समाजातील खूप श्रीमंत, परंतु आपल्या पैशाचा विनियोग फक्त आपल्यापुरता करणाऱ्या, दुसऱ्यांना मदत न करणाऱ्या लोकांना उद्देशून कबीर म्हणतात,
बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर
पंथी को छाया नाही, फल लागे अति दूर
खजुराचं झाड खूप उंच असतं, परंतु, थकल्या भागल्या पांथस्थांना ते सावली देत नाही, त्याची फळं इतक्या उंचावर असतात, की भूक लागलेल्या माणसाला, ती सहज काढता येत नाहीत, तसं श्रीमंत माणसांचं आहे, कबीरांना अशा श्रीमंतीचा राग आहे.
विश्वविजेत्या सिकंदराने अफाट संपत्ती मिळवली, परंतु दान धर्म केला नाही, लोकांवर दया केली नाही, अमाप मानव संहार केला, भूमी पादाक्रांत करीत भारतात आला, तिथे हिंदुकुश पर्वतावरील एका जंगलात त्याला एक साधू भेटला, सिकंदराने त्याला मौल्यवान रत्ने देण्याची इच्छा प्रकट केली, साधूने नकार देताना विचारलं, ‘‘ही तर नुसती माती आहे, तू देवाकडे जाताना ही नेऊ  शकशील?’’ या प्रश्नाने सिकंदर अस्वस्थ झाला, आपल्या अंतकाळी, आपले रिकामे हात कापडात न गुंडाळता, बाहेर ठेवा, ही इच्छा सांगतांना तो म्हणाला, ‘‘हा जगज्जेता सिकंदर, देवाकडे रिकाम्या हाताने जात आहे, हे लोकांना दिसू दे.’’ यात केवढा अर्थ भरला आहे.
श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘नीती-धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अब्रूने जगता यावे इतका पैसा, जवळ असला, की तो माणूस श्रीमंत समजावा.’’