अत्यंत गरिबी. घरात ९ माणसं. प्रत्येकाकडून कामाचीच अपेक्षा. अशा वेळी अभ्यासात हुशार लक्षराजला आईने मुंबईला पाठवलं, ते आपली सोन्याची नथ गहाण ठेवून. या एका टर्निग पॉइंटने आणि पुढे त्याच्या जोरावर अतिशय काबाडकष्ट करत लक्षराजने शैक्षणिक यश मिळवलं, टीव्ही, आकाशवाणी कार्यक्रमात नाव कमावलं आणि प्राध्यापकही झाला. त्या कष्टाची ही कहाणी.
आईमुळेच मी ‘हमाला’ऐवजी ‘साहेब’ झालो. त्याचीच ही कथा. नाशिक-पुणे महामार्गावर नांदुर-शिंगोटे या मोठय़ा गावाला चिकटून, सिन्नर तालुक्यातील एक बहुरंगी गाव म्हणजे मानोरी. निसर्गाचा कोप झाल्याने सिन्नर तालुका नेहमीच दुष्काळी, त्यामुळे बहुतांशी लोकांच्या घरी गरिबी. त्यात १९७२ ते १९७६ हा महाभयंकर दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेला तो काळ. दुभती जनावरं देवाच्या भरवशावर अशीच बेवारसपणे सोडून दिलेली. आमच्या घरात नऊ माणसं खाणारी, त्यामुळे कित्येकदा उपासमार व्हायची. रोजगार हमीच्या कामांच्या मोबदल्यात ‘सुकटी’ मिळायची, परंतु भुकेच्या तडाख्यात सुकटीसुद्धा अपुरी पडायची. माध्यमिक शिक्षण चालू असतानाच दुष्काळाने थैमान घातलं होतं. हायस्कूलला जाऊन तीन-चार दिवसांची हजेरी लावून, पुन्हा रोजगार हमीच्या कामावर हजर व्हावं लागायचं. रस्त्याची व बंडिंगची कामं करताना टिकावाने खोदकाम केल्यामुळे हाताला मोठमोठे फोड यायचे. माझ्या वजनाच्या दुप्पट टोकरीतला मुरूम वाहून नेताना डोक्यावरील टाळूचा भाग लालबुंद होऊन दुखरा होई.
पण अभ्यासात मी हुशार होतो. हायस्कूलमधील माझा एकपाठीपणा व हुशारी याचं शाळेतल्या मिसाळसरांना व वाक्चौरेसरांना भारी कौतुक वाटे, परंतु घरच्या गरिबीमुळे शिक्षण सोडून मी बागायती पट्टय़ातील गावच्या पोलीस पाटलांच्या घरी शेळय़ा-मेंढय़ा चारण्याचं किंवा शेतातली कामं करणारा, ‘वेठबिगार गडी’ म्हणून काम करावं ही घरच्यांची इच्छा. वडील म्हणायचे, ‘शिकून हा काय बॅलीस्टर व्हणार हायेका?’ माझा मामा व भाऊ यांचाही माझ्या शिक्षणाला कडाडून विरोध होई. आईला हे सारं बघवत नव्हतं.
माझ्या आईला सारेच प्रेमाने व आदराने ‘बाई’ म्हणत. आईला शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं होतं, ‘‘गोदाबाई, तुमच्या मुलाची माती करू नका, त्याला काहीही करून पुढे शिकू द्या, तो तुमचं नाव काढील.’’ हे आईने ऐकलं. थोडेफार पैसे उभे केले. एस.टी.च्या भाडय़ासाठी व माझ्या खर्चासाठी, आईने तिची अत्यंत प्रिय सोन्याची नथ गहाण ठेवली. तिची हौस-मौज मनाच्या कप्प्यात दाबून टाकली. संगमनेर-मुंबई या एस.टी.त आईने मला बसवलं, ओळखीच्या कंडक्टरला मला मुंबई सेंट्रलला सुखरूप पोहचवण्याची विनंती केली, सोबतीला बाजरीच्या दोन भाकरी, शेंगदाण्याची चटणी व एका पिशवीत भुईमुगाच्या शेंगा दिल्या आणि माझा प्रवास सुरू झाला. मुंबईकडे..
आमच्या गावच्या ओळखीच्या माणसाकडे ‘खाणावळी’ म्हणून तात्पुरती सोय झाली, त्यांनीच नाइट हायस्कूलमध्ये माझं नाव दाखल केलं. दिवसा जिवा मारवाडय़ाच्या दुकानात हमाली करायची तर कधी ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करावं लागे. रात्री १० पर्यंत घरी यायचो, खाणावळीत उरलं-सुरलेलं जेवण मिळायचं. पोट भरत नसे, पोटाची आग शमवण्यासाठी दोन-तीन तांबे पाणी प्यायचो. झोपण्यासाठी उसवलेलं साखर बारदान, सतरंजी म्हणून तर उशाला बंदाची कापडी पिशवी व त्यात सलीम टेलरच्या दुकानातील चिंध्या कोंबलेल्या. भाटिया हॉस्पिटलसमोरील फूटपाथवर (ताडदेवला) चार र्वष उन्हा-पावसात व थंडी-गारठय़ात झोपून काढली. पोटभर जेवण नाही, खाणावळी १०-१२ माणसं जेवायला येत, त्यामुळे हाजीर तो वजीर, उशिराने आलं की जेवणाचे हाल होईत. पुरेशी झोप होत नसे व दिवसभर काबाडकष्ट करून शरीर थकून जाई.
खाणावळीचे पैसे, शाळेची फी, पुस्तकं व इतर खर्चासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हमाली करायचो, त्यातून दिवसाला चार-पाच रुपये मिळायचे, त्यातूनच आईला साडी (लुगडं), सुके बोंबील, खोबरेल तेलाचा डबा व म्हैसूर पाक गाववाल्यांमार्फत गावी आई-वडिलांना पाठवीत असे.
प्रत्येक सीझननुसार कामाचं स्वरूप बदलायचं. उन्हाळय़ाच्या व दिवाळीच्या सुट्टीत बॉम्बे सेंट्रलला हमाली, इतर वेळी दारोदार अगरबत्ती विकणं तर कधी डिर्टजट पावडरचं भलं मोठं ओझं घेऊन, दारोदार कपडे धुण्याची डिर्टजट पावडर विकत असे, पावसाळय़ात किराणा दुकानात डिलिव्हरी बॉय किंवा वजनकाटय़ावर काम करून पुडय़ा बांधण्याचं काम करावं लागे. शिक्षण सुरूच होतं. दहावीनंतर बांद्रय़ाच्या गव्हर्नमेंट कॉलनीत, चेतना कॉलेजला कॉमर्सला प्रवेश घेतला. सर्व श्रीमंतांचीच पोरं. आपापल्या गाडय़ांमधून येत, मी मात्र फाटक्या-तुटक्या वहाणा घालून बेहरामपाडा-खेरवाडीमार्गे ११ नंबर बसने कॉलेज गाठी. स्वत:ची पुस्तकं विकत घेण्याची ऐपत नसल्याने, नेहमीच कॉलेजच्या लायब्ररीतून ‘होम इश्यू’तून पुस्तकं आणून रात्रभर फूटपाथवरच्या दिव्याखाली तर कधी पारशीवाडीतील अग्यारीसमोरील लाइटच्या पोलखाली बसून वाचन करायचो. दुसऱ्या दिवशी परीक्षेला तय्यार! त्या वेळी बाबूराव हेमाडे यांनी मला इंग्लिश टायपिंग व शॉर्टहॅण्डचा क्लास शिकण्यास सांगितलं. सकाळी कॉलेज व नंतर नोकरी व संध्याकाळी पन्नीकरसरांच्या विश्वभारती इन्स्टिटय़ूटमध्ये टायपिंग व इंग्लिश शॉर्टहॅण्डचा क्लास चाले. सरांनी माझी एकंदर माहिती काढली, माझ्या गरिबीची त्यांना कीव आली, परंतु माझी धडपड, जिद्द पाहून, त्यांनी माझी एकूण फी माफ केली, एक वर्षांनंतर टायपिंगची व शॉर्टहॅण्डची गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट (GCC) परीक्षा चांगल्या मार्काने पास केल्या.
कालपरत्वे मी माझगावच्या विक्रीकर भवनात (सेल्स टॅक्स ऑफिस) स्टेनोग्राफर म्हणून नोकरीला लागलो. सरकारी नोकरी, कमिशनर ऑफिसला नेमणूक, त्यामुळे चांगला पगार व मानमरातब मिळू लागला. एकीकडे शिक्षण चालूच होतं, सोबतीला मित्रांच्या ओळखीने मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये ५० रुपये भाडय़ाने एक छोटी बठय़ा चाळीतली खोली घेतली. शौचालय नसल्याने खूपच कुचंबणा व्हायची. १५ खोल्यांमध्ये दोन सार्वजनिक नळ, दोन-तीन र्वष कशीबशी काढली, नंतर डोंबिवलीला राहायला गेलो. नोकरी सुरूच होती, स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरू होती, त्याच दरम्यान आकाशवाणी-मुंबई केंद्रावर मराठी ‘वृत्तनिवेदक’ पदावर काम करण्याची संधी लाभली. प्रदीप भिडे, नंदकुमार कारखानीस, शिबानी जोशी, दीपक वेलणकर यांच्याबरोबर काम करताना खूप अप्रूप वाटे, संध्याकाळी सात वाजता, कामगार सभेनंतर आकाशवाणी मुंबईच्या बातम्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घरा-घरांत नि मना-मनांत पोहचायच्या, त्यामुळे ‘लक्षराज सानप प्रादेशिक बातम्या देत आहे, आजच्या ठळक बातम्या.. ‘एवढं ऐकून माझ्या मानोरी गावचे ग्रामस्थ वडिलांना शाबासकी देत व हळूच पाच-सहा कप चहाची ऑर्डर देऊन पार्टी वसूल करीत. पुढे पुढे मुंबई दूरदर्शनवर मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची संधी लाभली. हळूहळू विविध चित्रपटांमधून, माहितीपटांमधून अभिनय करण्याचीही संधी लाभली. वामन केंद्रेंसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शकाचं मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभलं. विविध जाहिरातींतूनही मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली. उच्च शिक्षणही, नोकरी व त्याचबरोबर सांस्कृतिक घडामोडी सुरूच होत्या. बी.कॉम., एलएल.बी.नंतर C.A.I.I.B व नंतर एमबीए (मानवी संशोधन) चं शिक्षण घेतलं. पत्रकारितेची हौस होतीच, म्हणून ‘डिप्लोमा इन जर्नालिजम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन’ यशस्वीरीत्या पूर्ण करून संपादकपदही भूषवलं. फिल्म सेन्सॉर बोर्डावर, ‘मानद सदस्य’ म्हणून काम करण्याची संधी लाभली, तसंच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांवर कार्यरत आहे. सध्या पीएच.डी. चं संशोधन सुरू असून, २०१४ संपण्याआधी ‘डॉक्टरेट’ मिळेल. मुलगा डॉ. अमोल हा दंतवैद्य आहे तर मुलगी मॅनेजमेंटची पदवी घेऊन नोकरी करीत आहे, पत्नी नंदिता (सुनंदा) हीसुद्धा लेखिका व संपादिका आहे.
लक्षराजने जिद्द सोडली असती तर लक्षराज आज कुठे तरी ‘हमाल’ (कुली) म्हणून नाही तर शेळय़ा-मेंढय़ा चारणारा गुराखी बनला असता. पण ते होणं नव्हतं हेच खरं!