ch18प्रेम मनात असून चालत नाही. ते कोणत्या तरी माध्यमातून व्यक्त व्हावे लागते तरच ते साकार होते, तरच ते प्रत्ययास येते. हे समजण्यासाठी माझा पराभव व्हावा लागला. मलाच माझ्या वागण्याविषयी लाज वाटवणारा धक्का माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आईच्या दु:खातून बसावा लागला. हा पराभव त्यानंतरच्या नव्या भारतला जन्माला घालणारा ठरला आणि असे अनेक पराभव नंतरच्या काळात व्यक्तिगत आचरणाच्या पातळीवर होत गेले आणि माझ्यातली मानुषता वाढवीत गेले..
पराभव हे किती प्रमाणात पराभव असतात आणि विजयातसुद्धा पराभव असतो की नाही, असा मूलभूत प्रश्न मानवी जीवनाला व्यापून राहिला आहे. ज्ञात इतिहासाचा डोळस धांडोळा घेतला, तर या द्वंद्वाची ठायी ठायी प्रचीती येऊ शकते; पण तरीही पराभवाने माणसे निराश होतात, कधी तर अगदी खचून जातात. पराभवामध्ये अंतर्भूत असलेले अदृश्य आणि भविष्यवेधी विजय त्यांना जाणवत नाहीत. विजयाने माणसे आनंदी होतात, कधी कधी हुरळून जातात. अशा परिस्थितीत या विजयांमध्ये लपलेले पराभव दिसत नाहीत. दिसणे शक्यच नसते. खरे म्हणजे जय-पराजय ही अतूट असलेली जोडी आहे आणि मानवी जीवन या दोन्हींशिवाय असूच शकते का, अशा प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.
या संदर्भात आणखी एक समस्या आहे. विजय किंवा पराजय कुणाचे तरी, कुणाच्या तरी विरोधातच असू शकतात, अशी सर्वसाधारण धारणा आहे. दोन वृत्तींमधला, दोन विचारांमधला, शोषक-शोषितांमधला, शासक-शास्त्यांमधला, दोन देशांमधला असे अनेक संघर्ष जगाच्या इतिहासात होत आले आहेत, आजही होत आहेत. या प्रकारच्या संघर्षांमध्ये कुणाचा तरी पराभव आणि कुणाचा तरी विजय होतोच अशी समजूत आहे. विजयी होणारी बाजू जल्लोष करते, आनंदाने बेभान होते. या सर्वात ‘दुश्मनी’ चालू राहण्याचा धागा तर राहतोच; पण या संदर्भात काही प्रकारचे प्रश्न आपण स्वत:ला विचारतच नाही. त्यामुळेच ‘दुश्मनी’ या संकल्पनेच्या कक्षेतच असे जय-पराजय पाहिले जातात. शोषणाची कोणतीही व्यवस्था समाजव्यवस्थेत चालू असणे हे शोषितांना मिळणारे, दु:ख देणारे, दडपणारेच असणार याबाबतीत प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही; पण जे शोषक असतात त्यांना अशा शोषण व्यवस्थेत मानुष जीवन जगता येते, असेही म्हणता येत नाही. त्यांना अनेक सुखे मिळतात, दुसऱ्याला पायदळी तुडवता येते, सत्तेलाही आपल्या मुठीत ठेवता येते; पण एवढे असूनही त्यांच्या अंतर्गत असणारा जीवघेणा संघर्ष, एकमेकांना नामोहरम करून मोठे होण्याची लढाई त्यांना शांततेचे, आनंदाचे आणि माणसांमधल्या, मानवी नात्यातल्या मानुषतेचा अनुभव घ्यायला परवानगीच देत नाही. त्यांच्यातल्या कौटुंबिक संबंधांना पैशाच्या मापानेच मोजले जाते, प्रतिष्ठेच्या मापाने मोजले जाते. प्रेम, माया, जिव्हाळा यांच्या अनुभूतीचा दुष्काळच त्यांच्या जीवनाला ग्रासून राहिलेला असतो. त्यामुळे शोषित जनतेने त्यांच्या शोषण व्यवस्थेचा पराभव करून नवा शोषणमुक्त, मानुष नात्यांवर आधारलेला समृद्ध समाज निर्माण करणारा विजय मिळवला, तर त्यात त्यांचीही ‘अमानुष’ परात्मभावी जीवनातून मुक्ती होते. तो त्यांचाही विजय ठरू शकतो! जय-पराजय अशा स्वरूपात बोलत असताना ‘दुश्मनी’च्या रीतीने कुठल्या तरी एका बाजूचा विजय आणि दुसऱ्या बाजूचा पराभव असे पाहणे त्यामुळेच चुकीचे आहे. खरे म्हणजे स्वत:ला जास्त मानुष बनवणारे काही पराभव हे स्वत:चेच विजय असू शकतात. हासुद्धा एक आगळा पैलू आपण समजून घेतला पाहिजे.

ch19माझ्या जीवनातला आनंद देणारा आणि माझ्या आठवणीतला ठळक पराभव अशाच प्रकारचा आहे. माया आणि प्रेमाच्या, आई-मुलाच्या नात्याशी जोडलेला. मी त्या वेळी सायन्स कॉलेज कराडला होतो. वय वर्षे १७. कॉलेजच्या वसतिगृहात राहात होतो. माझी खोली वसतिगृहाकडे येणाऱ्या रस्त्याकडे खिडकी असलेली होती. त्या दिवशी कुठला तरी सण. माझ्या गावाकडून डबे आणणारा डबेवाला त्या दिवशी येणार नव्हता. आईच येणार होती सणाचं जेवण घेऊन. मी अभ्यास करत करत खिडकीतून नजर टाकून आईची वाट बघत होतो. आई आली. मला खूप आनंद झाला. तेव्हाही आणि आजही माझ्या हृदयाचा मोठा भाग आईने व्यापलेला. आई, बाप, मित्र, सल्लागार इत्यादी. त्यामुळे आई म्हणजे आनंदाचे भरते; पण आई अशीच नव्हती आलेली. तिच्या एका हातात सणाच्या पुरणपोळ्या, भावडय़ा-कुरवडय़ा, दूध असलेला भला मोठा डबा. जुन्या, मोठय़ा घेराचे चार डबे असलेला. दुसऱ्या बाजूला, कडेवर लहानगा भाचा घेतलेला. त्या वेळी आई काही तशी ‘म्हातारी’ नव्हती; पण तरीही एवढय़ाने तिच्यापेक्षाही तरुण व्यक्ती घामेजून जाईल अशीच ती परिस्थिती; पण मी नुसता आनंदाने पाहात होतो. आई वसतिगृहाच्या प्रवेशाद्वाराकडून यायला लागलेली. मी दार उघडलेच होते. आई आत आली. डबा ठेवला. भाच्याला खाली ठेवले माझ्या कॉटवर बसली आणि.. रडायला लागली, हमसून-हमसून. मी हडबडून गेलो. काही कळेचना. ‘‘तुझे माझ्यावर काही प्रेमच नाही.’’ आई बोलत होती. मग मीपण रडायला लागलो. आई असे म्हणत असल्याचे मला खूपच वाईट वाटले. माझ्या मनात माझी चूक मुरायलासुद्धा काही वेळ गेला. माझ्या आईची साधी, सरळ अपेक्षा होती. आपला मुलगा आनंदाने खोलीतून बाहेर पडून पळत आपल्याला सामोरा येईल. हातातून ओझे घेईल आणि बोलत-बोलत आईबरोबर खोलीपर्यंत येईल. प्रेम मनात असून चालत नाही, ते कोणत्या तरी माध्यमातून व्यक्त व्हावे लागते तरच ते साकार होते, तरच ते प्रत्ययास येते. प्रेम हे दोन व्यक्तींमधल्या संबंधामध्ये होणाऱ्या व्यवहारातून आविष्कार होणारी गोष्ट आहे. ती कल्पनेने रंगवायची गोष्ट नाही. हे समजण्यासाठी माझा पराभव व्हावा लागला. मलाच माझ्या वागण्याविषयी लाज वाटवणारा धक्का माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आईच्या दु:खातून बसावा लागला. हा पराभव त्यानंतरच्या नव्या भारतला जन्माला घालणारा ठरला. असा माझा पराभव झाला म्हणून प्रेमाच्या आविष्काराच्या अनेक भाषा पुढे मला कळत गेल्या. हा पराभव आनंददायकच आहे. मानुषता वाढवणारा आहे. जीवन समृद्ध बनण्याचा मार्ग जवळ आणणारा आहे. असे अनेक पराभव नंतरच्या काळात व्यक्तिगत आचरणाच्या पातळीवर होत गेले आणि माझ्यातली मानुषता वाढवीत गेले.
आयुष्यात कधीच विसरणार नाही अशा पराभवांपैकी सामाजिक- राजकीय चळवळीच्या क्षेत्रांतला माझा- आमचा पहिला पराभव १९७५ साली आलेल्या आणीबाणींची सुरुवात होण्यापूर्वी काही महिन्यांच्या काळात झाला. १९६०च्या दशकाची अखेर आणि १९७०च्या दशकाची सुरुवात म्हणजे जगभर उसळलेल्या तरुण-तरुणींच्या चळवळी. समाजपरिवर्तनात झोकून देणाऱ्या, बेभान होणाऱ्या एका पिढीचा काळ. या काळात जसे युवक क्रांती दल, दलित पँथर उभे राहिले त्याच वेळी ‘मागोवा’ हा आमचा गटही उभा राहिला. येत्या १०-१२ वर्षांत भारतात क्रांतिकारक बदल करणारी शोषितांची चळवळ उभी राहणारच, हा ठाम विश्वास आमच्यात होता. सिद्धांताच्या पातळीवर, चळवळीच्या व्यवहारात, साहित्याच्या आणि मूल्यांच्या क्षेत्रात आम्ही काही नवे, ताजेतवाने उभारण्याची हिंमत दाखवली. ज्यांच्यावर आम्ही घणाघाती टीका करीत होतो, त्या डाव्या पक्षांना आमचा राग येण्याबरोबरच आमच्याविषयी कौतुकाचीही भावना होती.
अशा भारलेल्या वातावरणातून प्रवास चालू असतानाच आम्ही ‘मागोवा’ विसर्जित करण्याचा निर्णय एकमताने घेतला आणि मी तरी सुन्नच झालो. आता हे असे कसे घडले, असा प्रश्न बराच काळ भेडसावत राहिला. प्रस्थापित जीवनाच्या रस्त्याने पुन्हा जायचेच नाही, हा निर्धार काही त्यामुळे डळमळला नाही; पण मन सैरभैर झाले. जीवनातला, या क्षेत्रातला, ऐन मुसमुसत्या तारुण्यातला हा पराभवाचा मोठा तडाखा होता.
आणीबाणी काही महिन्यांचीच लागू केली गेली. आमच्यापैकी बहुसंख्य जण पुन्हा एकत्र आलो. भूमिगत राहून चळवळ केली. आणीबाणी एकदाची उठली. देशात एक नवेच राजकीय परिवर्तन घडले. आमचे विसर्जन प्रत्यक्षात आले. आमच्यापैकी काही जण प्रस्थापित जीवनाकडे वळले. काही जण प्रस्थापित डाव्या पक्षांकडे गेले. आम्ही काही जण ‘मागोवा’ आणि त्यानंतरच्या काळात विकसित झालेल्या विचारावरच राहिलो विस्कळीत; पण एकमेकांशी संबंधित काम करीत राहिलो आणि नव्या नव्या गोष्टी नव्याने कळण्यासाठी मनाच्या खिडक्या मोकळय़ा होत गेल्या.
माझे गाव सत्यशोधक चळवळीचे फार जुने केंद्र; पण माझ्या चळवळीच्या जीवनात त्या विचारांचा प्रभाव कधी पडला नाही. त्याचे महत्त्व कधी वाटले नाही; पण या विस्कळीत काळातच सत्यशोधक विचार-व्यवहारांशी माझी पुनर्भेट झाली. गिरणगावातल्या डिलाईल रोडवरच्या हेब्बाळ-जलघाळच्या, शंभरावर कामगार राहणाऱ्या सामुदायिक गाळय़ात माझी महात्मा फुल्यांशी गाठ-भेठ झाली, तिथल्या कामगारांनी घालून दिली. त्या गाळय़ात देवाचे एकही कॅलेंडर लावले जात नव्हते. वेगवेगळय़ा जातींचे कामगार एकत्र राहात होते. तो गाळा म्हणजे एक सत्यशोधकी बेट होते. आम्ही कार्यकर्त्यांनी याच गाळय़ात १९७९ ला ‘महात्मा फुले सांस्कृतिक मंचाची’ स्थापना केली. मागोवा विसर्जनामुळे झालेला पराभव धुऊन टाकला. या घटनेने मला वाटले, ‘बरे झाले, पराभव झाला! माझा-आमचा पुनर्जन्म झाला’. त्यानंतर ‘प्रदर्शन चळवळ’, ‘समग्र सडक नाटक चळवळ’, ‘लोकाधिकार चळवळ’ असे करीत नवीन तरुण जमा होत गेले. ‘मागोवा’मध्ये आम्ही ९५ टक्के अति उच्चशिक्षित होतो. आमच्यापैकी कुणीच जात-धर्म मानीत आणि आचरणात आणीत नव्हते; पण ९५-९६ टक्के प्रमुख कार्यकर्ते ब्राह्मण जातीय होते. उरलेले कुणबी, आदिवासी अशा जाती-जमातींचे होते. आता जमणारे नवे तरुण ९९ टक्के कामगार होते. शेतकरी, बलुतेदार आणि दलित जातीतले होते. स्त्री कार्यकर्त्यांही अशाच थरातल्या होत्या. यातूनच ‘श्रमिक मुक्तिदल’ घडत गेले. सामाजिक-राजकीय क्षेत्रांतल्या पहिल्या धक्कादायक पराभवामुळेच जग नव्याने कळण्याचे, नवे शोधण्याचे स्वातंत्र्य मिळाले. जनतेमधून येणाऱ्या सर्व विभागांतून घडता आले, स्त्री-मुक्तीचे नवे धडे गिरवता आले.
 याच काळात, १९७३-७४ ला झालेला कामगार चळवळीतला एक पराभव म्हणजे एक अतिशय हृद्य अनुभव होता. त्यामुळे तो सांगितलाच पाहिजे असा आहे. टेलिफ्लो नावाची एक फॅक्टरी. सर्व कामगार माझ्यासारखे तरुण किंवा त्यापेक्षाही थोडे तरुण, तशीच त्याची जवळ असलेली एक ‘बहीण फॅक्टरी’, तिथेही असेच तरुण कामगार. दोन्हीही इंजिनीअरिंग फॅक्टऱ्या. त्यातली एक मालकाने एका रात्रीत मद्रासला उचलून नेण्याचे अजब कारस्थान केलेले आणि मग सुरू झालेला तीव्र संघर्ष. जागता पहारा. मालकाच्या घरावर मोर्चे. कामगारांना पूर्णपणे बेदखल करण्याचा डाव पूर्ण शिजलेला. शेवटी विरोधाला न जुमानता दुसरी फॅक्टरीसुद्धा उचलून न्यायला परवानगी मिळाली शासनाकडून; पण नोटीस, पगार, प्रॉव्हिडंड फंड इत्यादी देणी देऊनच मग हे घडेल एवढं तरी ठरले. लढय़ाचा पूर्ण पराभव झाला.
कामगारांनी मात्र कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम ठेवला! मला काही कळेचना. मी वादही घातला. मी कार्यक्रमाला येणार नाही, अशी भूमिका घेतली; पण कामगार जवळ-जवळ सक्तीनेच मला घेऊन गेले; पण तेवढय़ावर थांबले नाही. त्यांनी चक्क एक सामुदायिक संघटना केली. एलिफंटा गुंफांच्या परिसरात जाण्याचे ठरवले. चक्क आनंदोत्सव आणि आता सर्व वेगवेगळय़ा कंपन्यांमध्ये नोकऱ्या शोधणार म्हणून निरोप समारंभसुद्धा! तो सर्व प्रसंग अविस्मरणीय होता. मी अशा गोष्टींची कल्पनाही करू शकत नव्हतो. लढय़ाचा पराभव झाला की विजय? की पराभव आणि विजय दोन्ही? असे दोन्ही एकत्र असू शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे कामगारांनी त्यांच्या सहज कृतीमधून देऊन टाकली होती. यातूनच जीवनाचे जेवढे तत्त्वज्ञान मला उमजले तेवढे तोपर्यंत वाचलेल्या अनेक चांगल्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांमधूनही समजले नव्हते; इतक्या सोप्या आणि सहजपणे. या सर्व प्रसंगांमध्ये माझे डोळे किती तरी वेळा ओलावले आणि जीवनाला धाडसाने आणि रसिकतेने सामोरे जाण्याचे धडे मी या सर्व अनुभवातून गिरवीत गेलो.
मूलभूत परिवर्तनाच्या चळवळीतून शोषणमुक्त, समृद्ध आणि निरोगी समाज निर्माण करण्याची चळवळ म्हणजेसुद्धा एक व्यामिश्र मानुष अनुभव असतो. संघर्षांबरोबरच एखादे हिरवेगार रान उभे करून त्याचे संगोपन करण्याची अनुभूती यात असते. एखादे सुंदर शिल्प साकारण्याची, काव्य आविष्कारित करण्याची झिंग यामध्ये असते; पण त्याचबरोबर आयुष्यभर न विसरणारे, हृदयावर घाव बसणारे अनुभव देणारीसुद्धा ही प्रक्रिया असते. बिनतोड आणि धाडसी पद्धतीने जनचळवळ करण्याच्या व्यवहारामुळे माझ्या वडिलांचा, क्रांतिवीर बाबूजी पाटणकरांचा खून केला गेला. प्रतिसरकारचे यशस्वी आणि पुढाकारातले नेते असूनही या स्वातंत्र्यसैनिकाला, स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनंतर स्वातंत्र्यामुळे प्रभुत्वात आलेल्या शोषक शक्तींनी नाहीसे केले. आईला चळवळ जिवंत ठेवून मलाही चळवळवाला म्हणून घडवण्याचे- वाढवण्याचे कार्य करावे लागले. चळवळीचे पराभव-जय असेही असतात.
 माझ्या वाटय़ाला आणखी एक मन एक विदीर्ण करणारा पराभव आला. ‘मागोवा’चे विसर्जन झाल्यावर आमचे वेगवेगळे सहकारी वेगवेगळय़ा दिशेने गेले. डाव्याच पण वेगवेगळय़ा संघटनांमध्ये गेले. त्यामुळे मतभेदांचे, वादविवादांचे, संघर्षांचे प्रसंग आले; पण आमच्यातली मूळ नाती कधी कटू झाली नाहीत. आम्ही कधीच एकमेकांविषयी कुठेही विरोधी किंवा हानीकारक बोललो नाही. ‘संघटना वाढण्यासाठी असे थोडे करावेच लागते’ असे समर्थन करीत कुजबुज मोहीम राबवली नाही. आजही आमच्यातले संबंध प्रेमाचे आणि एकमेकांविषयीच्या आदराचे आहेत. आजही आम्ही मित्र आहोत. आमच्यापैकी काही आमच्यातून कायमचे सोडून गेले, दिवंगत झाले; पण शेवटपर्यंत आम्ही मित्रच होतो. जणू एका जिव्हाळय़ाच्या कुटुंबाचा भाग होतो.
 पण गेल्या काही वर्षांपूर्वी झालेला पराभव मात्र या सर्व गोष्टींना संपवून टाकणारा आहे. आम्ही मानुष समाजाच्या निर्मितीची चर्चा तरी करू शकतो का, अशा परिस्थितीत या प्रश्नाला उत्तर देऊ न शकणारा आहे; पण तरीही आपण काय करू नये आणि कसे वागू नये याचे पक्के शिक्षण ज्यापासून घेतलेच पाहिजे असासुद्धा हा पराभव आहे. बुद्धाचे एक सुंदर वचन मी दररोज स्वत:ला सांगत असतो या पराभवानंतर.
‘‘वेरेन संमती वेरानी कुदाचन
अवेरेनच समंती एक धम्मो सनंतनो!
म्हणजे, ‘वैराने वैर कधीच संपत नसते. अवैरानेच वैर संपू शकते. असा पुरातन (मानव) धम्म सांगतो.’
भांडवलशाहीचे उदाहरण घेतले तर असे म्हणता येईल की, भांडवलशाही समूळ संपल्याशिवाय जनतेचे शोषण संपवून पुढचा, मानव, मुक्तीचा समाज आणता येणार नाही. त्यासाठी भांडवलदार वर्ग, कामगार वर्ग संपवून सर्वाना माणूस म्हणून नवे जीवन निर्माण करावे लागेल; पण एका अर्थाने स्पर्धेच्या, पैशांवर नाती मोजण्याचा, जीवघेण्या परात्मभावी अमानुष जिण्याच्या जाचातून खुद्द भांडवलदार असणारी माणसेसुद्धा यामुळे मुक्त होतील. संघर्ष भांडवलशाही आणि भांडवलदार वर्गाशी आहे. भांडवलदार बनलेल्या माणसांशी नाही. त्यांच्याशी ‘अवैर’ करूनच या संघर्षांचा शेवट होईल आणि मग चळवळीतल्याच माणसांची फारकत झाली तर हे फारच मोठे सत्य आहे. इथे वैराने वैर संपवायला जाणे हा चळवळीचा पराभव आहे. प्रेमाने बदल घडवणे यात पराभवाचा पराभव आहे.
नारायण सुर्वे त्यांच्या कवितेत म्हणतात,
‘विकता, विकता त्यांनी सूर्य बाजारात आणला!
घर फुंकून निघालेले लोक पाहातच राहिले
अशा वेळी स्वस्थ बसून कसे चालेल?’
आता तर वारा, सूर्य, प्रकाशलहरी, ध्वनिलहरी, समुद्र, समुद्राच्या लाटा, जंगले असे सर्वच त्यांनी माणूस आणि माणुसकीसह बाजारात आणले आहे. आता परिवर्तनवाद्यांनी स्वत:चाच पराभव करून कसे चालेल?      

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
bacchu kadu reaction on mahayuti
प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात? बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”