vaat इतक्या मोठय़ा संख्येने स्त्रियांनी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला हे कधी समजलेच नाही.

स्त्रियांना स्वातंत्र्य हवे असेल तर पुरुषांबरोबर संघर्ष करण्याची तयारी हवी. स्त्री पुरुषांमधील बरोबरी समानतेच्या सिद्धांतावर आधारित आहे. कोणाच्या दयेवर नाही.’ हे शब्द आहेत इंद्राणी चटर्जी यांच्या ‘बंगाली भद्र महिला’ या १९३० सालच्या निबंधातील.
हे तेज, वृत्तीतील ही स्वयंपूर्णता स्त्रियांच्या मनामध्ये वाढीस लागली, ती स्त्रियांनी त्या काळात केलेल्या अनेक उठावांमधून झोकून देऊन आंदोलनात घेतलेल्या सहभागामधून. १९२१ मध्ये महात्माजींनी असहकारितेचा, बहिष्काराचा लढा पुकारला आणि त्याला साद देत हजारो तरुण-तरुणी, विद्यार्थिनी, महिला या लढय़ात सामील झाल्या. गांधीजींचा लढा अन्यायाविरोधात असहकार आणि सत्याग्रह या धारदार शस्त्राने आत्मिक बळावर लढण्याचा होता, आणि आत्मिक बळात स्त्री पुरुषांपेक्षा काकणभर सरसच आहे. याची गांधीजींना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी स्त्रीशक्तीला आवाहन केले आणि स्त्रीशक्तीने आपले सामथ्र्य एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सिद्ध केले, की खुद्द गांधीजी म्हणाले,‘‘जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यातील यशाचा मोठा वाटा स्त्रियांना द्यावा लागेल.’’ नेहमीप्रमाणे इथेही स्त्रिया डावलल्या गेल्या. सरोजिनी नायडू, अ‍ॅनी बेझंट, अरुणा असफअली, कमलादेवी चटोपाध्याय यांचे काम महत्वाचे होतेच परंतु त्यांच्याबरोबरच्या शेकडो स्त्रियांचे फार मोठे कार्य अंधारातच राहिले, आमच्या शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातून आम्हाला इतक्या मोठय़ा संख्येनं स्त्रियांनी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला हे कधी समजलेच नाही.
१९३०च्या कायदेभंगाच्या चळवळीत जवळजवळ १७ हजार स्त्रियांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. २१ जून १९३० मध्ये मोतीलाल नेहरू मुंबईत आले असताना प्रचंड निदर्शने झाली. ब्रिटिशांचे सैन्य, पोलीस सज्ज होतेच. कृष्णा सरदेसाई, विमल गुप्ते, कमल सोहोनी, दिलशाद सय्यद, हंसा मेहता, पेरिन कॅप्टन, लीलावती मुन्शी अशा शेकडो स्त्रिया मोठय़ा धैर्याने पोलिसांच्या छडीमाराला आणि मारझोडीला तोंड देत होत्या. नाशिक जिल्ह्य़ातील येवल्याला राधाबाई आपटे यांनी लाठीधारी जमावाला शांत करून घरी पाठवले, ते पोलिसांवर हल्ला करण्यासाठी चालले होते. आहिंसात्मक वातावरण ठेवण्यात त्यांना मोठे यश मिळाले. त्यातील शंभर, सव्वाशे स्त्रियांना तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या.
स्त्रियांची एकता ही स्त्रियांची मोठीच शक्ती आहे, याचा साक्षात्कार स्त्रियांना प्रत्यक्ष अनुभवातूनच होऊ लागला. हे चित्र आहे १९२०-२१ मधले, आपल्यापासून आता दुरावलेल्या लाहोरमधल्या आर्य कन्या महाविद्यालयाच्या प्रमुख लज्जावंती यांनी त्या भागात पुष्कळ स्त्रियांना देशकार्यात भाग घेण्यासाठी प्रेरित केले होते. अनेक श्रीमंत बायकांची देशभक्ती फक्त विदेशी कपडय़ांची होळी करण्यापुरतीच आहे, याची त्यांना जाण होती. त्यांनी मध्यमवर्गीय स्त्रियांना मोठय़ा संख्येने आपल्या आंदोलनात ओढले. या स्त्रिया फारशा शिक्षित नव्हत्या, पण देशप्रेमासाठी काहीही करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. इंग्रजी फॅशनची थट्टा उडवणारी गीते रचून त्या यात्रा, जत्रा वगैरे ठिकाणी म्हणत, लोक जमले की मग विदेशी कपडय़ांची होळी होई. रौलट अ‍ॅक्टनुसार राजद्रोहाच्या कायद्याखाली महिलांना अटक होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा महिलांची एक मोठी सभा झाली. जालंधरपासून अनेक महिला सभेसाठी आल्या. बैठकीसाठी आलेल्या सर्व स्त्रियांनी आपणहून एकत्रित निर्णय घेतला की, एका स्त्रीला जरी अटक झाली, तरी त्या सगळय़ाच्या सगळय़ा तुरुंगात भरती होतील. लाला लजपतरायना मात्र वाटत होतं, की कायद्याचं उल्लंघन करून स्त्रियांनी तुरुंगाचा रस्ता धरू नये.
मुंबईच्या स्त्रिया झुंजार, लढाऊ. १९२०-२१च्या आंदोलनात स्त्रियांनी दारूची दुकाने लुटली. दारू विक्रीचा परवाना सरकार तर्फे जिथे देण्यात येतो, त्या टाऊन हॉलला स्त्रियांनी घेराव घातला आणि लिलाव बंद पाडला. मुंबईकर स्त्रियांच्या या आंदोलनात सहभाग होता सरोजिनी नायडू, उमा कुंडापूर, नंदूबेन कानुगा, पेरिन कॅप्टन (दादाभाई नौरोजींची नात) आणि मणिबेन (वल्लभभाई पटेलांची कन्या) यांचा. इतर शेकडो स्त्रियांना त्या मार्गदर्शन करत होत्या. याच वर्षी मुंबईच्या स्त्रियांनी राष्ट्रीय स्त्री सभेची स्थापना केली. खादीचा प्रचार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतातल्या आगमनावर बहिष्कार घालायचा ठरवून त्यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांशी हातमिळवणी केली आणि कपडा मजुरांचा हरताळ पुकारला. सुरुवातीला चरख्यावर सूत कातण्यावर त्यांनी भर दिला होता. पण मुंबईत कपडा उद्योग हा महत्त्वाचा असल्याने त्यांनी खादी वितरण केंद्रे सुरू केली. या स्त्रिया घरोघरी जाऊन खादी विकत, प्रदर्शने भरवीत. एका वर्षांत या बायकांनी खादी विकून २५ हजार रुपये मिळवले. हाच कित्ता कलकत्त्यात गिरवला वसंती देवी, ऊर्मिला देवी आणि सुनीती देवी या तीन महिला संघटकांनी. त्या स्वत: खादी वापरत आणि परदेशी कापड विकणारी दुकाने लुटत. कलकत्त्यात सभ्य लोकांच्या जीवनात व्यत्यय आणल्याच्या आरोपाखाली तिघींना अटक झाली. त्या काळातल्या ‘अमृत बझार पत्रिकेने’ ही बातमी छापली. लोकांवर त्या बातमीचा एवढा परिणाम झाला, की त्यानंतर लगेच एक हजार पुरुषांनी स्वत:ला अटक करवून घेतली. स्त्रियांची धडाडी पुरुषांनाही प्रेरणा देणारी ठरली. हीच गोष्ट पुढे कलकत्त्याच्या प्रभावतींनी सिद्ध केली. १९०५ पासूनच त्या बंगालमध्ये क्रांतिकारकांना मदत करत होत्या. अमेरिका आणि जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर त्या कम्युनिस्ट क्रांतिकारक गटाशी जोडल्या गेल्या. सफाई कामगारांच्या दोन संपात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे कलकत्त्याच्या ट्रेड युनियनच्या त्या एक प्रभावी नेत्या बनल्या, त्यांनी जणू एक स्त्रीसेनाच स्थापन केली होती. मजूर त्यांना ‘माता’ म्हणून संबोधित. त्यांनी तर ‘दादा’ लोकांची एक गँगच तयार केली होती. त्या इलाख्यात कोणी अपरिचिताने काही गडबड केली, की त्याची पहिली खबर प्रभावतींना मिळे. १९२८ मध्ये सफाई कामगारांचा पुन्हा मोठा हरताळ झाला, पण आता प्रभावतींच्या प्रभावामुळे सफाई कामगार स्त्रियाही यात मोठय़ा संख्येनं सहभागी झाल्या. या बायकांनी पोलिसांच्या अंगावर घाण फेकून आपल्या मनात साचलेल्या रागाला वाट करून दिली, जणू काही आपल्या कृतीतून त्या सांगू इच्छित होत्या की बघा, आमच्या कामाला तुम्ही हलक्या प्रतीचे मानता ना? आम्ही त्याचा वापर आमची ताकद दाखवणारी शस्त्रे म्हणून करू शकतो की नाही!
स्त्रीशक्तीची ही अशी किती रूपं त्या काळानं दाखवली. मणिबेन, उषाताई डांगे, पार्वतीबाई भोरे या महिला नेतृत्वाखाली मुंबईमध्ये श्रमिक आंदोलनावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली. १९२८ साली गिरणी कामगारांच्या हरताळात मोर्चामध्ये सर्वात पुढे स्त्रियांना ठेवलं गेलं. या मागे विचार होता की पोलीस बायकांवर लाठीमार करणार नाहीत. जिथे जिथे काही विशेष दक्षता, तिथे तिथे नेमणूक कोणाची तर स्त्रियांची. संपाच्या काळात कुणी चुकार मजूर गिरणीत कामावर जाऊ नये म्हणून गिरणीभोवती घेराव कुणाचा तर महिलांचा. या बायकाही हुशार. त्या हातात झाडू घेऊन उभ्या राहात. कुणी गिरणीत यायचा प्रयत्न करू लागला की, प्रथम नीटपणे त्याच्याशी बोलून त्याला समजावून सांगत आणि नाही ऐकलं तर केरसुणीनं झोडपून काढत. याच काळात कलकत्त्यात झालेल्या संपात बंगाली बायकांनी तर अशा संपमोडय़ांना चांगलं चोपून काढल्याच्या बातम्या आहेत.
 पेटून उठलेली प्रत्येकच स्त्री दुर्गादेवीचा अवतार असते. एरवी अबला म्हणून काही वर्षांपूर्वीच समजानं घरात कोंडून ठेवलेली स्त्री, पुढच्या इतक्या छोटय़ा काळात समाजाच्या सुखदु:खात इतकी पटकन सहभागी होईल, अशी कल्पना तरी कोणी केली असती का?
डॉ. अश्विनी धोंगडे – ashwinid2012@gmail.com