गर्भारपण व प्रसूती या गोष्टीत स्त्रीची भावनिक व शारीरिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असूनदेखील स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार? याबाबतीतलं स्त्रीचं निर्णय न घेणं व वेळेवर न बोलणं हे देखील तिच्या सद्यपरिस्थितीला कारणीभूत नाही का?
एकदा एक माणूस आपल्या पत्नीची आरोग्यविषयक सगळी कागदपत्रं घेऊन माझ्याकडे आला. कोकणात त्यांचं गाव होतं. त्याला तीन मुलं होती व बायकोची कुटुंबनियोजनासाठीची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी, त्याच्या चौकशीला तो आला होता.
बायकोच्या रिपोर्टमधल्या नोंदीनुसार तिच्या हृदयाची एक झडप निकामी झाल्याने तिची झडप बदलण्याची मोठी शस्त्रक्रिया झालेली होती, पण त्यानंतरही तिला दम लागतच होता. चालल्यावर, जिना चढल्यावर ती एकदम थकून जायची. हृदयविकाराचा तिला त्रास होऊ लागला होता व त्यासाठी औषधे चालू होती. ते सर्व केस पेपर्स बारकाईने पाहिल्यावर मी त्यांना सांगितलं की तिच्या हृदयविकाराच्या त्रासामुळे कुटुंबनियोजनाची जी शस्त्रक्रिया हिच्यावर करायची आहे त्यातले धोके कितीतरी पटीने जास्त वाढतात. कदाचित या शस्त्रक्रियेमध्ये तिच्या जिवालाही धोका होऊ शकतो. तिथल्या तिथे बेहोशी देऊन करायचं ठरवलं, व ती भूल नाही चढली किंवा कमी पडली तर धोका आहेच. तीन मुलांच्या आईच्या जिवावरचा एवढा धोका पत्करण्यापेक्षा तुम्ही स्वत:च नसबंदीची शस्त्रक्रिया का करून घेत नाही? ते कितीतरी सोपं, कमी धोक्याचं, कमी वेळाचं, हॉस्पिटलमध्ये दाखलदेखील करावी न लागणारी शस्त्रक्रिया आहे. यावर तो तात्काळ उत्तरला, ‘नाही नाही. मला खेडेगावात किती कामं असतात. तुम्हा शहरातल्या लोकांना कळणार नाही. मला झाडावर चढावं लागतं, मेहनत फार असते वगरे वगरे.’ मी त्याला समजावून सांगितलं, ‘दादा, ही शस्त्रक्रिया केल्यानंतरही तुम्ही सर्व कामं करू शकता. मी खात्री देते. तुमच्या बायकोला मात्र या शस्त्रक्रियेचा धोका जास्त आहे. तिचं काही बरं-वाईट झालं, तर मुलं उघडी पडतील. तुम्ही तुमची शस्त्रक्रिया झाल्यावर अध्र्या तासात चालत बाहेर पडाल. इतकं ते कमी त्रासाचं आहे.’ इतकं सांगूनही तो माणूस आपल्या निर्णयापासून तसूभरही सरकला नाही. ‘हे तर मला गावच्या डॉक्टरने पण सांगितलं होतं, म्हणून तर मुंबईच्या डॉक्टरकडं आलो. ते काही नाही. मी माझी शस्त्रक्रिया करून घेणार नाही. तिची शस्त्रक्रिया तुम्ही करणार का नाही ते बोला, मी त्यातला धोका घ्यायला तयार आहे. तुम्ही नसाल करत, तर चाललो दुसरीकडे.’
काय बोलणार अशा वेळी? ‘ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं !’ हाच प्रकार इथे आहे की नाही? बायकोच्या जिवापेक्षा याला झाडावर चढून कामं करता न येण्याची भीती महत्त्वाची. कधी कधी असा अनुभव येतो की समोरचा रुग्ण किंवा नातेवाईक कितीही समजावून सांगितलं तरी ऐकतच नाही, कारण ते ऐकण्याची त्यांची इच्छाच नसते.
मी ही घटना माझ्या एका युरॉलॉजिस्ट (जे नेहमी पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया करतात) सहकाऱ्याला ऐकवली. त्या वेळेस माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये तो, माझा भूलतज्ज्ञ, माझा सर्जन पती व मी एकटी स्त्री अशा तीन विरुद्ध एक अशा सांख्यिक िलगभेदाच्या वातावरणात तो म्हणाला, ‘अशा लोकांना ना मॅडम, हंटरनं बडवलं पाहिजे. बायकांच्या कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया इतकी कमी त्रासाची असूनदेखील पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया अत्यंत कमी होतात. याला कारण पुरुषांची वर्चस्वी मानसिकता आहे.’ उरलेल्या दोघांनी त्याचं म्हणणं लगेच उचलून घेतलं. वंध्यत्वाच्या तपासण्यांबाबतही आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेच्या बाबतही पुरुष कधीही पुढाकार घेत नाही. यावर त्या तिघांचं एकमत झालं. मला मात्र त्या युरॉलॉजिस्टने केलेल्या विधानाचा सुखद धक्का बसला. मनात आलं, का बरं ही पुरुषांची शस्त्रक्रिया जास्त मान्यताप्राप्त नाही झाली? काही क्षणांच्या सुखासाठीच का हे टाळलं जात असावं का? त्या मानाने ही शस्त्रक्रिया केल्यास तिला कामजीवनात नंतर काहीच बदल जाणवत नाही; पण पुरुषात थोडा फरक पडतो. स्त्रीच्या शस्त्रक्रियेमध्ये असलेले संभाव्य धोके जास्त आहेत; म्हणूनच तर ते कोणी करावे, कधी करावे, कुठल्या ऑपरेशन थिएटरमध्ये करावे; कोणत्या डॉक्टरला, कोणत्या रुग्णालयाला ते करण्याची कायदेशीर परवानगी द्यावी यासाठी खूप कडक नियम आले. एरवी या पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दलची पुरुषी मानसिकता काहीही असो, पण बायकोचा जीव या शस्त्रक्रियेमुळे धोक्यात असतानाही तो ही मानसिकता बदलू शकत नाही का?
मला आलेल्या कुठल्याही अनुभवावरून मी तो प्रातिनिधिक असल्याचं दाखवून समस्त पुरुषांवर ताशेरे ओढण्याचं काम अजिबात करू इच्छित नाही. कारण जगातले सर्वच पुरुष आपल्या बायकोशी असेच वागत असतील, असे सार्वत्रिक विधान करणे चूक आहे, हे मी पूर्णपणे समजते.
स्त्रीच्या -गर्भधारणा, प्रसूती, कुटुंबनियोजन इतकंच नव्हे तर बालसंगोपन या प्रत्येक पायरीवर पुरुष तिच्या बरोबरीने मदतीचा हात देताना हल्ली बऱ्याच कुटुंबात दिसून येते. ही संख्या हळूहळू वाढते आहे. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे; पण अजूनही प्रजनन या गोष्टीत स्त्री व पुरुष दोघांचा सारखाच वाटा असूनही वंध्यत्व, गर्भारपण, गर्भपात, बालसंगोपन अशा सर्व गोष्टींचे उत्तरदायित्व व जबाबदारी मात्र स्त्रीच्याच माथी मारले जाते, हे बहुसंख्य समाजात आढळते.
माझ्या ओळखीच्या एका वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ मत्रिणीलाही एक असाच आश्चर्यकारक अनुभव एका स्त्री रुग्णाकडून आला. लग्न होऊन ५-६ र्वष झाली तरी बाळ होत नाही म्हणून तिच्या व तिच्या पतीच्या खूप साऱ्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातून असं निष्पन्न झालं की पतीच्या धातूच्या तपासणीत शुक्रजंतूंचे प्रमाण अत्यल्प आहे. काही औषधे देऊन सहा महिने निरीक्षणावर ठेवलं, पण काही फरक पडला नाही. मूल होत नाही म्हणून त्या स्त्रीला सासरच्या सर्वाकडून आत्तापर्यंत भरपूर त्रास दिला गेल्याचं त्या डॉक्टरनाही माहीत होतं. पण त्यांनी जेव्हा तिला- तिच्या नवऱ्यात असलेल्या दोषामुळे मूल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले, तेव्हा ती म्हणाली,‘ डॉक्टर, तुम्ही हे त्यांना सांगू नका हं, त्यांना खूप वाईट वाटेल.’ त्या तिला लगेच म्हणाल्या, ‘अगं, पण ही खरी गोष्ट सांगितल्याने तुझा छळ तरी थांबेल. हे न सांगता तशीच राहिलीस तर उगाच तुझ्या जिवावर सतत टांगती तलवार नाही का राहणार सासरच्यांची?’ इकडे सत्यपरिस्थिती सांगून घरच्यांच्या जाचातून मुक्त होण्याचा सल्ला तिला डॉक्टर देत होत्या; तरी सोशिकता व पतिप्रेम यामुळे ही गोष्ट घरी उघड करायला ती तयार नव्हती. अशा वेळी सोसायला लागणाऱ्या अत्याचारांचा विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरू नये का? की ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं?
कित्येकदा स्त्रीचा मानसिक दुबळेपणाही मला तितकाच अस्वस्थ करतो. गर्भारपण व प्रसूती या संदर्भात वैद्यकीयदृष्टय़ा आवश्यक असे कोणतेही सल्ले स्त्रीला दिले, तरी त्याबाबतचे ठोस निर्णय ती सहसा एकटी घेताना आढळत नाही – या साऱ्या गोष्टीत तिची भावनिक व शारीरिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असूनदेखील असं का होतं? स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार? लतादीदींचं एक गाणं मला आठवलं, ‘उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते, अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते’ या ओळी एकत्र करून म्हणावंसं वाटतं, ‘उनको ये आदत है के हम कुछ नहीं कहते’ अशा रीतीने स्त्रीचं- निर्णय न घेणं व वेळेवर न बोलणं हेदेखील तिच्या सद्यपरिस्थितीला थोडेबहुत कारणीभूत नाही का?

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?