bhogle‘‘रोजच्या रोज थंडी-पावसात कचराकुंडय़ा पालथ्या घालत कचऱ्यातले खिळे, कागद, काच, पत्रा गोळा करून भंगारवाल्याला विकायच्या, मिळालेल्या पैशांवर गुजारा करायचा. नाही मिळालं तर पाणी पिऊन गपगुमान झोपायचं. पण आता तोही कचरा मिळेनासा झालाय. आम्ही कसं जगायचं?,’’ विचारताहेत, कचरावेचक कामगार कौशल्याबाई.

स काळचं नऊ वाजल्यापासून गोणी घिऊनशान फिरतीया. पण अजून काय बी गावलं नाय. आता एमआयडीशीतल्या कंपन्यांचा कचरा दुपारी तीनला पडल. तोपत्तूर हिंडायला हवं. आज बी खिळं, काच, पत्रा असा सुका कचरा गावला नाय तर पानी पिऊन झोपायचं. मालक अपंग, बेवडा. आता वय झालं म्हून. पण अगुदर बी निसता कुंकू लावाय पुरता. पोरगी अर्धवट. निसती खा खा करती. मग माझ्या पुढय़ातला भाकरतुकडा बी मी तिलाच दिऊन टाकती आन् पानी पिऊनशान झोपून जाती म्या. काय करनार?
सत्तर वर्साचं वय माजं. कचरा वेचताना डोळ्यांत ऑसिड गेलया. तवाधरनं धड दिसत बी न्हाय. तरीबी कचरा वेचाया जावंच लागतं. या उमरमध्ये कोन काम देणार कंपनीत? त्यांना जवान पोरी हव्या. म्हणून आमच्या कचरा वेचणाऱ्या समद्या बाया एक टाइम जेवत न्हाय. मातूर पोरांना साळत घालत्यात. शिकवित्यात. आमी अंगुठा छाप! पण आमची पोरं शिकली तरच या नरकाभाएर पडतील न्हवं?
आमचं आयुष्य गेलं कचराकुंडीत! पार कचरा झाला जिंदगीचा! लगीन करून आले आन ठावं झालं नवरा कमवत न्हाय. दारू-जुगाराचं व्यसन! आमच्या वस्तीतल्या समद्या जोडीदारनींची हीच कथा! त्या म्हनल्या, ‘‘तू आनीक घरी कशापायी बसतीस? चल आमच्या संग कचरा वेचाया! ’’ लालचीनं जायला लागले. पयल्या दिवशी लय वंगाळ वाटलं. पन मजबुरीनं जात ऱ्हायले.
आमच्या एमआयडीसी एरियात पंचवीस-तीस कचराकुंडय़ा हायत. त्यांत पुष्ठा, पळणी, काच, भंगार भेटतं. त्यो समदा माल भंगारवाल्याच्या दुकानांत जाऊनशान इकायचा. आता खिळे, लोखंडी वस्तू १८ रुपये किलो, प्लास्टिक १३ रुपये किलो आन् पुष्ठा ५ रुपये किलो असा भाव असतोया. त्यांत कसाबसा गुजारा हुतो. पन् असा कचरा वेचताना पत्र्याने हात कापतो. कधी हातात खिळा घुसतो. पायाची तर आख्खी चाळण हुतीया. कधी नखच निघतं. कधी बोटच तुटतया. तसं सहा म्हयन्यांतून येकदा विंजक्शन घेतो आमी. पण रोजच लागतं त्याला काय करनार वो? अस्से हातपाय सुजत्यात की इचारू नका. लय जोरात पत्रा, काच लागली आन् रगात निघत राह्य़लं का कुंडीतलाच येखांदा घाण कपडा फाडायचा आन् त्योच जखमेवर बांधायचा. इळभर तिथच बसायचं. रगात थांबलं का पुन्नांदा कचरा वेचायला लागायचं. घरी आल्यावर बी रगात व्हात राह्य़लं तरच दवाखान्यात जायचं.
गेल्या सालची गोष्ट! मी डम्पिंगवर गेले व्हते कचरा वेचाया. तिथं कचऱ्याची गाडी आली का समद्या बाया त्या गाडीमागं धावत्यात! तशी मी बी धावली. तेवढय़ात ड्रायव्हर वराडला, ‘‘सरका मागं. सरका मागं!’’ मी मागं सरकाया ग्येले तेवढय़ात ड्रायव्हरने जोरात गाडी मागे आणली. मी हेलपाटली. पडली. आन् माझ्या हातावरनं चाक ग्येलं. हात पार मोडला. तवाधरनं हाताला सळी हाय बगा. डम्पिंगवर लय घाण वास मारतुया तरी तिथं दहा-बारा घंटे कचरा वेचायचा. कचराकुंडीत वास बी मारतुया अन केमिकलचा ठसका लागतुया. कंपनीच्या कचऱ्यात अ‍ॅसिड असतया. त्याची वाफ डोळ्यात जाऊनशान माझ्या डोळ्याला आताशा दिसत बी नाय. अंधारी येते. डोळ्यातनं सारकं पाणी येतया. पन करणार काय? काम न्हाय केलं तर पोट उपाशी राहतया. मागं मी दुधाच्या डेअरीत दुधाच्या पिशव्या साफ कराया जायची. नासलेल्या दुधात अळ्या-किडे असत्यात. त्याचा घाण वास अंगाला मारायचा. बसमंदी कुणी बाजूला बसायचं बी नाय माझ्या!
आज सकाळधरनं फिरत्ये. दुपार झालीय. वडापाव खाऊनशान भरणीच्या जागी जाते. हिथं काय बी भेटलं न्हाय. बघते तिथं तरी काय गावतं का? बिल्डिंगी बांधतात तिथला भंगार भरणीवर टाकत्यात. त्यात दगड, विटा, खिळं काय बी असतया. तिथ ह्य़ो सगळा माल येऊन पडत नाय तर आमच्या बाया कुत्र्यावाणी मारामारी करत्यात. मला भेटतो भंगार का तिला भेटतो असं होतंया बायांना? कुत्र्यावरून आठवलं बगा. पावसाळ्यात कचराकुंडीत लई मेलेली कुत्री असत्यात! मेलेली कुत्री, गाढवं, उंदीर असत्यात! जनावरं पावसात कुजली की त्यात किडे-अळ्या भरत्यात. लई वास मारतुया. मंग आंग वलं होऊ नये म्हून अंगाला कागूद बांदायचा आन् घुसायचं घाणीत! पायांत गमबूट असत्यात. पन त्ये बी फाटके! गुडघाभर घाणीचा अन् चिखलाचा गाळ असतुया. गाळातनं येक पाय काढावा तर दुसरा पाय बचकन् गाळात जातो. त्या गाळात कसंबसं वाकून भंगार शोधावं तर डोस्क्यावरची गोणी बदकन् त्याच घाणीत पडतीया. कधी तर आपणच त्या घाणीत बदकन् पडतो. मंग लेकरांची हगण्यामुतण्याची कापडं, बायांचे विटाळाचे पॅड काय बाय आसतं- ती सगळी घाण अंगाला लागती. तसाच कचरा वेचायचा. काय करनार? पोटाची आग भागवायला हवी नाही? कचराकुंडीतला वास रोजरोज नाकात जाऊनशान डोकं भणभणतया. बिमारी येतेय. त्यापायी दोन महिने घरी काढले मी गेल्या साली.
नशीब! त्ये ‘परिवार सखी विकास संस्था’ हाय न्हवं, त्यांनी कार्ड दिलया. दवाखान्यात भरती झाल्यावर ते दावलं का औषधपाणी मिळतया. ‘स्त्री-मुक्ती संघटनेच्या’ वृषाली मगदुम मॅडम बी लई मदत करत्यात. बिमार पडलं का दवाखान्यात भरती करत्यात. पोरांची अ‍ॅडमिशन, बँकेची कामं, अर्ज लिवणं समदं करत्यात. कचरावेचक कामगार म्हणून त्यांनी कार्ड दिलंय आमाला. त्ये एक बरं झालया. नाय तर कुटं बी चोरी झाली का आमच्या बायांनाच पोलीस पकडत्यात. मंग आम्ही म्हनतो, ‘चल बाबा. यकीन नाय करत तू. दावते कार्ड तुला’ दिवसभर उन्हात गोणी घिऊनशान फिरलेले आसतो. कुठं पाच-पन्नास रुपये मिळत्यात, त्येबी जात्यात पोलिसाच्या डोस्क्यावर! खरं सांगते, या दुनियेत गरिबाचा वाली कोन नाय. नगरशेवक विलेक्शन आली का मतं मागाया येत्यात. हात-पाय जोडत्यात. तुमचं काम करू म्हणत्यात. नंतर लाथ मारतात. तोंडसुदीक दाखवत न्हाय. आता तुमाला सांगते, माझ्या घराच्या भिंतीत झाड घुसलंया. महानगरपालीकेत किती अर्ज दिले. किती खेटे घातले. निसती टोलवाटोलवी! म्हणं झाड तोडाया परमिशन न्हाय? आरं पन त्ये झाड डोस्क्यावर पडून आमचा जीव गेला तर चालंल? झाडाला वाचवायचं, मानसाला न्हाय? त्ये मेलं तर चालल! अजब न्याय हाय हा!
परवाची गोस्ट! कुठं भंगार भेटना म्हणून गेले डम्पिंगवर! रोज १०० गाडय़ा येत्यात तिथं! वास लय मारतुया. पन भंगार भेटतं. पन तिथं एका समाजाच्या बाया येतात, लय बेकार! त्या ड्रायव्हरला पैसे देऊनशान गाडी धरत्यात. त्यांनी गाडी धरली का त्या कोनालाबी कचरा वेचू देत नाय. आमाला लोखंडी सळीनं लय बडवित्यात! मला बी त्यादिवशी मारलं. मी गेले नगरशेवकांकडं. तर तो म्हणतो कसा, ‘‘तुमी कशाला त्या बायांच्या नादी लागता? वंगाळ बाया त्या. मटण, दारू पिऊनशान काम करत्यात. आमी कुठवर सोडवणार तुमचा झगडा! तुमचं तुमी बगा! ’’
हल्ली तर प्रस्थिती लय बेकार हाय! पोरं उपाशी ऱ्हातायत आमची. आता सरकारनं कचरा कुंडय़ा काढून टाकल्यात. डम्प्िंाग ग्राऊंडवर मिशिनी आल्यात. ओल्या कचऱ्याचे खत बनतया. सुका कचरा छाटायला मानसं बशीवल्यात. ती मानसं भंगार विकत्यात! ड्रायव्हर बी त्यांनाच सामील! आम्ही म्हणतो, सोसायटीतच सुका आन् ओला कचरा येगळा करा. आन् तो आम्हाला द्या. आम्हाला बी ओल्या कचऱ्यातून खत कराया शिकविलं हाय. आमचं प्वाट भरल आन् आम्ही सोसायटी बी साफ ठिऊ. पूर्वीसारकं कंपनीवाले कचरा गेट भायेर नाय ठेवत. त्यांना दंड व्हतोय. मंग त्यांचे झाडूवालेच कचऱ्यातलं भंगार वेचतात आन् इकतात. नाय तर आमच्यातले काही लोक लेकी-सुनांना काय बाय काम करायला पाठवित्यात. मंग गेटवरचा वॉचमेन त्यानला आतून कचरा आणून द्येतो. मंग बाया बी खूश! वॉचमन बी खूश!
कंपनीवाले घंटा गाडय़ांना बोलवित्यात. त्यांना कचरा उचलायचे पैसे देत्यात. कामगारांना त्यो-पैसा मिळतो. म्युनिशिपालटीबी पगार द्येते. आन् भंगार इकूनबी ते बक्कळ पैसा कमावत्यात आम्ही मात्र उपाशी मरतो. भंगारवालेबी तसेच. त्ये बी कंपनीला फोन करून तिथला कचरा थेट उचलत्यात आन् आम्ही गेटवर निस्त बघत बसून ऱ्हातो. हेच भंगारवाले आमच्या वस्तीतल्या पोरांना बंद पडलेल्या कंपनीत चोऱ्या करायला धाडत्यात. पोरांच्या हातात एक नोट ठेवत्यात आन् चोरीचा माल  इकतात. असं सगळं सेटिंग असतया.
मला सांगा, एवढी र्वस आम्ही किती कचरा गोळा क्येला तवा मुंबई स्वच्छ ऱ्हायली न्हवं? त्याचं आमाला काय मिळालं? सरकारनं पेन्शन दिली का फंड दिला? आमच्या कचराकुंडय़ा बंद करूनशान तुम्हाला स्वच्छता हवी ना? आमी साफ ठेवतो तुमचे रस्ते, वस्त्या. तुमी फोटोसाठी हातांत झाडू धरता न्हवं? मंग वस्ती साफ करा की! आम्हालाच साफ कशापायी करता हो?