लहानपणापासूनच अंधार, रक्त, अपघात, हॉस्पिटल या सर्वाची भीती. रक्त नुसतं बघितलं तरी चक्कर यायची. मृत्यूची भीती तर प्रत्येकालाच. मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि तेव्हापासून सर्व जण घरी येईपर्यंत मनात धागधुक सुरु झाली. अशा अनेक गोष्टींची मनात भीती कमी होती की काय, सन २००५ ला आईला कर्करोगाचं तिसऱ्या पायरीवरचं निदान झालं. तिला होत असलेल्या असह्य़ यातना पाहवत नव्हत्या. तेव्हा तिच्या मृत्यूलाच हाक मारावी लागली, तिला होत असलेल्या यातनांतून मुक्त करण्यासाठीच. मृत्यू हा अटळ आहे, पण तो एवढा भयावह असतो हे पाहून मन हादरून गेलं. सहनशीलतेची मूर्ती असणाऱ्या माझ्या आईला देवाने एवढय़ा यातना का द्याव्यात? सगळ्यांसाठी इतके करणारी माझ्या आईच्याच वाटय़ाला हा त्रास का ? मनात असलेले प्रश्न काही सुटत नव्हते. त्यातच २०१० साली वडिलांप्रमाणे माया करणाऱ्या माझ्या सासऱ्यांचे निधन झाले.  अजून एक धक्का बसला. आता मनाचं ओझं शरीराला पेलेनासं झालं. त्यानेही असहकार पुकारायला सुरुवात केली. ऑगस्ट २०१० ला मला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं.
ज्या मृत्यूच्या विचारानेही भीती वाटायची तो माझ्या दारात उभा होतो. ‘कॅन्सर म्हणजे कॅन्सल’ हेच समीकरण मला माहीत होतं. डोळे पाणावले, पण क्षणभरच. ३७ र्वष वय हे काही मृत्यूला कवटाळण्याचं नव्हतं. माझ्या आठ वर्षांच्या सुयशला पोरका करण्यासाठी माझं मातृत्व काही तयार नव्हतं. आणि मनामध्ये असलेली मृत्यूची भीती एकदम नाहीशी झाली. मी ठरविलं, मृत्यू-मृत्यू म्हणून जो आहे त्याच्याशी लढायचं, तेही जिंकण्यासाठीच. ‘विल पॉवर’ म्हणतात ती हीच असावी.
टाटा हॉस्पिटल जणू इंद्राचा दरबार. तिथं मला न्याय मिळणार होता. दोन-तीन वर्षांपासून ते सत्तर-ऐंशी वर्षांपर्यंतचे अनेक लढवय्ये जीवनाची लढाई लढत होते. मीही एक त्यामध्ये होते. परंतु ही लढाई मी सगळ्यांच्या मदतीने जिंकली आणि आयुष्याला टर्निग पॉइंट मिळाला.
आपण चांगले विचार करायला लागलो की चांगली माणसंही भेटतात. ‘अंबिका योग कुटीर’- बोरिवली संचालित ‘नवसंजीवन’ सपोर्ट ग्रुपशी नातं जोडलं गेलं. जन्म व मृत्यू आपल्या हातात नाही. पण त्या दोघांमधली वाट मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. ती भीत-भीत चालायची की लढत-लढत हे आपण ठरवायचं. आज एखाद्या रुग्णाला स्वत:चा अनुभव सांगून त्यांच्या मनातील भीती दूर करून त्याला कर्करोगाच्या लढाईसाठी धीर देण्यात खूप समाधान मिळतं. मग मनात येतं, ‘मृत्यूचा विचार करीत का घाबरावं. तो समोर येता पंख पसरावे.’