गोष्ट सांगताना चकवे देऊन प्रेक्षकाला साध्याच गोष्टींतून भव्य सिनेअनुभव देणारा ‘मिडनाइट स्पेशल’ हा चित्रपट त्याच्या वेगळेपणामुळे चर्चेत आहे. अनेक चित्रप्रकारांचे एकत्रीकरण करून जेफ निकोल्स या दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे दिग्गज दिग्दर्शकांच्या पंगतीत शिरकाव केला आहे.

कुठलाही सिनेमा तातडीने चांगला किंवा वाईट या दोन पातळ्यांवर तोलता येतो. मात्र  तर त्याची अवघड आणि सोपा अशीही विभागणी करता येईल. प्रेक्षकशरण ब्लॉकबस्टर चित्रपट खूप सोपा असणे हे स्वाभाविक असते. म्हणजे डोके बाजूला ठेवून पॉपकॉर्न चघळत पैसेवसुलीचे समाधानी मनोरंजन चित्रगृहातून घरी नेण्याची सवय लागलेला प्रेक्षक जगभरात सारख्याच प्रमाणात आहे. त्यात आपल्याकडच्या प्रेक्षकसंस्कृतीने सिनेमामध्ये सोपेपणाचा सोस सिनेनिर्मितीच्या काळापासून कायम ठेवला. परिणामी चित्रपटात काय घडत आहे, गोष्ट काय सुरू आहे, याचे कुतूहल पहिल्या पाचेक मिनिटांत उलगडले नाही, तर त्या चित्रपटाला तातडीने नाकारायची प्रेक्षकांना घाई असते. ही घाई लगेचच काही न उमगल्यास त्याच्यावर वाईट शिक्का मारण्यात मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत होते. त्यामुळेच कलात्मक समांतर सिनेमा आणि व्यावसायिक चित्रपट असे दोन विस्तव आपल्याकडे बरीच वर्षे कायम राहिले. आज समांतर आणि कलात्मक यांच्या सीमारेषा धुसर ठरविणारे चित्रपट येत आहेत. पण तरीही चित्रपटातून स्पष्ट गोष्टीचा चमचा प्रेक्षकांना भरवणे चित्रकर्त्यांना आवश्यक वाटते. क्वेन्टीन  टेरेन्टिनोचा ‘रिझव्हॉयर डॉग्ज’ किंवा ख्रिस्टोफर नोलानचा ‘मेमेण्टो’ हे चित्रपट भारतीयीकरण होऊन जेव्हा (काँटे आणि गझनी) आपल्याकडे आले, तेव्हा मूळ चित्रपटांच्या गोष्ट सांगण्याच्या गाभ्यालाच बदलून चित्रपटांचे सुस्पष्टीकरण केले गेले. मूळ चित्रपटाबरहुकूम गोष्ट आपल्या प्रेक्षकांना पचणार नाही, या खात्रीने ही रूपांतरे झाली. आताही चित्रपटात काय घडते आहे, हे सांगण्यासाठी गोष्ट एका बिंदूपासून सुरू होताना काय घडते आहे, हे सांगणारा निवेदक अत्यावश्यक असतो. अन् जगभरात, अगदी प्रायोगिक-व्यावसायिक चित्रपटांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या अमेरिकी चित्रसृष्टीमध्येही हा निवेदन अट्टहास कायम आहे. तो असण्यात वावगे काही नाहीच. तरी प्रेक्षकाला या दृश्यमाध्यमाची खरी ताकद ही त्याला थेटपणे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींऐवजी त्याने मनात तयार केलेल्या आकलनावर ठरत असते. जेफ निकोल्स या दिग्दर्शकाचा ‘मिडनाइट स्पेशल’ हा चित्रपट चित्रपटाची गोष्ट थेट सांगण्याच्या फंदातच पडत नाही. प्रेक्षकांना त्यांच्या आकलनशक्तीला ताण देण्यासाठी तो भला मोठा दृश्यचकवा घालून ठेवतो. यात चित्रपटाची गोष्ट समजावून वगैरे सांगितली जात नाही. तरी चित्रपट अनेक गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण ठरतो.

‘मिडनाइट स्पेशल’ चित्रपटाची मुख्य संकल्पना सांगितली, तर तो पाहण्यातील गंमत निघून जाऊ शकते. पण यातील चित्रप्रकारांचे भलेमोठे मिश्रण त्याला आणि या दिग्दर्शकाला पूर्णपणे वेगळा ठरवीत आहे. या चित्रपटामध्ये १९७०-८०च्या क्लिंट ईस्टवुडच्या वेस्टर्न चित्रपटांसारखे वातावरण आहे. १९९० नंतर अधून-मधून लोकप्रिय होणाऱ्या रोड मूव्हीसारखी मांडणी आहे. त्यात गुन्हेगारी चित्रपटांसारखा उंदीर-मांजरासारखी पळापळ आहे. शेरलॉक होम्सछाप डिटेक्टिव्ह सिनेमांसारखा कूटप्रश्नाचा उलगडा आहे. पुढे पुढे कौटुंबिक प्रेमाचा, नात्यांचा शिरकाव आहे. तरी हा चित्रपट आहे मुळात वैज्ञानिक थ्रीलर. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जेफ निकोल्सची तुलना थेट स्टीव्हन स्पिलबर्गशी होऊ लागली. अन् सिनेमाचा प्रचंड बोलबाला झाला.

चित्रपट करण्याआधी निकोल्सने केलेल्या तीन चित्रपटांपैकी दोन्ही चित्रपट कुटुंबकथा होत्या. एका छोटय़ा खेडेगावातील दोन कुटुंबातील वैराची परिणती सुडात दाखविणारा ‘शॉटगन स्टोरीज’, प्रचंड मोठय़ा वादळाच्या भयशंकेने आप्तांच्या बचावासाठी सुरक्षित जागा तयार करणाऱ्या माणसाची गोष्ट सांगणारा ‘टेक शेल्टर’. या दोन्ही चित्रपटांमध्ये गोष्ट सांगण्याची निकोल्सची पद्धत ही एकसारखी आहे. ‘मिडनाइट स्पेशल’ दृश्यघटनांतून गोष्ट प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसवण्यासाठी फार श्रम घेतो. ते श्रम हा चित्रपट पाहण्यासाठी आणि तो आवडण्यासाठी पुरेसे आहेत.

चित्रपटाला सुरुवात होते मोटेलमधील एका बंद खोलीमध्ये सुरू असणाऱ्या टीव्हीवरील आठ वर्षांच्या अपहरणाच्या बातमीने. एका विशिष्ट कोनात सुरू असलेला टीव्ही आणि दोन बंदूकधारी इसम त्या घरामध्ये त्याच लहान मुलावर पहारा देत बसलेले. टीव्हीवर दिसणारा अपहरण झालेला मुलगा त्यांच्या ताब्यात आहे. मात्र कॉमिक्स वाचनानंदात तो पुरता बुडालेला आहे. थोडय़ाच वेळात मोटेलमधील लपायची जागा अपहरणकर्ते बदलायचे ठरवितात. गाडीमध्ये बसून ते अनिश्चित दिशेने प्रवास सुरू करतात. त्यांच्या मागावर पोलीस लागतात. पोलिसांपासून बचाव करण्याच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येते की, टीव्हीवरील बातम्यांमुळे अपहरणकर्ते वाटणाऱ्या दोन बंदूकधारी इसमांपैकी एक त्या आठ वर्षांच्या मुलाचा पिता आहे.

या लहान मुलामध्ये विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे एका विशिष्ट समुदायाशी निगडित संस्था प्राण पणाला लावून अल्टन (जेडन लिबरहर) या मुलाला हस्तगत करू पाहत आहे. त्यांच्यापासून वाचविण्यासाठी मुलाचा पिता रॉय (मायकेल शेनॉन)हा आपल्या लुकास (जोएल एडगर्टन) या मित्रासोबत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. पण स्थलांतराचा हा प्रकार सोपा नाही. कारण त्या संस्थेने पसरविलेल्या अपहरणाच्या बातमीमुळे पोलीसयंत्रणाही या मुलाला हस्तगत करण्यासाठी सक्रिय झालेली आहे. या दोन्हींपासून सुरक्षित वाचविण्यासह आठ वर्षीय मुलाची कथित अद्भुतशक्ती लपविण्यासाठी रॉयला जीवघेणा आटापिटा करावा लागत आहे.

सूर्यकिरणांच्या शक्तीपासून बचावासाठी अल्टनला घेऊन जाणारा हा प्रवास रात्रीच्या अंधारातच सुरू राहतो. अन् यात त्याच्या शक्तीची पहिली प्रचीती एका धर्मसंस्थेच्या घरामध्ये लपलेले असताना येते. त्याच्या भीषण निळ्या डोळ्यांमधून निघणाऱ्या विशिष्ट लहरींनी त्या घराभोवती भूकंपसदृश परिस्थिती निर्माण होते. एका पेट्रोलपंपाजवळ त्याच्याकडून आकाश निरीक्षण केले जात असतानाच त्या भागात अंतराळयान कोसळू लागतात. ते आपण पाडल्याचा दावाही तो लहान मुलगा करू लागतो. मध्येच अगम्य भाषेत त्याचा संवाद सुरू होतो. जो कुठल्यातरी भलत्याच देशाच्या रेडिओवर सुरू असतो. रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या आधारे तो ते बोलत असल्याचे रॉय सप्रमाण दाखवून देतो. पण तरीही मुलाची तथाकथित दैवी किंवा अद््भुत शक्ती कसली आहे, याचा उलगडा करून दिला जात नाही. कारण त्याच्याशी खुद्द रॉयच अनभिज्ञ असतो.

दुसऱ्या बाजूला चित्रपटाचा एक प्रवाह पॉल सेव्हिएर (अ‍ॅडम ड्रायव्हर) या पोलिसांच्या तपास विभागाला साहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्याद्वारे सुरू असतो. तो त्या मुलामध्ये असलेल्या कथित शक्तीचा माग वेगळ्याच पद्धतीने काढून पोलिसांना मदत करीत असतो. पॉल आपल्या कामांत यशस्वी होतो. तोपर्यंत रॉय मुलाला घेऊन आपल्या विभक्त झालेल्या पत्नीपर्यंत पोहोचलेला असतो. पोलीस यंत्रणेपासून हे कुटुंब पुन्हा पळ काढत असताना, हा मुलगाच पित्याला जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी नेण्याचे निर्देश देतो. मुलाची शक्ती नेमकी काय गोष्ट आहे, हे उमजलेला रॉय मुलाने सांगितलेल्या वाटेवर जाण्यास सज्ज झालेला असतानाच. पोलीस त्यांना जायबंदी करतात. पण त्यावर मात करून अल्टन आपल्या पुढच्या प्रवासाची तयारी करतो.

मिडनाइट स्पेशलचा हा भाग मुलाकडून केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनाचा राहत नाही. चमत्कारांच्या मसालेदार क्लृप्त्या वापरून अशा प्रकारचे मनोरंजक चित्रपट जे काही करू साधतात, त्यांचा मागमूसही या चित्रपटामध्ये दिसत नाही. त्यामुळे चित्रपटाने घालून दिलेला सुरुवातीपासूनचा दृश्यताकदीचा परिणाम आपल्यावर शेवटपर्यंत टिकून राहतो. सिनेमा उत्तम विज्ञानिका कसा आहे, याचे स्पष्टीकरण करणारा चित्रपटाचा शेवट सुरुवातीपासून चित्रपटात घातलेल्या चकव्यांना दूर करण्याचा विडा उचलतो. तो प्रत्येकाला आवडू शकेल इतक्या भव्यदिव्य व्हिज्युअल इफेक्ट्सने आपल्यासमोर काही नव्या गोष्टी आणतो. त्यांच्या उत्तरांतून गोष्ट मांडण्याच्या निकोल्सच्या आडवळणाच्या पद्धतीचे कौतुक वाटायला लागते.

खूप काही न सांगता परग्रहवासीयांनी पृथ्वीवर निर्माण केलेला थरार संयतभय निर्माण करून सादर करणारा मनोज नाइट श्यामलनचा ‘साइन्स’ किंवा स्टीवन स्पिलबर्गच्या ‘क्लोज एन्काऊन्टर ऑफ थर्ड काइंड’शी चित्रपटाचे किंचितसे साम्य आहे. एवढे म्हटले तरी चित्रपट कशावर आहे, याचा उलगडा होऊ शकतो. तरी ते कितपत खरे-खोटे हे प्रत्यक्ष अनुभवानंतरच प्रत्येकाने ठरवायचे आहे.

या चित्रपटाची पटकथा, अभिनय आणि एकामागोमाग चालणाऱ्या साध्याच घटकांची दृश्यमांडणी खिळवून ठेवण्याइतपत शक्तिशाली आहे. या दृश्यमालिकांनी पाठलागपटाचे रहस्यपटात पुढे कुटुंबपटाचे वैज्ञानिकेत बदल घडविणारे यातले रूप पाहून एकूणच चित्रपट माध्यमाचा आपला आजवरचा अनुभव समृद्ध होण्याची शक्यता अधिक आहे.

पॉपकॉर्न चघळत मनोरंजन ओरपू देणारा सिनेमा आणि तुमच्या डोक्यातील विचारसाखळी भरपूर काळ सक्रिय ठेवणारा ‘मिडनाइट स्पेशल’ सर्वासाठी आहे. कलात्मक वा प्रायोगिक अशा गटात त्याला मोडता येणार नाही. फक्त सारी गोष्ट पहिल्या बिंदूपासून तंतोतंत समजलीच पाहिजे हा अट्टहास, इथे चालवून घेता येणार नाही. हॉलीवूडमधील मोजक्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांकडे जगभरातील सिनेरसिक डोळे लावून असतात. ख्रिस्तोफर नोलान, जेम्स कॅमेरॉन, रॉबर्ट झेमेकिस, स्टीवन स्पिलबर्ग या आघाडीच्या पंगतीत जेफ निकोल्सचा शिरकाव ‘मिडनाइट स्पेशल’मुळे झाला आहे. तो कसा, हे याची खात्री चित्रपट पाहिल्यानंतर हमखास येऊ शकेल.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com