‘डॉक्टर’ या व्यक्तीविषयी एवढंच सांगायचं आहे की ही व्यक्ती आयुष्यभर सतत रुग्णांच्या व्यथा-वेदनांच्या जगात वावरते. त्या नकारात्मक, निराशाजनक विचारांना मनाच्या तळघरात गाडून त्यावर सकारात्मक उपचारांचे इमले बांधताना डॉक्टरांनादेखील खूप आशावाद व मनशक्ती जागृत ठेवावी लागते. ती शक्ती तेव्हाच प्रबळ व प्रभावी होते; जेव्हा त्या डॉक्टरला आधी ‘माणूस’ म्हणून समजून घेतलं जातं, जेव्हा विश्वासाचं दान त्याच्या पदरात आपसूक टाकलं जातं.
‘डॉ क्टर’ या व्यक्तीविषयी कधी समाजाला कौतुकमिश्रित आदर असतो, तर कधी तो लोकक्षोभाचा, िनदेचा धनी असतो, तर कधी त्याला एकदम देवत्वच बहाल केलेले असते. पण एक मात्र नक्की – याच डॉक्टरच्या आयुष्याबद्दल, दिनचय्रेबद्दल, मानसिकतेबद्दल लोकांच्या मनात कुतूहलही तेवढंच असतं; हे आम्हाला रुग्णांशी बोलताना लक्षात येतं. म्हणून आज तुम्हाला न्यायचं ठरवलंय ‘डॉक्टरांच्या म्हणजे स्वत:च्याच जगात’! या जगात तुम्हाला वैद्यकीय विद्यार्थ्यांपासून निष्णात डॉक्टरांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवरील त्यांच्या जडणघडणीतून त्यांची वेगळी मानसिकता कशी तयार होत जाते त्याची माहिती होईल व त्यातून एका वेगळ्या जगाची झलक मिळेल.
एम. एच. सी. ई. टीच्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांमधून साधारण पहिल्या एक हजारच्या आत नंबर आल्यास ओपन मेरिटच्या जागांमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचं दिव्य सतराव्या वर्षी पार पाडायचं असतं. मग सुरू होते मानसिक व शारीरिक परीक्षा. कॉलेज रोज आठ (घडय़ाळाचे)तास असतं. शवविच्छेदन, प्रात्यक्षिके, तासंतास उभे राहणे, अवाढव्य आकाराची पुस्तके, प्रत्येक परीक्षेत ५० टक्के गुणांवर उत्तीर्णता.. या चक्रातून आपोआपच एक गांभीर्य, परिपक्वता येऊ लागते. आपल्या समवयीन मित्रांपेक्षा वेगळं वागावंच लागतं,कौटुंबिक सण, संमेलनांना आळा घालावा लागतो. ‘रात्रंदिन आम्हां परीक्षांचा प्रसंग’ अशी अवस्था असते. एक लेक्चरमधील विषय आत्मसात करायला पुस्तकाची ७०-८० पाने, तर एका छोटय़ा परीक्षेसाठी शेकडो पाने पचवावी लागतात. या परीक्षांमधून तावूनसुलाखून निघाल्यामुळे मनातील भीतीची भावना बोथट होते. आल्या परिस्थितीला धीराने तोंड देणे, प्रसंगी वेळ मारून नेणे या गोष्टी वाढीस लागतात.
घर सोडून लांब राहण्याची सवय, मिळेल ते आणि मिळेल तेव्हा खाण्याची सवय लागते. गणेशोत्सव, कॉलेज गॅदिरग, कॉलेज नियतकालिक, कॉलेज ट्रिप (अलभ्य लाभ)याच्या आयोजनात झोकून देऊन काम करायचं, मजा करायची आणि परीक्षा आल्यावर तेवढंच जीव टाकून जागरणं करायची हे अंगवळणी पडतं. पूर्वी साडेचार वर्षांच्या धामधुमीनंतर एमबीबीएस होऊन इंटर्नशिप करताना तरी मोकळा श्वास मिळे, पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करण्याच्या अनुभवातून आनंद मिळे, पण आता इंटर्नशिप संपता संपता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पूर्ण साडेचार वर्षांच्या सर्व विषयांवर आधारित सीईटी परीक्षा असते.  
यासाठी  पुन्हा  ऊर फुटेपर्यंत धावणं चालू!
पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यावर ‘निवासी’ डॉक्टर म्हणून तीन वष्रे तिथेच राहून शिकताना मजेच्या संकल्पनाच बदलतात. राहण्याच्या कोंदट खोल्या, ढेकणांच्या गाद्या, अपुरी स्वच्छतागृहे, अर्धवट सुरक्षाव्यवस्था यावर विनोद करत करत काळ पुढे सरकतो. भूक, झोप, आंघोळ यांचे त्या त्या वेळेस बदलते अग्रक्रम ठेवून निवासी डॉक्टरच्या भूमिकेत आम्ही खूप रमतो; कारण ‘मी रुग्णाला बरं करणार’ या एकाच स्वप्नामागे धावणाऱ्या जीवाला आता योग्य दिशा मिळालेली असते आणि साध्य नजरेच्या टप्प्यात आलेलं असतं आणि कितीही खडतर वाट चालायची मानसिकता विकसित व्हायला लागलेली असते. १४-१६ तासांच्या अखंड कामानंतर रात्री सगळी हॉटेल्स बंद झाली म्हणून एस.टी.कॅन्टीनमध्ये पोटभर चहाबिस्किटे खाण्याचा आनंद आयुष्यात तेव्हाच मिळतो.
पहिला मृत्यू जवळून पाहिल्यावर पायाखालची वाळू सरकल्यासारखी वाटते, हातांना कंप येतो, भूक नाहीशी होते, मनाला एक टोचणी लागून राहते. हळूहळू मन समजूतदार होऊ लागतं. आजाराची गंभीरता आणि आपले प्रयत्न यांचं मनोमन गणित मांडलं जातं. कर्तव्यात कसूर करायची नाही; पण यश-अपयश ‘त्याच्या’ हातात -ही जाणीव होते. स्वत:च्या मर्यादा कळू लागतात आणि ‘त्या’ अनादिअनंत शक्तीपुढे नम्र व्हावंसं वाटतं.
पदव्युत्तर परीक्षा पास होऊन बाहेरच्या जगात येईपर्यंत मानवी जीवनाच्या इतक्या कठीण अवस्था व भावनांची मानसिक आंदोलनं जवळून बघितली असतात, की आपोआपच बाहेरच्या विश्वातील राग-लोभ, आनंद-दुख, भीती-चिंता अशा विविध भावनांची अभिव्यक्ती जरा भडक वाटू लागते. रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू अनुभवून किंवा अत्यवस्थ रुग्णाचे उपचार सांभाळून घरी येणाऱ्या डॉक्टरला घरी दिवाळी किंवा वाढदिवस यात सामील होताना किती विरोधाभासातून जावं लागत असेल? बऱ्याच वेळा ‘मला वेळ नाही’ हे त्याचं पालुपद घरच्यांना सवयीचं होतं, पण कधीकधी मनावर दगड ठेवून धोरण अवलंबत त्या कौटुंबिक सोहळ्यात सामील व्हावे लागते. बऱ्याच वेळी रुग्णांना डॉक्टर स्वभावाने भावनाशून्य, कोरडे  वाटतात, त्यामागे या सर्व गोष्टी कारणीभूत असतात. डॉक्टर जर रुग्णांच्या सहवेदनेत फार गुरफटत गेले, तर त्यांची कार्यक्षमताच कमी होईल; जे रुग्णांना घातक असेल; त्यामुळे डॉक्टरांना ‘माणूस’ म्हणून संवेदनशील; पण कर्तव्यदक्ष राहून भावनांच्या अभिव्यक्तीवर संयम ठेवावाच लागतो, वास्तवाच्या व्यवहार्यतेला धरूनच राहावे लागते.
एका घरात एक डॉक्टर बनत असताना एकूण तीन पिढय़ांना त्याच्यासाठी तडजोड करावी लागते असं मला वाटतं. आईवडिलांच्या पिढीला -हे मूल त्याच्या वयाच्या कमीत कमी ३०-३५ वष्रे वयापर्यंत हाताशी येणार नाही हे सत्य स्वीकारावे लागते. आमच्या वेळी काही मित्रमत्रिणींचे वडील त्यांचे आठवडाभर वापरलेले कपडे धुण्यासाठी घरी नेत व पुढील आठवडय़ाचे धुऊन इस्त्री केलेले कपडे खोलीवर आणून ठेवत. २२ वर्षांपूर्वी माझ्या एका सर्जन मत्रिणीच्या सासऱ्यांनी तिच्या सात महिन्यांच्या मुलीला पुढील तीन वष्रे सांभाळले, जेणेकरून ती जे.जे.रुग्णालयात राहून प्लास्टिक सर्जरी या विषयात ‘विशेषज्ञ’ झाली. हे मागच्या पिढीने समजून केलेलं योगदान फार मोठं आहे. डॉक्टरांच्या पिढीतील त्यांचे सहचरी-पती किंवा पत्नीला तर या व्यक्तिमत्त्वाला फारच समजून घ्यावे लागते; कारण रोजची कामाची वेळ शाश्वत नसते, रिकाम्या वेळावरदेखील त्यांचा काही हक्क वा नियंत्रण नसते. पुढील पिढीच्या तडजोडीचं उदाहरण माझ्या घरामधेच मला पाहायला मिळालं. माझ्या दोन्ही मुलांनी फणफणलेल्या तापातदेखील कधी आई किंवा वडील आपल्याजवळ बसावेत अशी अपेक्षा केल्याचं मला आठवत नाही, फक्त आमच्या रुग्णालयात फोन करून ‘तापासाठी औषध पाठवा’ एवढंच कळवायची. आता ते आठवलं की वाटतं, एवढय़ा लहान वयात हे कसं साधलं असेल त्यांना? म्हणजेच डॉक्टर व्यक्ती अखंड शिक्षणाला व रुग्णसेवेला अग्रक्रम देत राहणार या गोष्टीची जाणीव घरातल्या तिन्ही पिढय़ांना असणे हे फार भाग्य म्हणावं लागेल.
डॉक्टरांच्या जगात प्रेमाला आणि वात्सल्यालाही सीमित जागा मिळते. आमच्या सर्जरीच्या डॉ.भरुचा सरांच्या लग्नाच्या दिवशी ते आणि त्यांच्या पत्नी संध्याकाळी आपापल्या वॉर्डमध्ये राऊंड घेताना सापडले. सर सर्जरी वॉर्डमधे तर मॅडम गायनॅक वॉर्डमध्ये! आम्हाला ही कहाणी ऐकायला विद्यार्थिदशेत फार मजा वाटायची.
माझी मोठी मुलगी पुण्यात ज्या रुग्णालयात जन्माला आली, तिथून पाचव्या दिवशी मला डिसचार्ज मिळेपर्यंत माझे यजमान आम्हा दोघींना पाहायला येऊ शकले नव्हते. बाळाचे वडील भेटायला, पण कसे नाही आले – या विषयावर तेथील आयाबाईंच्या दुपारी चर्चा झडत. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करी. शेवटच्या दिवशी जेव्हा मीच त्यांना सांगितलं की ‘ते एकटे दुसऱ्या गावी एवढंच हॉस्पिटल एकटय़ाने सांभाळत आहेत आणि आमच्यात काही फारकत झालेली नाही’  तेव्हा कुजबूज जरा शांत झाली. नंतर तिला लहानाचं मोठं करताना, पण काही वेळा अशा यायच्या, की मी एकटीच असेन, तर तिला ऑपरेशन थिएटरच्या एका कोपऱ्यात खाली ठेवून रुग्णाला टाके घालण्याचे माझे काम चालू असे. माझ्यासारखे अनेक अनुभव माझ्या सहकारी डॉक्टरांनाही आले आहेत याची मला खात्री आहे. वैयक्तिक दु:खाचीही अशीच एक गोष्ट. ज्यादिवशी माझे वडील आमच्या रुग्णालयात सकाळी वारले, त्या दिवशीच्या नियोजित शस्त्रक्रियांपकी एका रुग्णाला दहा-पंधरा जुलाब होऊन आतडे साफ करण्यासाठी काही औषधे आदल्या दिवशी देण्यात आली होती व त्याच्या मोठय़ा आतडय़ाची दुर्बणिीने तपासणी करायची होती. त्या दिवशी ती तपासणी पुढे ढकलली असती; तर पुन्हा त्याला याच त्रासातून जावं लागलं असतं. त्यामुळे ती पूर्ण करून मग बाबांचे अंतिम संस्कार केले. आज तो रुग्ण जेव्हा जेव्हा तब्येत दाखवायला येतो; तेव्हा ‘त्या’ दिवशीच्या आमच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
मला फक्त तुम्हाला ‘डॉक्टर’ या व्यक्तीविषयी एवढंच सांगायचं आहे, की; ही व्यक्ती आयुष्यभर सतत रुग्णांच्या व्यथा-वेदनांच्या जगात वावरते. त्या नकारात्मक, निराशाजनक विचारांना मनाच्या तळघरात गाडून त्यावर सकारात्मक उपचारांचे इमले बांधताना डॉक्टरांनादेखील खूप आशावाद व मन:शक्ती जागृत ठेवावी लागते. ती शक्ती तेव्हाच प्रबळ व प्रभावी होते जेव्हा त्या डॉक्टरला आधी ‘माणूस’ म्हणून समजून घेतलं जातं, जेव्हा विश्वासाचं दान त्याच्या पदरात आपसूक टाकलं जातं. कामाच्या वेळी अतोनात श्रम, एकाग्रता व मजेच्या वेळी भरपूर मजा अशा तऱ्हेने विकसित झालेल्या मानसिकतेची हीच व्यक्ती रुग्णाच्या निदानासाठी, उपचारांसाठी तहानभूक, झोप विसरून जिवाचं रान करताना तुम्हाला दिसेल.
पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील स्वागतकक्षात ज्ञानेश्वरांचा दोन्ही हात उंचावून आकाशाकडे बघणारा एक सुंदर पुतळा आहे, त्याखाली लिहिलं आहे-‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!’ ज्ञानोबांएवढं नाही, पण त्याच्या शतांशाने तरी डॉक्टरांच्या मनातील रुग्णाविषयीच्या भावना त्या वाक्यातून यथार्थपणे व्यक्त होतात; असं मला नेहमीच वाटत आलंय! डॉक्टरांच्या नजरेतून डॉक्टरांच्या जगाची इतरांना ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न.