आपल्याकडील स्त्रिया घरातील सर्वाची अगदी जीव तोडून सेवासुश्रूषा करतात; पण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. कधी मुलांच्या परीक्षा, कधी सणवार, कधी पाहुणेरावळे, कधी घरातील मंगलकार्य, कधी गावी जायचं म्हणून.. ही चालढकलीच्या कारणांची यादी कधी संपतच नाही. पण ते जीवघेणं ठरू शकतं.
एकदा आमच्या रुग्णालयात एक ऐंशी वर्षांचे आजोबा प्रोस्टेटग्रंथीच्या आजारामुळे लघवीच्या त्रासाने दाखल झाले. औषधाने नियंत्रण झाले नाही म्हणून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तपासून झाल्यावर त्यांना एका जांघेत हíनयादेखील उद्भवल्याचे लक्षात आले. नशिबाने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यातले काही आजार नसल्यामुळे सर्व तपासण्यांचे निष्कर्ष चांगले आले. त्यामुळे एकाच वेळेला त्याच बेहोशीमध्ये प्रोस्टेटग्रंथी व हíनया दोन्हीची शस्त्रक्रिया काहीही गुंतागुंत न होता पार पडली. त्यानंतर ५-६ दिवस जेव्हा ते रुग्णालयात होते, तेव्हा दिवसा त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर सोबत बसे; तर रात्री आजोबांचा मुलगा किंवा नातू झोपायला येत असे. आजींचं वय असेल साधारण ७५ र्वष. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम, दोघेही गोष्टीवेल्हाळ. आजोबांच्या खाण्यापिण्यावर, सलाइनच्या संपत आलेल्या बाटलीवर, सलाइन लावलेल्या हातावर; इतकंच काय, रोजच्या लघवीच्या प्रमाणावर, लघवीची पिशवी वेळोवेळी नोंद ठेवून मग ओतली जाते की नाही, या सर्व बाबींवर आजींचं बारीक लक्ष असे व त्या सगळ्या गोष्टी आजी आम्हा डॉक्टरांना राउंडच्या वेळेला उत्साहाने सांगत. बोलण्यात मार्दव, चेहऱ्यावर एक स्थायी समाधान आणि बोलघेवडा स्वभाव यामुळे सगळ्या नस्रेसना, आयाबाईंना त्यांनी आपलंसं करून घेतलं होतं. सहाव्या दिवशी नळी काढल्यावर जेव्हा आजोबांना घरी पाठवलं तेव्हा सगळ्यांनाच एकीकडे ते बरे झाल्याचं समाधान तर एकीकडे त्यांच्या जाण्याची हुरहुर वाटत होती. सहा-आठ महिन्यांनी पुन्हा तेच आजी-आजोबा बाह्य़रुग्ण विभागात हजर झाले. यावेळेस आजोबांना तपासलं तर त्यांना दुसऱ्या बाजूला पण हíनया झाल्याचं लक्षात आलं. त्याच आठवडय़ात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तीन दिवस राहून आजोबांना घेऊन आजी घरी चालल्या; तेव्हा सगळे कर्मचारी व चालू शकणारे रुग्णसुद्धा दारापर्यंत टाटा करायला आले होते, असं होतं ते जगन्मित्र जोडपं!
एक महिन्याने परत दाखवायला बोलावलं होतं म्हणून ते आले; तेव्हा त्यांनी आजींचंही नाव रुग्णांच्या यादीत दिलं. प्रथम आजोबांना तपासून ते एकदम छान असल्याचा मी निर्वाळा दिला. मग आजींना तपासू लागले; तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. आजींना एका स्तनामध्ये ६-७ सेंमी. आकाराची घट्ट दगडासारखी गाठ होती, शिवाय त्यामुळे काखेत रसग्रंथींना पण सूज आलेली होती. हे बदल काही थोडय़ाथोडक्या दिवसांत घडलेले नव्हते. मी आजींना यासंबंधी विचारलं, तर त्या म्हणाल्या, ‘‘अहो, १० महिन्यांपूर्वी आजोबांचं पहिलं ऑपरेशन झालं ना, त्याच्याही आधीपासून ही गाठ मला होतीच, दुखत नव्हती म्हणून मी नाही सांगितली.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘इतक्या वेळ आजोबांकडे बसत होतात, तेव्हा एकदा तरी मला बोलला असतात; तरी मी लगेच तुम्हाला तपासलं असतं, गाठ एवढी मोठी होईपर्यंत तुम्ही थांबलात कशा?’’ आजी उत्तरल्या, ‘‘अहो डॉक्टर, मी विचार केला, आजोबांची तब्येत जरा बरी होऊ दे, मग सांगू. त्यांचं एक ऑपरेशन झालं, थोडा वेळ तरी तब्येत सुधारायला लागणारच की; मग सांगणार होते तर लगेच तुम्ही दुसऱ्या ऑपरेशनचा निर्णय घेतला. मग त्यातून ते बरे होण्यासाठी मी अजून एक महिना थांबले. मग त्यांना काल मी माझ्या गाठीविषयी बोलले, तेव्हा त्यांनी आज मलाही दाखवायला लावलं.’’ आजींच्या वक्तव्याने मी थक्क तर झालेच, पण तितकीच अस्वस्थही! कारण आजींना स्तनाचा कर्करोग झाला होता आणि त्याचं निदान त्यांच्या उशीर करण्यामुळे खूप पुढच्या अवस्थेत आल्यावर झालं होतं. ज्या आजी स्वत: आजोबांच्या तब्येतीबाबत इतक्या दक्ष, जागरूक असत; त्यांनी एवढी गाठ हाताला समजूनसुद्धा स्वत:च्या बाबतीत इतकी चालढकल का केली? काय म्हणावं या गोष्टीला -‘प्रेम आंधळं असतं?’ खरं तर आजोबांच्या दोन्ही शस्त्रक्रिया सोयीनुसार ठरवून केलेल्या होत्या. आजींनी त्यांचा आजार लवकर सांगितला असता तर कर्करोगाच्या आजाराला प्राधान्य देऊन आम्ही त्यांची शस्त्रक्रिया आधी केली असती व निदान होण्यास एवढी दिरंगाई झाली नसती. नंतर आजींची मोठी शस्त्रक्रिया झाली. किमोथेरपी, रेडिओथेरपी सगळे सोपस्कार झाले; पण मुळात आजार बराच वाढल्यावर त्यावर उपचार सुरू झाल्यामुळे तो पुन्हा उद्भवेल का, याविषयी मनात टांगती तलवार राहिलीच.
खूप वेळा आपल्याकडील स्त्रिया घरातील सर्वाची अगदी जीव तोडून सेवासुश्रूषा करतात; पण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. कधी मुलांच्या परीक्षा, कधी सणवार, कधी पाहुणेरावळे, कधी घरातील मंगलकार्य व उत्सव, कधी गावी जायचं म्हणून..ही चालढकलीच्या कारणांची यादी कधी संपतच नाही .चिऊताईच्या गोष्टीसारखं ‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालते..’ हे पालुपद चालू राहतं. पण स्वत:च्या तब्येतीपुढे या सर्व गोष्टी गौण आहेत हे समजलं पाहिजे ; नाहीतर आजार वाढत जातो. यामध्ये कुटुंबीयांमधील नितांत भावनिक गुंतवणूक, हळवा स्वभाव, परिणामांची भीती तर कधी स्वत:चं आíथक परावलंबित्व अशी अनेक कारणं असू शकतील.
मध्यंतरी माझ्याकडे साधारण चाळिशीची गृहिणी रुग्ण म्हणून आली होती. पोटात आग होणं, वारंवार उलटय़ा होणं अशी तिची सहा महिन्यांपासून तक्रार होती. अ‍ॅसिडिटीची बरीच औषधे खाऊनसुद्धा तात्पुरतं बरं वाटायचं, पुन्हा काही दिवसांत तोच त्रास सुरू. मी तिची एंडोस्कोपी (दुर्बणिीने अन्नमार्गाची तपासणी) केली; त्यात आतडय़ात मोठा अल्सर(जखम)झाल्याचे लक्षात आले. तिला योग्य ती औषधे लिहून देताना मी तिच्या दिनचय्रेबाबत विचारणा केली. तेव्हा तिच्या नवऱ्याने सांगितलं, ‘‘आमच्या मोठय़ा कुटुंबात ही सकाळी ५ वाजता उठते, शाळेत जाणाऱ्या मुलांचा व लवकर ऑफिसला
जाोणाऱ्यांचा डबा बनवते. मग घरी राहिलेल्यांचा चहा-नाश्ता बनवते. मग घराची साफसफाई. मग कॉलेजवाल्यांचे डबे बनवते. घरातील इतर कामे होईपर्यंत शाळेतली मुलं घरी येतात- त्यांना जेवण वाढते; प्रत्येकाच्या आवडीचं वेगळंवेगळं बनवते. मग मागचं आवरून होईपर्यंत घरात आला-गेला असतोच, स्वत: वेळेवर जेव म्हटलं तर ऐकत नाही. एवढय़ा कामापर्यंतच तिला तरतरी येण्यासाठी ५-६ वेळा तरी चहा होतो. मग जेवायला भूक नाही ही तक्रार करते. त्यानंतर विरंगुळा म्हणून ठरलेल्या टी.व्ही.मालिका बघते. रोज हिला दुपारचं जेवायला चार वाजतात. परत संध्याकाळी तीच कामं, मुलांचा अभ्यास घेणं, रात्रीच्या जेवणाची तयारी; सगळं आटोपून ही रात्री अकरा वाजता जेवते. शिवाय आठवडय़ातून दोन वार उपवास ठरलेले.’’ हे ऐकल्यावर मला वाटलं, या तऱ्हेने जर खाण्यापिण्याची चालढकल असेल तर अल्सर नाही झाला तरच नवल म्हणावं लागेल. काही कामं अपरिहार्य तर काही स्वत: ओढून घेतलेली! स्वत:च्या खाण्याची आबाळ करण्याचं कारण देखील तेच- ‘थांब माझ्या बाळाला ..’ असा विचार करून एकामागून एक कामे करत राहिलं की खाण्याचं भान नाही, वेळाचं भान नाही. कारण घर ही एक अशीच संस्था आहे जिथे २४ ताससुद्धा कामामध्ये व्यापले जातील. पण तब्येतीकडे दुर्लक्ष करून कामे करत राहण्याने आजार लवकर सांगितले जात नाहीत. कधी कधी ते उग्र रूप धारण केल्यावर डॉक्टरांपर्यंत पोहोचतात, तर कधी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. मग या अक्षम्य उशिराबद्दल डॉक्टरला दोष देऊन कसं चालेल? घरातल्या लहान-थोर घटकांसाठी राबताना माया, हौस, कर्तव्य या सर्व भावनांचा विचार केला तरी स्वत:च्या प्रकृतीची हेळ्सांड ही स्त्रीला स्वत:ला व सर्व कुटुंबीयांना पण त्रासदायक ठरते.
आजार लक्षात आला तरी त्याची सोयीस्कर कारणमीमांसा व निष्कर्ष काढत घरी बसणं, नवरा कामावरून येईपर्यंत दुखणं सहन करत राहणं व डॉक्टरांकडे उशिरा जाणं. एकदा पत्ता माहीत झाल्यावरदेखील पुढील व्हिजीटला स्वत:हून डॉक्टरांकडे न जाता नवऱ्याची वाट पाहात बसणं किंवा त्याला वेळ होत नसेल तर चिडचिड करणं, नवरा गावाला गेल्यावर स्वत:ची मधुमेह, रक्तदाबासारखी दैनंदिन औषधेसुद्धा न आणणं वा आणली तर वेळेवर न घेणं, स्वत:चे रिपोर्ट्स व डॉक्टरांचे कागद नीट न सांभाळणं; इतकंच काय स्वत:च्या मासिक धर्माच्या तारखा नीट लक्षात न ठेवणं या सर्व गोष्टी कित्येक स्त्रिया नेहेमी करताना आढळतात. अशिक्षित व आíथकदृष्टय़ा परावलंबी स्त्रियांची मनोधारणा समजून घेऊन त्यांना तात्पुरतं बाजूला ठेवलं, तरी इतर स्त्रियांची ही चालढकल किंवा मानसिक परावलंबन मला खूप अस्वस्थ करतं.
या लेखाच्या शेवटी माझी पहिली कळकळीची विनंती आहे की, माझ्या स्त्री रुग्णांनाच-ती म्हणजे जरासे आत्मपरीक्षण करून स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याची कारणं किती योग्य वा अयोग्य हे स्वत: तपासून पाहायचं आणि त्यावर कृती करायची. आपल्या शिक्षणाचा रोजच्या व्यवहारात उपयोग करून वेळेवर आपल्या तक्रारी आपण डॉक्टरांपुढे मांडायच्या. शक्य तेवढय़ा प्राथमिक गोष्टी तरी स्वत:च्या पातळीवर सोडवायच्या, त्यानंतर घरच्यांचा मदतीचा हात आपल्यापुढे असतोच. नाहीतर  ‘काय ऑफिसमधून आल्या आल्या माझं डोकं खाते’ असे शेरे ऐकायची वेळच न आणता आपली घरच्यांवरची अवलंबितता इतकी टोकाला न जाऊ देता- सजग, आत्मनिर्भर बनायचं.
माझी दुसरी विनंती आहे कुटुंबातल्या इतर मंडळींना! कितीही सांगितलं तरी कामाच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देण्याचा, मिसळून जाण्याचा, गुंतण्याचा, झिजण्याचा जो स्त्रीचा उपजत ओढाळ स्वभाव आहे; तो सहजासहजी बदलणं अवघड आहे. प्रसिद्ध कवी िव.दा.करंदीकर ‘झपताल’ कवितेत पत्नीच्या दैनंदिन कामांच्या उरकाबद्दल उद्देशून लिहितात, ‘संसाराच्या दहाफुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजून कळली नाही’! आता तर घरकाम आणि ऑफिसचं काम यात स्त्री अधिकाधिक गुरफटलेली आहे. म्हणून विनंती ही की, घरातल्या समजदार वयातील मुलांनी, नवऱ्याने, वडीलधाऱ्या मंडळींनी या गृहलक्ष्मीकडे थोडंसं अधिक लक्ष देऊन तिला क्षुल्लक वाटणाऱ्या तिच्या तक्रारींना बोलतं करायचं व तिला डॉक्टरांकडे वेळेवर नेण्याबद्दल आग्रही राहायचं. नाहीतर हे चालूच राहणार- ‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालते, जेवू घालते..’