मनुष्य काय किंवा वास्तू काय.. जीर्ण झाली म्हणून दुर्लक्ष करणं क्षम्य नाही. त्या दिवशी मैत्रिणीकडे गेले. तिच्या वृद्ध सासूबाईंची परवड पाहिली, म्हणून माझे आतले डोळे उघडले. आता आमच्या इमारतीचे- घराचे पुनर्निर्माण झाले तर आनंदच आहे. पण तोपर्यंत तरी मी ही वास्तू ‘सुवास्तू’च ठेवीन, घराची लाज न बाळगता, अभ्यागतांचे स्वागतच करीन.. पूर्वीसारखंच.. आनंदानं!

आ म्ही गेली कित्येक वर्षे निवास करतो आहोत ते डेक्कन जिमखान्याजवळचं पुण्यातलं आमचं घर, म्हणजे आमचा फ्लॅट, चांगलाच आहे. फक्त नऊ फ्लॅट्सच असणारी आमची इमारतही तशी सुस्थितीतच आहे. लिफ्टची आणि कारपार्किंगची सोय नाही. एवढं आधुनिक तंत्र सोडून, बाकी ‘सुखवस्तू’ म्हणावी अशी इमारत. मुलांच्या शिक्षणाच्या आणि आमच्या व्यवसायासंदर्भातही खूपच सोयीची, म्हणून आवडीची ही वास्तू, हळूहळू मनातून उतरायला लागली..
 ही प्रक्रिया मनाच्याही नकळत, आस्ते आस्ते सुरू झाली, एवढं मात्र खरं. आसपासच्या क्वचितच उपलब्ध असणाऱ्या रिकाम्या प्लॉटवर पाश्चात्त्य देशातील अपार्टमेंट्सशी स्पर्धा करणारे आलिशान फ्लॅट्स उभे राहिले. कित्येक चौरस फूट जागा. ‘ओपन’ ड्राय बाल्कनीज, स्विमिंग पूल, कारपार्क, शॉवर्स, टब बाथ, आलिशान बाथरूम्स, चोवीस तास सिक्युरिटी गार्ड आणि पोलारिस.. लक्झरी व्हिला.. अशी नावे असणाऱ्या घरांतून राहणारी चकचकीत, श्रीमंत माणसं. असं सगळं अगदीच आसपास, आमच्या ‘सुखद अपार्टमेंट्स’ला, पर्यायाने आम्हा रहिवाशांना खुजं करणारं..
आम्ही राहतो आहोत, त्या एरियाची सवय-आवड-भावबंध-मैत्र-सोय, सगळं चार दशकं, इतकं मोठं, कालव्यापी, त्यामुळे पुण्यातच दूरवर कुठेतरी उपनगरात जागा घेऊन, या वयात ‘रुळणं’ शक्यच नाही. तेव्हा ‘रुजणं’ अशक्यच. आणि आमच्या परिसरातच ‘कोटय़वधी’ रुपये मोजून (१६ हजार रु.चौ.फू.) नवीन अपार्टमेंट खरेदी करणं, त्याहूनही अशक्य.
‘भौतिक आनंदाच्या फार मागे लागू नये’, ‘कोणाशी तुलना करू नये’, इ. सुविचारांवर समंजसपणे मोठी झालेल्या पिढीतली ‘मी’, आणि, आसपासच्या सुंदर घरात पाहुणचार घेऊन आलेली ‘मी’.. त्यातल्या दुखव्या ‘मी’ला चकचकीत घरांतल्या मैत्रिणींना घरी पाहुणचाराला म्हणून बोलावणं, इच्छेविरुद्धच ऑकवर्ड वाटायला लागलं, आणि आपोआपच पाहुणचार म्हणजे भिशी, केळवणं, गेटटुगेदर्स माझ्यातर्फे ‘हॉटेल’मधून साजरे होऊ लागले. आणि एक दिवस अचानकच, एक इस्टेट एजंट आमच्या बिल्डिंगसाठी पुनर्निर्माण (री-डेव्हलपमेंट) प्रपोजल घेऊन आला. पुण्यातली डेक्कन जिमखाना ही प्राइम लोकॅलिटी असल्याने, प्रपोजल उत्तमच होते. आधुनिक सोयींनी युक्त चकचकीत घर, राहत्या घरांच्या जागीच मिळणार. इमारत तयार होईपर्यंत पर्यायी जागाही, राहत्या घराजवळ मिळणार..
आमच्या मनात एक आशेची नवी पालवी फुटली खरी.. मग सभासदांच्या मीटिंग्ज.. कोणाचे होकार.. काहींचे नकार.. हा बिल्डर नको.. तो बिल्डर पाहू.. पुनर्निर्माणाची गरज आहे, नाही.. कोणाचे मूल ‘दहावीत’ शिकते आहे (पुढच्या वर्षी पाहू!) एकदीड वर्ष असंच पुढं गेलं..
कधी नवीन घर मिळायची खात्री.. कधी आशंका.. परंतु मनापुढे अनेक बिल्डर्सनी सादर केलेले प्लॅन्स.. त्यातलं आमचं होऊ शकणारं भारी घर, यांनी मन व्यापून गेलं होतं खरं.. ही व्याप्ती इतकी मोठी होती, की घराचा रंग फिका होत होत, विटण्याच्या मार्गावर होता, आणि पावसाळ्यानं गळक्या भिंतीचे पोपडे पडून, भिंत अतिशय वाईट दिसत होती. डोळ्यांना सगळं दिसत होतं. मनाला खटकत होतं. तरीही ‘आता एवीतेवी नवी बिल्डिंग होणार आहेच, तर उगाच या जुन्या वास्तूवर का खर्च करा’ ही भावना इतकी प्रबळ होत होती, की घराकडेच नाही, तर घराच्या निगराणीकडेही दुर्लक्ष केलं. बाथरूमचे टाइल्स फुटलेत? असूं देत! पेस्टकंट्रोल करायला हवाय! कशाला उगीच? औषध मारू. सगळे आचार-उच्चार असेच. घर बापुडवाणं होत होत गेलं..
हे झालं आमच्यापुरतं.. शेजारीपाजारीही असंच चित्र उमटायला लागलं.. ‘पडदे जुने झालेत- तूर्त नकोतच नव्या घरी पाहू.’ दरम्यान नवीन नवीन बिल्डर्स अधिक अधिक ‘भारी’ ऑफर्स घेऊन येतच होते. पण नुसताच कोलाहल.. नेमकं, निश्चित काहीच घडत नव्हतं. आमच्यासारख्याच उर्वरित ‘वसाहती’सुद्धा असेच विचार करत होत्या. आणि सरत्या महिन्यानंतर आमच्या घरासकट अवघ्या इमारतीला अवकळा आली.
तरीही प्रत्येक जण नव्या वास्तूच्या स्वप्नांत आपल्याला अनेक र्वष साथ देणाऱ्या घराकडे तुच्छतेने पाहात राहिला. आणि अशातच एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे बऱ्याच महिन्यांनी गेले. आठ-दहा महिन्यांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या अनुपस्थितीत माझ्याशी गप्पा मारणाऱ्या, मला चहा करून दिलेल्या, तिच्या सासूबाई आता अस्थिपंजर अवस्थेत अंथरुणात पडून असलेल्या दिसल्या. मला नवलच वाटलं. मैत्रिणीशी फोन होतच होते, पण तीही कधी बोलली नव्हती. तिच्या सासूबाईंशी थोडीशी बोलले (त्यांना बोलवत नव्हतंच) आणि दुसऱ्या रूममध्ये आम्ही दोघी बसलो. ‘मुद्दामच नाही बोलले कुणाला.. एक तर, वय झालंय.. त्यात तिसऱ्या पायरीवरचा कर्करोग.. एक टक्काही आशा नाहीये जगायची.. आम्ही त्यांचं ऑपरेशन करणं टाळलंच आहे.. औषधंही नॉमिनल देतोय.. आयुर्वेदिक. त्यांना बरं वाटावं म्हणून.. आता वाट पाहायची. अगं, फळं, खाणं, सुकामेवा, दूध-तूप देऊन तरी काय होणार? नुसता पैसा वाया.. त्यातून त्यांना फॅमिली पेन्शनही नाही..’
अस्वस्थ मनानं मी घरी आले. अवकळा आलेल्या माझ्या घराचं दार उघडताना, मला त्या आजारी वृद्धेची आठवण आली.. ती वृद्धा.. ती संपणारच आहे म्हणून होणारं दुर्लक्ष! मी तरी काय करते आहे दुसरं?  ज्या घरानं आनंद दिला, ते संपायच्या रस्त्यावर आहे, म्हणून प्रिय वास्तूची, जिला ‘वास्तुदेवता’ म्हणून अभिमानाने पुजली, तिची हेळसांड.. तीही अकारणच.. वास्तूची सुवास्तू करण्याइतका पैसा आमच्याजवळ आहेच.. री-डेव्हलपमेंट होईल तेव्हा होवो. आता तरी हे घर आमचं आहे. या घरानं आनंदच दिला आहे. एवढंच मनात ठेवायचं. घर अजागळ आहे, म्हणून आतिथ्य टाळण्यापेक्षा, घर छान करून घेऊन हसतं-आनंदी ठेवायचं, ठरलं.. ठरवलंच.. आणि परत नव्याने एकदा घराच्या दिमतीला लागलो. गळती काढली. प्रसन्न रंग लावला. छान पडदे शिवले. खिडक्यांना पॉलिश केले.. नव्या कप-बशा आणल्या.. घर पुन्हा कात टाकून हसले. या सर्वाना खूप काही खर्चही नाही आला. इतके दिवस ( वर्ष) ही वास्तू उपेक्षित ठेवली. याची खंत वाटली खरी.
मनुष्य काय किंवा वास्तू काय.. जीर्ण झाली म्हणून दुर्लक्ष करणं क्षम्य नाही. त्या दिवशी मैत्रिणीकडे गेले. तिच्या वृद्ध सासूबाईंची परवड पाहिली, म्हणून माझे आतले डोळे उघडले. आता आमच्या इमारतीचे- घराचे पुनर्निर्माण झाले तर आनंदच आहे. पण तोपर्यंत तरी मी ही वास्तू ‘सुवास्तू’च ठेवीन, घराची लाज न बाळगता, अभ्यागतांचे स्वागतच करीन.. पूर्वीसारखंच.. आनंदानं!!