माझी आणि माझ्यासारख्या अनेकांची भाबडी समजूत होती की, जन्माला आल्यावर श्वास जितक्या सहजपणे घेता येतो तितक्या सहजपणे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्त्री-पुरुष समानता, श्रमसंस्कार ही मूल्यं प्रत्येकांत रुजलेली असायला हवीत. पण असं खरंच होतंय का? हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात दिसली दोन्ही रूपं. परीक्षेत मार्क किती मिळतील, एवढीच काळजी करणारे काही जण तर काही मात्र समाजात चांगलं काही करण्यासाठी धडपडणारे, ‘वंदे मातरम्’ चा अर्थ जाणणारे. अशाच धडपडणाऱ्या मुलांचीही गोष्ट.
‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ ज्याच्या त्याच्या ओठी काही वर्षांपूर्वी असणारं ग. दि.   मा.चं हे गीत. विस्मृतीत गेलं आहे का, अशी शंका येते. रोजच्या बातम्या ऐकल्या की वाटतं, ‘मृतांचे राष्ट्र’ होऊ पहाणाऱ्या या देशाला जागविणारा हा मंत्र पुन्हा एकदा सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा.
माझी आणि माझ्यासारख्या अनेकांची भाबडी समजूत होती की, जन्माला आल्यावर श्वास जितक्या सहजपणे घेता येतो तितक्या सहजपणे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री-पुरुष समानता, श्रमसंस्कार ही मूल्यं प्रत्येकांत रुजलेली असायला हवीत. देश, देशाची माती, माणसं, पशु-पक्षी, प्राणी या साऱ्यांबद्दल मनात प्रेम हवं. उपग्रहाचं यशस्वी उड्डाण, दौलतबेग ओल्डीवर मोठं विमान उतरलं, हॉकीतली जीत अशांसारख्या बातम्यांनी प्रत्येक भारतीय मोहरून जायला हवा. तर रेल्वे अपघात, अलकनंदेचं रौद्ररूप, तिनं केलेला कहर यांची चिंता, काळजी प्रत्येकाला वाटायला हवी. पण असं खरं होतंय का? यासाठी पालक काही प्रयत्न करतात की नाही? हे जाणून घेण्यासाठी आसपासच्या अनेक शाळा सुटताना आपल्या मुलांना घरी न्यायला येणारे पालक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. उत्तर मिळणं दूरच, पण माझा प्रश्नच त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, असं वाटत नव्हतं.
काही ज्येष्ठ शिक्षकांशी जेव्हा मी बोलले तेव्हा त्यांच्याही बोलण्यातून डोकावत होती निराशा. ‘बाई, हे सगळं असंच आहे. आपलं बोलणं ना मुलांपर्यंत पोहोचतं ना त्यांच्या पालकांपर्यंत. एखादी गोष्ट परीक्षेत येईल का? आणि मार्क किती मिळतील, एवढीच यांना काळजी. सगळंच खूप बदलत गेलं. मुलांना लिहिता-वाचता येत नाही आणि त्यात अनेक सरकारी नियम! ध्वजवंदनालाही मुलांना न पाठविणारे पालक आहेत. आता बोला!’ मला त्यांची निराशा कळत होती, पण खात्री होती मला आशेचे किरण गवसतील याची. मग माझ्या माहितीची गुणी मुलं आणि त्यांच्या पालकांशी बोलायचं ठरविलं आणि भेटली अनेक मंडळी.
मुलांशी गप्पा मारताना, खाऊ-पिऊ घालतानाच अगदी सहजपणे राष्ट्र, राष्ट्रातील माणसं, मातीवर प्रेम करायला शिकविणारी. शब्दांना अनुभवाची जोड देणारी. प्रथम भेटली आयआयटी इंजिनीअर धवलची आई आणि अनेकांची शोभामावशी. तिच्याकडे उपक्रमांची खाण. ती दरवर्षी मुलांकडून राष्ट्रध्वज बनवून घेते. १४ ऑगस्टला एक छान कार्यक्रम करते. ध्वजाच्या केशरी, पांढऱ्या, हिरव्या रंगांचं महत्त्व सांगणाऱ्या कथा, गाणी मुलं सादर करतात आणि १६ ऑगस्टला रस्त्यावर विखुरलेले ध्वज गोळा करून त्यांना सन्मानानं निरोप दिला जातो.  तिच्याकडे येणाऱ्या मुलांना ती सांगते, ‘राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान करण्याचं भाग्य सर्वाना मिळत नाही. सीमेवर जाऊन लढणंही प्रत्येकाला शक्य नाही, पण निदान त्यांच्याप्रती कृतज्ञता तरी दाखवावी.’ मग ज्या कोणाचा त्या आठवडय़ात वाढदिवस असेल तो किंवा ती स्मारकाला भेट देतात आणि आठवडाभर तिथं फुलं ठेवतात.
मुंबई उच्चन्यायालयात वकिली करणाऱ्या अविनाशची आई सांगते, ‘आम्ही मुलांना लहानपणी खूप निवडक नाटकं, चित्रपट दाखवायचो. मग त्यातली गाणी, उतारे पाठ करून घ्यायचो. उत्तम भाषा, पल्लेदार भाषण सअभिनय करता करताच अन्यायाविरुद्ध लढणारं प्रोफेशन निवडण्याचं बीज त्याच्या मनात रुजलं असावं.’
‘स्पृहा लहान असताना आम्ही अनेक पुस्तकं विकत आणायचो. प्रदर्शनांना भेटी द्यायचो,’ ‘उंच माझा झोका गं’ मालिकेतील स्पृहा जोशीची आई श्रेया सांगत असते. ‘स्पृहा खूप हुशार आहे. तिचं वाचन प्रचंड म्हणूनच विचारही प्रगल्भ आहेत. म्हणूनच तिच्या बाबांना वाटतं व्यवस्थेला नाव ठेवत न बसता स्पृहानं आयएएस अधिकारी व्हावं.’ घरातल्या संस्कारांबरोबर ती स्पृहाच्या यशाचं श्रेय देते दादरच्या बालमोहन शाळेला आणि पुस्तकांना!
‘अ‍ॅक्चुरी’ (गणितातील सर्वोच्च पदवी) होऊ पाहणाऱ्या अमोदची आई म्हणते, ‘ तो बॉर्न लीडर आहे आणि त्याची ‘चतुर्भुज’ शाळाही खूप छान आहे. अगदी मोजकी उदाहरणे देते. आम्ही टिश्यू पेपर वापरलेले, कारण नसताना एसी, दिवे, पंखे लावलेले त्याला आवडत नाहीत. पतंगाच्या मांज्यानं पक्ष्यांना इजा होते म्हणून तो पतंग उडवीत नाही. प्रदूषण वाढतं, खर्च केलेला पैसा वाया जातो म्हणून तो फटाके उडवीत नाहीच, पण कित्येक वर्षांपूर्वी त्यानं सोसायटीतल्या साऱ्या मुलांना गोळा केलं. आपलं म्हणणं त्यांना पटवून दिलं आणि साऱ्यांनी फटाक्यांचे पैसे गोळा केले. त्यातून पुस्तकं आणि खाऊ खरेदी करून तो अनाथाश्रमात पोहोचवला. मुलं ती पुस्तकं वाचतात ना, याची खात्री करून घेतली आणि त्यांचा आनंद पाहून मग ही आता प्रथाच पडली.’
शहरी भाग आणि त्याच्या आसपासच्या वंचितांना मदत मिळणं त्या मानानं सोपं असतं; पण बॉर्डर स्टेटमध्ये! व्हॅली वा सेव्हन सिस्टर्सचं काय? तिथले नागरिक आणि आपल्यात दुवा कसा सांधणार? पण म्हणतात ना, इच्छा असली की मार्ग सापडतो. अगदी तसाच मार्ग सापडला व्यवसायानं इंजिनीअर असलेले सारंग गोसावी, तेजश्री कर्वे आणि त्याच्या सहकाऱ्यांना. त्यातूनच मग यंग, प्रोफेशनल चमूनं स्थापना केली ‘असीम फाऊंडेशन’ची. जनरल पाटणकर आणि ऑपरेशन सद्भावना सर्वाना परिचित नाव. पुण्याच्या भेटीत ते सारंगच्या कॉलेजवर पोहोचले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला सारंगनं. त्याचं फाऊंडेशन (इको टुरिझम) या दुर्गम भागाची सहल त्यांच्यासारख्याच प्रोफेशन यंग लोकांना घडविते. तिथल्या तरुणवर्गापर्यंत पैसा, शिक्षण, व्यवसाय पोहोचायला हवेत, हे पटवते. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर लोकांचा विश्वास बसतो. आज ‘असीम’च्या मदतीने सीमावर्ती भागातल्या अनेक खेडय़ांत संगणक केंद्र, छोटे उद्योग यांची उभारणी झाली आहे. सुजाता, प्रांजली यांसारख्या मुली आणि त्यांच्या पालकांसाठी म्हणावं लागेल ‘हॅट्स ऑफ’. या आणि यांच्यासारखी अनेकजणं विवेकानंद केंद्राच्या संपर्कात आली आणि केंद्राची पूर्णवेळ कार्यकर्ती बनली. केंद्राशी यांचा परिचय झाला सुट्टीतल्या शिबिरांपासून. विवेकानंदांचे समर्थ विचार आणि ते निष्ठेने आचारात आणणाऱ्या कार्यकर्त्यांनी कामाचं जाळं देशभर विणलं आहे.  प्रथम शिक्षण पूर्ण करून ही तरुण मंडळी त्यांच्या वयाच्या मुलांना असणाऱ्या प्रलोभनांपासून स्वत:ला दूर ठेवतात. कन्याकुमारी ते ईशान्येतील अनेक राज्यांत शाळा चालवितात. ग्रामविकासाचे कार्यक्रम राबवितात. कामाच्या निमित्ताने मला भेटलेले लेफ्टनंट जनरल कुलकर्णी, विंग कमांडर हेमंत कुलकर्णी सांगतात, ‘यांचं काम खूप मोलाचं आहे. सीमावर्ती भागात देशभरातून खूप मोठय़ा प्रमाणावर पैसा आणि मनुष्यबळ पोहोचायला हवं. धगधगणाऱ्या सीमा शांत ठेवण्याचा आणि शत्रूला आक्रमणापासून रोखण्याचा हा उत्तम मार्ग आहे.’
पण हेही आहे सत्य की, सुजाता, प्रांजली, अभयदासारखे केंद्राच्या संपर्कात योग्य वयात येणारे खूप थोडे. तरी आपला घरसंसार सांभाळूनही मनात असेल तर खूप काही करता येतं. दहशतवाद, भ्रष्टाचार यासारखीच पर्यावरणाची समस्याही गंभीर. त्याचा मुकाबला करणं म्हणजेपण देशभक्तीच. उदा. डॉ. अलका मांडके यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून आपल्या घराच्या गच्चीवर छान बाग फुलविली आहे. ती बघण्यासाठी त्या आग्रहाने साऱ्यांना निमंत्रण देतात. युथ एक्स्प्रेशन ग्रुप स्थानिक कॉर्पोरेटर, आमदारांना भेटून वृक्षलागवडीची परवानगी मागतो. संवर्धनाची हमी घेतो. तर टाऊन प्लानर, आर्किटेक्ट श्री. कोलवणकर दर प्रत्येक रविवारी योगप्रसार आणि गिरीदुर्गाच्या सफाई मोहिमेला देतात. विलेपार्लेस्थित देवांगिनी सोसायटीला आदर्श बनवितात. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देतात. त्यांच्या सोसायटीतील केवळ सात टक्के कचरा गाडय़ांवर- डम्पिंग ग्राऊंडवर जातो. बाकी मग पेपर ऑडिट होतं. निर्माल्याचं खत वेगळं. सुक्या कचऱ्याचं प्रोसेसिंग वेगळं, ओल्या कचऱ्याचं नियोजन वेगळं. एक पर्यावरणीय बुलेटिन निघतं, हे सारं होतं सोसायटीतील छोटय़ांना हाताशी धरून. अनुराधा प्रभुदेसाई लष्कर, त्यांचं काम याबाबत जनजागृतीचं काम करतात. त्यांच्या ‘लक्ष्य फाऊंडेशन’चा टारगेट ग्रुप आहे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी. कारण लहान वयातील मने अधिक संस्कारक्षम असतात. शीतल गर्देच्या मुलाची शिवाजी महाराजांवर कल्पनातीत भक्ती. मग शीतल त्याला शिवाजीच्या गोष्टी सांगते. न चुकता दरवर्षी एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेटीला नेते. कोणी अमेया इंजिनीअर होऊन संस्कृतचा अभ्यास करते, कारण आपली संस्कृती, परंपरा ज्ञानाचा ठेवा आहे संस्कृतात. आपण भारतीय आपल्याच रूढी-परंपरा, ज्ञान, विज्ञानाची हेटाळणी करतो. याकडे तुच्छतेनं बघतो कारण त्यासंबंधीचं अज्ञान. दूर करायचं तर प्रथम आपण ज्ञानी व्हायला हवं, हा तिचा ध्यास. ती आणि तिच्यासारखी असंख्य गिरीभ्रमंती करतात, कधी पानिपतला भेट देतात, तर कधी लोणार सरोवराला. कधी सूर्यग्रहणासाठी प्रवास करतात, तर कधी रामदासांच्या शिवथरघळीला. त्यांना मार्गदर्शन मिळतं डॉ. मोहन आपटे सरांचं. मग कधी त्यांच्यासमवेत असतील इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर, तर कधी शिवाजी महाराजांचा चालता-बोलता इतिहास बाबासाहेब पुरंदरे!
खरं सांगायचं तर, माझ्या भारतमातेसाठी काय करावं, कोणी कसं किती करावं यावर बंधन नाहीच. प्रत्येकानं आपल्या कुवतीनुसार, श्रद्धेनुसार करावं. हे लिहितानाच साधना सहानीच घरी आल्या. त्यांचा रेकीवर विश्वास. देशात सारं सुरळीत व्हावं, शांतता, समृद्धी नांदावी म्हणून प्रत्येक घरात प्रत्येकानं रात्री झोपण्यापूर्वी काही काळ प्रार्थना करायला हवी, असं त्या सांगत होत्या. मनात येत होते, ११० कोटी लोकांनी मनापासूनची प्रार्थना केली तर व्यर्थ कशी जाईल? पुन्हा एकदा वंदे मातरम्चा घोष भारतवर्षांत घुमू लागेल. अगदी नक्कीच!