मागील लेखांमध्ये आपण पाचवी जीवनशैली उच्चार व त्याचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व जाणून घेतले. कोणताही उच्चार चत्वारवाणीतून स्फुरतो व आवाजाच्या रूपातून बाहेर पडणाऱ्या नाद शब्दातून व्यक्त होतो. आधुनिक वैद्यकशास्त्रातील आवाजाची व्याख्या फार बहारीने व मोजक्या शब्दात बरेच काही सांगणारी अशी आहे. ती अशी ‘आवाज म्हणजे मनाची आज्ञा व श्वासाची कृती.’ म्हणूनच चांगला आवाज म्हणजे चांगल्या मनाची आज्ञा व उत्तम श्वासाची कृती तर वाईट आवाज म्हणजे वाईट मनाची आज्ञा व निकृष्ट श्वासाची कृती. तेव्हा कोणाही व्यक्तीचा त्या वेळचा आवाज व वाणी व्यक्तीच्या त्या वेळच्या मनाच्या व श्वासाच्या स्थितीचे द्योतक असते. त्यामुळे उदास, नकारात्मक विचार आलेली व्यक्ती किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त व्यक्ती फोनवर बोलू लागली की, ऐकणारी व्यक्ती सहज म्हणते की, काय हो आपला आवाज असा का येतोय, बरं नाही का?
ओमकारातील अकार, उकार व मकार या मात्रा अनुक्रमे देह, मन व जीवात्म्याची प्रतीके आहेत. त्यामुळेच ओमकार हे देह, मन आणि आत्मस्वास्थ्य खुलवणारे विश्वातील सर्वोत्तम नादचतन्य आहे, सर्वोत्तम आवाज वाणीचे प्रतीक आहे. ओमकाराच्या नित्य शास्त्रशुद्ध साधनेने मन सकारात्मक, प्रसन्न व वृत्ती समाधानी होऊ लागते, चिंता, काळजी, भीती सहज नाश पावू लागतात व साधकाला एक नवी चेतना, नवा उत्साह, नवा आनंद प्राप्त होऊ लागतो, आत्मविश्वास वृिद्धगत होऊ लागतो व श्वासोच्छ्श्वास क्रिया परिपूर्ण होऊ लागते. श्वास आणि मन हीच कोणाही व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची अंगे आहेत ती दोन्हीही ओमकार साधकाच्या ताब्यात राहू लागतात. एरवी श्वास व मनच अशुद्ध व अलयबद्ध होऊन व्यक्तीला रोगग्रस्त करीत असतात. शास्त्रशुद्ध ओमकार साधनेतून निर्माण होणाऱ्या श्वासशुद्धी व मन:शुद्धीतून साधक व्यक्तीची निरामय आरोग्याकडे वाटचाल सुरू होऊ लागते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक कर्मारंभी ओम् नामोच्चार करण्याची प्रथा आहे ती यामुळेच ! ओम् आधी –  टळतील व्याधी –  विरतील व्याधी.
 डॉ. जयंत करंदीकर -omomkarom@rediffmail.com