डॉ. रोहिणी गोडबोले या देशातील नामवंत भौतिकशास्त्रज्ञ व सध्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान संशोधन, त्यातही उच्च ऊ र्जा भौतिकशास्त्रात मोलाचे योगदान असणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व. बी.एस्सी. व एम.एस्सी.मध्ये उज्ज्वल यश ch24संपादन करून न्यूयॉर्क येथील प्रथितयश विद्यालयातून ‘उच्च ऊर्जा भौतिकशास्त्रात’ डॉक्टरेट संपादित केली आहे. १९७९ मध्ये  डॉक्टरेट मिळवून भारतात परतल्यावर काही काळ मुंबईतील टीआयएफआर संस्थेत योगदान, तर १९९५ सालापासून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दिल्लीच्या इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA), बंगलोरच्या इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (IAS) आणि अलाहाबादच्या नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स, या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या तिन्ही संस्थांच्या फेलो म्हणून निवड होण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. देशातील अग्रणीच्या महिला शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते. त्यांचे हे स्त्री शास्त्रज्ञांविषयीचे विचार.

आज भारतातील स्त्री शास्त्रज्ञांची संख्या कमी असली तरी त्यांच्या योगदानाचा दर्जा उच्च आहे. पोषणशास्त्रज्ञ कमला सोहोनी, इलेक्ट्रिकल इंजिनीअर राजेश्वरी चॅटर्जी, रसायनशास्त्रज्ञ असिमा चॅटर्जी, भौतिकशास्त्रज्ञ बिमला बुटी अशा प्रथितयश शास्त्रज्ञ स्त्रियांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले व करवूनही घेतले. हे प्रमाण कमी आहे, यामागे अनेक कारणे आहेत. कुटुंबाने, समाजाने ते समजून घेऊन मदतीचा हात स्त्रीपुढे केला, तर देशातले हे ५० टक्क्य़ांचे बौद्धिक भांडवल, बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक वैविध्य वापरून देशाच्या प्रगतीत अधिक मोलाची भर पडू शकते. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त तरुणींनी या क्षेत्रात यावे आणि तसेच शास्त्रमार्ग  अर्धवट सोडणाऱ्यांनी परत त्याकडे वळावे, हीच अपेक्षा.

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
HDFC Life Insurance Company appoints Keki Mistry
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप

सामान्यपणे विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण विज्ञान क्षेत्राशी संबंधित  विविध गोष्टींचा आढावा घेतो. उदाहरणार्थ, भारताचे विज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान, गेल्या वर्षांत भारतातून झालेली विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, ती करणारे शास्त्रज्ञ, भारताचे विज्ञान क्षेत्रातील स्थान उंचावण्यासाठी जरुरी असलेले प्रयत्न आदी. मात्र ‘स्त्रियांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान’ हा अशा प्रकारच्या विज्ञाननिगडित चर्चेचा एक अंगभूत, अविभाज्य भाग असावा असे गेले काही दशके म्हटले जात आहे, नव्हे तर ती एक गरजच आहे. असं असताना  ‘शास्त्र व संशोधन क्षेत्रातील स्त्रियांचे स्थान’ याची चर्चा फक्त स्त्री दिनापुरती मर्यादित न ठेवता आजच्या दिवशी त्यावर चर्चा करणे हा शास्त्र क्षेत्रातील ‘लिंग समानता’ (Mainstreaming of gender in science) आणण्यास सुरू असलेल्या प्रयत्नांच्या यशाचा दाखला म्हणता येईल.
 गेल्या ३० ते ४० वर्षांच्या काळात स्त्री शास्त्रज्ञ म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत असताना आलेले अनुभव, गेल्या १४-१५ वर्षांमध्ये या विषयात केलेले काही काम यामधून जे काही उमगले आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र! स्त्रियांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान वाढावे, यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील त्यात हातभार लावण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आशा हीच की, जशी आता डॉक्टर, आय.टी. मधल्यांविषयी बोलताना ‘स्त्री’ ही उपाधी लावण्याची जरुरी भासत नाही, तसेच नजीकच्या काळात शास्त्रज्ञांबद्दल बोलताना त्यांच्या ‘स्त्री’पणाचा उल्लेख करावा लागू नये. म्हणजेच जनमानसात शास्त्रज्ञ व पुरुष हे समीकरण जोडलेले राहणार नाही! या ध्येयाकडील समाजाच्या वाटचालीस हा माझा हातभार!
‘स्त्रियांचा शास्त्रातील सहभाग इतका महत्त्वाचा का?’ या प्रश्नाचे उत्तर सरळच आहे- ‘व्यक्ती तितक्या प्रकृती!’ त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची, स्त्री अथवा पुरुष, संशोधन करण्याची पद्धत वेगळीच. कलेप्रमाणे संशोधन क्षेत्रातही सर्जनशीलतेला अत्यंत महत्त्व आणि वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची आपली शैली! तेव्हा स्त्रियांनी संशोधनात भाग न घेतल्याने शास्त्राचे जग जगातील ५० टक्के बौद्धिक क्षमतेला मुकते आणि या वैविध्यालाही!  कुठलाही व्यवसाय करताना ५० टक्के भांडवल कपाटात बंद करून कुणीच ठेवत नाही, मग मानवजातीच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याच्या या प्रयत्नात आपण आपले संपूर्ण बौद्धिक भांडवल का वापरीत नाही? स्त्रियांचा प्रभावी सहभाग शास्त्र क्षेत्रात न असणे, म्हणजे आपण सर्व जण विश्वाची रहस्ये उलगडण्याचा/ आकलण्याचा हा प्रयत्न, एक हात मागे बांधूनच करीत आहोत असे म्हणावेसे वाटते. असे करण्यात काही खूप शहाणपण आहे असेही नाही. हे वैविध्य शास्त्राच्या सर्वागीण प्रगतीला मदतच करेल. तेव्हा स्त्रियांचा शास्त्रातील सहभाग फक्त स्त्रियांच्या बौद्धिक क्षमतेला पूर्ण वाव मिळण्याच्या दृष्टीने नव्हे, तर शास्त्राच्या सर्वागीण प्रगतीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. अर्थातच वरील विधान फक्त स्त्रियांच्याच शास्त्रातील सहभागाला लागू पडते असे नाही. सर्वच दुर्लक्षित अथवा वंचित गटांना हे लागू पडू शकते.
खरे म्हटले तर आपल्या देशात लोकसंख्येच्या तुलनेत उच्च दर्जाच्या शास्त्रज्ञांची संख्याच प्रमाणत: कमी आहे, त्यात स्त्री शास्त्रज्ञांची संख्या अधिकच कमी. मी येथे फक्त नैसर्गिक विज्ञान, तंत्रविज्ञान व वैद्यकीय क्षेत्रांबद्दलच विचार करीत आहे, हे मी येथे स्पष्टपणे मांडते, कारण या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल मला थोडी फार तरी माहिती आहे. शिवाय अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा विषयांमध्येदेखील स्त्रियांची संख्या कमी असली तरी वरील इतर शास्त्रज्ञांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे असे मला वाटते. उदाहरणार्थ आजपर्यंत दिल्या गेलेल्या एकूण ३५ इन्फोसिस शास्त्रीय पुरस्कृतांमध्ये ६ स्त्री शास्त्रज्ञ आहेत व त्यातील ५ सामाजिक शास्त्र अथवा मानवशास्त्रांमध्ये काम करीत आहेत.
संख्याबळ कमी, पण दर्जा उच्च
तेव्हा विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे प्रमाण व अर्थातच योगदानही प्रमाणत: कमी आहे. प्रत्यक्ष टक्केवारी पाहिली, की हे सत्य फारच प्रकर्षांने जाणवेल. आपल्या देशातील संशोधन व प्रशिक्षण यासाठी प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळय़ा संस्थांमध्ये स्त्री वैज्ञानिकांचे प्रमाण जेमतेम १५-२० टक्के आहे. उच्च पदांवर काम करणाऱ्यांमध्ये अधिकच कमी व संचालकपदी तर स्त्री वैज्ञानिक जवळजवळ नाहीतच, असे म्हटले तरी चालेल. दरवर्षी भटनागर पुरस्कारविजेत्यांची नावे असोत, की शास्त्र क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल पद्म पुरस्कार असो, स्त्रियांची नावे त्यात अभावानेच आढळतात. २०१४ मार्चपर्यंत जाहीर झालेल्या ४६२ भटनागर पुरस्कारांपैकी फक्त १५ पुरस्कार स्त्री शास्त्रज्ञांना दिले गेले आहेत, म्हणजे फक्त ३ टक्के. पदार्थविज्ञान क्षेत्रात तर आजतागायत एकाही स्त्रीला हे पारितोषिक मिळालेले नाही. सर्वसाधारणपणे पद्म पुरस्कारांमध्येही तसे स्त्रियांचे प्रमाण कमी नाही; पण विज्ञान क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल पद्म पुरस्कार मिळालेल्या स्त्रियांची संख्या बहुतेक दोन हातांच्या बोटांवर मोजता येईल. भारतातील वेगवेगळय़ा शास्त्रीय अकादमींच्या सदस्यांमध्ये स्त्री शास्त्रज्ञांचे प्रमाणही कमीच. अभियांत्रिकी अकादमीतली परिस्थिती फारशी वेगळी नाही. सर्वसामान्य माणसाला भारतीय शास्त्रज्ञांची नावे विचारली, तर क्वचितच एखाद्या स्त्री शास्त्रज्ञांचे नाव त्याच्या तोंडी येईल;     
परंतु सगळीकडे संख्या इतक्या कमी असल्या तरी स्त्री शास्त्रज्ञांच्या योगदानाचा दर्जा कमी आहे असे मात्र नाही. पोषणशास्त्रज्ञ कमला सोहोनी, इलेक्ट्रिकल इंजिनीअर राजेश्वरी चॅटर्जी, रसायनशास्त्रज्ञ असिमा चॅटर्जी, भौतिकशास्त्रज्ञ बिमला बुटी अशा प्रथितयश शास्त्रज्ञ स्त्रियांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले व करवूनही घेतले. प्रा. असिमा चॅटर्जी भारतातील विद्यापीठातील प्रथम स्त्री प्रोफेसर, त्यांनी कलकत्ता विद्यापीठात नैसर्गिक पदार्थाच्या रसायनशास्त्राच्या अभ्यासाला चालना दिली, भारतीय औषधी वनस्पतींच्या रासायनिक संशोधनाला गती दिली व त्या क्षेत्राचे अनेक वर्षे नेतृत्वही केले. ८० वर्षांपूर्वी बंगळुरू इंडियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या पहिल्या विद्यार्थ्यांमध्ये एका स्त्रीचा (डॉ. जानकी अमल यांचा) समावेश होता. जरा आजकालच्या काळातील गोष्टी करायच्या झाल्या तरीदेखील आपल्याला हेच आढळेल की, स्त्रियांचे संख्याबळ कमी म्हणून दर्जा कधीच कमी नव्हता.
काही दिवसांपूर्वीच मी माझ्या १९७२-१९७४ सालातील आय.आय.टी. (पवई) येथील ‘विद्यार्थिनींच्या वसतिगृहात’ असलेल्या मैत्रिणींशी बोलत होते. त्या वेळेस इनमिन २५-२८ विद्यार्थिनी होत्या व हजारेक विद्यार्थी; परंतु आजच्या आय.आय.टी.च्या ‘डिस्टिंगविश्ड अॅल्युमनी’च्या यादीत त्या २८ पैकी तिघींची नावे आहेत. म्हणजे तंत्रविज्ञानांच्या या बालेकिल्ल्यात स्त्रियांचे प्रमाण खूपच कमी होते; पण प्रमाणत: ‘यशस्वी’ विद्यार्थ्यांमध्ये त्यांची संख्या जास्तच होती.
आणखी जवळच्या काळातील यशोगाथांबद्दल बोलायचे तर ‘मिसाइल’ लेडी टेसी थॉमस अथवा ‘रिमोट सेन्सिंग’ तज्ज्ञ गीता वरदन, टाटा इन्फोसिस पुरस्कारविजेत्या शुभा टोळे यांची नावे आपल्याला सहज आठवतील. किरण मजुमदार शॉ यांची व्यवसायातील घोडदौड सर्वानाच माहिती. मी अर्थातच उदाहरणादाखल काही प्रसिद्ध नावे सांगितली; पण अशी अनेक नावे सांगता येतील. तर सारांश काय, भारतात स्त्री शास्त्रज्ञ/ तंत्रज्ञ यांचे प्रमाण कमी, उच्च पदविभूषित तर आणखीनच कमी; पारितोषिके, पुरस्कार यांतही त्यांचा भाग प्रमाणत: कमी; पण ज्या स्त्री शास्त्रज्ञ/ तंत्रज्ञ क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचे कार्य आहे उच्च पातळीचे!
अध्ययन/अध्यापनातील वाढती संख्या
आणखी एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की, भारतात शास्त्रीय संशोधनात स्त्रियांचे प्रमाण कमी, पण विज्ञानातील अध्ययन/अध्यापन क्षेत्रात मात्र काही स्त्रियांची कमी नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा पदवीपूर्व क्षेत्रात विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्यांत स्त्रियांचे प्रमाण १० टक्के इतके जेमतेम होते. आज विद्यालये व महाविद्यालयांमध्ये विज्ञान क्षेत्रात पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांमध्ये ४०-४५ टक्के विद्यार्थिनी असतात. इतकेच नव्हे, तर पदव्युत्तर परीक्षांमध्ये पहिला क्रमांक, सुवर्णपदके पटकविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. इतकेच नव्हे, तर गेल्या तीन दशकांमध्ये विज्ञानात डॉक्टरेट करणाऱ्यांमध्येदेखील स्त्रियांचे प्रमाण २५ ते ३५ टक्के आहे; परंतु शेवटी प्रथितयश विद्यापीठे व संशोधन संस्था यात मात्र हे प्रमाण १०-१५ टक्क्यांच्या वर नाहीच नाही. तेव्हा या भांडय़ाला गळती का व केव्हा लागते याचा विचार करायलाच हवा. सारांश हा की, भारतात विज्ञान शिकणाऱ्या व शिकवणाऱ्यांमध्ये स्त्रियांचा अभाव नाही; पण विज्ञान संशोधन हा ज्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे अशांमध्ये मात्र हे प्रमाण कमीच. यातही एक लक्षणीय गोष्ट अशी की, विद्यालये, महाविद्यालये येथे विद्यार्थिनींची संख्या वाढत असली तरी जिथे प्रवेश मिळविण्यासाठी दुसऱ्या गावी जाऊन, पैसे ch12भरून प्रशिक्षण द्यावे लागते त्या आय.आय.टी.मध्ये मात्र हे प्रमाण अजून कमीच. सुदैवाने नुकत्याच सुरू झालेल्या आय.आय.एस.ई.आर. (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च) अथवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस, पदवीपूर्व कार्यक्रम यात आता २५-३० टक्के विद्यार्थिनी दिसतात. पुणे, मोहाली येथील केंद्रात तर नवीन महिला अध्यापकांचे प्रमाणही जास्त आहे. अशा गोष्टी वाळवंटात हिरवळ दिसावी तशा मनाला सुखावतात!
 जगातील इतर देशांशी तुलना केल्यास, तेथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेथे तंत्र व विज्ञान क्षेत्रातील विद्यापीठातील विद्यार्थिनींचे प्रमाणच कमी आहे. त्यामुळे ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ असा प्रश्न विचारू शकतात. भारतात डॉक्टरेट पदवीपर्यंत हा प्रश्न उद्भवताना दिसत नाही; परंतु शेवटची परिस्थिती मात्र भारत आणि इतर देशांमध्ये फार वेगळी नाही व जरी अध्यापन क्षेत्रात भारतात स्त्रियांचे प्रमाण जास्त असले, तरी संशोधन व अध्यापन करणाऱ्या संस्थांमध्येच फारकत झाली असल्याने संशोधनातील स्त्रियांचे प्रमाण आणि परिस्थिती शेवटी भारतात आणि सर्व जगात एकच आहे आणि या गळक्या भांडय़ांची छिद्रे बुजवायची कशी, हाच एक प्रश्न सर्वापुढे आहे.
गळती का होते?
पीएच.डी व त्यानंतर काही तरी कारणाने गाडी रूळावरून घसरते. जर त्या एका गतीरोधकावरून सहजतेने पुढे जाता आले, तर मात्र संशोधनाच्या रस्त्यावर स्त्रिया पुढे भरधाव वेगाने जातात हे मी वर दिलेल्या यशस्वी स्त्री शास्त्रज्ञांच्या उदाहरणांवरून लक्षात आलेच असेल. तेव्हा विचार करण्याजोग्या दोन गोष्टी. ही गळती का होते व ती कशी थांबवायची. अर्थातच शास्त्र संशोधन करणाऱ्यांचा ओघ वाढवायचा कसा? शास्त्रज्ञांची संख्या भारतात कमी असता हा अपव्यय राष्ट्रीय पातळीवर आपल्याला पेलतो का, हाही एक विचार करायलाच हवा. भारताच्या संदर्भात स्त्री शास्त्रज्ञांचे प्रमाण व त्यांचे स्थान उंचावण्यासाठी किमान तीन गोष्टींची गरज आहे. १) या बौद्धिक भांडवलातील गुंतवणुकीचा अपव्यय थांबविणे. २) पीएच.डी करूनही शास्त्राचा मार्ग सोडून देणाऱ्यांची संख्या कमी करणे आणि ३) त्या क्षेत्रात राहणाऱ्या स्त्रियांचा संशोधन संस्था, विद्यापीठे यात व विज्ञानातील राष्ट्रीय धोरणांच्या बाबतीतील चर्चामध्ये नेतृत्वपदी तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी असलेल्या पदांवरील सहभाग कसा वाढेल याचा विचार करून ते अमलात आणणे.
स्त्री शास्त्रज्ञ होणे आवाक्यातले
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्रियांचा शास्त्रातील सहभाग व त्यांचे स्थान उंचावण्याची व या क्षेत्रात लिंग समानता आणण्याची चर्चा सुरू झाली तेव्हाच भारतातही ही चर्चा सुरू झाली. त्या वेळेसच वरील तिन्ही मुद्दे स्वसिद्धच होते. या प्रश्नांवर संशोधन, कारणमीमांसा करून कोणत्या प्रकारची सुधारणा करता येईल हा अभ्यास करणे जरुरीचे असेल, तर काही गोष्टी अशा प्रकारचे संशोधन करण्याच्या आधीच करता येणे शक्य होते. भारताच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीच्या त्या वेळच्या सचिवांचे,     डॉ. राममूर्तीचेही हेच मत होते. त्यातूनच भारतात संशोधनाचा मार्ग ज्यांना काहीही कारणांमुळे सोडावा लागला अशा स्त्रियांना परत त्या मार्गावर येऊ शकता येईल, त्या प्रवासात मदत होईल अशा प्रकारच्या खास निधी योजना राबवायला त्यांच्या विभागाने सुरुवातही केली व गेली १५ वर्षे त्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे डी.एस.टी.कडे संशोधनासाठी आर्थिक आधार मागण्यासाठी येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढले. स्त्री शास्त्रज्ञांनी डी.एस.टी.कडे पाठविलेल्या अशा प्रकल्पांत १२-१५ वर्षांत ७ पट वाढ झाली आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (डी.बी.टी.)नेही अशा प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. भारतीय सरकारचा एक स्त्री शास्त्रज्ञ सचिव (डॉ. मंजू शर्मा) असणारा हा एकमेव विभाग ही नमूद करण्याजोगी गोष्ट! डी.एस.टी.ने शास्त्र फोर्स (पाहाणे)ही स्थापित केला होता. त्यांना काही प्रमाणात डेटा संकलन करून अभ्यास करून आपला अहवाल व शिफारसी सरकारला सादरही केल्या आहेत. २००९ साली अद्याप त्यावर म्हणावी तशी कारवाई झालेली नाही. या सर्व गोष्टींबद्दल बरीच माहिती देण्याजोगी आहे; पण जागेअभावी मी येथे देत नाही. अधिक माहिती आपल्याला येथे मिळू शकेल.
http://www.ias.ac.in/womeninscience/othersources1.htm
अर्थातच सर्वच गोष्टी काही नवीन धोरणे आखून अथवा खास निधी योजना राबवून होत नाहीत. काही काही गोष्टी शास्त्रज्ञ व शास्त्रीय अकादमीही करू शकतात. वर सांगितलेल्या योजनांमुळे स्त्रियांच्या शास्त्राचा मार्ग सोडून दिल्यामुळे जे नुकसान होत होते ते थोडय़ा फार प्रमाणात भरून काढण्यासाठी मदत झाली, तर शास्त्रज्ञ व शास्त्रीय अकादमींनी ही गळती मुळातच बंद करता कशी येईल व ओघ वाढविता कसा येईल यासाठी काय योजना राबवाव्यात याचा विचार केला. बंगळुरू येथील इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्स (आयएएस) या प्रश्नावर विचार करण्यासाठी व काही योजना राबविण्यासाठी एक समिती नेमली व ‘अॅकॅडमी पॅनेल फॉर वुमेन सायन्स’ (wis)चा जन्म झाला. तेव्हा असे वाटले की, शास्त्र क्षेत्रात शिकणाऱ्या या तरुण मुलींना या मार्गावरूनच ज्यांनी प्रवास केला आहे त्यांच्या कहाण्या कळल्या, तर त्यांना समजेल की, स्त्री शास्त्रज्ञ होणे हे सर्वाच्याच आवाक्यातले आहे. ती जर आस मनात असेल तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला काहीच प्रत्यय नाही. प्रयत्नांना यश मिळतेच. त्यांच्या आधी या मार्गावरून काही लोकांनी प्रवास केला आहे. ही अगदीच काही न चाललेली पाऊलवाट नाही! फक्त आपल्याला त्या पाऊलवाटेचा राजमार्ग व्हायला हवा आहे. स्वतंत्र भारतात वाढलेल्या, काम करणाऱ्या १०० स्त्री शास्त्रज्ञांनी त्यांच्या कहाण्या ‘लीलावतीच्या (मानस) कन्या’ (Lilawati’s Daughters) या पुस्तकात लिहिल्या त्या होतकरू शास्त्रज्ञांना वरील संदेश देण्यासाठी! तरुण स्त्रियांचे शास्त्रातील सहभाग वाढावा म्हणून Wis  व पॅनल आणखीही गोष्टी करीत आहे. तीही माहिती आपल्याला वरील लिंकवर मिळेलच.
‘लीलावतीच्या’ १०० मानसकन्यांपैकी २५ जणींच्या कहाण्या जरा लहान वयोगटाला आकर्षक वाटतील अशा पद्धतीने लिहून व त्याचबरोबर त्या शास्त्रज्ञ जे संशोधन करतात त्या विषयातील पुढच्या संशोधन शक्यतांबद्दल थोडे लिहून आम्ही A Girl’s Guide to a Life in Science  असे पुस्तक ‘जुबान’ या प्रकाशकांबरोबर प्रसिद्ध केल आहे.
 इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया व स्त्री शास्त्रज्ञांमध्ये वर नमूद केलेली गळती हा महत्त्वाचा फरक आहे. स्त्री शास्त्रज्ञांच्या बाबतीत पीएच.डी. व त्यानंतरच संशोधन केल्यानंतरचा काळ दोन दृष्टींनी अतिमहत्त्वाचा असतो. एक तर या काळातच कुठल्याही शास्त्रज्ञाला आपली स्वत:ची ओळख शास्त्र जगताला पटवून द्यायची असते व स्त्री शरीराचे घडय़ाळ ही या काळातच टिकटिकत असते. नवीन जोडप्याला कुटुंबाची सुरुवात करणे, मुलांना जन्म देणे व त्यांचे अति लहान वयात संगोपन करणे, कधीकधी त्यातच वृद्ध आईवडील व सासूसासरे यांची काळजी घेणे या विविध जबाबदाऱ्या यातील मुलांना जन्म देणे हे तर फक्त स्त्रीलाच शक्य आहे; परंतु बाकीच्या सर्व जबाबदाऱ्याही तिच्याच आहेत, अशी आपली सामाजिक संकल्पना आहे. त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना एक तर हा मार्ग सोडूनच द्यावा लागतो अथवा त्यांच्या संशोधानाची धार कमी होते व त्यांचे संशोधन कार्य पुरेसे स्पर्धात्मक राहात नाही. जवळजवळ सर्व यशस्वी स्त्री शास्त्रज्ञ या काळातही स्पर्धात्मक संशोधन करीत राहिल्या असे दिसते. तेव्हा बाल संगोपन, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ही गळती होते, असे बऱ्याच जणांचे मत आहे व ते बहुतांशी खरेही आहे. शास्त्रातील संशोधनाच्या मार्गावर कुठलीही प्रगती कुणासाठी थांबत नाही. तेव्हा ज्यांना या क्षेत्रात यश मिळवायचे आहे त्यांना कौटुंबिक कारणांसाठी तो मार्ग काही काळ सोडूनच जाणे तितकेसे इष्ट नाही. सोडावाच लागला, तर आता परत येण्यासाठी दरवाजे आहेत खरे. या काळात हा मार्ग सोडून न देण्यासाठी पतीकडून, कुटुंबाकडून, संस्थेकडून व समाजाकडून मदतीचा हात पुढे येणे गरजेचे आहे. स्त्री शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रात कार्य करणे हे सर्व स्तरांवर महत्त्वाचे मानले गेले, तर ही जाणीव सहज होऊ शकते. अगदी त्या तरुण शास्त्रज्ञांच्या गुरूंनादेखील (स्त्री अथवा पुरुष) हे महत्त्व पटायला हवे. या गोष्टीकडे मनापासून सर्वानीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शास्त्रीय समुदायाचाही यात समावेश आहेच. अर्थातच काही धोरणात्मक बदल केल्याने या प्रक्रियेला वेग येईलही. या सर्वाची पायाशुद्ध चर्चा करून काही धोरणे राबवावयास हवी. भारतात याचा अजूनही अभाव आहे. या संदर्भात डब्लू.आय.एस.तर्फे आम्ही केलेल्या एका सर्वेक्षणाबद्दल सांगावेसे वाटते. सर्वेक्षणाचे नाव होते
Trained scientific women power – What fraction are we losing and why? त्यात ज्या स्त्रियांनी पीएच.डी.नंतर शास्त्राचा मार्ग सोडला आहे अशांचाही समावेश होता, पुरुष शास्त्रज्ञांचाही. सर्व पुरुष व ज्यांनी शास्त्राचा मार्ग सोडला नव्हता त्या सर्वाच्या मते ‘स्त्री शास्त्रज्ञ कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे हा मार्ग सोडत असावेत.’ तर ज्या स्त्रियांना हा निर्णय घ्यावा लागला होता त्यांनी स्पष्ट सांगितले की, योग्य संधीच्या अभावी त्यांना हा मार्ग सोडावा लागला. म्हणजे कुटुंबाने, संस्थेने, समाजाने काही गोष्टी समजून घेतल्या, तर अशा योग्य संधी निर्माण करता येतीलच. अशा संधी निर्माण करणे तर जाऊच दे पण अनेकदा ‘पती-पत्नी दोघांना एकाच संस्थेत नोकरी नियमांमुळे देता येत नाही,’ असे सांगून हातची संधी हिरावूनही घेतली जाते. याचा विचार आणि चर्चा व्हायलाच हवी. अमेरिकेत आजकाल पती-पत्नी दोघेही शास्त्रज्ञ असतील तर एकाच ठिकाणी, एकाच शहरात कार्यक्षेत्र असावे यासाठी खास प्रयत्न केले जातात. आयएएस, आयटीएस अथवा बँकेतील अधिकाऱ्यांसाठी शक्य असेल, तर पती-पत्नींना एकत्र/जवळ राहता येईल, असे बघण्याचा नियमच आहे. तसा आपल्याकडेही व्हायला हवा. मात्र याचबरोबर तिसऱ्या गोष्टीचीही चर्चा व्हायला हवी, ती म्हणजे स्त्रिया संचालकपदी, निर्णय घेणाऱ्या पदांमध्ये सहभाग व त्यांनी केलेल्या कामगिरीची स्वीकृती व कौतुक. फ्रान्समधील C.N.R.S. संस्थेतील एका अभ्यासानुसार स्त्री शास्त्रज्ञांना या कार्यशिडीवर एकाच ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा दीड ते दोनपट जास्त चांगले काम करावे लागते. सामान्यपणे पारितोषिके, पुरस्कार यांचे निर्णय बऱ्यापैकी व व्यक्तिनिष्ठ असू शकतात, ते वस्तुनिष्ठ असतात असे नाही. त्यामुळे अनेकदा काही पुरुष शास्त्रज्ञांच्या बाबतीतही पात्रता असून त्यांची निवड होत नाही. फक्त स्त्री शास्त्रज्ञांची संख्याच कमी असल्याने अशा चुकीचा परिणाम अधिक गंभीर होतो. या सगळय़ा पदांचा, पारितोषिकांचा एक परिणाम असतो, तो म्हणजे सार्वजनिक जनमानसात जाणवणारे अस्तित्व, त्यामुळे स्त्रिया उच्च दर्जाच्या शास्त्रज्ञ असतात हे सत्य मग लोकांच्या विचारसरणीचा भाग होऊ शकतो.
  स्त्री शास्त्रज्ञ तिथे कमी प्रमाणात पोहोचतात याची काही कारणे मी वर सांगितली; पण एक कारण आपल्याला विसरून चालणार नाही. सर्व निर्णय गुणवत्तेनुसारच होतात व एकदा स्त्री संशोधन क्षेत्रात स्थिरावली, की काही वेगळे करावे लागत नाही, ही थोडय़ा फार प्रमाणात परीकथा आहे. ‘मिरांडा फ्रिकर’ याला ‘एपिस्टेमिक इनजस्टिस’ असे म्हणतात. त्याप्रमाणे पूर्वग्रहदूषित मूल्यमापन चुकीचे निर्णय देऊ शकते. जरी शास्त्रीय सिद्धांताची स्वीकृती तो सिद्धांत मांडणाऱ्याच्या लिंगावर अवलंबून नसली तरी त्या संशोधनाचे मूल्यमापन कधी कधी कुणी संशोधन केले आहे यावर अवलंबू शकते आणि परत हे वाक्य फक्त स्त्री-पुरुष या संदर्भात नव्हे, तर सर्वच दुर्लक्षित क्षेत्रांतील लोकांनी केलेल्या कामाला लागू पडतो. हा अन्याय दूर करण्यासाठी काय करावे, काही धोरणात्मक बदलांनी हे होऊ शकेल याचा विचार करायला हवा.
अगदी शेवटी, परंतु खूपच महत्त्वाचे हे की, भारतात माझ्या मते स्त्री तंत्रज्ञांना इस्रो व डीआरडीओत सर्वात जास्त स्वीकृती मिळालेली आहे. तेव्हा या संस्थांमध्ये काही तरी ठोस घडत असावे. ते काय याचा अभ्यास करायला हवा. या दोन्ही संस्था ध्येयसापेक्ष काम करीत असल्याने, कामातील प्रत्येक टप्प्यात महत्त्व आधीच अधोरेखित झालेले असते. त्यामुळेच त्या केलेल्या मापाचे मूल्यमापन वर सांगितलेल्या ‘एपिस्टेमिक इनजस्टिस’पासून कदाचित मुक्त असेल. या शेवटच्या वाक्यात मी अर्थातच एक गृहीत मांडते आहे. ते बरोबर असेल किंवा नसेलही; पण चर्चेला जागा आहे. माझ्या मते एका स्त्री शास्त्रज्ञाला यशस्वी शास्त्रीय कारकीर्द, आनंदी घर व संसार हे सर्व असण्यासाठी नशिबाचीही मोठी जोड लागते. जर नशीब या समीकरणातून काढूनच टाकता आले तर फार बरे!
  माझ्या तरुण मैत्रिणींना एकच सांगणे! जर शास्त्र संशोधनाच्या ध्यासाने मन झपाटलेले असेल, तर फक्त ‘स्त्री’ म्हणून हे आपल्याकरिता नाही, हा विचार मनातून काढून टाका! या पाऊलवाटेवर जितकी अधिक पावले पडतील तितक्या लवकर त्याचा हमरस्ता होईल. सो मार्च ऑन!!!  
डॉ. रोहिणी गोडबोले- rohini@cts.iisc.ernet.in