नामदेवांनी विठोबाची आरती लिहिली, युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, त्यात ते म्हणतात, आषाढी कार्तिकी एकादशीला या विठुरायाचं वैभव पाहत राहावं. दिंडय़ा पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती.. या विठोबावर अवघ्या महाराष्ट्रानं खूप प्रेम केलं.
मृदंग, टाळ, वीणा वाजवणारे वारकरी, मैल मैल चालत संतांच्या पालख्या घेऊन, विठुरायाचं भजन करीत पंढरपूरला येतात. आळंदी ते पंढरपूर हे २५० मैल अंतर चालत येतात, पायात चपला नाहीत, ऊन पावसाची पर्वा नाही, कुठे राहायचं याची चिंता नाही, हे किती कठीण आहे. विठोबावरील प्रेम त्यांना ऊर्जा देतं.
वारकरी संप्रदायाचा मूल मंत्र ‘जय जय राम कृष्ण हरी’ आसमंतात घुमत असतो. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर काळा बुक्का, गोपीचन्दन, हातात भगवा ध्वज असा हा वारकरी आपल्याला सांगत असतो, विठोबा हे कृष्णाचं रूप, कृष्णाला तुळस आवडते म्हणून आम्ही तुळशीची माळ घालतो. गोपीचन्दन हे स्वच्छ चारित्र्याचे प्रतीक. काळा रंग सर्व रंगांना सामावून घेतो, तसे हा संप्रदाय सर्व जाती-धर्माना सामावून घेतो आणि भगवा रंग हे त्यागाचे प्रतीक आहे. स्त्रिया डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन धावत पंढरपूरला येतात, त्या सांगतात, अहो, कार्तिकात तुळशीचं आणि कृष्णाचं लग्न झालं.
विठोबा कृष्णाचा अवतार, तुळशीला कृष्णाला भेटविण्यासाठी आम्ही जात आहोत. कृष्णाचं आणि तुळशीचं नातं अगदी घट्ट आहे, कसं ठाऊकआहे? दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. स्त्रीच्या भावना स्त्रीला समजतात. कधी एकदा तुळशीला घेऊन गाभाऱ्यात जातो असं या स्त्रियांना होऊन जातं.
पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान करून, नदीच्या वाळवंटातील कीर्तन ऐकत, विठोबाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेले वारकरी अभंग गातात. संतभार पंढरीत, कीर्तनाचा गजर होतो,
ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला ध्यावे?

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com