व्यवसायातही मी प्रवेश केला आहे. कमानी उद्योगसमूहाला पूर्वलौकिक प्राप्त व्हावा असं मला मनापासून वाटतं.
न्याय, समता आणि साधनशुचिता ही रामजीभाई कमानी यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती. या तत्त्वांच्या आधारानेच जगभरात व्यवसाय करून भारताच्या विकासात अहम भूमिका अदा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आज योगायोगाने माझ्या खांद्यावर त्यांच्या या स्वप्नांना सत्यात आणण्याची जबाबदारी आलेली आहे. मला त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती मिळावी यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. पंडित नेहरू, गांधीजी, रामजीभाई आदींच्या पदस्पर्शाने पावन झालेली मुंबईतील बलार्ड इस्टेटमधली ‘कमानी चेंबर्स’ ही देखणी वास्तू हे माझं कार्यालयच माझं प्रेरणास्थान आहे.
हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंच! मी गेल्या सप्टेंबरमध्ये लंडनला गेले असताना डॉ. आंबेडकरांच्या तेथील निवासस्थानी नेहमीप्रमाणेच गेले होते. तेव्हा बंगल्याच्या लिलावाची नोटीस मला तिथं दिसली. भारतीयांच्या गौरवाचं प्रतीक असलेला हा बंगला लिलावात दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये अशी माझी इच्छा होती. मी त्यासाठी फंड जमवावा या विचारात होते, पण लिलावाची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि आमच्याकडे एवढा वेळ नव्हता. शेवटी मी आणि माझ्या इतर सहकाऱ्यांनी हा बंगला घेण्याबद्दल तत्कालीन आघाडी सरकारकडे पाठपुरावा सुरूकेला. सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी पूर्ण केली, पण तेवढय़ातच महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागली आणि ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. पण आताच्या फडणवीस सरकारने तत्परता दाखवून हा बंगला ताब्यात घेतला. मी यासाठी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करते.
माझी कौटुंबिक जबाबदारी आता कमी होते आहे. भावंडे स्थिरस्थावर झाली आहेत. माझा मुलगा जर्मनीहून शिक्षण घेऊन आता ‘एअर इंडिया’त पायलट आहे आणि मुलगीदेखील लंडनमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करते आहे.
एका झोपडीवजा घरात जन्मलेली मी.. आज कोटी कोटी रुपयांची उलाढाल करते आहे. माझं सगळं आयुष्य एका चमत्कारापेक्षा कमी नाही. चमत्कार होतात यावर माझा विश्वास आहे, पण त्याहीपेक्षा अधिक विश्वास माझा सत्यावर आहे. सत्याला न्याय मिळतोच. फक्त त्यासाठी लढायची तयारी हवी!
तुम्ही कितीही बिकट परिस्थितीत जन्मले, वाढले असाल, पण तुम्हाला आपल्या आयुष्यात बदल करायचा असेल तर ते केवळ तुमच्याच हाती असतं. इतरांना दोष देत बसण्यापेक्षा आपला उत्कर्ष कसा होईल याचा विचार करा!
‘शिक्षण हा उत्कर्षांचा एकमेव मार्ग आहे’ हे खरं असलं तरी ते अर्धसत्य आहे असं मला वाटतं. कुठलाही व्यवसाय करायला मोठमोठाल्या पदव्या हव्या असतात असंही नाही. तुमच्या अंत:प्रेरणा सच्च्या असतील तर अशा पदव्या नसतानादेखील उत्तम व्यवसाय तुम्ही करू शकता. त्यामुळे मोठं व्हायचं असेल तर प्रामाणिक राहा, कष्टाला घाबरू नका, एवढंच माझं सांगणं आहे.
शब्दांकन- शर्वरी जोशी – sharvarijoshi10@gmail.com

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत