२०१६ हे वर्ष टीव्ही माध्यमासाठी आव्हानात्मक, बदलाचं आणि उत्साहाचं गेलं. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सगळ्याच चॅनल्सनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. या प्रयत्नांमधून मालिका, रिअ‍ॅलिटी शोजचे वेगवेगळे प्रयोग समोर आले. काहींना पसंती मिळाली तर काही मागेच राहिले. या प्रयोगांवरचा हा एक रिकॅप!

टीव्ही या माध्यमाचा आवाका दिवसेंदिवस मोठा होत आहे. चॅनल्सच्या वाढत्या संख्येमुळे त्यात काम करणाऱ्या कलाकारांचीसुद्धा संख्या वाढतेय. त्यामुळे इथली स्पर्धाही वेगाने वाढतेय. एका चॅनलने विशिष्ट प्रयोग केला की दुसरा आणखी वेगळा प्रयोग करण्याकडे सरसावणार हे नक्की. या स्पर्धेमुळे प्रेक्षकांकडे मात्र कार्यक्रमांचे भरपूर पर्याय तयार होतात. या वर्षी सगळ्याच चॅनल्सने वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी दिली. त्यातले काही कार्यक्रम यशस्वी झाले तर काही नाही. ‘हे वर्ष कसं गेलं’ असं सगळेच एकमेकांना विचारतात. पण हे वर्ष टीव्ही माध्यमासाठी विविध प्रयोग करण्याचं गेलं असं म्हणता येईल. २०१६ या वर्षांत चॅनल्समध्ये झालेले प्रयोग, बदल यावर टाकलेली ही नजर.

मराठी चॅनल्स सध्या वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहेत. हिंदीप्रमाणे मराठी चॅनल्सही सादरीकरणावर भर देत आहे. ही सकारात्मक बाब म्हणायला हवी. नेहमीप्रमाणे या चॅनल्सवर वेगवेगळ्या विषयांच्या मालिका दिसून आल्या. पण या वर्षी उल्लेख करावा लागेल ते झी मराठीच्या मालिकांबाबत. यंदा झी मराठीने कथाबाह्य़ कार्यक्रमांपेक्षा मालिकांवर जास्त लक्ष केंद्रित केलं. त्यातल्या काही मालिकांवर जोरदार टीकाही झाली, पण प्रयोग करून बघण्यात झी मराठीने बाजी मारली. वर्षांच्या सुरुवातीला ‘पसंत आहे मुलगी’ ही मालिका सुरू झाली होती. पण या मालिकेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. खरं तर या मालिकेची कथा, विषय चांगला होता, पण प्रेक्षकांना त्या मालिकेने फारसं आपलंसं केलं नाही. या वर्षभरात या चॅनलवर ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘काहे दिया परदेस’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिका ठरावीक कालावधीनंतर टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. झी मराठीवर आणखी एक प्रयोग दिसून आला; रात्री साडेदहाच्या स्लॉटचा. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ संपवून या चॅनलने त्या जागी ‘रात्रीस खेळ चाले’ ही रहस्यमय मालिका सुरू केली. तर ती संपल्यानंतर त्या जागी ‘हण्ड्रेड डेज’ ही मालिका सुरू झाली. साडेदहाचा स्लॉट यानिमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय झाला. कथाबाह्य़ किंवा रिअ‍ॅलिटी शो मात्र यंदा दिसले नाहीत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘होम मिनिस्टर’ या दोन कार्यक्रमांना भरपूर पसंती मिळाली. झी मराठीचा मालिका देण्याचा फॉम्र्युला प्रेक्षकांना आवडला. आता नव्या वर्षांत ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका सुरू होत आहे. त्यामुळे नवनवीन मालिकांचा ट्रेण्ड पुढच्या वर्षीही असाच चालू राहील असं दिसतंय.

‘स्टार प्रवाह’मध्येही नव्या कार्यक्रमांचा एक संच साधारण तीन महिन्यांपूर्वी सुरू केला. ‘विकता का उत्तर’, ‘नकुशी’, ‘आम्ही दोघं राजा-राणी’, ‘गं सहाजणी’, ‘गोठ’ या मालिका एकाच वेळी सुरू झाल्या. यापैकी ‘गोठ’ आणि ‘गं सहाजणी’ हे दोन कार्यक्रम तुलनेने जरा कमी पडले. ‘नकुशी’चा विषय सामाजिक असल्यामुळे आणि त्याच्या सादरीकरणामुळे त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘दुर्वा’ आणि ‘देवयानी’ या मालिकांची दुसरी र्पवसुद्धा या वर्षी सुरू झाली. पण त्यांच्या पहिल्या पर्वाइतका प्रतिसाद अजिबात मिळाला नाही. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पण मध्यंतरी त्यात आणलेल्या मुंबईच्या ट्रॅकला मात्र प्रेक्षकांची नापसंती होती. मालिकेत आधीपासून दाखवत असलेला कोल्हापुरी बाज आणि त्याला मिळणारी पसंती हे त्यामागचं महत्त्वाचं कारण होतं. ‘लेक माझी लाडकी’ ही मालिका सध्या स्टार प्रवाहवर खूप महत्त्वाची ठरतेय. या मालिकेची लोकप्रियताही खूप आहे. तसंच त्याच्या कथेत पुढे येणाऱ्या काही गोष्टी उलगडणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतक्यात तरी ही मालिका संपणार नाही, असा अंदाज आहे. ‘अरे वेडय़ा मना’ ही मालिका विशेष लोकप्रिय ठरली नसली तरी ती एक वर्ष सुरू होती. तसंच ‘तू जिवाला गुंतवावे’ ही मालिका प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तीन महिन्यांत गुंडाळावी लागली. स्टार प्रवाहची नवी टॅगलाइन ‘आता थांबायचं नाही’ अशी आहे. त्यामुळे या टॅगलाइननुसार पुढच्या वर्षीसुद्धा या चॅनल्समध्ये विविध कार्यक्रम दिसतील, असा अंदाज आहे. पुढच्या वर्षी कथाबाह्य कार्यक्रम आणि ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिका चॅनलवर दिसतील असाही अंदाज आहे.

मराठी चॅनल्समध्येही आता हिंदीप्रमाणे युद्ध दिसून येतंय. पाठीशी मोठा बॅनर असल्यामुळे मराठी चॅनल्सची ताकदही आता वाढली आहे. ही ताकद वाढल्यामुळेच त्यात देखणे, आशयपूर्ण, प्रयोगशील विषय दिसून येतात. यातले सगळेच उत्तम असतात असं नाही. पण हिंदी चॅनल्सप्रमाणे आता मराठी चॅनल्सही याकडे काही प्रमाणात बिझनेस म्हणून बघू लागली आहेत हे नाकारता येणार नाही. अर्थात याकडे सकारात्मकदृष्टय़ाच बघायला हवं. कलर्स मराठी या चॅनलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनेक चांगले बदल झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा बदल त्यांच्या प्रेक्षकवर्गात दिसून येतो. पूर्वी या चॅनलचे बहुतांशी प्रेक्षक ग्रामीण भागातील होते, पण आता ग्रामीण, शहरी, तरुण, मध्यमवयीन, वयस्कर अशा सगळ्या भागांतील आणि वयोगटांतील प्रेक्षक आहेत. ही चॅनलची जमेची बाजू आहे. ‘तू माझा सांगाती’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘सरस्वती’ आणि ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ आणि ‘कमला’ या दोन्ही मालिका या वर्षी संपल्या. यापैकी ‘असावा सुंदर..’ ही मालिका तीन र्वष सुरू होती. या वर्षीच सुरू झालेल्या ‘किती सांगायचंय मला’ आणि ‘तुझ्यावाचून करमेना’ या दोन मालिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे कमी कालावधीत त्या बंद झाल्या. साडेदहाच्या स्लॉटवर इथेही प्रयोग करण्यात आला. ‘चाहूल’ ही मालिका सुरू झाली. ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये स्वप्निल जोशी अँकर म्हणून भेटीस आला.

हिंदी चॅनल्सची संख्या मराठीच्या तुलनेने जास्त आहे. तिथलं बजेटही जास्त असतं. तसंच तिथे रविवारचा प्राइमटाइमही रिअ‍ॅलिटी शोसाठी राखून ठेवलेला असतो. त्यामुळे अनेक हिंदी चॅनल्समध्ये शनिवार आणि रविवार रिअ‍ॅलिटी शो आढळून येतील. झी टीव्हीने वीकेण्ड लक्षात घेऊन ‘यारों की बारात’ हा कार्यक्रम सुरू केला. सेलिब्रेटींशी त्यांच्या मैत्रीविषयी गप्पा मारण्याचा फॉरमॅट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि तो पसंतीसही उतरला. या चॅनलचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘एक था राजा, एक थी रानी’, ‘टशन ए इश्क’, ‘सरोजिनी’, ‘ये वादा रहा’, ‘जमाई राजा’ या मालिकांमध्ये काही वर्षांचा लीप म्हणजे मालिकांमध्ये काही र्वष काळ पुढे सरकल्याचं दाखवलं. ‘सारेगमप’चा नवा सीझनही या वर्षी वेगळ्या फॉरमॅटमध्ये दाखवला गेला. ‘अजी सुनते हो’ हा शोसुद्धा वेगळ्या धाटणीचा आहे.

स्टार प्लस या चॅनलवर नेहमीच काहीना काही वेगळं दिसून येतं. मग तो ‘सत्यमेव जयते’सारखा शो असो किंवा ‘मास्टर शेफ’सारखा हट के बाजाचा कार्यक्रम असो. नेहमी काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चॅनलने यंदाही अनेक कार्यक्रम दिले. या वर्षी सुरू झालेले ‘तमन्ना’, ‘जाना ना दिले से दूर’ आणि ‘देहलीज’ हे दोन्ही कार्यक्रम आशयपूर्ण होते, पण टीआरपीच्या शर्यतीत मागे पडले. पण त्यातून दिला गेलेला सामाजिक संदेश अनेकांपर्यंत पोहोचला. तसंच ‘पीओडब्ल्यू.. बंदी युद्ध की’ या मालिकेचं आहे. या मालिकेचा प्रभाव पडला, मालिकेची वेगळी ओळखही निर्माण झाली, पण टीआरपी रेटिंगमध्ये मात्र घसरली. ‘नामकरण’ आणि ‘चंद्र नंदिनी’ या मालिका लोकप्रिय असून यांचं रेटिंगही चांगलं आहे. यापैकी ‘नामकरण’मधलं रिमा लागू यांचं छोटय़ा पडद्यावरचं पुन:पदार्पण प्रेक्षकांना आवडलं. ‘मास्टर शेफ’चा आताचा सीझन मात्र नेहमीसारखा पसंतीस उतरलेला दिसत नाही. याचं कारण इतर चॅनल्सवर त्याच वेळी असलेले कार्यक्रम असू शकतं. ‘ये है मोहब्बतें’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘साथ निभाना साथिया’ या स्टार प्लसच्या यूएसपी मालिका. बरीच र्वष सुरू असणाऱ्या या मालिकांची लोकप्रियता तशीच आहे. ‘परदेस है मेरा दिल’ ही मालिका परदेशात शूट करीत असल्यामुळे आणि त्याची कथा रंजक असल्यामुळे या मालिकेलाही पसंती मिळत आहे.

मालिकांचा इतिहास मोठा आहे. आजवर असंख्य विषयांवर मालिका येऊन गेल्या. जसा काळ बदलत गेला तसे मालिकांचे विषय, कथाही बदलत गेल्या. नवे चेहरे दिसू लागले. टीआरपीची गणितं आखली जाऊ लागली. चॅनल्सची संख्या वाढली. रिअ‍ॅलिटी शोचं पेव फुटलं. एचडी चॅनल्स आले. सादरीकरण बदललं. स्पर्धा वाढली. ही स्पर्धा पुढे वाढतच जाणार. या स्पर्धेत पुढे जायचं असेल किंवा टिकून राहायचं असेल तर काही तरी वेगळं द्यावंच लागतं. हे ‘काही तरी वेगळं’ कधी तरी वेगळं असतंही आणि नसतंही. पण प्रयोग केल्यानंतरच ते वेगळं आहे की नाही हे सिद्ध होतं. त्यामुळे चॅनल्स सतत काहीना काही प्रयोग करीत असतातच. असे प्रयोग करीतच २०१६ हे र्वषही संपलं.

सोनी चॅनलसाठी या वर्षी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ठरला तो त्याचा लोगोबदलाचा. सोनी चॅनलचा लोगो बदलून फ्रेश लुकसोबत काही नवे शोजही सुरू झाले. या चॅनलसाठी यंदा सगळ्यात मोठा बदल ठरला म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या कार्यक्रमामुळे अनेक चर्चा रंगल्या. प्रचंड लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम नावात थोडा बदल करून सोनी चॅनलवर सुरू झाला. ‘सुपर डान्सर’ हा शो लोकप्रिय ठरला. ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘अदालत टू’ हे कार्यक्रम याच वर्षी सुरू होऊन लगेच बंद झाले. वर्षांखेर सुरू झालेल्या ‘इंडियन आयडॉल’ने येणाऱ्या काळातील गाण्याच्या विविध रिअ‍ॅलिटी शोजची सुरुवात करून दिली आहे.

कलर्स चॅनलसाठी दरवर्षी तीन शो खूप महत्त्वाचे असतात. ‘झलक दिखला जा’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘बिग बॉस’. त्यामुळे यात नवनवीन गोष्टी करण्याचा चॅनल्सचा नेहमीच प्रयत्न असतो. पण यावेळच्या ‘झलक..’ची इतकी चर्चा झाली नाही. ‘इंडियाज..’ नेहमीप्रमाणे गाजलं. ‘बिग बॉस’चा दहाव्या सीझनमध्येही या वेळी फारशी मजा नाही. यंदाचा ‘ट्वेंटी फोर’ या मलिकेचा दुसरा सीझनही वेगळा ठरला. याशिवाय ‘ससुराल सिमर का’ ही मालिका कलर्स चॅनलवरील जुनी मालिका. तिची लोकप्रियता आजही तशीच आहे. त्याहीपेक्षा जास्त लोकप्रिय असलेली ‘बालिका वधू’ ही मालिका मात्र या वर्षी संपली. ‘नागीन टू’, ‘शक्ती’, ‘कवच’, ‘देवांशी’, ‘कर्मफल दाता शनि’ अशा निरनिराळ्या विषयांच्या मालिका या वर्षी कलर्सवर होत्या. यापैकी ‘शक्ती’ आणि ‘देवांशी’ या दोन मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत होता.

अ‍ॅण्ड टीव्ही या चॅनलला आता दोन र्वष पूर्ण होतील. या चॅनलने अजून तितकासा जम बसवलेला दिसत नाही. पण या चॅनलवरील काही ठरावीक मालिका प्रेक्षकांना आवडत आहेत. ‘भाभीजी घर पर है’ ही त्यांपैकी एक मालिका. या मालिकेतल्या मुख्य भूमिकेतील शिल्पा शिंदे या अभिनेत्रीमुळे ही मालिका चर्चेत राहिली. ‘मेरी आवाज यही पहचान है’ ही मालिका पाच महिन्यांत संपली. या मालिकेत बडय़ा कलाकारांची मोठी फळी होती. दीप्ती नवल, झरिना वहाब, अमृता राव अशा अभिनेत्री या मालिकेत होत्या. मालिकेचा विषयही चांगला होता. कलाकार आणि विषय या दोन्हीमुळे ही मालिका वेगळी ठरली. ‘वारीस’ ही मालिका प्रेक्षकांना आवडतेय. ‘द वॉइस इंडिया किड्स’ लोकप्रिय ठरला. नुकताच सुरू झालेल्या ‘द वॉइस इंडिया’च्या दुसऱ्या सीझनलाही तितकाच प्रतिसाद मिळत आहे.  या शोच्या ब्लाइंड ऑडिशनचा फॉरमॅट प्रेक्षकांसाठी वेगळा आहे आणि तो उत्सुकतेचा ठरत असल्यामुळे पसंतीसही उतरत आहे.

कधी कधी काय बघावं, असा प्रेक्षकांना प्रश्न पडावा इतके उत्तम कार्यक्रम एकाच वेळी सुरू होते. टीव्ही माध्यमात फक्त कार्यक्रमांच्या विषयांची एकमेकांशी स्पर्धा नसते तर ते कार्यक्रम प्रक्षेपित होत असणाऱ्या वेळेशीही असते. प्राइम टाइम हा चॅनलचा महत्त्वाचा भाग असतो. या प्राइम टाइममध्ये काय- कधी- कसं दाखवायचं हे गणित प्रत्येक चॅनलला बसवावं लागतं. या वर्षी सगळ्याच चॅनल्सनी ते बसवलं. सगळेच प्रयोग, प्रयत्न यशस्वी झालेच असं नाही, पण स्पर्धा वाढली हे मात्र यंदा दिसून आलं. ही स्पर्धा पुढच्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये आणखी चुरशीची होऊन विविध आशयविषयांचे कार्यक्रम बघायला मिळतील यात शंका नाही.

चैताली जोशी @chaijoshi11

response.lokprabha@expressindia.com