bhogleमुलांना चांगलं आयुष्य , शिक्षण मिळावं म्हणून उषा इंगळे  रिक्षा चालवतात.  दहा-दहा तास खाचखळग्यांच्या रस्त्यांवरून रिक्षा चालवणं हाडं खिळखिळं करणारं असतं, ‘त्या’ दिवसांत तर जास्तच. तरीही त्या पुरुषांच्या या ‘लायनीत’ काम करताहेत..  स्वकष्टाने जगताहेत..

‘‘ओ ऽ गाववालेऽ काय विचारताय? फुडं बसू का? डोळे फुटले का तुमचे? मागं तीन शिटा रिकाम्या हायेत. दिसत नाय? जा, त्या म्होरल्या रिक्षात. आता डबल नाय तिब्बल पैसं दिलंत तरी माज्या रिक्षाला पाय न्हाय लावायचा समजलं? चला व्हा फुडं!’’
सकाळच्या पारी बोहनीच्या टायमाला आसं पॅसेंजर भेटलं की नाट लागतीया धंद्याला! पण काय करनार? अशांना पायताण दाखवावंच लागतं. घाबरायचं कशापायी? मुंबईत नवी होती, या लायनीत नवी होती तवा घाबरायची. पण दाजी धीर द्यायचे. इतर रिक्षावाले सांभाळून घ्यायचे आणि मुंबईत राहणं, टिकणं मुश्कील! इथे टिकायचं आसलं तर अशी भीती, धास्ती, संकोच सोडूनच द्यावा लागतोया. पन हिथं इमानदारीने काम केलं तर मुंबई तुमच्या झुणका-भाकरीची सोय नक्की करते. हा, पण तुम्हाला श्रीखंड-पुरी हवी तर मातुर करा मरस्तोवर कष्ट! मग ती पण मिळल.
दारुडय़ा नवऱ्याला गावाकडे सोडून दोन चिमण्या पोरांना पोटाशी घेऊन मुंबई गाठली तवा हेच ठरविलं व्हतं का मरस्तोवर कष्ट करायचे. पण पोरांना शिकवायचं. त्यांच्या पायांवर त्यांना उभं करायचं. बहिणीने आसरा दिला. कंपनीत कामाला लागले. पगार फक्त तीन हजार! त्यात काय भागना! गावाला परत जायचं नाय! कोणावर भार बनून जगायचं न्हाय! मग करायचं काय? दाजींची रिक्षा होती. त्यांना म्हटलं, ‘‘दाजी मला रिक्षा शिकवाल? मला तुमच्यासारकं या लायनीत यायचंय!’’ पहिल्यांदा ते चमकले. पण लगेच शिकवायला राजी झाले. नात्यातले एक जण म्हणाले, ‘‘उषा हे डेअरिंगचं काम हाय! उगाच नसतं खूळ घेऊ नको डोस्क्यात?’’ पण मी ठाम ठरवलं होतं, रिक्षा लायनीत यायचंच. धोका कुठं न्हाई? आपण व्यवस्थित आसलं की काय बी होत न्हाय! उगा दिवसभर कंपनीत राबून न्यायतर चार घरी धुणंभांडी करून किती पैसे भेटणार? दाजी दिवसाला चांगली कमाई करतात. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? आपल्याला का नाय जमणार हे काम? जमलंच पायजे. त्यांच्याइतकी कमाई आपण पण करू शकतो!
या लायनीत यायचं ठरवलं खरं, पण रिक्षा कुठे होती मजजवळ? भाडय़ाने चालायची तर मालकाची ताबेदारी! ते नको. मग ठरवलं, स्वत:ची रिक्षा घ्यायची! लोनवर रिक्षा घेतली. आता प्रश्न हप्ता कुठून भरायचा? मग दिवसभर कंपनीत काम करायचं. घरी यायचं. पोरांसाठी भाजी-भाकरी करून ठेवायची आणि लगेच रिक्षा घेऊन निघायचं! घटकाभर विश्रांती नाय? तशी रिक्षा चालवायला चार दिवसांत शिकले खरी! पण संध्याकाळच्या टायमाला फुल्ल ट्रॅफिकमध्ये रिक्षा चालवताना घाम फुटायचा. त्यात तोवर माज्याकडे लायसनपण नव्हतं. पण कर्जाचा हप्ता भरायचा तर रिक्षा रोडवर आणायलाच हवी. एकदा ट्रॅफिक पोलीसला चुकवून रिक्षा दामटवली तर शिट्टी मारून त्याने मला थांबवलं. साईडला घेतलं. म्हणाला, ‘मॅडम, लायसन दाखवा!’
‘टाकलंय करायला आरटीओत. अजून आलं नाय!’
‘मग रोडवर कशा उतरला? असं चालवणं बरोबर नाय!’
‘ठाऊक आहे भाऊ! पण रोडवर रिक्षा आणली नाय तर पोरं उपाशी रातात रे माझी!’ लई गयावाया केली तशी त्याला दया आली. म्हणाला, ‘या वेळी सोडतो. पुन्हा गावलात तर दंड करीन!’ हा म्हटलं, आणि सटकले. लवकरच लायसन आलं. मग नोकरी दिली सोडून आणि फुलटाइम रिक्षा लायनीत आले. हळूहळू हिंमत आली. वाटलं जमतंय काम आपल्याला. मग शेअर रिक्षाची लाईन घेतली. ठाणा चेकनाका- ऐरोली- दिघा! मग हळूहळू रिक्षावाले ओळखीचे झाले, पण मी कधी त्यांचा फायदा नाय घेतला. मी कायम लाईनीत रिक्षा भरते. तरीबी पॅसेंजर भेटतात. मला कधी कोणाशी भांडण करावं लागत नाय का तंबाखूची गोळी तोंडात धरून रिक्षा चालवावी लागत नाय! हा. पण या धंद्याला सुरुवात केली तवा लई गंमत व्हायची. पुरुष पॅसेंजर माझ्या रिक्षात पाय टाकायचे आन् ड्रायव्हिंग शिटवर मला बघितलं का लगीच उतरून दुसऱ्या रिक्षात बसायचे. ‘लेडीज रिक्षावाली हाये. कसं बसायचं? हिला नीट चालवता येत असेल ना? काय झालं तर?’ अशा पॅसेंजरच्या मनात शंका! पण लायनीतले दुसरे रिक्षावाले सांगायचे, ‘अहो, मॅडम चांगलं चालवतात. बसा बिनघोर!’ हळूहळू पॅसेंजर ओळखीचे झाले. आता उलट एखादं दिवशी मी दिसले नाय तर चवकशी करतात. पण हा. सुरुवातीला मी खूप पॅसेंजर गमावलेत हे खरं! पण एखादा पॅसेंजर मुद्दाम माझ्यासाठी थांबून राहिलाय असा वेडावाकडा अनुभव मात्र आजवर मला कधी नाय आला.
लेडीज या रिक्षा-लायनीत येत नाय ते चुकीचे हाय. माझंच बघा. मी या लायनीतून मिळालेल्या पैशावर माझं घर सांभाळते का नाय? हा फक्त मेहनत केली पायजे आणि थोडं सांभाळून राह्य़ला पायजे बस्स! मी गाडी भरताना पॅसेंजर बघूनच भरते. दारू प्यायलेल्या, नशेतल्या माणसाला गाडीत घेत नाय. बाईची नजर तल्लख असती. एखादी पॅसेंजर बरोबर नाय वाटला तर सांगायचं जा पुढच्या रिक्षात! शेअरिंगवर पॅसेंजर घेतले की बरं पडतं! चार जण एक ठिकाणचे मिळाले आणि ते एकमेकांच्या ओळखीतले असले तर धोका! रस्ता ओळखीचा नसतो. मीटर किती पडतं ठाऊक नसतं म्हणून काळजी घ्यायची! मग चार जण असे र्अजट काम आहे, भाडं जास्त देतो म्हटलं तरी नाय घ्यायचे ते पॅसेंजर! एखाद्याने विटावा, दिघा पुढे लांब आडबाजूचा पत्ता सांगितला तर गाडी सोडतानाच त्याला सांगून टाकते, ‘‘भाऊ, मला दोन पैसे कमी दे. पण मी तुला नाक्यावरच सोडणार. तिथून तू दुसरी रिक्षा घे.’’ हल्ली कायपण होऊ शकतं ना? तेव्हा आपणच काळजी घ्यायची! सावध राहायचं.
 हा. पण लेडीजसाठी हे काम खूप कष्टाचं आहे. आराम जरापण भेटत नाय. मी पहाटे चारला उठून स्वयंपाक करते. घरातलं आवरते. बरोबर सकाळी साडेपाचला गाडी बाहेर काढते. चांगली धुवूनपुसून, दिवाबत्ती करून! ऊन, पाऊस, थंडी काय का असेना! सकाळभर गाडी चालवून दुपारी दीडला घरी येते. धुणंभांडी उरकते. पुन्हा दुपारी तीनला गाडी काढते ती रात्रीपर्यंत रस्त्यावर! एकच पंचाईत असते. रस्त्यावर चांगली शौचालयं नसतात. घरी येईपर्यंत संडास-बाथरूमला जाता येत नाही. त्यात मासिक पाळीत तर घरच गाठायला लागतं. तो वाया गेलेला एक तास संध्याकाळी भरून काढायचा. त्यात आपले रस्ते खराब! खाच खळग्यांचे! दहा तास दिवसाला गाडी चालवून हाडं पार खिळखिळी होतात. कंबरडं पार मोडून जातं. मासिक पाळीत याचा जास्त त्रास होतो. पण काय करणार? हातावर पोट आहे. त्यामुळे रविवार असो की सणवार! मी सातही दिवस रिक्षा बाहेर काढते. त्यामुळे आराम भेटत नाही. मुलांबरोबर वेळ मिळत नाही. पण शेवटी मी एवढे कष्ट करते ते त्यांच्यासाठीच ना? त्यांना कळतं ते! मुलं आपोआप समजूतदार बनतात. सुट्टी असली, ट्रॅफिक लागला की धंदा कमी होतो. बँकेचे हप्ते असतात. मुलांच्या शाळा-कॉलेजची फी असते. मग अशा वेळी टेन्शन येतं.
 खरं सांगायचं तर गाडीवर बसलं की टेन्शन येतच. एरवीसुद्धा ट्रॅफिकमधून गाडी व्यवस्थित घ्यायला पायजे. कोण कधी कसा टर्न मारेल सांगता नाय येत. बाईकवाले वाट्टेल तसं चालवतात. मध्येच घुसतात. बसवाले तर बाई रिक्षा चालवते पायलं की काही वेळा मुद्दाम रिक्षा कडेला दाबतात. नायतर सुसाट स्पीडने आपल्याला कट मारून जातात. सुरुवातीला खूप भीती वाटायची मला! मी कायम आस्ते आजूबाजूला लक्ष ठिऊनच रिक्षा चालवते. निष्काळजीपणा कधीच करत नाय. कारण आपली चूक नसली तरी कायपण होऊ शकतं. मला नेहमी वाटतं, आपल्या मागे जे तीन जीव आपल्यावर भरोसा टाकून विश्वासाने बसलेत, त्यांची आपण काळजी घ्यायला हवी, त्यांना सुखरूप न्यायला हवं आणि आपली काळजी करणाऱ्या मुलांसाठी आपणही सुखरूप घरी जायला हवं.
 माझी एकच पंचाईत होते. रिक्षा भर रस्त्यात बंद पडते तेव्हा! पण अशा वेळी इतर रिक्षावाले लगेच मदत करतात. रिक्षा गॅरेजपर्यंत नेतात. पॅसेंजरसुद्धा काही वेळा रिक्षा ढकलायला मदत करतात. शेवटी भलंबुरं समाजात असतंच. रिक्षात बसणाऱ्या बाया कौतुक करतात, तू डेअरिंगबाज आहेस, म्हणतात. तेव्हा लय बरं वाटतं. ‘‘लेडीजच्या रिक्षात बसून चाललास काय?’’ असं म्हणून पुरुषमाणसं डोळे मारतात पण दुनिया जेवू घालायला येते का? आपल्या हातात कला हाय तर इमानदारीने भरपूर कमाई करायची!
 मघाच्या गिऱ्हाईकाला हाकलला आणि चार चांगल्या बाया भेटल्या. त्या लय चिडल्या होत्या त्याच्यावर. त्यांना म्हटलं, ‘अहो चिडताय कशापायी? एकदा या लायनीत उतरलं की अब्रूवर बेतू शकतं आणि जिवावरही बेतू शकतं. मरण येणारच आहे तर घाबरायचं कशापायी? सावध राह्य़चं.. जगायचंच तर शेर बनून जगू या की.’
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com