13-khaथंडी म्हटल्यावर आल्हाददायक हवा, एक प्रकारची उत्साहित करणारी ऊर्जा हा अनुभव सर्वाचाच. सकाळी-सकाळी व्यायाम करणारे उत्साही ‘तरुण’ रस्त्यांवर / मैदानावर दिसतात, तर वॉकला जाणाऱ्या मंडळींनी बागा फुलतात. हिवाळा म्हणजे आरोग्य कमावण्याचा ऋतू. भूकही वाढलेली असते. एवढं सगळं छान मग ‘कुरबुर’ शब्द का वापरला? कारण आजी-आजोबांच्या आरोग्याच्या काही तक्रारी थंडीतच बळावतात. उदा. सांधेदुखी, दम लागणे, सर्दी-खोकला वगैरे. म्हणूनच आज आपण बोलूया काही उपायकारक टिप्सविषयी, जेणेकरून समस्त आजी-आजोबांनासुद्धा हा हिवाळा आरोग्यदायीच असेल! 

१. तहान जास्त लागत नाही म्हणून पाणी कमी प्यायलं जातं. शरीराला जेवढी गरज आहे तेवढं पाणी एका जगमध्ये भरून ठेवा, जे दिवसभरात फक्त तुम्हीच प्याल. म्हणजे अंदाज राहील की पाणी किती प्यायलं जातंय ते! तहान न लागल्याने पाण्याची चव चांगली लागत नसेल तर पाणी सकाळी उकळताना त्यात थोडासा ओवा किंवा आल्याचा तुकडा किंवा तुळस-पुदिन्याची पानं टाकायची म्हणजे छान ‘फ्लेवर’चं पाणी आणि पचनसुद्धा व्यवस्थित!
२. थंडीमध्ये वाफाळता चहा किंवा कॉफी प्यायला नक्कीच मजा येते. पण अतिरेक नको. त्याऐवजी हर्बल चहा किंवा कॉफी घ्या. पुढील कोणतेही मसाले आवडीप्रमाणे कमी-जास्त वापरा. उदा. गवती चहा, आलं, सुंठ, ज्येष्ठमध, मेथीचे दाणे, दालचिनी, लवंग, तुळस वगैरे.
३. नेहमीप्रमाणे एक प्रेमळ सूचना – मैदा किंवा अतिसाखरेचे आणि पाकीटबंद पदार्थ वापरू नका. ब्रेड-बिस्किट्स बादच करा – जरी दोन-चार खाल्ले तरीही. लाहय़ा / खाकरा / चिक्की / ड्रायफ्रुट्स काहीही चालेल. पोळी / बाजरीची भाकरी / हातसडीचा भात आलटूनपालटून खा.
४. आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरने सांगितलेले लोह / कॅल्शियम / जीवनसत्त्व ब / ड वगैरे सप्लिमेंट्स घेणे टाळू नका.
५. हात-पाय नेहमी स्वच्छ ठेवा. जंतुसंसर्ग टाळू शकाल. थंड पाणी सोसवत नाही तर कोमट पाणी वापरा.
६. चालण्याचा व्यायाम कधीही चांगला. जरी सकाळी चालायची सवय असेल तरी हिवाळ्यात पहाटे बाहेर पडू नका. थोडं कोवळं ऊन आल्यावर चालायला जा. मोजे, बूट आणि कान-टोपी – जरूरच! शक्य नसल्यास संध्याकाळी चाला / घरात चाला.
७. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे हाता-पायांना थोडं थोडं तेल लावा – अंघोळीच्या आधीही चालेल.
हिवाळ्यासाठी ‘खास’ आहार –
मस्त मेनू, साधा आणि चमचमीत दोन्ही!
सकाळी उठल्यावर – दूध न घातलेला गरमागरम हर्बल चहा
नाश्ता – १ कप दूध + पोळी किंवा भाकरी + गुळाचा खडा किंवा जिरं-ओवा घातलेला लाल भात + गाईचं तूप + मेतकुट
मधल्या वेळी – १ फळ + ड्रायफ्रुट्स किंवा खजूर आणि बदाम / काजू (थोडेसेच)
दुपारी जेवण – पोळी + भाजी + आमटी + हिरव्या लसणाची तीळ घातलेली चटणी
संध्याकाळी – लाहय़ा / चिक्की + गाजर + इतर भाज्यांचं गरम सूप किंवा मुगाचं कढण
रात्री (लवकर) – लापशी-मूगडाळ-भाजी घातलेली मऊ खिचडी + तूप + ओल्या हळदीचं लोणचं
तुमच्या ‘लाडक्या’ शब्दात निरोप घ्यायचा म्हणजे – ‘मस्त खा आणि स्वस्थ राहा.’

वैदेही अमोघ नवाथे,
आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com