‘आजची व्यग्र स्त्री आणि अपराध भाव’ या विषयावर वाचक स्त्रियांकडून मागवलेल्या प्रतिक्रियांना नेहमीप्रमाणेच भरघोस प्रतिसाद मिळाला आणि जणू स्त्रियांच्या भावविश्वाचं ‘विश्वरूप’ दर्शन घडलं. काय नाही या पत्रांमध्ये? असहाय्यता आहे, तसा समाधानाचा काठोकाठ भरलेला प्यालाही आहे. नात्याच्या रेशीमगाठी आहेत, तसंच गरजेच्या वेळी लादलं गेलेलं एकटेपणही आहे. काहींना नवीन नाती मिळाली, तर काहींची सख्खी नाती दुरावली. एक मात्र मान्य केलंच पाहिजे, या पत्रांमधून दिसलेली नोकरी-व्यवसाय-करिअर यात व्यग्र असलेली स्त्री कणखर आहे, खंबीर आहे. परिस्थितीपुढे शरण गेलेली नाही. उलट त्यातून मार्ग शोधला आहे. त्यासाठी काही जणींनी नोकरीत राजीनामा दिला. काहींनी बढत्या, बदल्या नाकारल्या. घरी न बसता काहींनी पार्टटाइम, काहींनी शिकवण्या आदी घेतल्या, तर काही जणी गॅप घेऊन पुन्हा कामाला लागल्या. काही जणींनी आधुनिक उपकरणं आणली, ज्यामुळे काम सोपं होईल, तर काहींनी विकतच्या वस्तू आणायला सुरुवात केली. पण प्रत्येकीने आपल्या मुलांना, संसाराला चांगलं तेच द्यायचा प्रयत्न केलाय. तडजोड केली ती विचारात, नात्यांमधील समजुतीत.
म्हणूनच यात सर्वात महत्त्वाचा अधोरेखित करवा असा वाटणारा भाग म्हणजे नात्यांचा. अनेक जणींना मुलांना सांभाळणाऱ्या चांगल्या बाई, आजी मिळाल्या. काहींना घर, स्वयंपाक सांभाळणाऱ्या चांगल्या मावश्या मिळाल्या. काहींना तर खूप चांगले शेजारी मिळाले, ज्यांच्या जीवावर त्या आपली नोकरी व्यवसाय नि:शंक मनाने करू शकल्या. काहींना कार्यालयातील सहकारी समजूतदार मिळाले. काहींना सासू-सासरे, तर काहींना आई-बाबा यांचा भरभक्कम पाठिंबा मिळाला, तर काहींवर कोणीच मदतीला नाही म्हणून पाळण्यातल्या बाळाला एकटं सोडून जायची वेळ आली. त्याचमुळे काहींनी मुलांनाच स्वावलंबनाचे धडे दिले. प्रत्येक संसारी स्त्रीचा महत्त्वाचा साथी म्हणजे जोडीदार, पण यातल्या अनेक पत्रांत त्याचा साधा नामोल्लेखही नाही. तर काही जणींना नवऱ्याच्या परगावी बदल्या, शिफ्ट डय़ुटय़ा एकटय़ाने संसाराची खिंड लढवण्यास भाग पाडत होत्या. काहींना मात्र नवऱ्याची भरघोस मदत मिळाली आहे. पण यातून एक नक्की अर्थ काढता येतो, अजूनही अधिकाधिक पुरुषांमध्ये- नवऱ्यांमध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव वाढायला हवी आहे. घर दोघांचं असतं, हे त्यांनी जाणायला हवं आहे.  यातल्या प्रत्येक स्त्रीला जेव्हा जेव्हा अशी माणसांची मदत मिळाली तेव्हा तेव्हा तिचं  व्यक्तिगत आणि कार्यालयीन आयुष्य बहरलं, फुललं आहे.
पत्र पाठवलेल्या सगळ्यांचेच म्हणूनच खूप खूप आभार. यातून दिसणारी ही आजची स्त्री पुढच्या संसार-नोकरी यात कसरत करू पाहणाऱ्या तरुणींना मार्गदर्शक ठरत आहे. कष्ट करत, आव्हानांना सामोरे जात, नात्यातल्या, न नात्यातल्या अनेकांना बरोबर घेत पुढे जाते आहे, मार्ग काढते आहे. तुमच्या कष्टांवर पुढच्या पिढीचं आयुष्य सोपं होणार आहे, म्हणूनच पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचेच आभार! पत्र न पाठवणाऱ्या अनेकींचेही!

‘आऊट ऑफ कव्हरेज एरिआ’
आधुनिक युगातल्या स्पर्धात्मक, गतिमान जीवनाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी मी सर्वप्रथम दिनक्रमाचे व्यवस्थापन केले. आहार, व्यायाम, विश्रांतीने शरीर आव्हाने स्वीकारण्यास समर्थ करण्याचा ‘स्वार्थ’ साधताना स्वत:ला अपराधी मानले नाही. त्याचबरोबर मनाचे सामथ्र्य साध्य करताना वर्तमानात जगणे, स्वत:ला बदलणे, निरपेक्ष राहणे, चुका स्वीकारून सुधारणे, काही राहून गेले, कुठे कमी पडले, विसरले, हरविले तर ते सगळे ‘अक्कलखाती’ जमा केले. स्वत:शी प्रामाणिक राहून इतरांच्या कॉमेंटसपासून मी ‘आऊट ऑफ कव्हरेज एरिआ’ राहिले. कटू आठवणी-अनुभव ‘डिलिट’ केले.  हे करताना माता, पत्नी आणि इतर नात्यांचे आधुनिकीकरण करावे लागले. छंद, मैत्री, पर्यटनाने स्वत:ला ताजेतवाने ठेवले. मुख्य म्हणजे पैशाला मित्र मानले,साध्य नाही. भविष्यासाठी थोडी फार बचत करून तयार पीठ, चिरलेल्या भाज्या, इतर काही सेवा विकत घेतल्या, सर्व मीच करीन हा अट्टहास ठेवला नाही. मर्यादा जाणून तुलना, स्पर्धा, अतिमहत्त्वाकांक्षांना दूर ठेवले. मोलकरणीशी मैत्रीचे नाते जोडून त्या सखीची सेवा घेतली. स्वत:ला सुपर वुमन न समजता, संगणक वुमन मानून भावनांच्या गर्दीत न हरविता न स्वत:ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, न इतरांना करू दिले!
– अनघा ठोंबरे, पुणे

काळजावर ठेवला दगड
माझी नोकरी खेडय़ातली. लग्नानंतर वर्षभरात बाळाचे आगमन झाले! सांभाळायला येणारे कोणी नव्हते. तरी माहेरच्यांनी एक-दीड वर्षे बाळ सांभाळले. बाळ २ वर्षांचे झाले. आमची त्रेधातिरपीट सुरू झाली. आम्ही बॉसला विनंती करून शिफ्ट पद्धतीने कामाची वेळ मागितली. तरी मधल्या म्हणजे ११ ते १ या वेळेत  सांभाळायचा प्रश्न होता. त्यावर उपाय शोधला. बाळाला सकाळी ६ वा. उठवायचो. त्या वेळेपासून त्याचे सर्व व्यवस्थित पार पाडायचो. मध्ये झोपू द्यायचो नाही. मला ११ वा. नोकरीसाठी बाहेर पडावे लागे. ११ वाजता त्याला झोळीत झोपावयाची आणि दरवाजा बाहेरून लावून बाहेर पडायची. पती १ वाजता यायचे. तो मध्येच उठला तर खाली पडू नये म्हणून झोळीला रुमाल बांधून ठेवायची. रडला तर दूध पिता यावे म्हणून दूध भरलेली बाटली झोळीतच हातात ठेवून द्यायची. अशा प्रकारे काळजावर दगड ठेवून मी नोकरीवर जायची. पुढे तो ३ वर्षांचा झाल्यावर, त्याला समजायला लागल्यावर पुढच्या रूममध्ये त्याचे सर्व साहित्य, खाणे, खेळणी ठेवून जायला लागले. त्यातच तो राहू लागला. या सर्व गोष्टींना पर्याय नव्हता. मुलांच्या भविष्यासाठी हे सर्व करणे आवश्यक होते. अशा भावनिक, शारीरिक, आर्थिक अस्थिरतेतून नोकरी करिअर निभावून नेले.
– निर्मला साळुंखे, शहापूर    

‘पेरेंट केअर लीव्ह ’ नाही
माझी नोकरी महाविद्यालयातील शिक्षिकेची. मात्र, आईला एन.पी.एच.सारख्या दुर्धर मेंदूविकाराने ग्रासले आणि वडिलांना काचबिंचू झाला तेव्हा काम-आरामाचा हिशोब करण्याची वेळ आली. डॉक्टरांच्या मते मेंदूरुग्णाला शक्यतो घरीच सांभाळावे, मग त्या दृष्टीने विचार सुरू झाले. घरकाम- वरकामाला ज्या बायका होत्या त्यांनीच हे काम स्वीकारले. मध्यंतरीच्या काळात हौसेने खरीदलेल्या, पण न वापरलेल्या फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, वॉशिंग मशीन या वस्तू मी नियोजनपूर्वक वापरू लागले, तर पोळ्यांचे काम आऊटसोर्सिंगनेच (तयार विकत) करायचे ठरवले. जाणीवपूर्वक काही बदल घरात केले. स्वयंपाकघरात पारदर्शक बरण्या ठेवल्या म्हणजे तातडीने दुकानात धावायची वेळ येऊच नये. रोज घरासाठी अध्र्या तासाहून जास्त वेळ माझ्याकडे द्यायला नव्हता. याच काळात मधल्या भावाने वडिलांना फोन घ्यायला लावला. मी एक वही करून त्यात डॉक्टरांचे, नातेवाईकांचे, परिचितांचे व अन्य पण वेळेला कामी येणारे फोन क्रमांक लिहिले. वेळ वाचविण्याची व कामे सुकर करण्याची तंत्रे वापरली. औषधांच्या अकरा गोळ्या निरक्षर बाईकरवी केवळ वेगळ्या रंगाच्या पिशव्या वापरून देवविल्या. हे सगळे करावे लागले, कारण चाइल्ड केअर लीव्हप्रमाणे पेरेंट केअर लीव्ह मिळत नाही.
– पद्मजा बिवलकर, डोंबिवली

तडजोड स्वीकारली
१९६७ साली माझी मुंबईत सचिवालयात अनुवादक म्हणून निवड झाली. लेखी परीक्षेत शंभर उमेदवारांमध्ये प्रथम येऊनही वर्षभरात मला मुलीच्या जन्मानंतर नोकरी सोडावी लागली. मुलाच्या जन्मानंतरही मी चार वर्षे घरीच होते. नंतर मुलांना शाळेत घातल्यावर त्यांच्याच शाळेत मी शिक्षिका म्हणून नोकरीला लागले. पगाराची कोणतीही अट ठेवली नाही; पण त्यामुळे मी त्यांना पूर्ण वेळ देऊ  शकले. मुले मोठी झाल्यावर मी एम.ए. व बी.एड पूर्ण केले. चाळिशीनंतर अनुदानित शाळेत नोकरीला लागले. झपाटून काम केले. ‘इंग्लीश टीचर्स’साठी दहा वर्षे राज्यस्तरीय मार्गदर्शक होते. उपक्रमशील शिक्षिका म्हणून दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार तसेच आदर्श शिक्षिका म्हणून दोन वेळा पुरस्कार मिळाले. नोकरी सोडली नसती तर मी आज उच्च पदावर असते; पण त्यामुळेच मी मुलांना वेळ देऊ  शकले. आज दोन्ही मुले उच्च शिक्षित असून चांगली स्थिरावली आहेत.
– आसावरी फडणीस, ठाणे
                                                                                                                                                                                                                                                कसं निभावलं सगळं
पती इलेक्ट्रिक कंपनीमध्ये, मी रेल्वेमध्ये नोकरीला. त्यांची शिफ्ट डय़ुटी. सासरी लहान जागेची अडचण म्हणून लहानग्या सौरभला घेऊन कंपनीच्या चेंबूरमधील कॉलनीत राहायला गेलो.  कॉलनी मुख्य रस्त्यापासून १ कि.मी. लांब, त्यामुळे कंपनीने शटल सव्‍‌र्हिसची सोय केलेली. तेथून पुढे मी बेस्ट बसने कुर्ला स्टेशनपर्यंत जायचे. तेथून पुढे ट्रेनने सी.एस.टी.ला जायचे असा प्रवास करून एकदाचे मस्टर गाठायची. दुसऱ्या मुलानंतर मी एका कामगाराच्या बायकोला विनंती करून दोघांची सोय केली. मुलांच्या बॅगा दप्तरे नेण्या-आणण्यासाठी मी टु व्हीलर शिकले. रोज नेण्या-आणण्याचा दिनक्रम चालू झाला. सासरी नवरा मोठा मुलगा आणि माहेरी मला भाऊ नाही म्हणून सासर-माहेरची जबाबदारी आमच्यावरच, एकूण काय तर ३ कुटुंबे सांभाळताना नाकात दम येई! आज मला नोकरीत ३४ वर्षे पूर्ण होत आहेत. दोन्ही मुलांचे अमेरिकेत वास्तव्य आहे. आता जाणवतं, लहान मुलांना घेऊन यांच्या रात्रपाळीत एकटीने २७ वर्षे मी कशी काढली असतील?
– स्मिता पाटील, चेंबूर

कुटुंबाची खंबीर साथ
माझी आई नोकरी करणारी असल्याने वयाच्या १२-१३व्या वर्षांपासूनच शिक्षणासाठी मला लांब राहावे लागले म्हणून मी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मला शासकीय नोकरी चालून आली व माझ्या घरातील सर्व म्हणजे पती, सासूबाई, माझे दोन्ही दीर व माझी आई व भाऊ या सर्वानी मला नोकरी करण्यासाठी पाठबळ दिले व त्यामुळेच मी गेल्या १५ वर्षांपासून विस्तार अधिकारी या पदावर चांगल्या प्रकारे काम करू शकते आहे. सासूबाईंच्या रूपाने मला दुसरी आईच मिळालेली आहे. मात्र मी कमावती आहे, असा ‘अहं’ मी कधीही जोपासला नाही. पहिला पगार झाला त्या दिवसापासून काही ठरावीक रक्कम मी दरमहा सासूबाईंच्या हातात ठेवते व माझे सगळेच व्यवहार त्यांना विचारल्याशिवाय व सांगितल्याशिवाय करत नाही. कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीच्या दिवशीही घरातलीच कामे करण्याला मी प्राधान्य देते. मला नोकरीच्या ठिकाणी व घरातही बऱ्याच वेळेस अडचणी आल्या; परंतु त्या सर्व अडचणींवर मात केली व त्यासाठी मला सतत घरच्यांनी खंबीरपणे साथ दिली व देत आहेत.
– सीमा संतोष सरवडीकर- कुलकर्णी, लातूर.

सगळ्यांचा आनंदाचा विचार
माझी मुलगी तान्ही असताना कामावर निघायच्या वेळी हमखास रडायची. मग मी डोळे पुसतच जिना उतरे. घरून शाळेत जाताना घरातल्या गोष्टी घरात व शाळेतून निघताना शाळेच्या गोष्टी विसरणे अशी सवय मनाला लावली. मुले लहान होती तेव्हा मी सकाळी, तर मी आल्यावर हे दुपारी कामावर जायचे. रोज रात्री साडेनऊ वाजता दिवे बंद केले पाहिजे असा आम्ही दंडक केला. त्यामुळे गादीवर मुलांसोबत थोडी दंगामस्ती, खेळ खेळता यायचे. गाणी, गोष्टी सांगून त्यांना झोपवता यायचे. त्यामुळे मुले प्रेमाने पोट भरल्याने शांत झोपत. हे मुलांचे झाले. नवऱ्याचे काय? त्याच्या उपासमारीवरही एक तोडगा काढला. शनिवारी लवकर घरी आल्यावर मस्त आराम करून रात्री एकदम फ्रेश राहायचे नि आठवडय़ाची भरपाई करायची. हा फाम्र्युला छान मजला.
-अस्मिता लोणकर, मुलुंड

अपराध भाव घालवला कर्तव्यपूर्तीने
माझा नोकरीचा काळ १९५७ नंतरचा. मी कोयना या गावी नोकरीस लागले. तेव्हा आमच्या डिव्हिजनमध्ये मी एकटी महिला कर्मचारी होते. म्हणून ऑफिसकामात कुठे कमी पडायचे नाही व बाई म्हणून सवलती मागायच्या नाहीत हा निश्चय केला. १९५८ साली मुलगी झाली आणि नोकरी कशी टिकवायची याचा सिलसिला चालू झाला. दरम्यान एक आजीबाई मिळाल्या. आईच्या देखरेखीखाली आजीला बाळ सांभाळण्याचे ट्रेनिंग मिळाले. पुढे ऑफिसचे ट्रेनिंग व परीक्षा द्यायची होती. तेव्हा हे मेसमधून डबा घेऊन यायचे, कुरकुर न करता! आमची धावपळ व धडपड पाहून सासऱ्यांना कौतुक वाटे. देवधर्म रीतिरिवाज यात सोयीस्कर बदल केले. प्रत्येक ३ वर्षांनी यांची बदली व्हायची. त्या वेळी मला बदली मिळेपर्यंत ६-६ महिने मुलांना घेऊन एकटीला राहावे लागे. शिफ्टिंगच्या वेळी नणंद किंवा बहीण मदतीला धावून यायची. आता निवृत्त झाले. करिअर करणारी सून घरात आली अन् मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तिच्या करिअरला स्पेस दिली. नातवंडांना पाळणाघरात न ठेवता त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही दोघांनीही घेतली. अपराधीपणाची भावना कर्तव्यपूर्तीने घालवली.
– वसुधा पाध्ये, नाशिक

वेळेचे नियोजन व तडजोड
आमचा आंतरधर्मीय विवाह झाला आणि निष्कांचन अवस्थेत घराबाहेर पडावे लागले. मी नुकतीच स्टाफ नर्स म्हणून अंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयात लागले होते. पगार अगदी बेताचा. माहेर-सासरच्या माणसांकडून कसलेही पाठबळ नव्हते. लग्नाला व नोकरीला एक वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच माझी लेक जन्माला आली. बिनपगारी रजा परवडणार नव्हती. दीड महिन्याची असताना तिला सोडून डय़ुटीवर जावे लागले. आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या, दिवसा मी, रात्री ते. माझ्या रुग्णालयातल्या मेट्रन मला सहकार्य देत होत्या. पुढे आर्थिक परिस्थिती सुधारली. दोन वर्षांच्या अंतराने मुलगाही झाला. मुलांना सांभाळण्यासाठी चोवीस तास कायमची घरात राहणारी निराधार विधवा बाई मिळाली. प्रेमासाठी वंचित असलेली ही बाई मुलांवर भरभरून प्रेम करीत होती. आज मुलगी एम.एस्सी. शिकून स्वत:ची शाळा चालवीत आहे, तर मुलगा र्मचट नेव्हीत कॅप्टन असून जगप्रवास करीत आहे. दोघेही संसारात व करिअरमध्ये स्थिर आहेत, हे पाहून अपराधीपणाची भावना विरून गेली.
– मोनिका कुवर, अंबरनाथ

मिळेल तो वेळ फुलवला
सगळं सांभाळणारी आपली आई ‘सुपरमॉम’ आहे यावर मुलांचा आज विश्वास बसला आहे. (तो किती योग्य की अयोग्य यापेक्षा तो बसणं महत्त्वाचं होतं.) मुलं मानसिकदृष्टय़ा स्थिरावली, सक्षम झाली. आम्ही दोघे आणि मुलं म्हणजेच संसार नव्हे. अनेक घटक, अनेक नाती, त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी- अनेक परिस्थिती म्हणजे खरं तर संसार. मग त्या साऱ्यांना कसं सांभाळायचं? किंचित अवघड होतं इतकंच.  वेळ नाही यापेक्षा मिळेल तो वेळ नाती सांभाळायची, पेक्षा फुलवायची याचा छंद लागला. लहानांपासून थोरांपर्यंत वाढदिवसांना आठवणीने साधलेला संवाद असो, की कुणाच्या आजारपणात केलेली विचारपूस. मग ती सासू असो, आई असो, बहिणी-नणंदा असोत वा अगदी स्वत:च्या मत्रिणी, सारं जमेल तसं करत गेले. कुणी न कुणी आपल्याला उपयोगी पडत असतंच. त्यांची जाण ठेवणे तसंच आपणही कुठल्या तरी क्षणी कुणाला उपयोगी पडता येईल यासाठी प्रयत्न करत गेले. यामुळे जे काही चार-दोन क्षण अधिकचे मिळाले- ते मार्गी लागले. ‘हिला का सांगा? हिच्याकडे वेळच कुठे असतो..’ असे टोमणे बंद झाले. उलट सगळं कसं व्यवस्थित निभावते म्हणून चारचौघांत कौतुकच झालं आणि मग सारंच सोप्पं होत गेलं.
– अनुराधा म्हापणकर

पाच वर्षे रजा
मी बेस्टमध्ये १७ वर्षे नोकरी केली. घरी सासू-सासरे असल्यामुळे मुलीला कधी पाळणाघरात ठेवायची गरज भासली नाही. परंतु २००४ मध्ये सासरे व नंतर चार वर्षांतच सासूबाईंचे निधन झाले. त्याचदरम्यान माझी मुलगी आठवीत गेली. अभ्यासाचा पसारा वाढू लागला. किशोरवयीन मुले अचानक पाळणाघरातही जुळवून घेऊ शकत नाहीत. ती एकटी राहू लागली. तिच्या सुरक्षेविषयी मनात भलतेसलते विचार यायचे. म्हणून मी पाच वर्षे बिनपगारी रजा मंजूर करून घेतली. अर्थात यामध्ये मला माझ्या अधिकारीवर्गाने संपूर्ण पाठिंबा दिला. माझ्या या निर्णयामुळे माझ्या नवऱ्याला व मुलीला खूप फायदा झाला. दोघेही निर्धास्त झाली. आता माझी रजा संपत आली व मी पुन्हा नोकरीत रुजू होईन. पण मुलीच्या आठवी ते बारावी या महत्त्वाच्या वर्षांत मी तिला सहवास दिला हे सुख मला संपूर्ण आयुष्यासाठी समाधान देणारे ठरले.
– शर्मिला  मुजुमदार, गोरेगाव

अपराधी विचारांवर केली मात
 मी ठामपणे ठरवलं होतं की अपराधभाव वाटणाऱ्या विचारांनाच पळवून टाकायचे. मी त्यासाठी स्वत:मध्ये काही बदल केले. घरात बोलण्यामध्ये स्पष्टपणा ठेवला जे सांगायचं ते शांतपणे सांगू लागले. ‘‘मला काही गोष्टी शिकायच्या आहेत. छंद जोपासायचे आहेत. ज्यामुळे माझे व पर्यायाने कुटुंबाचे स्वास्थ चांगले राहणार आहे. हे करण्यासाठी मला जो ‘वेळ’ हवा आहे त्याचे नियोजन व कामाचे नियोजन आपण सर्वानी चर्चा करून करायचे आहे. तुम्ही सर्व जणसुद्धा कुटुंबाचे घटक आहात त्यामुळे प्रत्येकानेच आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवली तर सगळेच समाधानी, आनंद राहू शकतो. त्यानंतर ज्या गोष्टी मला पटत नव्हत्या, चुकीच्या वाटत होत्या त्या गोष्टींना मी नकार द्यायला शिकले व ते चुकीचे का? हेही पटवून द्यायला लागले. तसेच समोरच्यांचा नकारही पचवायला शिकले. त्यामुळे वाद मिटत गेले. सध्या मी कुटुंबाबरोबरच माझा ऑटोमोबाइल स्पेअर पार्टस्चा घरचा व्यवसाय सांभाळत आहे. लेखन सुरू आहे. तसेच समुपदेशक म्हणूनसुद्धा काम करत आहे.
-दीपा भणगे, कोल्हापूर.

सासूबाईंचा भक्कम पाठिंबा
७-८ वर्षांपूर्वी मला एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगला हुद्दा व चांगल्या पगाराची बेलापूर येथे नोकरी लागली. त्या वेळी तीन ट्रेन बदलण्याचे समीकरण जुळवताना मला खूप त्रास होत असे. त्यामुळे घर, स्वयंपाक, नवीन नोकरी हे करताना तारांबळ उडू लागली. माझ्या घरी माझे सासू-सासरे, पती मिलिंद व मुलगा अधोक्ष असा परिवार. माझ्या सासूबाई पुष्पलता यांनी मला मदतीचा/सहकार्याचा हात दिला. सकाळ-संध्याकाळ-रात्रीच्या जेवणाचा पूर्ण ताबा त्यांनी घेतला. पूर्ण घराची जबाबदारी त्यांनी माझ्या पतीसमवेत घेतली. शनिवार- रविवार सुट्टी असल्यामुळे मी वाटण, शेंगदाणा कूट, दळणे वगैरे तसेच साफसफाई, भाज्या निवडून ठेवणे, लसूण पेस्ट, मुलांसाठी घरचा खाऊ (नानकटाई, लाडू वगैरे) ही कामे जसे जमेल तसे करून ठेवत असे. त्यांनी मला सांगितले, ‘‘तू घराची काळजी करू नकोस, मी असेपर्यंत तुझ्या पाठीशी उभी राहीन. तू खूप मोठी हो.’’ परिस्थितीला न डगमगता  त्यांनी जे सहकार्य दिले त्यामुळे आज उच्चपदावर काम करताना मला त्यांचा खूप गर्व वाटतो.
शीतल सोनावणे, ठाणे

मुलगी दुरावली
नोकरी सोडूनही मला आता पंधरा वर्षे झाली; पण त्याआधी चाळीस वर्षे केलेल्या नोकरीत मात्र मला बराच अपराधी भाव जाणवत होताच. १९६२ साली मोठय़ा मुलीचा जन्म झाला तेव्हा ठाण्याला पाळणाघराची सोय नव्हती. मुलीसाठी घरी बसणे अशक्यच. दादरला राहणाऱ्या आईवडिलांनी मुलीला सांभाळायची जबाबदारी घेतली. थोडा फार दिलासा लाभला, पण मग मुलीला आमचा लळा लागलाच नाही. मनाविरुद्धचा हा निर्णय असल्यामुळे खूप मानसिक त्रास व्हायचा. ती आजोळी रमायची, पण तिच्या बाललीला बघण्याचे भाग्य मला लाभले नाही. आमच्या रजेच्या दिवशीही ती आमच्याबरोबर येण्यास राजी नसायची; पण निघताना मात्र मला धरून ठेवायची व रडायची. माझ्याही डोळय़ांना धार लागायची. कुल्र्याला ब्लॉक घेतल्यावर मात्र तिला वरचेवर भेटणे शक्य झाले. दिवस तसेच राहिले नाहीत; पण नात्यांत मात्र थोडा दुरावा निर्माण झाला. सहा वर्षांनी दुसऱ्या मुलीचा जन्म झाला, तेव्हा आमच्या शेजारच्याच मावशीनी तिला सांभाळले. ऑफिसमधून घरी आल्यावर तिने आई म्हणून मारलेली हाक व मिठी म्हणजे दिवसभर ऑफिसमधले कष्ट व दगदग विसरायला पुरेशी व्हायची.
शुभदा कुलकर्णी, कुर्ला

वेळ वाचवला
मुले अगदी लहान असताना सासूबाईंना मोठय़ा आर्जवाने बोलावून घेतली. वृद्धापकाळातील चिरचिर, लहानसहान आरोग्यतक्रारी यांच्याशी तडजोड केली. त्यांच्या हाताशी एक बाई ठेवली. त्यामुळे मुलांना आजीचे प्रेम मिळाले, त्यांच्या खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष राहिले. माझा मोकळा वेळ मुलांना देता येऊ लागला. माझ्या स्वातंत्र्यावर थोडी गदा आली, पण मी त्या वेळी तरी जिव्हाळा आणि सुरक्षितता यांना महत्त्व देऊन वृद्ध आजींशी आनंदाने तडजोड केली. मुलांना गाणी, गोष्टी, ओव्या, भजन यांचा आनंद आजीकडून मिळाल्याने माझे अपराधीपण कमी झाले आणि एक गोष्ट केली- इस्त्री, दूध, भाजी इत्यादी नित्याच्या गोष्टी थोडे अधिक पैसे देऊन घरपोच होतील अशी व्यवस्था केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैशाच्या मोबदल्यात मी वेळ वाचवला आणि तो कुटुंबीयांसाठी दिला, त्याचा सकस उपयोग करून घेतला.
– शांता सहस्रबुद्धे, दापोली

एकमेका साहाय्य करू
लग्नाच्या पंधरा दिवसांनंतर माथाडी हॉस्पिटल कोपरखरणे नवी मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम-नोकरी सुरू झाली. एकत्र कुटुंब, पाहुणे व नोकरीसाठी प्रवासात तीन तास लागणारा वेळ यातून निभावले. गरोदरपण, बाळंतपण, मुलाला सांभाळणे या सर्व गोष्टींवर समाजातील गरजू घटक व पाळणाघर असा तोल सांभाळला. नोकरीच्या ठिकाणी, माझ्यासारख्या बऱ्याच जणी नोकरी करून घर सांभाळून दमत असल्याचे पाहिले. अशा वेळी माथाडी कामगारांच्या पत्नींना टिफिन सव्‍‌र्हिस सुरू करण्याची संधी दिली. शेजारधर्म पाळला. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौनव्रत स्वीकारणे, अस्वस्थ वाटले की, मैत्रिणींशी बोलणे, सामाजिक कामात पुढाकार घेणे, जमेल तशी मदत सर्वच घटकांना करणे हे व्रत आचरले. वेळापत्रक बनवून त्याप्रमाणेच कामे केली.
– डॉ. राजश्री पाटील, कोपरखराणे, नवी मुंबई

शेजारीच आले मदतीला
वसई (गाव) ते मुंबई असा ३३ वर्षे प्रवास करताना अगदी तारेवरची कसरत होत असे. सुट्टीच्या दिवशी मात्र मी आपले घर, नवरा, मुलगा यांना थोपटत न बसता आवर्जून बाहेर पडत असे ते आमच्या मध्यमवर्गीय सोसायटीत राहाणाऱ्या कुटुंबाशी सलोखा वाढवण्याकरिता. त्यामुळे मी घरी नसताना या सगळय़ा काकू माझ्याकडे माझ्या मुलाकडे लक्ष देत असत, अगदी वेळप्रसंगी त्याला दवाखान्यात नेऊन इलाज करेपर्यंत. मोलकरणीवर मी पूर्णपणे विश्वास टाकला होता. किल्ली घेऊन ती काम करीत असे. तिच्या मुलांच्या फीसाठी वगैरे मी तिला थोडीफार आर्थिक मदत करीत असे, त्यामुळे तिचीसुद्धा मला वेळोवेळी मदत होत असे. मुलाच्या प्रत्येक परीक्षेत अगदी १२ पर्यंत मी सुट्टी घेत असे, कारण परीक्षा संपल्याचा आनंद शेअर करायला मुलांना दारात समोर आई उभी हवी असते!
– अंजली  सौंदणकर, नाशिक

जबाबदारीचं भान
मी कारागृह खात्यामध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी २ या पदावर कार्यरत असून पोलीस असल्यामुळे सुट्टय़ा तशा खूपच कमी मिळतात. तसेच माझे पती इंजिनीअर आहेत. लग्नानंतर आम्हाला फक्त १० दिवस सोबत राहण्यासाठी मिळाले, परंतु त्या दहा दिवसांच्या सहवासाने, आठवणींनी मला खूप मोठय़ा जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. मी तडजोड करून मुंबई उच्च न्यायालयात डय़ुटी मागून घेतली. माझे पती पुणे येथे स्थायिक असल्याने मी रोज पुणे-मुंबई करू लागले. त्यातच शनिवार- रविवार दोन दिवस उच्च न्यायालयास सुट्टी असल्यामुळे मला नाशिक येथे माझ्या ऑफिसमध्ये जावे लागे. या सर्व त्रिकोणी सूत्राच्या गणितामध्ये मला माझ्या घरच्या माणसांना जाणून, समजून घेण्याची खूप मोठी जबाबदारी होती. ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. माझे आई-वडील, सासू-सासरे, पती यांचा मला खूप मोठा पाठिंबा आहे, यापुढेही राहील. या सर्वात माझे पती हे माझ्यासाठी खूप मोठा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मला आजपर्यंत नोकरी व घर सांभाळताना कितीही त्रास झाला तरी नकारात्मक भावना येत नाहीत.
– मनीषा पोखरेकर-लोखंडे, पुणे

सहकार्यामुळे निभावले
 घाटकोपरच्या विद्याभवन शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले आणि शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लग्न झाले ते एकत्र कुटुंबात. लग्नानंतर दोन वर्षांनी मुलगा झाला. आमच्या घरातील सर्व जण नोकरी करत होते. प्रश्न होता बाळाला कोण सांभाळणार? त्या वेळी आमच्याकडे काम करणाऱ्या लक्ष्मीबाईंनी ती जबाबदारी स्वीकारली. बाळाची ती अतिशय निगुतीने काळजी घ्यायची; परंतु कधी ती उशिरा आली किंवा त्याला जास्त बरे नसेल तर मात्र पंचाईत व्हायची. मग त्याला आईकडे ठेवून शाळेत हजेरी लावत असे. असे बरेचदा होत असे. आईचे घर शाळेपासून जवळ होते म्हणून ते शक्य होते. अशा प्रकारे तो पाच ते सहा वर्षांचा होईपर्यंत चालू होते. पुढे माझ्या सासूबाई पाच वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. तेव्हा सकाळ/संध्याकाळ दोन बायका त्यांना सांभाळण्यासाठी ठेवल्या. ते शक्य झाले केवळ आम्ही दोघेही नोकरी करत होतो म्हणून. माझ्या पतीनेही  रजा घ्यायला न लावता सहकार्य केले.
– प्रिया नाईक

असा शोधला सुवर्णमध्य
लग्नाआधीपासूनच नोकरी सुरू होती. गाडीची धावपळ, ऑफिस, घर जरा जड गेलं; पण स्वकष्टार्जित चार पैसे मिळाल्याचा आनंद वेगळा! चार महिन्यांत विवाह झाला. त्यातच पहिल्या वर्षांत कन्यारत्न झाले. लगेच दुसऱ्याची चाहूल लागली. साऱ्यांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला. त्यात वडीलही सामील होते. मी मात्र नकार दिला. आम्ही मूल सांभाळणार नाही, इति सासूबाई! माहेरी भावंडंच लहान, तो दरवाजा बंद! साऱ्यांच्या मनाविरुद्ध निर्णय घेतल्यामुळे सारेच नाराज, घरातील ताणतणाव वाढत होता. अशा विमनस्क अवस्थेत मुलांच्या संगोपनाला प्राधान्य देऊन ऑफिसला रुजू व्हायच्या ऐवजी राजीनामा दिला. चार महिने झाले. पैशाची गरज होती. समोरच्या कमलाताई म्हणाल्या, मला एस.एस.सी.ला शिकवाल का? घरातील सांभाळून आव्हान स्वीकारले. त्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. पाटी न लावताच पुढे ५वी ते ११ वी ‘अनंत’ क्लास सुरू झाले आणि सुवर्णमध्य गवसला! आता अक्षर ज्ञानदीप मंडळ, अथर्वशीर्ष वर्ग, अभिनव वाचनालय, संस्कृत वर्ग, ज्येष्ठांसाठी वाचन.. अभ्यासेतर वर्ग विनाशुल्क सरस्वती मंदिरात भरू लागले आहेत.
– अंजली बापट

मायेची ‘जिद्द’ मिळाली
 मुलाच्या वेळी १४व्या दिवशी दवाखान्यातून घरी आले. त्याच दिवशी मला सरकारी नोकरीचे नेमणूकपत्र आले. ही संधी पुन्हा मिळणार नव्हती. त्यावेळी पतीचे सहकारी माधव भिडे व कुटुंबीयांनी बाळाला वर्षभर सांभाळण्याची जबाबदारी घेतली. माझी नोकरी नवीन असल्याने एकही दिवस रजा मिळत नव्हती. आई म्हणून मला यावेळी खूप अपराधी वाटायचं. शेवटी घराजवळच एक चांगलं पाळणाघर मिळालं. त्यांच्या बंगल्याचं नाव ‘जिद्द’ होतं. खरोखरच नावाप्रमाणे त्यांनी आम्हाला जिद्द दिली. आधार दिला, मुलांना सांभाळण्याची हमी दिली. तेव्हापासून हेच कुलकर्णी काका-काकू मुलांचे पालनकर्ते झाले. त्यांनीच मुलांवर चांगले संस्कारही केले, प्रेम दिलं. इतकं की मुलाला १०वी-१२वीत ९० टक्केमार्क्‍स मिळाले होते. त्यावेळी त्याने माझ्या अगोदर कुलकर्णी काका-काकूंना फोन केला. मला तेव्हा खूप अपराधी वाटले. पण ते न दाखवता आनंदच व्यक्त केला. आता स्वेच्छा सेवानिवृत्तीही नुकतीच घेतली आहे. तरीही मागे वळून पाहताना मनात कळ उमटतेच.
    -प्र. द. घोडके, चिंचवड, पुणे.

विचारांची दिशा बदलली
गेली ३५ वर्षे मी नोकरी करतेय. दोन मुली लहान असताना रोजच मुलींना दूर लोटून नोकरी करतेय, ही वेदना मनाला ग्रासून जात असे. तरीसुद्धा महिन्याच्या शेवटी हिशेब केला तर मिळालेला पगार, माझी सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, मुलांना थोडय़ा फार जादा सुखसोयी पुरविण्याचा आनंद, या गोष्टींनी मी त्या वेदनेवर मात केली. आता माझ्या मुली शिकून-सवरून सुसंस्कारित होऊन, लग्न करून आपापल्या घरी स्वबळावर सुखाने नांदताहेत. नातवंडे आहेत. मात्र, आजवर जी मजल गाठली, त्यात पाळणाघराच्या बाई, मित्र, सहकारी, नातेवाईक व समाजाची पाठीवरील थाप अत्यंत मोलाची आहे.
-माधुरी वैद्य, कल्याण

तडजोड स्वीकारली
१९६७ साली माझी मुंबईत सचिवालयात अनुवादक म्हणून निवड झाली. लेखी परीक्षेत शंभर उमेदवारांमध्ये प्रथम येऊनही वर्षभरात मला मुलीच्या जन्मानंतर नोकरी सोडावी लागली. मुलाच्या जन्मानंतरही मी चार वर्षे घरीच होते. नंतर मुलांना शाळेत घातल्यावर त्यांच्याच शाळेत मी शिक्षिका म्हणून नोकरीला लागले, पगाराची कोणतीही अट ठेवली नाही, पण त्यामुळे मी त्यांना पूर्ण वेळ देऊ  शकले. मुले मोठी झाल्यावर मी एम.ए. केले. विद्यापीठात प्रथम आले. पुढे बी.एड.ही पूर्ण केले. चाळिशीनंतर अनुदानित शाळेत नोकरीला लागले. झपाटून काम केले. ‘इंग्लिश टीचर्स’ साठी दहा वर्षे राज्यस्तरीय मार्गदर्शक होते. शालेय चित्रवाणीसाठी सहा वर्षे इंग्रजी लेखन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन इंग्लिश पुस्तके लिहिली. उपक्रमशील शिक्षिका म्हणून दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार तसेच आदर्श शिक्षिका म्हणून दोन वेळा पुरस्कार मिळाले. नोकरी सोडली नसती तर मी आज उच्च पदावर असते, पण त्यामुळेच मी मुलांना वेळ देऊ  शकले. आज माझी मुलगी एम.डी. डॉक्टर आहे आणि मुलानेही आय. आय. टी. पवई व आय. आय. एम. बंगलोरसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले आहे.
-आसावरी फडणीस, ठाणे

ट्रेनमधल्या वेळेचंही नियोजन
मुलांच्या बाललीला, त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल, उच्चारलेला पहिला शब्द यासारखे अनमोल क्षण अनुभवणं नोकरीमुळे शक्य नव्हतं. पुढे काळानुसार अधिकच कसरत सुरू झाली.  मग ट्रेनमध्ये मिळणाऱ्या वेळेचं नियोजन- मुलांच्या वह्य़ा बघणं, त्यांच्या प्रोजेक्टची तयारी करणं, सामानाची यादी करणं अशा अनेक गोष्टींसाठी होऊ  लागलं. ऑफिसमधून घरी जायला उशीर झाला, की साग्रसंगीत जेवण न करता, खिचडी, मटारभात असे पौष्टिक शॉर्टकट. नियोजनामुळे थोडा वेळ काढता येतो.  तो वेळ माझ्यासाठी/ माझ्या छंदासाठी- वाचन, गाण्यासाठी वापरता येतो. हे  शक्य झालं ते केवळ माझा नवरा-मुलं, माझे सासू-सासरे, आई-बाबा, पाळणाघराच्या जोशीकाकू, कामवाली आणि पोळीवाली यांच्या सक्रिय सहकार्यामुळेच.
-शिल्पा नातू, ठाणे

 बढत्यांवर पाणी
पतीचा व्यवसाय असल्यामुळे घरातले बराचसे काम मलाच बघावे लागत होते. माझीही खासगी नोकरी असल्यामुळे सुट्टय़ा आणि सवलती कमी आणि कामाचे तास जास्त आणि आव्हानात्मक काम. मुलगी झाली आणि फारच तारांबळ उडू लागली. सुरुवातीच्या काळात आईची मदत घेतली. शेवटी नोकरी सोडली, पण घरात राहून समाधान होत नव्हतं. मग तिथेच पार्टटाइम नोकरी सुरू केली. आता मुलगी, तिचा अभ्यास, घराकडे लक्ष देणे यासाठी पुरेसा वेळ असतो. मात्र यासाठी मला करियरमधे बरीच तडजोड करावी लागली. बऱ्याच बढत्या, प्रगतीच्या संधी घेता आल्या नाहीत. कनिष्ठांच्या हाताखाली काम करावं लागलं, तरीही आपल्या क्षेत्रात काम करण्याचं आणि कुटुंबासाठी वेळ दिल्याचं समाधान आणि आनंद वाटतो.
-अश्विनी करंदीकर-सुळे

केली सहप्राध्यापिकांनी मदत
प्रत्येक मुलाला वाटते की, आपली आई आपल्याला शाळेतून नेण्या-आणण्यासाठी रोज यावी. पण ते जमणे शक्य नव्हते. अपराधी वाटायचं. पण नंतर माझी शाळेची वेळ दुपारची करून घेऊन सकाळी मुलाला शाळेत सोडणे व जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शाळेची वेळ जुळवून घेऊन त्याला शाळेतून घेऊन येणे मला जमू लागले. प्राध्यापिका  आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे मी हा सुवर्णमध्य साधू शकले.
-प्रियांका साटम, मालाड.

नोकरी घरात आणत नाही
मी आणि माझे पती शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षकाचे काम करतो. मुलं सांभाळण्यासाठी आईची सुरुवातीला मदत घेतली. नंतर सासू-सासरे माझ्याकडे मुलं आणि घर सांभाळण्यासाठी येतात म्हटल्यावर मला स्वत:ची अधिक तडजोडीची मानसिक तयारी करावी लागली. घरच्यांचा विश्वास संपादन करून माझे नोकरीचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे लागले. हे सगळं करताना माझ्या पतीची भक्कम साथ मला होती आणि आहेदेखील. मी नोकरी करते, पण शाळेतून आल्यावर चपलांसोबत माझी नोकरीही दारातच काढून ठेवते. घरात फक्त एक सून, आई, पत्नी आणि गृहदक्ष गृहिणी म्हणून वावरते. सासू-सासरे सोबत राहातात म्हणून घरात नेहमी पाहुण्यांचा राबता असतो. त्याचा शाळेतून आल्यावर कधी कधी त्रास होतो. थकवाही येतो. पण एकदा ‘करावच लागणार’ ही मानसिकता बनविली की जमतं सगळं. हे सगळं सांभाळून स्पर्धा परीक्षा देते, सभा, संमेलनाला जाते. कार्यक्रमांत सहभाग घेते. घर आणि नोकरीचा घरच्यांच्या मदतीने तोल सावरते. दोन्हीपैकी कोणत्याही गोष्टीत वहावत जात नाही.
– तोष्णा  मोकडे, यवतमाळ

मुलीला विश्वासात घेतले
माझे घर आणि नोकरीचे ठिकाण यातील अंतर मी कमी केले आहे, ज्यामुळे रोजच्या प्रवासाचा वेळ वाचतो. तातडीने काही अडचण आल्यास घरी लगेच पोहोचता येतं. ज्या दिवशी ऑफिसचे काम लवकर संपतं, त्या दिवशी जो वेळ मिळाला आहे तेव्हा स्वत: मुलीला शाळेतून घेऊन येते. मुलीला विश्वासात घेऊन समजावते. त्यामुळे नोकरी आणि घर सांभाळता आले.
-डिम्पल मापारी, अकोला</strong>
 
मदत मिळाली
 एकदा मी लॅबमध्ये गेले असताना, एका स्त्रीने माझ्या मुलीला, ‘तुझी आई पैशाच्या मागे नुसती धावते’, असे म्हणून भडकावले. त्यावेळी, ही वैद्यकीय सेवा रुग्णाला किती आवश्यक आहे हे मी तिला समजावून सांगितले. त्यानंतर तिने कसलाच हट्ट केला नाही. शेजारी राहणाऱ्या अरुणाताईंनी त्या काळात मुलांना प्रेम दिले, वेळोवेळी ही कृतज्ञता मी आजही व्यक्त करते.
-माधवी कवीश्वर , गोरेगाव                    

‘मी सुपरवुमन नाही’चं भान
   माझ्या मते नोकरदार स्त्रियांमध्ये मुख्यत्वे अपराधभाव येतो त्यांना बाळ झाल्यावरच! आपण स्त्रीला शक्तिरूप पाहत असलो, तरी मी सुपरवुमन नाही आणि सगळी कामे मी एकटी नाही करू शकत, हे वास्तव मी आधी स्वीकारले, मग मी कामाची विभागणी केली. घरकामाच्या मावशी महत्त्वाच्या, ज्यांच्यामुळे माझं घर नीटनेटकं राहतं आणि आम्हा सगळ्यांना जेवायलाही वेळेवर मिळतं. नंतर होती बाळाची जबाबदारी ती माझ्या सासूबाई, काकू आणि आई यांनी लिलया पेलली. यामुळेच मी निश्चिंत मनाने ऑफिसला जाऊ  शकते. यासह मी आणि नवऱ्याने आठवडय़ाची कामे विभागून घेतली. शनिवार दुपापर्यंत आम्ही बाहेरची सगळी कामे आटपायचा प्रयत्न करतो. जेणे करून आम्हा दोघांनाही कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करता येईल.
-मृगा पळसोकर, ठाणे

सासू-सासऱ्यांची मदत
नोकरी लागली आणि मी खऱ्या अर्थाने बिझी झाले. घर, नोकरी आणि कुटुंब.. वाटले सगळे सांभाळू, पण रोज लवकर उठून डबा करण्यापासून वेळेत ऑफिसमध्ये पोचण्याची तारेवरची कसरत सुरू झाली ती अजून चालूच आहे. साठी पार केलेले माझे सासू-सासरे सगळी कामे करतात, माझ्या अनुपस्थितीत मुलांना छान पाहतात. त्याने मला एकच शिकवण मिळते ती म्हणजे या वयात ते दोघे इतके सारे करू शकतात, तर आपण अजून खूप तरुण आहोत. माझ्या नोकरीच्या वेळेमुळे त्या दोघांना कुठे जाता येत नाही, इतर कामे ते टाळतात तेव्हा मात्र जास्त अपराधी वाटते. पण मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी हे करायलाच हवं.  
 -श्रद्धा

मोठी भावंडेच होतात पालक
मुंबई, नोकरी आणि लोकल हे महत्त्वाचे त्रिकूट आहे. त्यात नोकरी करताना गरोदरपणात जे सोसावे लागते ते आम्हीच जाणोत. मुलं झाल्यावरही त्यांचे नियमित डोस, इंजेक्शन, आजारपण सांभाळूनच कार्यालय गाठण्यावाचून पर्याय नसायचा. माझ्या मोठय़ा मुलाने धाकटय़ाला चांगले सांभाळले म्हणून दिवस चांगले गेले असे वाटते. एक प्रसंग सांगते. लहान मुलाला ताप आला होता. तेव्हा माझ्या मोठय़ा मुलाने फोनवरून मी संगितल्याप्रमाणे धाकटय़ाला औषध दिले; अगदी एक्सपाइरी डेट बघून. किती समजूतदार होतात ही मुलं. घर, काम अशा धावपळीत दिवस जायचा. मात्र तेव्हा रात्रीचे जेवण भरवताना त्यांच्याशी बोलायचे, मग जरा अपराधीपणा कमी व्हायचा. त्यांना शांत झोप लागली की सल राहत नाही, की आपण दिवसभर त्यांच्यापासून लांब होतो.
-नीलम पास्तेकर
सुवर्णमध्य स्त्रियांनीच साधायचा?
नोकरी, घर यात सुवर्णमध्य साधण्याचा प्रश्न स्त्रियांनाच पडावा?  त्यांनी तो साधावा ही अपेक्षा इतरांचीच नव्हे तर त्यांची स्वत:ची देखील असते. त्यातूनच घराकडे, कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही हा अपराधभाव येणे हेही ओघानेच. हा सुवर्णमध्य साधण्यासाठी काही गोष्टी केल्या. स्वैपाकात चवींचा जिथे प्रश्न येतो तिथे तडजोड करायची नाही, पण वरकाम, इतर मदतीची कामे यासाठी मदतनीस ठेवायची. एखादे कार्य, आजारपण अशावेळी जेव्हा घरच्यांना आपली गरज असते तेव्हा काही तडजोडी ऑफिसच्या कामाच्या बाबतीत केल्या, जसे की घरून काम करण्याचा पर्याय स्वीकारला, किंवा आधी किंवा नंतर थोडा जास्त वेळ ऑफिसच्या कामासाठी दिला. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी दोन्ही आघाडय़ा यशस्वीपणे सांभाळण्यास मदत करतात.
-अनघा आपटे, चिंचवड

रेशीमगाठी          
अत्यंत परिश्रम केल्यावर मी प्रेमराज सारडा कॉलेजमध्ये मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून रुजू झाले, आज माझ्या नोकरीला, तारेवरच्या कसरतीला १२ वर्षे झाली. अपराधभाव माझ्या उंबरठय़ावर कधीच विसावला नाही. मुलींना कायमच मदतीला घेतले. त्यामुळे आपल्या आईला आपली मदत होते, ही भावना त्यांच्या ठायी निर्माण झाली आणि या पद्धतीने मला मुलींमधील अतिरिक्त कार्यशक्ती विधायक वाटेने प्रवाही करता आली. अनिवार्य असणाऱ्या पाटर्य़ानाही मी हजेरी लावली नाही, सुट्टीच्या दिवशीही मैत्रिणींबरोबर खरेदीला जाणे टाळले. उलट बाजारहाट, कपडे खरेदी, बँकेचे व्यवहार अशा सर्व ठिकाणी लहान मुलींना नेत होते. मी अनेक ठिकाणी मुलींना बरोबर ठेवले, ज्यामुळे आपल्या आईला कोणते व कसे कष्ट करावे लागतात याची अनुभूती त्यांना मिळाली. कठीण प्रसंगात एकमेकींच्या सहवासात राहिलो, त्यामुळे आज आमचे मायलेकींचे नाते दृढ आहे.
-प्रा. डॉ. स्मिता भुसे, अहमदनगर  

मुलांना स्वावलंबी बनवले
सुरुवातीच्या काळात मुलांना माझे आई-बाबा सांभाळत होते. मात्र बाबांच्या कर्करोगाने चित्र पालटले. तेव्हा माझ्या विवाहित नणंदेने मला मोलाचे सहकार्य केले. बाबांच्या मृत्यूनंतर आई खूपच एकटी पडली. तिला सावरायचे, मुलांना सांभाळायचे आणि ऑफिस सांभाळायचे बिकट समस्या उभी राहिली. खूप विचाराअंती निर्णय घेतला की मुलांना एकटे घरी ठेवायचे, मुलांशी विचारविनिमय केला. मोठा मुलगा ५ वीत आणि मुलगी ३ रीत होती. खूप मनाची तयारी केली की या सर्वातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे की मुलांना स्वावलंबी बनवायचे. त्यांना स्वत:ची कामे स्वत: करायला शिकवायची. शेजाऱ्यांना तशी कल्पना दिली. एक जुना मोबाइल मुलांसाठी घेतला. घराची नवीन चावी बनवून त्यांच्या शाळेच्या बॅगेत ठेवायला दिली. मग तो दिवस आला.. दुपारपासून मुले एकटीच घरी राहणार होती. सकाळी बसमध्ये चढताना दोघांचे चेहरे बघवत नव्हते. ही दोघे एकटी घरी राहतील का? या विचाराने कल्लोळ माजला. दुपारनंतर तर थोडय़ा-थोडय़ा वेळाने मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क करत होते. तो दिवस लवकर सरतही नव्हता. खूप काळजी वाटत होती त्या दोघांची. संध्याकाळी जेव्हा मी घरी आले, तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर माझी दोन पिल्ले मला अशी बिलगली की जशी खूप दिवसापासून भेटलोच नव्हतो.. आता वर्षभरात त्यांनाही एकटे घरी राहाण्याची सवय झाली आहे. पण ते जुने दिवस आठवले की मन गहिवरून येते..
– प्राची तारी, ठाणे.

मदतीचे हात मिळाले
आई लहानपणीच गेल्यामुळे लहानपणी माझे पती मामाकडे जास्त राहिले, त्याची फेड म्हणून लग्नानंतर सात वर्षे मामाच्या एका मुलाला शिकवून व्यवसायात उभे केले. बहुतेक कॉमर्स विषयातील प्राध्यापक मुलाखतीनंतर काही दिवस तरी आमच्याकडे राहात. मुले पण लवकरच झाली. मामे दीर, धाकटा दीर शिक्षणासाठी घरी होते, आला-गेला पैपाहुणे, समारंभ असतच. वेळेच्या नियोजनाप्रमाणे एक बाई मुले लहान असेपर्यंत ठेवली. सासरची जबाबादारीही खूप होती.  गरजेच्या काळात आईने आधार दिला. मुलांचे आजार, घर बांधणे, वास्तू, मुलांच्या मुंजी, मुलीचं लग्न !! २२ वर्षे कशी गेली कळलंच नाही. अपराधीपणाची भावना न येता कर्तव्याचं समाधानच मिळवलं.
-तारा माहुरकर, नवी दिल्ली

कसलीही बोचणी नाही
विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका, सर्वोत्कृष्ट योगदानासाठी पगारात मोबदला, संशोधनपर निबंधांचे वाचन व प्रकाशन, ऑफिसच्या कामानिमित्त परदेशी प्रवास आणि त्याचवेळी दोन मुलींचे संगोपन, नवऱ्याची नोकरी, प्रवास, सासू-सासरे, आई-वडील व इतर नातेवाईकांशी प्रेमाचे संबंध हे सर्व पेलणे तसे सोपे नव्हते, पण पराभूत करणारेही नक्कीच नव्हते. सुरुवातीच्या काळात अक्षरश: एका हातात खुळखुळा आणि एका हातात पुस्तक घेऊन व्याख्यानाची तयारी करावी लागे. दुसऱ्या मुलीच्या वेळी पुण्यात प्रेमळ आजीआजोबांचे पाळणाघर मिळाले, त्यामुळे माझा कामानिमित्त होणारा प्रवास, जबाबदाऱ्या घेणे, त्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणे याचे ओझे वाटले नाही. पण आता परिस्थिी बदलली आहे. मोठी मुलगी दहावीला तर दुसरी आठवीला आहे. आज त्यांच्या अभ्यासाला जास्त वेळ देत यावा म्हणून यशस्वीपणे पेललेले करियर सोडून छोटा व्यवसाय करताना उणिवांची बोचणी नाही, काही करायचे राहून गेल्याची भावना नाही.        
-साधना घळसासी, पुणे

मदतीला ‘आजी’ धावून आल्या
लग्नानंतर मुलाच्या पिंटूच्या जन्मात कौतुकांत ५-६ महिने निघून गेले. मला ऑफिसमध्ये कामावर रुजू व्हायला हवे होते.  बिनपगारी रजाही संपायला आली. शेवटी नोकरी सोडण्याचा विचार केला. त्याच वेळी शेजारी राहाणाऱ्या आजीबाईंना विचारावं असा विचार आला. त्यांना आमच्या कल्पनेचा फार आनंद झाला. आणि मी निश्चित झाले. पिंटू आजीजवळ मजेत राहिला. माझी नोकरी सुरू झाली. तोही काकालोकांबरोबर शाळेत जातो. रमतो. खूप आनंदात आहे.
– वासंती काळे, सातारा.

छंदच निवडले करिअर
लग्न करून ठाण्यात आले. मी एम.एस्सी, बी.एड व संगीत विषारद.   कॉलेजमध्ये प्राध्यापक व्हायचं स्वप्न होतं, पण लांबचा प्रवास आणि संसार सांभाळणे शक्य नव्हते म्हणून स्वत:चे ‘म्युझिक स्कूल’ काढायचं ठरवलं. लग्नाला दोन वर्षे झाली होती व माझा मुलगा एक वर्षांचा होता. करिअरच्या बाबतीत मी खूप गंभीर होते. बाळाला पाळणाघरात ठेवलं. घरी व लवकरच व्यावसायिक जागेत काम सुरू केलं.  मुलगा शाळेत जायला लागला तसे मी माझे कामाचे तास वाढवले. क्लासच्या पैशाच्या जोरावर मी पहिली स्वत:ची जागाा विकत घेतली.  ३ वर्षांनी माझ्या दोन शाखा सुरू झाल्या. आज कर्मचारीवर्गही आहे आणि विद्यार्थी वाढतच आहेत.
– अर्चना मुजुमदार, ठाणे

भूमिकांची अदलाबदल
नोकरी, व्यवसायात व्यग्र असलेल्या आम्ही संसार व मुलांसाठी जास्त जागरूकपणे वेळ देत असतो. किंबहुना अष्टभुजाप्रमाणे अष्टपैलू होण्यासाठी पण धडपडतो. उमेदीत ही त्रेधातिरपीट, दमणूक जाणवली नाही. नोकरी व संसारामधील सुवर्णमध्य आपला आपणच शोधायचा असतो. संसारात मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व आपल्या निवृत्तीनंतरच्या शांत-सुखी उत्तरायुष्यासाठी आज प्रत्येक आईला बाबा होणे व बाबांना आई होणे आवश्यक आहे. हाच तो सुवर्णमध्य. या काळात सतावणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेवर मात करून, मनाचे संतुलन ढळू न देता, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून नोकरी-संसारातील सुवर्णमध्य गाठून दोन्ही गोष्टी यशस्वीपणे करता येतात हा माझा अनुभव आहे.
 – हेमांगी  बर्वे, पुणे

मल्टिटास्किंग
मी कर्ण-बधिरांच्या शाळेत विशेष शिक्षिका म्हणून नोकरी करते. नोकरी आणि घर दोन्ही सक्षमपणे सांभाळणे म्हणजे रोजचीच तारेवरची कसरत. त्यात नवऱ्याची फिरतीची नोकरी म्हणजे घरकामात मदत करणारं हक्काचं माणूस नाही. प्रथम मी हे सर्व जसं आहे तसं मान्य करायला शिकले. दोन्ही सक्षमपणे सांभाळायचं म्हणून काही तंत्र आवलंबली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेचे नियोजन केले. यात घरातील व घराबाहेरील कामाबरोबर स्वत:साठीही वेळ दिला. रोजच २० मिनिटे फिरायला जाणे. घरात एकटे असताना आपल्या आवडीची गाणी ऐकणे. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणे इ. दुसरे म्हणजे कामाची प्राथमिकतेप्रमाणे यादी करायला लागले. त्यामुळे सगळी कामे वेळेवर होत गेली. तिसरे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला लागले. बिल भरण्याकरता रांगेत उभे राहून वेळ न दवडता ऑनलाइन भरू लागले. चौथे  महत्त्वाचे म्हणजे सर्वच कामे मी स्वत: करू शकत नव्हते म्हणून काही कामांची जबाबदारी घरातील सदस्यांवरही टाकली.              
-शुभदा अघोर

टय़ूशनचा पर्याय शोधला
डबल एम.ए.बी.एड. एम फिल एवढे शिक्षण घेतल्याने आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायचे होते. एका खासगी महाविद्यालयात नोकरी सुरू केली. पण नऊ वर्षांनी अनपेक्षितपणे मी पुन्हा आई झाली.  मनात द्वंद सुरू झाले. अखेर नोकरी सोडण्याचा मी निर्णय घेतला. मुलाचा अभ्यास घरीच घेणे सुरू केले. त्यांची प्रगती पाहून मला घरच्या घरी टय़ूशन घेण्याची कल्पना सुचली व त्यासाठी पतीनेही पूर्ण सहकार्य केले. आता मुलांची घडी बसली आहे. टय़ूशनही वाढतच आहेत. मदतीला शिक्षक घेऊन त्यांनाही रोजगार उपलब्ध करून देते आहे व कुटुंबाकडे लक्ष देऊन, शिक्षणाचा उपयोग करून पैसाही कमावत आहे.
– अंजली  जोशी, अमरावती</strong>

 मुलाला समर्थ केलं
मी ज्युनिअर कॉलेजवर लेक्चरर म्हणून लग्नाआधीपासूनच नोकरी करत होते. त्यामुळे लग्नानंतरही नोकरी करायचीच हा आमचा दोघांचाही निर्णय होता. मुलाचा, मल्हारचा जन्म होईपर्यंतचं आयुष्य खूप सरळसोट होतं, पण आत्यंतिक गरज असतानाच सासरच्यांनी असहकार पुकारला. आतून कोलमडून गेले. पण ठरवलं की, यावरही उपाय शोधायचाच. मुलाला पाळणाघरात ठेवलं. रोज घरातलचं अन्न, पाणी त्याला मिळेल याची दक्षता घेतली. गाडीवर नेण्या-आण्यासाठी कांगारू बॅगचा पर्याय शोधला, पण जेव्हा मान अवघडू लागली तेव्हा जेमतेम उभा राहू लागलेल्या त्याला गाडीवर उभं राहायला शिकवलं, मग हळूहळू मागच्या सीटवर बसायलाही. नवऱ्याच्या शिफ्ट डय़ुटीमुळे घरात मायलेक दोघच असायचो. अशा वेळी स्वयंसंरक्षण म्हणून २ वर्षांच्या मुलाला दरवाजांच्या कडय़ा काढायला, लावायला शिकवलं. गेल्या ५ वर्षांच्या मेहनतीचं फलित म्हणजे आज तो दाराचं कुलूप लॅचसह उघडतो, लावतो, वॉशिंग मशीन लावतो. मी कामात असेन तर गॅसही बंद करतो, स्वीचेस काळजीपूर्वक चालू बंद करतो.  आज ५ व्या वर्षी तो इंटरनेटसह संपूर्ण संगणक मदतीविना हाताळतो. अडचणीवर मात  करायची असते हेच खरे!
– कीर्तीदा शेळके, पनवेल.

जाणीव करून दिली
माझी बँकेत वीस वर्षे नोकरी झाली तेव्हाच ऐच्छिक सेवा निवृत्ती योजना आली. मुलीच्या नाजूक तब्येतीमुळे घरून नोकरी सोडवण्यासाठी दबाव आला, पण बँकेने  राजीनामा नामंजूर केला. पुढे बँकेने माझी ताकद ओळखून मला अधिकारपद तर दिलेच, शिवाय अल्पावधित माझ्यावरच्या दर्जाच्या शाखेचे प्रमुख केले. पण घर व ऑफिस जवळ असल्याने वेळेची सांगड घालता आली. माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी एक काकी रोज येत असत त्यामुळे मुलांची आबाळ झाली नाही. शिवाय शेजाऱ्यांचे पण या कामी खूप सहकार्य मिळाले. मी पण, त्या काकींच्या पुढील आयुष्याची तजवीज केली व शेजाऱ्यांच्या अडीअडचणींच्या वेळी उपयोगी पडले.मी माझ्या पतीला मी करीत असलेल्या बँकेच्या कामाप्रती आस्था बाळगण्याची व मुलांना आदर करण्याची जाणीव करून दिली. त्यामुळे  मुलांच्या परीक्षेला रजा घ्यावी लागली नाही.     
– रंजना लिमये, वांद्रे (पू.).

नवरा-मुलींचा समंजसपणा
दीड वर्षांची एक अन् ७-८ वर्षांची मोठी मुलगी घेऊन जेव्हा वेगळं बिऱ्हाड थाटावं लागलं. तेव्हा सर्व अडचणींवर मात करण्याची मनाची तयारी होतीच. पण खरी कसरत सुरू झाली ती स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरू केल्यावर.  खूप जास्त वेळ काम करायला लागायचे. काम संपलेलंच नसायचं आणि घरून बाईचा फोन यायचा की, सई (धाकटी) खूप रडतेय, जेवतच नाही. मग मी नवऱ्याला फोन करायचे, ‘तू पटकन घरी जा, तिला खाऊ घाल, मी काम संपवून आलेच.’ त्यानेही कुरकूर न करता ते सारं निभावले. नंतर नंतर छोटीचा अभ्यास, होमवर्कही मोठीच बघायची, आनंदानं. मी बऱ्याचदा परिषदांना जायची तेव्हा मुलींचा बाबाच भरवायचा, आंघोळी घालायचा. तेव्हा, ‘मी सुवर्णमध्य शोधला’ असं म्हणण्यापेक्षा माझ्या इच्छाशक्तीला परिस्थितीनं साथ दिली, ‘त्या’नं हात दिला असंच म्हणावं लागेल..
– ऋतुजा अयाचित, लातूर.

कामाची त्रिसूत्री
मी सध्या अमेरिकेत असून, सिन्टेल इंक या कंपनीत  एंगेजमेंट डायरेक्टर आहे. संगणक क्षेत्रात असल्याने आणि सहकारी जगभर पसरल्याने कामाच्या वेळा या बऱ्याचदा २४/७ अशाच असतात. मला तेरा वर्षांची मुलगी आहे. या सर्वामध्ये ऑफिस आणि घर तसंच स्वत:कडे लक्ष पुरवणं हे म्हणजे तारेवरची कसरत. पण आता २० वर्षांच्या अनुभवानंतर एक त्रिसूत्री तुमच्यासमोर मांडत आहे. कामाचं नियोजन- मी कामाची फक्त यादी काढत नाही तर ते काम कधी करणार हे ठरवून माझ्या कॅलेंडरवर टाकते. कामाची यादीही जास्त वाढत नाही. मुलीसाठी वेळ-  वेळ मिळतो तेव्हा मी मुलीच्या सॉफ्टबॉल टीम किंवा विज्ञान ऑिलपियाडसारख्या स्पर्धामध्ये काम करते, ज्यायोगे मला तिच्या बरोबर वेळ घालवता येतो, तसंच रोजच्या कामातून वेगळेपणासुद्धा मिळतो. खाणे- मी कायम पर्समध्ये बदाम, अक्रोड, खजूर ठेवून देते. ज्यामुळे कधीही भूक लागली की पटकन खाता येतात. सकाळीही नाश्ता करून ऑफिसला जाते. ज्यायोगे घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायची शक्ती मिळते.
रत्नांगी मालपेकर, शिकागो

डॉक्टरमधलं आईपण..
डॉक्टर आणि आई दोन्ही जबाबदाऱ्या मोठय़ा आहेत, पण सगळ्याच स्त्री डॉक्टर्स या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडताना दिसतात. डॉक्टरच्या व्यवसायात असल्याने स्वत:च्या हौसेमौजेसाठी फार वेळ देता आला नाही. मला आठवतंय, एखादा गंभीर रुग्ण आला की २४ तास सलग मेहनत करायला लागायची. अशा वेळी डॉक्टरमधली आई लुप्त होऊन जायची. पण घर हॉस्पिटल एकाच इमारतीत असल्यामुळे मधून मधून मुलांना भेटायचं. त्यांचा अभ्यास, दूध पिणं, जेवण या गोष्टी सांभाळायच्या. माझी तीनही मुलं खूप समजूतदार असल्यामुळे आणि पती डॉक्टर कुलकर्णी सहकार्य करीत असल्यामुळे फार अडचण आली नाही. पण मुलांना विश्वासात घेणे फार महत्त्वाचं असतं. त्यांना रुग्ण किती गंभीर आहे- त्याची जाणीव करून द्यावी लागायची आणि मग मनोमन त्यांचा प्रामाणिक कष्ट आणि सतत कार्यमग्न राहण्यावर विश्वास वाढत गेला. आज तिन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. लातूर जवळ एका गावी सेवालय नावाची संस्था-अनाथ एच.आय.व्ही पॉझिटीव्ह मुलांसाठी रवी बापटले चालवतात. तिथे मी नेहमी जाते. लहान मुलांबरोबर वेळ घालवते. त्यांना खाऊ, कपडे, आर्थिक सहाय्य जमेल तेवढे करते मग माझ्या अपराधी मनाला बरं वाटतं आणि मानसिक समाधानानं रोजचं आयुष्य सुसह्य होतं, समृद्ध होतं.
डॉ. माया कुलकर्णी, लातूर

यांचाही प्रतिसाद उल्लेखनीय होता सविता रामनामे, जयश्री कुलकर्णी, शामला क्षीरसागर, कल्याणी बिदनूर, शोभना ठाकूर , ऋचा चाळके, दीपा गोखले, रत्नप्रभा पाटील , स्मिता पगारे, सुनंदा सपकाळ, शैलजा दांदळे , रश्मी ठोसर, आशा जाधव, सविता जोशी, सुनंदा हर्णे-कुलकर्णी, गौरी साठे, स्पप्नगंधा कुलकर्णी , रिता चिमलवार, उज्ज्वला जोशी, नलिनी चौलकर, शर्मिला दामले, अरुणा जोशी, साधना वैद्य, नागरत्ना नागेश सावंत, स्मिता पिंपळे, स्मिता लिभने नलिनी भांडारकर, माधुरी मुजुमदार,नीलम वयाने, अंजणी रेणावीरकर, निरुपमा राजेश