माझ्याकडे माझी मैत्रीण जेवायला येणार होती. खूप वर्षांनी भेटणाऱ्या या मैत्रिणीला आपल्याच घरात फुलवलेल्या बागेतली भाजी खायला घालून चकित करायचं ठरवलं आणि मेनूही ठरवला. अळूची भाजी, वडे, कोशिंबीर, मिरची, कढीलिंब, कोथिंबिरीची चटणी, घोसाळ्याची भजी. शिवाय चटणी, लोणच्याचे प्रकार होतेच.
सकाळी उठल्या उठल्या मी आमच्या परसबागेत शिरले. गेल्या १५ वर्षांपासून वेळात वेळ काढून, प्रसंगी काही लोकांची मदत घेऊन फुलं, फळं आणि भाजी पिकवते आहे. आवड आणि गरज म्हणूनही! ताजी भाजी बघून मनाला आनंदच झाला. मन प्रसन्न ताजंतवानं झालं. गेली कित्येक वर्षे या बागेत अळू, कोथिंबीर, मेथी, पालक, कढीलिंब, मिरची, घोसाळी, तोंडली, वांगी, टोमॅटो, चाकी, गवार, वाल, चवळी, भोपळा, मुळा, वगैरे भाज्या पिकल्या आहेत. लिंब, पेरू, बोरं, केळी, सीताफळ वगैरे फळं आली आहेत.
मुख्य म्हणजे कुणी येणार असेल तर परसबागेमुळे ऐन वेळेस धावाधाव करावी लागत नाही. दुसरे, आजकाल या खाण्याच्या वस्तूंचा कस कमी झाला आहे. खताचा भरमसाठ वापर, निकृष्ट, कस कमी झालेली जमीन नि दूषित सांडपाण्यावर लावलेला भाजीपाला खाणे टाळता येते. म्हणूनच आत्ताच्या आपल्या मुलांना पूर्ण पोषक आणि चौरस आहार मिळावा यासाठी शक्यतो तुमच्याही परसदारी, गॅलरीत, गच्चीत, बिल्डिंगच्या आवारात ही बाग फुलवू शकाल! म्हणूनच घरच्या घरी कशी फुलवाल तुमची बाग, हे या सदरातून आपण पाहणार आहोत, दर शनिवारी. मग तुमच्याही बाबतीत ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ हे सार्थ ठरेल.
तारा माहूरकर