कुंकू ! एक तांबडय़ा रंगाची भुकटी. म्हणावं तर अगदी क्षुल्लक बाब. पण हिंदू समाजाने त्यामध्ये मांगल्य, पावित्र्य भरलेलं. कुंकवात स्त्रीचा जीव अडकलेला. कधी अनवधानाने कुंकू पुसलं गेलं तर केवढा मोठा अपशकुन! पूर्वीच्या काळात कुंकू पुसणं असं नुसतं म्हटलं तरी नवऱ्याचं बरं-वाईट होईल या धास्तीमुळे ‘कुंकू वाढवलं’ असं म्हटलं जाई. चतुरंग पुरवणीमध्ये ‘जिणे वैधव्याचे’ या अनुभवांवर आधारित लेखामध्ये विधवांचा कुंकू लावण्याचा हक्क व आत्मसन्मान यासाठी चाललेलं प्रबोधन व उपक्रमांबद्दल वाचल्यानंतर कुंकवाच्या मांगल्याबाबत, पवित्रतेबाबत असलेला अंधश्रद्धाळूपणाविषयी लिहावं, असं वाटल्याने शब्दबद्ध केलेले गेल्या पंचाहत्तर वर्षांतील माझे व्यक्तिगत अनुभव व मनन.

वयाच्या ५-६  वर्षांपर्यंत आईच्याभोवती घोटाळत आईबरोबर चत्रगौरीची सुंदर आरास सजवण्यामध्ये लुडबुड करत चटकदार आंब्याची डाळ नि आंबटगोड पन्ह्याचा आस्वाद घेत हळदीकुंकू साजरं करायचं. संक्रांतीचा पांढराशुभ्र काटेदार हलवा आणि वाण लुटण्याचा आनंद. हरितालिकेला पारिजातकाच्या फुलांची मोहक रांगोळी आणि फलाहार, सारं मोठं लोभस आणि मौजमजेचं वाटे. त्याच्या अर्थाचा विचार करण्याएवढी शिंगं अजून फुटलेली नव्हती. कुंकवाकडे प्रथम लक्ष गेलं ते प्रभातच्या ‘कुंकू’ सिनेमातील नायिका नीरा (शांता आपटे) कुंकू कपाळाला टेकवताना संभ्रमावस्थेत सापडल्याने तिचा भेदरलेला चेहरा आणि थरथरता हात पाहून. तिला प्रश्न पडला होता की कुंकू लावायचा तिला अधिकार आहे का? जिचं भाग्य नवरा मिळाल्याने भविष्यात उजळायचं असतं अशी कुमारिका किंवा जिचा नवरा हयात असल्याने सौभाग्य उजळलेलं असतं अशी सौभाग्यवती यांना फक्त कुंकू लावण्याचा हक्क! मग तो नवरा दारुडय़ा, छंदीफंदी, मारहाण करणारा कसाही असला तरी बाईला इतर पुरुषांपासून संरक्षण देतो ना हेच बाईचं महाभाग्य! जी अगदी बळजबरीने लादलेला औटघटकेचाही नवरा गमावते अशा पांढऱ्या पायाच्या अवदसेचं कपाळ पांढरंच हवं! एवढंच काय त्या काळात तर आमच्या घरात केशवपन केलेल्या अलवण (विटकट तांबडं विनाकाठापदराचं लुगडं) नेसणाऱ्या पार्वतीकाकू होत्या. शेजारच्या ‘बाई’ होत्या आणि अशा किती तरी अभागी बालविधवा माझ्या परिसरात होत्या, ज्यांना समाजानं माणसाचं जिणंच नाकारलेलं होतं! याला काही अपवाद मात्र होते. माझी आजी माझे आजोबा वारल्यावरही (१९३२ साली) कुंकू लावत होती. स्वत:च्या हिमतीवर नागपूरमधील शेतावर तिने संत्र्यांचा बगिचा फुलवला होता. नागपूरला एकटी राहून समर्थपणे शेतीवाडी सांभाळत होती. मातृसेवा संघांची अध्यक्ष या नात्याने संस्थेची जबाबदारी चोखपणे पार पाडत होती. अशा करारी, कर्तबगार स्त्रिया किती तरी, पण रूढी-परंपरेने बहुतेकांच्या आयुष्याचे बळजबरीने मातेरं केलं जात होतं.
कुंकू! एक तांबडय़ा रंगाची भुकटी. म्हणावं तर अगदी क्षुल्लक बाब. पण हिंदू समाजाने त्यामध्ये मांगल्य, पावित्र्य भरलेलं.
सासूबाई, तुमचं नेसणं फुलाचं।
राघू मनाले वंशाचं॥
सासूबाई, सारा संसार तुमचा।
कपाळी कुंकू एवढा। दागिना आमचा॥
 विवाह हा मंगल विधी, स्त्रीच्या दृष्टीने जन्मोजन्मीची गाठ बांधणारा आणि त्याचं मंगल प्रतीक म्हणजे कुंकू! कुंकवात स्त्रीचा जीव अडकलेला. कधी अनवधनाने कुंकू पुसलं गेलं तर केवढा मोठा अपशकुन! त्या काळात कुंकू पुसणं हा वाक्प्रचारही निषिद्ध होता. पुसणं असं नुसतं म्हटलं तरी नवऱ्याचं बरं वाईट होईल या धास्तीमुळे ‘कुंकू वाढवले’ असं म्हटलं जाई.  
सासू नि सासरे।
माझ्या घराचे भूषण।
कपाळी कुंकू लावले।
भरजरीचे निशाण॥

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
manipur high court revokes inclusion order for meitei community in st list
अन्वयार्थ : हिंसेचे मणिपूरचक्र पश्चातबुद्धीने थांबेल?
Bhavani Talwar
‘भवानी तलवार’ परमारवंशीय गोवेलेकर सावंत घराण्याने दिली 

कुंकवाच्या उगमाचा इतिहास धूसर आहे. मातृप्रधान संस्कृतीत शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबळीचा रक्ताचा टिळा लावला जाई त्यावरून कुंकवाची प्रथा आलेली दिसते. स्त्री ही जगदंबेची अंशरूप मानली गेल्याने जेव्हा स्त्री घरामध्ये गृहलक्ष्मी म्हणून येते तेव्हा पशुबळी देऊन त्याच्या रक्ताचा टिळा लावूनच तिने गृहप्रवेश करायचा अशी प्रथा दक्षिणेतील काही आय्रेतर समुदायात प्रचलित होती व आजही काही आदिवासी जमातीत त्या प्रथेचे अवशेष आढळतात. तंत्र / संत वाङ्मयात कुंकुमतिलकाला विशेष महत्त्व आहे. कुंकू हे सौभाग्यप्रतीक, ही द्रविड स्त्रियांमधील प्रथा भारतात इतरत्र आठव्या शतकानंतर प्रचलित झालेली दिसते. कुंकू हे स्त्रियांचं सौभाग्य लेणं आणि नवरा गमावण्याचं दुर्भाग्य जिच्या नशिबी येतं, अशा विधवेने कपाळी कुंकू लावणं निषिद्ध ठरवलं गेलं. सुवासिनीला सुवासिनीनेच कुंकू लावायचं आणि कुंकू लेणाऱ्या सौभाग्यवतीला फक्त सणासमारंभात, पूजाअच्रेत, समाजात स्थान! विधवेला स्थान नाही. ती दळभद्री, नवऱ्याच्या मुळावर आलेली म्हणून अशुभ, अपशकुनी मानली जाऊ लागली. स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता मानववंशाचं सातत्य टिकवण्यासाठी कळीची असते. आदिम समाजात त्यामुळे स्त्रीला महत्त्वाचं स्थान होतं. परंतु उत्पादन पद्धतीत बदल होत जाऊन अतिरिक्त उत्पादन शक्य झाले. ते काढण्यासाठी हुकमी मनुष्यबळाची गरज होती. हे मनुष्यबळ स्त्रीवर ताबा ठेवून मिळवणं शक्य होतं. त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांवर ताबेदारी प्रस्थापित केली. क्रमश: समाज स्थिरावून प्रादेशिक संस्कृतीच्या उदयाबरोबर खासगी मालकी हक्क व पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था प्रस्थापित झाली आणि स्त्री दावणीला बांधली गेली. स्त्रियांना दावणीच्या गाईसारखं विवाहसंस्थेच्या बंधनात जखडण्याची, तिची अस्मिता दडवून टाकण्याची, तिला अभिव्यक्तीची संधी नाकारण्याची शेकडो पिढय़ा चालत आलेली परंपरा अजूनही टिकून आहे.
मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे, ‘नवरा जरी दुराचारी असला, स्वैराचारी असला, त्याच्यात गुणांचा जरी लवलेश नसला तरी सज्जन स्त्रीने नवऱ्याची अगदी देवासारखी आराधना करावी’ (५.१५४ मनुस्मृती). ‘स्त्रीने – मग ती लहान मुलगी असो, तरुणी असो वा म्हातारी असो – कुठलंही काम – अगदी घरातलं कामही आपल्या अधिकारात करू नये’ (५.१४७ मनुस्मृती). मनुस्मृती काळापासून पक्की झालेली ही बंधनं एकविसाव्या शतकातही भारतातील हिंदू समाजात टिकून आहेत.
मग वयाच्या ७-८ व्या वर्षांपासून, पुढेही मला बरेचसे प्रश्न पडू लागले. बाईचं स्थान विवाहसंस्थेच्या चौकटीतच – कुंकवाभोवतीच का बांधलं पाहिजे? ती कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी आई म्हणूनच का ओळखली जावी? शेतकरीण, भाजीवाली, शिक्षिका, गायिका, डॉक्टर अशी स्वतंत्र अस्मिता बाळगून स्वतंत्रपणे वावरायला तिला समाजात पत का नाही?  मुलांना जन्म देणं हीच स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता असू शकते का? विनापत्य स्त्रीला ‘वांझोटी’ असं अवमानास्पद नामाभिधान देऊन तिला अभद्र ठरवायचं असा पक्षपात का? चांगला नवरा मिळावा म्हणून हरितालिका पुजायची, उपासतापास करायचे. नवरा मिळवणं आणि पुत्र जन्माला घालणं एवढंच स्त्रीचं जीवनध्येय असू शकतं का? आणि म्हणूनच ‘मुलगी’ असल्याने आई लावत असलेलं रूढीपारंपरिक वळण नाकारायला आरंभ झाला. वंश, धर्म, जाती, लिंगानुसार उच्चनीच्च भाव, वेगवेगळे दंडक नसावेत,    
‘माणूस’ म्हणून सर्वाना समान वागणूक व संधी मिळाली पाहिजे ही भावना त्यामागे होती. कुंकवाच्या बंधनात बांधलेली स्त्री, त्यापायी विधवांना मिळणारी अमानूष वागणूक या अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध प्रतीकात्मक निषेध म्हणून कुंकवाला व सौभाग्य अलंकारांना विरोध नोंदवावा असं वाटलं. त्या काळात (१९४२-४३) कुंकू, बांगडय़ा, डूल, हिरवी पोत, माळ, साखळी – अशी सौभाग्य लेणी लेऊनच मुली शाळेत येत. मी मात्र आमच्या वर्गशिक्षिकांच्या शब्दात ‘लंकेच्या पार्वतीच्या’ अवतारामध्ये शाळेत जात असे.
बिन काठापदराची पांढरी साडी, ओके – हात – कान – गळा आणि पांढरं कपाळ पाहून हुजूरपागेतल्या आमच्या वर्गशिक्षिकांचा राग अनावर होई. चडफडत मुलींच्या होस्टेलवरून कुंकवाची बाटली त्या आणवत आणि माझ्या कपाळी कुंकवाचा टिळा लावत. आणि ते फिसकटवून, पुसून टाकलं की त्या भडकत, चडफडत. ‘अवदसेची काय ही लक्षणं?
पुढे खरंच माझा नवरा अचानक वारला. पण विधवेने पांढऱ्या कपाळाने राहण्याची समाजाची सक्ती तर मोडली पाहिजे, म्हणून विधवा झाल्यावर कुंकू लावायला हवे. पण कुंकू लावण्याची रूढी तर मला कधीच मान्य नव्हती, म्हणून मी लग्नानंतरही कुंकू लावत नव्हते, सौभाग्यालंकार घालत नव्हते. तेव्हा मी कुंकू न लावणंच चालू ठेवलं. फक्त कधी समारंभाला जावं लागलं तर पूर्वीप्रमाणे समारंभाला साजेशा वेशभूषेबरोबर शोभेसं कुंकू लावत असे. त्यानेही पंचाईत झाली. आईच्या जवळच्या मत्रिणीच्या नातीच्या लग्नाला गेले होते. दारात कुंकू, अत्तर देणाऱ्या मुलीचा हात मला कुंकू लावायला सहज पुढे झाला, तेव्हा वधूची आई – भेदरलेली कृष्णा ओरडत आली आणि तिने तो हात माझ्या कपाळापर्यंत पोचायच्या आत एक झटका देऊन तिच्या सुदैवाने रोखला! अन्यथा विधवेला नुसतीच विधवा नाही तर कृष्णाला माहीत असल्याप्रमाणे नि:संतान विधवेला कुंकू लावण्याचा ‘डबल अपशकुन’ तिच्या मुलीच्या लग्नात घडला असता आणि त्याने तिच्या मुलीचे भवितव्य धोक्यात आले तर? मला कुंकू लावू पाहणारी मुलगी बिचारी कावरीबावरी झाली. तिच्या कसं लक्षात येणार की एक विधवा कुंकू लावून लग्नाला आली होती! कृष्णाची कीव करत, मनातल्या मनात हसत मी बाहेर पडले. या प्रसंगाने आपल्या समाजातील अंधश्रद्धाळूपणापायी एवढय़ा किरकोळ बाबीपासून गंभीर गोष्टीत विधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात खंबीरपणे उभं राहण्याची निकड पुन्हा अधोरेखित झाली. ही घटना ४५ वर्षांपूर्वीची. परंतु आजही विधवेचा अपशकुनी म्हणून सुशिक्षितांमध्येही अपमान केला जातो आणि त्याने दुखावून ती हमसून हमसून रडते. (जिणे वैधव्याचे, चतुरंग, २९ नोव्हेंबर २०१४ )
माझ्या शालेय मत्रिणीचा – उषाचा नवरा नुकताच वारला. कॉलेजातले तिचे वर्गबंधूभगिनी तिला भेटायला गेलो. उषाला ठसठशीत कुंकू शोभून दिसायचं. ती आली ती पांढरं कपाळ घेऊन. मी चकित! आमच्या वर्गबंधूंनी न राहवून विनंती केली नि उषा आत गेली. पण बाहेर आली ती काळा टिळा लावून! मी थक्कच झाले. १९३२ साली नागपूरमध्ये माझी आजी विधवा झाल्यावर कुंकू लावी. पण २०१४ साली पुण्यामध्ये उच्चशिक्षित, सुस्थित उषा कुंकू लावण्यास का कचरते? बालपणापासून मुलीला दुय्यम स्थान, विवाह म्हणजे सौभाग्य, त्याच्या मांगल्याचं प्रतीक कुंकू, त्याचं पावित्र्य जपण्यासाठी विधवेने कुंकू नाही लावायचं, अशी पांढऱ्या कपाळाची विधवा अपशकुनी, या अंधश्रद्धा एवढय़ा खोलवर रुजलेल्या आहेत की, विधवांनाही स्वत:मध्ये काही तरी न्यून आहे, असं वाटून आत्मविश्वासही गमावला जातो. यातून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांना खरं शिक्षण, आíथक स्वयंनिर्भरता आणि या साऱ्या अंधश्रद्धांविरुद्ध मोठय़ा प्रमाणात प्रबोधन, कृतिकार्यक्रमांची निकड आहे. मी कुंकू लावत नाही तेव्हा अनाहूत सल्ला मिळे की मी एकटी हिंडते-फिरते, प्रवास करते, तेव्हा सुरक्षिततेसाठी तरी कुंकू लावावं. मला प्रश्न पडे की, स्वत:ला सांभाळायची धमक असताना कुंकवाची ढाल बाळगण्याचा सल्ला का मिळतो? आपण सावध आणि खमकं असल्यावर भिण्याचं कारण काय? एकटी असल्याने विधवेने जर आत्मविश्वास गमावला, तिचं वागणं भयातुर असलं तर कुंकू लावूनसुद्धा बिंग फुटायचं! भित्यापाठी ब्रह्मराक्षस!
मी कुंकू लावत नाही तेव्हा सहज कोणी विचारे की, तुम्ही पारशी का, मुसलमान आहात का? मी कोणत्याच धर्माची नाही, नास्तिक आहे. धर्माधतेपोटी माणसामाणसात आपपरभाव निर्माण होतो. धर्माच्या संकुचित चौकटींच्या पलीकडे जाऊन विवेकनिष्ठा, मानवता, समानता प्रस्थापित करण्याची निकड आहे. मी पारंपरिक धर्माच्या भिंती मानतच नसल्याने मला सलमा म्हटलं किंवा ज्युलिया म्हटलं – कोणतंही नाव चालेल, असं सांगितल्यावर एक बाई तर चिडल्याच, ‘तुम्ही हिंदू असताना अशी परधर्मीय नावं कशाला घेता? हिंदू म्हणून लहानपणी तुमच्यावर भयंकर अन्याय झाला असला पाहिजे. म्हणून तुम्ही हिंदुत्वच नाकारता हे दुर्दैव आहे.’
माझ्यावर व्यक्तिगत अन्याय कोणताही होणं संभवतच नाही व तो कधीही झालेला नाही आणि तो होणं कसं शक्य आहे? उच्चशिक्षित, सुस्थित, चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाल्यावर सामाजिक अन्याय कोण करणार? कौटुंबिक अनुकूलतेमुळे मी अर्थशास्त्रात एम्. ए., पीएच.डी. होऊन प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी असल्याने अंध चालीरीती – रूढी पाळत नाही म्हणून समाजात होणारी टीका हसून सोडून देत होते. पण हिंदू समाजात आजही सर्वसामान्य स्त्रिया आणि विशेषत: विधवा दुय्यम, तिय्यम स्थानावर लोटलेल्या आहेत. धर्माच्या नावाने लादल्या जाणाऱ्या रूढी-परंपरांपायी लाखो भारतीयांवर, विशेषत: दलित बांधवांवर आणि स्त्रियांवर जे अनन्वित अन्याय-अत्याचार केले गेले व जात आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी कितीतरी सुधारकांनी  प्रयत्न केले. समाज सुधारकांनी जातिभेद दूर सारण्यासाठी महाप्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही हिंदू धर्म नाकारून बौद्ध धम्म स्वीकारला. तरी भारतीय जनतेवरील धर्माची जुलूमजबरदस्ती वाढतच आहे. पकड घट्ट केली जात आहे.
हिंदुत्ववाद्यांच्या अशा वाढत्या हुकूमशाही वातावरणात मला मात्र कुंकू न लावता उजळ माथ्याने वावरता येतं. कारण विधवा असल्याने कोणी माझ्यावर कुंकू लावायची सक्ती करण्याचं ‘पाप’ करणार नाही. विधवा झाल्याने का होईना कुंकवाने माझी पाठ सोडली! वैधव्याचा हा एक फायदा म्हणायचा की, महाराष्ट्रात राहूनही कुंकवाच्या सामाजिक जबरदस्तीतून माझी सुटका झाली!