ch16‘‘आजपर्यंत दलित समाजासमोर दोनच पर्याय होते. एक तर सरकारी नोकरीत जाणे किंवा राजकीय पुढारी होणे. परंतु जागतिक बाजारपेठेत ‘जात’ महत्त्वाची नसते, तर ‘गुणवत्ता’ सर्वोत्तम मानली जाते. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि अमेरिकेतील ब्लॅक कॅपिटलिझम यांच्या प्रभावातून स्थापन झालेल्या ‘डिक्की’ म्हणजेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या चौकटीबाहेरच्या संस्थेच्या माध्यमातून भारतीय उद्योगजगतात एक दमदार पाऊल टाकले गेले आणि ‘येस वी कॅन’ साध्य झाले.’’

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात की जे आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरतात. जन्मलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात काहीतरी बनण्याची सुप्त इच्छा असते. जो मनुष्य ती कल्पना प्रत्यक्षात उतरवतो तो यशस्विततेकडे वाटचाल करतो. माझ्या आयुष्यातही असे काही क्षण, अशी काही वळणे आली, ज्याने माझे आयुष्य बदलवून टाकले.
६ डिसेंबर २००१ रोजी दिल्ली येथे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील वेबसाइटचे उद्घाटन झाले. या वेबसाइटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब अर्थतज्ज्ञही होते ही बाब जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित जगातली सगळ्यात मोठी वेबसाइट म्हणून ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये तिचा समावेश झाला. या वेबसाइटच्या निर्मितीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. त्यामुळे ही घटना माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणता येईल.
मराठवाडय़ातील लातूर जिल्हय़ातले चोबळी नावाचे माझे गाव! माझे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांची ज्या गावी बदली होईल त्या ठिकाणी माझे शिक्षण झाले. इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण दोन ठिकाणी, सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षण लातूरचे देशी केंद्र विद्यालय येथे, तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिरूर ताजबंद येथील महेश विद्यालयात झाले. माझे शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे ग्रामीण, शहरी, निमशहरी क्षेत्रांतील शाळा, वेगवेगळे शिक्षक, विद्यार्थी मित्र, प्रत्येक ठिकाणी भेटलेल्या व्यक्ती व त्यांची स्वभाववैशिष्टय़े, भौतिक जीवनातील अंतर, व्यवहारातील बदल मला खूप वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता आले. खरेतर मराठवाडय़ासारख्या मागास, विकासाच्या दृष्टीने उपेक्षित असलेल्या खेडय़ातून मी आलो. माझे काका अ‍ॅड. टी. एन. कांबळे हे ‘दलित पँथर’ या चळवळीचे काम करीत असल्यामुळे कळत नकळत त्या चळवळीचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्त्वावर होत होता. आजूबाजूच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करत होतो. त्यातून मीही एक पँथर झालो.
त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण. मी नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनात  इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच विजय देशमुख यांच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आलो. या चळवळीचे काम करीत असताना विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन अनेक आंदोलने केली. या काळात माझ्यातील नेतृत्व गुण विकसित होत गेले. सातत्याने सामाजिक समस्या, विद्यार्थी समस्या यांचे चिंतन, आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण, वाचन यातून माझे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
१९९०-९१ हे वर्ष महात्मा फुले यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हा योग साधून समरसता मंच व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फुले आंबेडकर संदेश यात्रा’ काढण्यात आली. सलग ४५ दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संदेश यात्रा घेऊन गेलो. मी व मधुसूदन व्हटकर आम्ही या यात्रेचे संचालन करत होतो. या संदेश यात्रेमुळे माझ्या विचारात प्रगल्भता येत गेली. आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचे एकांगी चित्रण समाजासमोर आले होते. परंतु या संदेश यात्रेच्या निमित्ताने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य वाचनात आले. या महापुरुषांचे विचार, त्यांनी समाज परिवर्तनासाठी दिलेले योगदान या सर्व गोष्टींची जाणीव झाली. त्यातून एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. यातूनच खरंतर आगामी काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वेबसाइटच्या निर्मितीचे बीज रुजले.
इंजिनीअिरगची पदवी हातात पडल्यानंतर खरेतर आरक्षणाच्या बळावर कुठेही सरकारी नोकरी मिळवता आली असती, परंतु आपल्याला त्या वाटेने जायचे नाही हे मनाशी पक्के ठरवले होते. पुण्यात येऊन खासगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय करायचा असे ठरवले होते. सुरुवातीला प्रत्यक्ष कामाचा अनुभव येण्याकरिता ५ वष्रे नोकरी केली. पुण्यातील म्हाळगी असोसिएट्स, ‘मंत्री कन्स्ट्रक्शन’, मिश्रा असोसिएट्स यांसारख्या मोठय़ा कंपन्यांतून उमेदवारी केली. येथील कामाच्या अनुभवातून १९९५ मध्ये ‘मििलद कांबळे सिव्हिल इंजिनीअर्स अँड कॉन्ट्रक्टर्स’ ही संस्था रजिस्टर केली. बी.एम.सी.सी. कॉलेजच्या संरक्षक िभतीचे काम केले. सुरुवातीच्या काळात हेमंत लेले, प्रमोद कुलकर्णी, भगवान वांजळे या मित्रांच्या साहाय्याने काही कामे पूर्ण केली. त्यानंतर मिश्रा असोसिएट्सबरोबर कृष्णा खोरे विकास मंडळाचे, िपपळगाव डाव्या कालव्याचे काम, कोकण रेल्वे राजापूर स्टेशन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरच्या घाटातील काही भाग, खंबाटकी बोगदा अशी कामे केली. आज मिश्रा असोसिएट्स या कंपनीत मी संचालक आहे. हे करत असतानाच मी स्वत:ची ‘फॉच्र्युन कन्स्ट्रक्शन कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून मोठे प्रकल्प तडीस नेले. ‘एमपीके’ कंपनीच्या माध्यमातून गारमेंटच्या व्यवसायातही उतरलो आहे. एक नवीन ब्रँड मार्केटमध्ये लोकप्रिय केला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. व्यवसाय करत असताना मी कायम गुणवत्तेचा आग्रह धरला. प्रगती करायची असेल तर आव्हानांचा सामना करावाच लागेल. तिथे ‘शॉर्टकट’ नाही. कष्ट केल्याने यश आपोआपच येईल यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे कोणतेही काम आव्हानात्मक वाटत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा कायमच माझ्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. काहीतरी वेगळं केलं पाहिजे ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे मी व्यवसाय करत असतानाच काहीतरी ठोस, वेगळं करण्याच्या तयारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर वेबसाइटची निर्मिती करण्याचे ठरवले. या वेबसाइटच्या निर्मितीमुळे त्यांच्या आíथक विचारांचा प्रभाव माझ्यावर अधिक पडला. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनासाठी उभारलेल्या चळवळी, त्यांचे योगदान सर्वश्रुत आहेच. तसेच आजपर्यंत त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विचारही प्रसृत केले गेले. पण आजवर दुर्लक्षित राहिलेले त्यांचे आíथक विचार या वेबसाइटच्या निमित्ताने समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते अर्थशास्त्राचे पदवीधर होते, अर्थतज्ज्ञ होते ही गोष्ट वेबसाइटच्या माध्यमातून पुढे आणली. जवळपास चार वष्रे मी या वेबसाइटच्या निमित्ताने अभ्यास केला. बाबासाहेबांचं संपूर्ण लेखन, विविध विषयांवरील लेख, निबंध, अर्थशास्त्रविषयक प्रबंध, त्यांनी केलेली भाषणे यांचा धांडोळा घेतला. अनेक लोकांना या निमित्ताने भेटलो. त्यांच्याकडील पत्रव्यवहार, आठवणी, फोटो यांचा संग्रह केला. एक हजाराहून अधिक फोटो असलेल्या या वेबसाइटचे उद्घाटन झाल्यानंतर लाखो लोकांनी या वेबसाइटला प्रत्यक्ष भेट दिली. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी तसेच डॉ. आंबेडकरांच्या अभ्यासकांनी या वेबसाइटचा उपयोग झाल्याचे कळवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि अमेरिकेतील ब्लॅक कॅपिटलिझम यांच्या प्रभावातून १४ एप्रिल २००५ रोजी ‘डिक्की’ म्हणजेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या चौकटीबाहेरच्या संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांच्या आíथक विचारांना मूर्त स्वरूप देऊन दलित समाजातील तरुणांमध्ये उद्योजकता चेतवण्यासाठी आम्ही काही उद्योजकांनी एकत्र येऊन २००३ मध्ये ‘एस.सी. एसटी चेंबर ऑफ कॉमर्स’ या संस्थेची स्थापना केली. भारतात जसा दलित समाज उपेक्षित आहे त्याप्रमाणेच अमेरिकेत कृष्णवर्णीय समाज आहे. कृष्णवर्णीय समाजाने केलेला संघर्ष अर्थकारणाशी मेळ राखत असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेणे भाग पडले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये ब्लॅक कॅपिटलिझमचा वाटा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेतील त्या वेळच्या सरकारने उद्योग, कला, क्रीडा, साहित्य यातून कृष्णवर्णीयांना संधी देत सामावून घेतले. तसेच ‘निग्रों’च्या प्रश्नावर मार्ग काढत असताना समन्वय आणि सामाजिक समुपदेशनासोबतच ‘ब्लॅक कॅपिटलिझम‘ विकसित केले. हेन्री फोर्ड यांच्यासारख्या उद्योगपतीने आपल्या मोटारींना लागणाऱ्या सुटय़ा भागांचे प्रदर्शन मांडले व तेथील कृष्णवर्णीय समाजाने यापकी कोणतेही पार्ट बनवून दिल्यास ते भाग स्वत: ‘फोर्ड मोटर’ खरेदी करेल, अशी घोषणा केली. त्यातून अमेरिकेत ब्लॅक कॅपिटलिझम रुजत गेला.
तसं पाहिलं तर भारतातही दलित चळवळ याच मार्गाने पुढे गेली. इथेही दलित साहित्य, दलित रंगभूमी या माध्यमातून दलित चळवळ विकसित झाली. पंरतु या चळवळीत आíथक स्वावलंबनाचा, उद्योजकतेचा भाग नव्हता. वेळोवेळी आलेल्या सरकारांनीही या दृष्टीने पावले उचलली नाहीत. दलित समाजामध्ये राजकीय, शैक्षणिक, कामगार, तत्त्वज्ञान या विविध क्षेत्रांत नेतृत्व तयार झाले. परंतु उद्योगक्षेत्रात नेतृत्व तयार झाले नाही. या पाश्र्वभूमीवर दलित उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, दलित उद्योगपती निर्माण करणे, त्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी ‘डिक्की’ने महत्त्वाचे पाऊल उचलले. ब्लॅक कॅपिटलिझमच्या धर्तीवर दलित कॅपिटलिझम संकल्पना पुढे आणली.
आज ‘डिक्की’ची स्थापना होऊन दहा वर्षांचा काळ लोटला आहे. या दहा वर्षांत ‘डिक्की’ने अतिशय लक्षणीय वाटचाल केली आहे. जून २०१० मध्ये पुण्यात दलित उद्योजकांनी निर्माण केलेल्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करून भारतीय उद्योगजगतात एक दमदार पाऊल टाकले आहे. हे प्रदर्शन दलित समाजाच्या आशाआकांक्षा उंचावत असल्याचे द्योतक ठरले. ‘येस वी कॅन!’ ही घोषणा या प्रदर्शनाने सार्थ केली. डिसेंबर २०११ मध्ये मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ‘डिक्की’चे दुसरे भव्य औद्योगिक प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, आदी गोदरेज, तसेच उद्योगजगतातील प्रमुख उद्योगांचे सीईओ अधिकारी उपस्थित राहिले. या सर्वानी ‘डिक्की’च्या प्रयत्नांचे कौतुक केले. दलित उद्योजक व भारतीय उद्योगसमूह पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र आले याची इतिहासात नोंद झाली.
पुणे व मुंबई येथे झालेल्या दोन प्रदर्शनांमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डिक्की’ची चर्चा झाली. भारतीय उद्योगविश्वातील विविध संघटना, जसे की सी.आय.आय., फिक्की, असोचेम यांच्याप्रमाणेच ‘डिक्की’लाही एक ओळख प्राप्त झाली. सरकारच्या विविध आíथक धोरणविषयक चर्चाच्या बठकांसाठी ‘डिक्की’लाही प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. आज ही एक मान्यताप्राप्त संस्था झालेली आहे.
नुकतेच फेब्रुवारी महिन्यात १३ ते १५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे ‘डिक्की’चे चौथे औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात आले. त्याची भव्यता डोळे दिपवणारी होती. या प्रदर्शनासाठी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्घाटनासाठी उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन, उद्योगपती आदी गोदरेज आवर्जून उपस्थित राहिले. तसेच तेलंगणा सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर करून सरकारची संवेदनशीलता जागृत आहे हे दाखवून दिले.
 ‘डिक्की’ केवळ उद्योगधंद्यांशी संबंधित न राहता सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करत आहे. उद्योगाच्या माध्यमातून दलित सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात डी.एस.आर. उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून मार्गदर्शन, नेटवìकग, भांडवल उपलब्ध करून देणे या विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. ‘डिक्की’ने स्वत:चा व्हेंचर कॅपिटल फंडही निर्माण केला आहे. विविध उद्योग संघटनांशी ‘डिक्की’संपर्कात आहे. या सर्व प्रवासात टाटा, गोदरेज, थरमॅक्स या कंपन्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
या विविध टप्प्यांवर अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींचा पाढा वाचणे मला आवडणार नाही. परंतु अडचणींवर मात करत पुढे जात राहिलो. प्रत्येक अडचणींच्या वेळेस अनेक लोकांनी, मित्रांनी, कुटुंबीयांनी मला मदत केली. अनेकांनी सहकार्य केले. त्यामुळेच खरेतर उभा राहू शकलो.
माझ्या प्रवासात ‘डिक्की’चं वळण हे सर्वात मोठं वळण आहे. चौकटीबाहेरचा विचार, संकल्पना समोर आणली आणि ती हळूहळू यशस्वी होताना मी पाहत आहे. या वेगळ्या संकल्पनेमुळेच, चळवळीमुळेच भारत सरकारने माझ्या कामाची म्हणजेच ‘डिक्कीची’ दखल घेऊन मला पद्मश्री देऊन सन्मानित केलं. हाही माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा राहिला.
आजपर्यंत दलित समाजासमोर दोनच पर्याय होते. एकतर सरकारी नोकरीत जाणे किंवा राजकीय पुढारी होणे. परंतु उद्योग क्षेत्रातही आपण काही करू शकतो. यातूनही आपल्याला सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते हा आत्मविश्वास दलित तरुणांमध्ये निर्माण करता आला.
आज जागतिकीकरणामुळे सर्वानाच प्रगतीची दारे खुली झाली आहेत. या मोकळ्या आकाशात भरारी मारण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनतीची तयारी आवश्यक आहे. जागतिक बाजारपेठेत ‘जात’ महत्त्वाची राहिली नाही, तर ‘गुणवत्ता’ सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे गुणवत्तेच्या जोरावरच आज यशाचे शिखर गाठणे सहज शक्य आहे. आम्ही तेच करतो आहोत..