ch07चिंता हा भावनिक व शारीरिक स्वरूपाचा एक अनुभव आहे. बऱ्याच मनोशास्त्रज्ञांना वाटते की, चिंता हा सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल होणाऱ्या मनातील द्वंद्वाचा बाहय़ आविष्कार आहे.

जीवनातील अनेक लहान-मोठय़ा प्रसंगांना सामोरे जाताना एखाद्या वेळी खूप भावुक वाटायला लागते. मनात खूप चिंता दाटून येते. काही तरी नकोसे होणार आहे, वाईट होणार आहे, मनाविरुद्ध होणार आहे वा काही तरी हातातून निसटून जाणार आहे असे वाटून जीव गुदमरायला लागतो. अशा काही घटना आयुष्यात अचानक चाहूल न देता घडतात व आपले विश्वच हादरते. साहजिकच मनात या घटनांमुळे प्रचंड काहूर उठते व खूप काळजी वाटते. कधी कधी असे वाटणे प्रसंगानुरूप असते. माणूस आहे तिथे कधी तरी ‘नव्र्हस’पणा किंवा भावनांचा कल्लोळ आलाच. धडधडणारे हृदय, कापणारे हात, थरथरणारे पाय, कोंडणारा श्वास आणि आक्रंदणारे हृदय हा अनुभव आयुष्यात आपल्याला कधी तरी येतोच. खरे तर धोक्याच्या प्रसंगी या अशा सिग्नलमुळे आपण जिवंत राहतो. ही आपल्या शरीरातील धोक्याची घंटा म्हणायला हरकत नाही, कारण त्यामुळेच आपल्यावर आलेल्या संकटाची गंभीरता जाणवते. त्यातून सुटायला मग आपण धडपड करायला लागतो.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अशा प्रकारच्या चिंतेच्या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. बऱ्याच स्त्रिया आपले पूर्ण आयुष्य अशा प्रकारच्या चिंतेच्या छायेखाली जगतात. काही स्त्रियांमध्ये या सामान्य वाटणाऱ्या चिंतेचे ‘पॅनिक अॅटॅक’ गंभीर स्वरूपाच्या ‘चिंतेच्या आजारा’मध्ये रूपांतरित होतात. तेव्हाच त्या डॉक्टरांकडे पोहोचतात. माझी एक मत्रीण तिच्या मावशीला ‘चिंता’मावशीच म्हणायची. तिच्या म्हणण्याप्रमाणे मावशीला मुळात चिंता करायला कारण लागतच नाही. माशी शिंकली तरी तिला माशीचे पुढे कसे होणार म्हणून चिंता वाटायला लागेल. अर्थात हे विधान फार अतिशयोक्तीचे नाही! कारण काही स्त्रियांना छोटय़ा छोटय़ा कारणांनी मोठमोठी चिंता लागते खरी!
चिंता म्हणजे काय?
चिंता हा भावनिक व शारीरिक स्वरूपाचा अनुभव आहे. बऱ्याच मनोशास्त्रज्ञांना वाटते की, चिंता हा सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल होणाऱ्या मनातील द्वंद्वाचा बाहय़ आविष्कार आहे. सतत अस्वस्थ वाटणे, हुरहुर वाटणे ही भावनिक लक्षणे असतात तशीच हृदयातली धडधड वाढणे, धाप लागणे, हातापायाला कापरे सुटणे, घाम फुटणे व पोटात गोळा येणे ही शारीरिक लक्षणेसुद्धा चिंतेच्या आजारात कमी-जास्त प्रमाणात दिसून येतात.
स्त्रियांना सारे दु:ख व त्रास हसत सहन करा, असे बालपणापासूनच सांगितले जाते. स्त्रियांसाठी खरे तर चिंता करणे, भीती वाटणे हा तिच्या स्त्रीधर्माचा परिणाम आहे, असेही सांगितले जाते. ‘तू बाईमाणूस आहेस म्हणून हळवी आहेस. त्यामुळेच तुझे मन विकल आहे, अशक्त आहे,’ असे चिंतित स्त्रियांना वेळोवेळी सांगितले जाते. चिंतेचा आजार म्हणजे तिच्या मनाची कमजोरी समजली जाते. मन कणखर कर, म्हणजे असे फालतू व कटकटीचे विचार मनात येणार नाहीत, असा फुकट सल्लाही तिला घरची मंडळी व मित्रपरिवार देत असतात. म्हणजे चिंतेचा आजार स्त्रीला झाला तर तिलाच दोषी मानले जाते. अशीच चिंताग्रस्त रुग्ण, मीना लग्नानंतर पाच वर्षांनी बहिणीबरोबर आमच्या बाहय़ रुग्ण विभागात आली होती. तिला वारंवार छातीत धडधडत असे, खूप घाम फुटत असे. मानेच्या मागे स्नायू ताणल्यासारखे वाटत. झोप लागत नसे. मनात सतत चलबिचल होत असे. नंतर समजले की, तिची सासू खूप खाष्ट होती. लग्न झालेल्या दिवसापासून ती हिला धारेवर धरत असे. ती कशी कुचकामी आहे, हे वारंवार ऐकवत असे. मीनाला सतत आपल्या हातून चूक होते आहे, असे वाटत असे. साधी पोळी करतानाही तिचा थरकाप होत असे. त्यामुळे तिला सतत दबावाखाली जगल्यासारखे वाटे. सुरुवातीला ती बरे वाटत नाही म्हणून आईकडे निघून जाई. आठ-दहा दिवस तिथे असेपर्यंत ती बरी राहत असे. वरील कुठलीही लक्षणे तिला तेथे जाणवत नसत; पण सासरी आली की, पुन्हा येरे माझ्या मागल्या. नंतर नंतर माहेरचे लोकही कंटाळले. सासरी तर नुसता आक्रस्ताळेपणा व अपमान. नुसती भित्रट व सदा ‘बिमार’ म्हणून हेटाळणी. मीनाला सर्वसामान्य चिंतेचा आजार म्हणजेच जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर (जीएडी) झाली होती. सौम्य व मध्यम पातळीचा चिंतेचा मानसिक आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो; पण स्त्रिया आपले कामकाज मात्र व्यवस्थित करीत असल्याने तो आजार आहे हे ओळखणे कठीण होते. बऱ्याच वेळा आपल्याला हे ‘जे’ काही होते आहे ते आजच्या काळात हृदयाशी संबंधित रोग असावा, असा समज बऱ्याच स्त्रियांचा व त्यांच्या नातेवाईकांचा होतो. त्यामुळे बऱ्याचदा चाचण्या करण्यात खूप वेळ जातो. काही वेळा अतिशय सक्षम, महत्त्वाकांक्षी व सुशिक्षित स्त्रियांना चिंतेची लक्षणे जाणवतात तेव्हा हा आपल्यावर येणाऱ्या विविध तणावांचा परिणाम आहे व तो ताण कमी केल्याने निघून जाईल असे वाटते. म्हणून त्या तज्ज्ञांकडे जायचे टाळतात. काही वेळा या स्त्रिया स्वत:च जिवंत ऊर्जा असतात. प्रचंड शक्ती त्यांच्यात दिसून येते. अशा वेळी त्यांना चिंतेचा आजार झाला आहे असे डॉक्टरांनाच पटत नाही. माझ्याकडे दीर्घकालीन (क्रॉनिक) चिंतेत वावरणारी एक चाळिशीची स्त्री येत असे. सदैव बिथरलेली, चिडलेली असे. सतत चलबिचलपणा मनात दाटलेला, हाताला घाम फुटलेला. चिंतेच्या एक दीर्घकालीन अनुभवाचा प्रचंड भार डोक्यावर ठेवून चालली होती. आता तर तिला दुसरी चिंता सतत वाटे की, आपल्याला एवढी सततची काळजी का वाटते? म्हणजे तिला चिंतेचा आजार एक तर आहेच. वर तो आपल्याला का आहे याची आणखी चिंता. मनुष्यप्राणी समजायला अवघड, असे म्हणतात ते यामुळे. या बाईंना आपण नक्की कशाने चिंतित झालो आहोत हेही सांगता येत नाही. सगळे घरी आल्याशिवाय तिला चैन पडत नसे. पती व मुलांचा प्रश्न तिला छळत असे. ‘आम्ही आरामात येणार आहोत, कसलीच समस्या नाही. मग उगाच तू काळजी का करतेस?’ त्यांना तिची ही काळजी निष्कारण वाटायची. नंतर नंतर तर ते मग तिच्याकडे दुर्लक्षच करायचे. त्यामुळे तिची चिंता मात्र आणखी वाढायची.
‘जीएडी’ची कारणे काय?
सर्वसामान्यपणे स्त्रियांना आपण सांगतो की, ‘चिंता ही तुझ्या डोक्यात आहे. खरे तर चिंता करण्यासारखे अमक्या गोष्टीत काही नाही.’ यात तथ्य व सत्य दोन्ही आहे. चिंतेच्या आजाराचे कारण तसे आपल्या डोक्यात असणाऱ्या मज्जासंस्थेतील मेंदूमध्ये जे न्यूरोट्रान्समीटर्स (रसायने) असतात त्यांच्यातील बदलामुळे होते. ही रसायने निसर्गत: आपल्या मेंदूमध्ये असतात. विविध प्रकारची ही रसायने त्यांची कार्ये व्यवस्थित करत असतात. यातील रसायनांचे दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मेंदूला चेतवणारी वा उत्तेजित करणारी व दुसरी मेंदूला शांतचित्त ठेवणारी रसायने. यातील चेतवणारी केमिकल्स जास्त प्रभावित झाली व शांत करणाऱ्यांचा प्रभाव कमी झाला तर जो असमतोलपणा येतो त्यामुळे चिंतेचा आजार होतो. आजकाल चिंतेच्या आजारावर पटकन सुटका देणारी औषधे या असमतोलपणावर कार्य करतात. हायपोथेलॅमो पिटुटरी अॅड्रीनल (एचपीए) असा एक मेंदूचा महत्त्वाचा भागसुद्धा चिंतेशी संबंधित आहे. हे एचपीए कनेक्शनसुद्धा सतत उत्तेजित राहिले तर विविध हार्मोन्समध्ये असमतोलपणा येऊन चिंतेचा आजार होतो. पाळी जायच्या दरम्यान ईस्टरोजन कमी होऊ लागल्याने स्त्रीला चिंतेच्या लक्षणांचा व तणावाचा खूप त्रास होतो. त्यामुळे पाळी जायच्या वेळा व गेल्यावर बऱ्याच स्त्रियांना शरीरातून उष्ण लहरी सळसळायल्या लागतात, घाम फुटायला लागतो व छातीत धडधडण्याची लक्षणे दिसायला लागतात. म्हणून हार्मोन्सचा समतोलपणा राखणे खूप महत्त्वाचे आहे.
चिंतेचा आजार कसा ओळखायचा?
या आजारात स्त्रीची संपूर्ण मानसिक ताकदच पणाला लागते. आपण आतमधून भरडले जात आहोत असेच बऱ्याच जणींना वाटते. या अशा भयानक गुदमरून टाकणाऱ्या अनुभवातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही असे स्त्रियांना वाटते. कधी-कधी आपण मृत्यूच्या गुहेत ओढले जात आहोत असेही त्यांना वाटते. याशिवाय खालील इतर लक्षणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
० कारणाशिवाय किंवा छोटय़ाशा गोष्टींनीही चिंता वाटणे.
० स्नायूंमध्ये तणाव किंवा खेचल्यासारखे वाटणे.
० हृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधडणे.
० छातीत दुखणे किंवा भरल्यासारखे वाटणे.
० जुलाब होणे किंवा पोटात कडकडल्यासारखे वाटते.
० ओकारी येणे व मळमळणे.
० चिडचिडणे/उतावीळ वाटणे.
० डोळे भरून येणे.
० हातापायाला घाम सुटल्यासारखे वाटणे.
० चिंतित मनाने झोप येत नाही. तळमळणे, धाप लागणे होते. सोबत श्वास अडकतो.
० चिंतेच्या दीर्घकालीन आजारात पोट व आतडय़ांशी संबंधित लक्षणे अधिक आढळतात.
काही वर्षांपूर्वी वसुंधरा माझ्याकडे येत असे. चार-पाच महिन्यांच्या काळात तिला खूप अस्वस्थ वाटत असे. प्रत्येक वेळी छातीत प्रचंड दाब जाणवायला लागला व हृदयाचे ठोके वाढले म्हणून घाबरीघुबरी होत असे. मोठय़ा अधिकाऱ्याची बायको म्हणून तिचे सर्व रिपोर्ट होत असत. ईसीजी काढला तर तोही नॉर्मल असे. तशी कुठल्या सर्वसाधारण वा गंभीर आजाराची लक्षणे तिच्यात दिसत नव्हती. थोडी औषधे दिली की ती नॉर्मल व्हायची; पण तिला सांगता मात्र येत नव्हते, की हे कशामुळे होत आहे. हळूहळू या लक्षणांचे प्रमाण वाढले. तिला झोप यायची नाही, आवाज थरथरायचा, सतत बेचन वाटायचे. शेवटी तिच्याशी बोलता बोलता लक्षात आले की, तिचा नवरा परशुरामाचा संतप्त अवतार होता. चुकून जरी तिच्या हातून गोंधळ झाला, एखाद्या कामाची वेळ टळली, तर तिला शापावर शाप मिळत असत. आईबाबा, भाऊ गावाकडे व ती मुंबईत, तसा कोणाचा आधारसुद्धा नाही. लग्नानंतर वर्षांनुवष्रे हिटलरस्वरूप नवऱ्याबरोबर कसे जगायचे, हाच प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा असायचा. उद्याचा दिवस कसा एकदाचा संपतो हे आजचा दिवस संपताना तिच्या मनात येत असे. मधल्या काळात ती कशीबशी जगत असे. मात्र, जसे जसे तिच्या लक्षात आले की, आपला हा आजार आपल्या पतीच्या दडपणामुळे येतो आहे तेव्हा आपल्याला काही तरी जीवघेणा आजार झाला आहे, ही तिची काळजीसुद्धा कमी झाली.
चिंतेच्या आजारात एखादी न सोसणारी त्रासदायक घटना या लक्षणांची सुरुवात करते. मग ही लक्षणे सोसणेसुद्धा रुग्णास असहय़ होते. सांगता येत नाही व सोसतही नाही असे अवघड दुखणे म्हणजे चिंतेचा आजार. म्हणूनच या आजाराबद्दल स्वत:शी तर्क करत बसण्यापेक्षा तणाव वा चिंता कमी करणं हाच सर्वात उत्तम उपाय आहे. यावरच्या उपायाविषयी पुढील (८ ऑगस्ट) अंकात. (क्रमश)
डॉ. शुभांगी पारकर -pshubhangi@gmail.com.

education institute owner cheated by agent marathi news
डोंबिवलीतील शिक्षण संस्था चालकाची मंत्रालयातील शिक्षण विभागातील मध्यस्थाकडून फसवणूक
How To Stop Constant Burping Acid Reflex Doctor Suggested Remedies for Quick Relief in Acidity That Lead to Intestinal Disease sign
वारंवार ढेकर येत असल्यास डॉक्टरांचे ‘हे’ ७ उपाय देऊ शकतात आराम; आतड्यांच्या विकाराचे लक्षण कसे ओळखाल?
severe back pain after cesarean delivery
सी सेक्शन डिलीव्हरीनंतर महिलांच्या मणक्यात तीव्र वेदना का होतात? जाणून घ्या त्यामागील कारणे
cardiac arrest symptoms
पाठीच्या ‘या’ भागात दुखणे ठरू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे कारण; जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती