कारस्थानं, कुरघोडी, भांडण असा ड्रामा म्हणजे मालिकांना मरण नाही. भर पडतेय ती खोटय़ाची. कोणाची इतरांसाठी, तर काहींची स्वत:साठीच खोटे बोलण्याची धडपड आहे! हा खोटं बोलण्याचा सिलसिला सध्या मालिकांमध्ये सुरू आहे.

‘एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू’ अशीच गत झालीये सध्या मराठी मालिकांची. का म्हणून विचारताय? जरा रिमोट उचला आणि मराठी चॅनल्स लावा बरं. चटकन लक्षात येईल. अनेक मालिकांमध्ये सध्या सुरू असलेला ट्रॅक खोटं बोलण्यावरच रेटिंग मिळवतोय. पटलं ना..! ‘कोणाचं भलं होणार असेल तर थोडं खोटं बोललं तर चालतं’ हे तत्त्वज्ञान चॅनल्सने चटकन आचरणात आणलंय, पण फरक इतकाच की, इथे कोणी दुसऱ्याचं भल व्हावं म्हणून खोटं बोलतंय, तर कोणी स्वत:चंच भलं व्हावं यासाठी खोटं बोलताहेत. तर असा खोटं बोलण्याचा सिलसिला सध्या मालिकांमधून सुरू आहे.

‘नांदा सौख्य भरे’ ही मालिकाच मुळी खऱ्या-खोटय़ावर आधारित. त्यामुळे यातलं द्वंद्व दिसणार यात शंका नाही, पण किती? ती बिचारी स्वानंदी जिवाचं रान करत सगळ्यांना एकत्र आणण्याचा, शहाण्यासारखं वागून सगळ्यांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करते. तिची होणारी सासू ललिताही जिवाचं रान करते खोटं बोलण्यासाठी, खोटं बोलून स्वत:चं भलं करण्यासाठी. वरवर चांगुलपणा आणि आत खोटारडेपणा, असंच वर्णन करावं लागेल ललिताचं. पण या वागण्यामुळे स्वानंदीच्या मनात मात्र अति चांगली प्रतिमा तयार होते. इकडे होणारी सासू अशी खोटं बोलणारी, तर तिकडे ‘होणार सून मी या घरची’मधली सासू खोटारडी. अहा.. जान्हवीच्या सासवांचा इथे विषय नाहीच. तर जान्हवीच्या आईचा अर्थात शशिकलाबाईंचा विषय आहे इथे. पिंटय़ा आईला न सांगता, न जुमानता लग्न करून आला आणि घरी एकच गोंधळ झाला. पुढे प्रकरण जानूपर्यंत आल्यावर जानूही चक्क खोटं बोलली. आदर्श सून खोटं बोलायला लागली हे प्रेक्षकांनाही पचवणं थोडं जडच गेलं म्हणा. पिंटय़ाच्या लग्नाबद्दल मला काहीच माहीत नव्हतं असं जान्हवी तिच्या आईशी धादांत खोटं बोलली आणि पुढेही काही दिवस बोलत राहील यात शंका नाही. त्याशिवाय मालिकेचे पुढचे काही भाग चालणार तरी कसे?

‘नांदा..’मधल्या ललिताचा खोटं बोलण्याचा पाढा मोठा आहे. प्रतिष्ठा, प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी खोटं बोलण्याचा आधार घेत सतत ती पैशांची हेराफेरी करत असते. तिच्या जोडीला तिचा नवरा असतोच. तो तिच्यासोबत कारस्थानांमध्ये सामील. खोटं बोलून गुंडाळण्यात ललिताबाईंनी पीएचडी केली असावी. क्षीरसागरांनी धमकी देऊन आमचीच संपत्ती लुबाडली असं खोटं बोलण्यातही बाईंनी मागे-पुढे बघितलं नाही. सध्याचा मालिकेचा ट्रॅक या खोटय़ाभोवतीच फिरतोय. हे खोटंचक्र इतक्यात थांबणार नाही हेही स्पष्ट दिसतंच आहे. कारण या मालिकेचा हुकमी एक्का आहे तो. खोटं बोलण्यामुळेच मालिकेत ड्रामा होणार आणि टीआरपी मिळणार. त्यामुळे टीआरपी मिळण्याचं हे धारदार शस्त्र इतक्यात तरी बोथट होईल असं वाटत नाही. पण या रेटिंग वाढवण्याच्या आणि लोकप्रियता मिळवण्याच्या नादात ललिताबाई हा खोटं बोलण्याचा पाढा कुठवर नेताहेत हे बघणं उत्सुकतेचं ठरेल.

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’मध्ये अंकिता ही व्यक्तिरेखा अशी आहे जी काही केल्या सुधारत नाही. ती कंगाल होऊ दे किंवा तिचा नवरा, मुलगी तिच्यापासून दूर होऊ दे; मॅडमना काही फरक पडत नाही. फक्त ईश्वरीला त्रास देणं हे एवढंच तिचं ध्येय. आता तिच्यासारखी दिसणारी अनामिका ईश्वरीच्या आयुष्यात आली आहे. हे अनामिका-अंकिताचं द्वंद्व हाच मालिकेचा सध्याचा यूएसपी आहे. तो जपायला तर हवाच. त्यामुळे असंख्य कटकारस्थानंही करून अंकिता काही थकत नाही. ‘मी अंकिता नाही, अनामिका आहे’ असं खोटं सांगून नाटक रचण्याचे तिचे मनसुबे हिट होताहेत. यासाठी ती तिच्या आत्तुला साथीला घेते, नाही तर स्वत:चंच डोकं चालवते. पुन्हा फसते. पुन्हा डाव रचते. हे असं चक्र सुरूच आहे. अंकितासोबत आता ईशूसुद्धा म्हणजे ईश्वरीसुद्धा आता खोटं बोलायला शिकली आहे. अर्थात, कोणाचं वाईट व्हावं हा हेतू त्यामागे नक्कीच नाही. पण खोटं बोलतेय ती हे लपवता येणार नाही. अंकिता-अनामिकाचा लपंडाव तिने तिच्या सासूपासून लपवलाय.

मालिका बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, कुतूहल हवंच. त्यासाठी मुळात प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायला हवं. सगळ्याच वाहिन्या हे काम चोख करताहेत. मनोरंजनासाठी फक्त गुडी-गुडी दाखवून कसं चालेल. त्यात मसालेदार तडका हवाच. त्याचसाठी खलनायिका-खलनायक यांची भूमिका अधोरेखित केली जाते, पण नेहमीच या व्यक्तिरेखांना ढाल करून मालिकांचं मनोरंजन होऊ शकत नाही. अशा वेळी नायक-नायिकांमधले रुसवे-फुगवे, अबोला, दुरावा, नाराजी, गैरसमज, संकट, दुर्दैवी घटना अशा अनेक गोष्टींचा मालिकांमध्ये एंट्री मिळते. असंच एक मनोरंजनाचं साधन म्हणून खोटय़ाचा डाव सध्या मालिकांमध्ये दिसून येत आहे.

‘का रे दुरावा’ यातल्या जय-अदितीची फारच दया येते. कारणच आहे तसं. यांना वाटतं म्हणून नाही, तर नाइलाज म्हणून त्यांना खोटं बोलावं लागतंय. डोक्यावरचं लाखो रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आणि स्वत:चं घर घेण्यासाठी दोघांनाही धडपड करावी लागतेय. त्यात खोटं बोलण्याची कसरत आहेच. ऑफिसमध्ये त्यांना त्यांचं नवरा-बायकोचं नातं इतरांपासून लपवावं लागतं. ते नवरा-बायको नसल्याचं खोटं सांगताहेत. अदितीच्या बाबांनी जयला स्वत:ला सिद्ध करण्याची एक वर्षांची मुदत दिली आहे. त्यातले तीनेक महिने तर झाले. त्यामुळे हा खोटं बोलण्याचा सिलसिला आणखी साधारण नऊ-एक महिने तरी सुरूच राहिला. खोटं बोलणं हा या मालिकेचा अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही. आधी अण्णा आणि केतकर काकांसमोरही जय-अदिती खोटं बोलत होते, पण आता त्यावर पडदा टाकला गेलाय.

टीव्ही हे प्रभावी माध्यम आहे. इथे जे दाखवलं जातं त्याचा परिणाम सामान्य प्रेक्षकांवर चटकन होताना दिसतो. म्हणूनच आता सिनेमांप्रमाणे वाहिन्यांमध्येही सेन्सॉर बोर्डसारखी एक टीम कार्यरत असते. वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा प्रभाव लगेच पडत असल्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह आढळत असेल तर त्याची दखल वाहिन्यांना घ्यावीच लागते. मालिका किंवा कोणत्याही कार्यक्रमातून चुकीचा संदेश पोहोचत नसल्याची खात्री करून घ्यावी लागते. सध्या सुरू असलेल्या मालिकांचा ट्रॅक बघता खोटं बोलण्याचं समर्थन केलं जातंय, असंही काहींचं मत होऊ शकतं. पण टीव्ही जसं प्रभावी माध्यम आहे, तसंच ते मनोरंजनाचंही माध्यम आहे. त्यामुळे काही गोष्टी या मनोरंजनासाठी केलेल्या असतात असा सुज्ञ विचार प्रेक्षकांनी करावा. ‘एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’ असा पणच केलाय टीव्हीने. त्यामुळे एवढं त्यांना माफ..! शेवटी मालिका आहे ती. तिथेही ‘अंत भला तो सब भला’ हे होणारच. त्यामुळे खोटं बोलण्याचा सिलसिला सुरू असला तरी खऱ्यानेच हा सिलसिला थांबेल यात शंका नाही.

‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका मनोरंजक आहे. यातले कलाकार चांगलं काम करताहेत. विषयही हळूहळू जम बसवतोय. तर, यातही ‘झुठ बोले..’ आहेच. मालिकेची नायिका म्हणजे जुई स्वाभिमानी. तिच्या वडिलांचा बिझनेस आहे. असं असूनही तिला स्वत:लाच तिचं करिअर शून्यापासून घडवायचंय. यासाठी तिला तिच्या बाबांनी परवानगी तर दिली आहे, पण त्यांच्याच ऑफिसात काम करत करिअर घडवण्याची. खरं तर तिला या सगळ्यात खोटं बोलण्याची काहीच गरज नाही, पण स्वाभिमानी असल्यामुळे जुई तिचं आणि तिच्या बाबांचं नातं ऑफिसातल्या सहकाऱ्यांपासून लपवते. मुंबईबाहेरून आलेली हॉस्टेलला राहणारी मुलगी असल्याचं खोटं सांगते. आता तिचं करिअर घडवून होत नाही तोवर हे झूठ पे झूठ सुरूच राहणार असं दिसतंय. तसंच तिकडे ‘रुंजी’मध्येही सुरू आहे. मोठी आई कटकारस्थानं करण्यात पटाईत आहे. त्यामुळे साहजिकच खोटं बोलण्याची कला तिला अवगत आहे. रुंजीच्या बहिणीच्या लग्नात नवऱ्यामुलाचं अपहरण करून तिचं लग्न स्वत:च्या मुलाशी लावून देण्यासाठी मोठी आई खोटं बोलली. त्याच खोटय़ावर मालिकेचा ट्रॅक पुढे सरकताना दिसतोय.

थोडक्यात काय तर, बऱ्याच मालिकांचा सध्याच्या ट्रॅकचा पाया हा खोटय़ावर पक्का झालेला आहे, पण कटकारस्थानं, कुरघोडी असलेले ट्रॅक प्रेक्षक आवडीने बघतो. मग हा खोटय़ाचा ट्रॅक मनोरंजन म्हणून बघायला हरकत नाही. मालिकेतला हा खोटय़ाचा सिलसिला कुठवर चालेल माहीत नाही, पण तोवर हे ‘खोटेबाज’ मनोरंजन एन्जॉय करूया..!

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
Twitter: @chaijoshi11