स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार, पण त्यामुळे आयुष्यच थांबून जावं हे ‘आय.पी.एच.’ला पटणारं नव्हतंच. त्यातूनच साकार झाला त्रिदल प्रकल्प. अनेक जणींना एकत्र करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणारा. एक सक्षम प्रकल्प. त्याविषयी.
वेदनेतून विणल्या गेलेल्या नात्याचे बंध फार चिवट असतात. त्या ताण्याबाण्यातील एक धागा वेदनेचा असतो तर दुसरा, या आव्हानात्मक परिस्थितीतही आपल्या बरोबर कोणीतरी आहे या आश्वासनाचा असतो. हे दोन धागे आडवे-उभे गुंफत उभ्या राहिलेल्या एका सशक्त सुंदर नात्याचा प्रत्यय ठाण्यातील ‘त्रिदल’च्या मैत्रिणींशी बोलताना आला.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ काम करणाऱ्या आय.पी.एच. इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिक हेल्थ या संस्थेच्या एका मोठय़ा छत्राखाली जे विविध प्रकल्प उभे राहिले आणि वाढले त्यापैकी एक ‘त्रिदल’. प्रत्येक प्रकल्प जन्माला येण्याचे निमित्त वेगळे पण जन्माला आल्यावर स्वत:मधील जोम, उमेद घेऊनच तो वाढतो, मोठा होतो. ‘त्रिदल’चा जन्म होण्याचे निमित्त झाले ते सविता नाडकर्णी यांच्या संशोधन प्रकल्पाचे! हे संशोधन होते स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांच्या काळजी वाहकांचे (केअरगिव्हर). आपल्याभोवतालचे वास्तव नाकारणाऱ्या आणि एकाच वेळी दोन पातळय़ांवर जगणाऱ्या या रुग्णांची काळजी घेणे हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी फार आव्हानात्मक असतं. या प्रक्रियेत त्यांना कधी-कधी कमालीचा थकवा येतो. या प्रवासाला अंतच नाही या जाणिवेने नैराश्य येते, खूप चिंता मन कुरतडू लागतात. हे सगळं या संशोधनातून दिसत होतं, स्पष्टपणे.
मानसिक आरोग्यातील कोणतीही समस्या दिसली, समोर आली की त्याच्या निवारणासाठीही पुढे व्हायचे या आय.पी.एच.च्या स्वभावधर्मानुसार या कुटुंबीयांसाठी काही प्रशिक्षण सत्रं आखली गेली. हा थकवा, नैराश्य हाताळायला शिकवणारी. आय.पी.एच.मध्ये या रुग्णांना ‘शुभार्थी’ तर त्यांच्या काळजी वाहकांना ‘शुभंकर’ म्हटले जाते. प्रशिक्षण सत्राच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या सर्व शुभंकरांना त्यानिमित्ताने एकमेकांचा जो आधार मिळाला तो सर्वासाठी इतका मानसिक विसावा देणारा होता की त्यातून एक आधार गट उभा राहिला. या शुभंकरांच्या आधार गटात एक चर्चा किंवा एक चिंता कायम असायची आणि ती म्हणजे कोणतेही दैनंदिन रुटिन नसलेल्या शुभार्थीसाठी काय करता येईल? त्यांच्या दिनक्रमाला थोडी शिस्तीची चौकट घालण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करता येईल का? आय.पी.एच.च्या स्थापनेपासून या संस्थेत असलेल्या ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभा थत्ते या शुभार्थीसाठी गट उपचार सत्र घेत होत्या. त्यासाठी येणाऱ्या शुभार्थीना आपण काही काम देऊ शकतो का असा विचार सुरू झाला आणि ‘त्रिदल’ची रूपरेषा नक्की झाली.
‘त्रिदल’चे उद्दिष्ट आहे या शुभार्थीच्या पुनर्वसनाचे आणि या उद्दिष्टासाठी किंवा वाटचालीतील महत्त्वाचे तीन घटक म्हणजे स्वत: शुभार्थी, त्यांचे काळजीवाहक म्हणजे शुभंकर आणि त्यांना उपचार देणारे डॉक्टर व तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे समाज. बेलाच्या पानाला आपण ‘त्रिदल’ म्हणतो आणि त्या पानाचे काही औषधी गुणधर्म आहेत. तसेच या ‘त्रिदल’चे गुणधर्म या शुभार्थीसाठी उपकारक आणि उपचारकही ठरले आहेत. ‘त्रिदल’मधील शुभंकर या फक्त स्त्रिया असाव्या असा काही धोरणात्मक निर्णय किंवा संकल्प आय.पी.एच.ने केला नव्हता. पण या सगळय़ा प्रक्रियेसाठी अधिक वेळ देणे हे स्त्रियांना शक्य होत त्यामुळे आज तरी त्यात काम करणारे शुभंकर आणि स्वेच्छेने या गटात दाखल झालेले स्वयंसेवक या सगळय़ा स्त्रिया आहेत.
शुभार्थीना कोणती काम करणं शक्य आहे असा विचार सुरू झाला तेव्हा पहिला प्रयोग केला गेला चिरलेल्या भाज्या विकण्याचा. आय.पी.एच.च्याच कार्यालयात शुभार्थी आणि शुभंकर एकत्र जमून हे काम करू लागले. एकत्र येऊ लागल्यावर आणखी काही कामं सुचू लागली. कागदी पिशव्या बनवणे, पौष्टिक केक बनवणे, आर्टिफिशियल ज्वेलरी बनवणे असे काही प्रयोग सुरू झाले आणि त्या प्रयोगातून धडेही मिळू लागले. उदाहरणार्थ, ज्वेलरीच्या कामासाठी जी कमालीची सफाई लागते ती या शुभार्थीच्या कामात येऊ शकत नव्हती. कारण या आजारामुळे त्यांच्या मोटर स्किल्सवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे खूप कौशल्याचे, सफाई आवश्यक असलेले काम ते करू शकत नाहीत. या धडय़ांमधूनच मग शेवटी ‘त्रिदल’ते आपले लक्ष केंद्रित केले ते खाद्य पदार्थावर. वेगवेगळय़ा प्रकारच्या चटण्या, पीठ, भाजणी अशी उत्पादनं सुरू झाली आणि मग या प्रयोगामध्ये अधिक जोम भरण्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी प्रस्ताव मांडला तो ‘वेध’ करिअर परिषदेत स्टॉल लावण्याचा.
‘वेध’ करिअर परिषद ही आय.पी.एच.ची वेगळी ओळख निर्माण करणारा उपक्रम. दोन दिवस चालणारा तरुण पिढीसमोर समाजातील वेगळी, भन्नाट माणसं ‘रोल मॉडेल’ म्हणून आणणाऱ्या या परिषदेसाठी चार एक हजार विद्यार्थी पालकांची खच्चून गर्दी असते. या गर्दीसाठी खाण्या-पिण्याचे स्टॉल्स चालवणं हे प्रारंभी तर शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. त्यामुळे पहिली एक-दोन फजितीचे क्षण ‘त्रिदल’च्या वाटय़ाला आले. पण आता या गटाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे ‘वेध’ परिषदेतील सगळे स्टॉल्स हे शुभार्थी-शुभंकर आणि स्वयंसेवक मोठय़ा सफाईने हाताळतात.
अशाच प्रयोगातून ‘त्रिदल’ने ‘कॅलप्रो’ हे गुणकारी उत्पादन विकसित केले. शरीराला आवश्यक अशा प्रथिने व जीवनसत्त्वांचा पुरवठा करणाऱ्या अनेक गोष्टी एकत्र करून केलेली ही पावडर निव्वळ प्रायोगिक तत्त्वावर करताना, दहा किलो करून बघितली पण त्याचा फायदा लक्षात घेऊन त्याची मागणी वाढू लागली, इतकी की आज वर्षभरातून सुमारेतीनशे किलो ‘कॅलप्रो’ त्रिदल विकते. कर्करोग रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त म्हणून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलने त्याला मान्यता दिली आहे!
सुमारे बारा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या गटाने आता व्यावसायिकदृष्टय़ा स्वत:ला खूप सक्षम केले आहे. आय.पी.एच.च्या कार्यालयात कधीही गेलात तरी ‘त्रिदल’ने बनवलेल्या उत्पादनांची विक्री करणारे छोटे टेबल आपल्याला कायम दिसते. चटण्या, कॅलप्रो, केक, रव्याचे लाडू, भाजणी उत्पादनांबरोबर दिवाळीत दिवे, रांगोळय़ाची विक्री होते. सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते ४ या वेळात शुभार्थी शुभंकर आणि स्वयंसेवक एकत्र भेटून ही कामे करीत असतात. पण या सगळय़ात ‘पैसे कमावणे’ हा विचार कधीच केंद्रस्थानी नव्हता. शुभार्थीचे रिकामे मन आणि त्यामुळे निष्क्रिय हात यांना निर्मितीच्या वाटेवर वळवणे व त्यातून त्यांच्या जीवनाला अर्थ देणे या उद्दिष्टाने ही वाटचाल सुरू झाली आहे. त्यातून काय घडले? तर शुभार्थीच्या दैनंदिन जीवनाला एक शिस्त आली, अतिशय सुरक्षित वातावरणात त्यांना काम करता येईल असा अवकाश त्यांना मिळाला आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याशी मनातलं बोलता येईल असा नीट ऐकणारा, संवेदनशील परिवार त्यांना मिळाला आणि खरोखरच एका चांगल्या, दर्जेदार आयुष्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. या सगळ्या प्रवासात स्वयंसेवकांचा वाटा फार वेगळा आणि मोलाचा कारण यातील अनेक स्वयंसेवक मैत्रिणी अशा आहेत ज्या शुभंकर नाहीत. पण केवळ समाजाचे आपण काही देणे लागतो या विशुद्ध भावनेतून पुढे आलेल्या या स्वयंसेवकांशी अनेक शुभार्थीचे एक वेगळे, जिवाभावाचे नाते निर्माण झालेले आहे.
जमिनीत रुजणाऱ्या बीमधून फुटणारा प्रत्येक अंकुर हा निदरेष, सशक्त असतोच असे नाही. पण अशा दुबळय़ा धडपडणाऱ्या अंकुरांना आधार देत उभं करू शकतो आणि मग तेही समाजाच्या उत्पादकतेला आपल्या परीने हातभार लावू शकतात याचं एक सुंदर उदाहरण म्हणून या ‘त्रिदल’कडे बघायला हवं, नाही का?
vratre@gmail.com