इतिहास नेहमी जेत्यांचा असतो, असं म्हणतात. याचा अर्थ एखादा योद्धा जिंकतो तेव्हा पराजित माणसाच्या बाजूने सर्व गोष्टी विपरीत लिहिल्या जातात किंवा सांगितल्या जातात. कॉर्पोरेट जगतामध्येदेखील मर्जर व अ‍ॅक्विझिशनमध्ये बरेचदा असेच होते. एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला आपल्या पंखाखाली घेते तेव्हा सहसा जी कंपनी टेकओव्हर केली जाते त्या कंपनीतील लायक लोकांच्या नशिबीदेखील अवहेलना, अन्याय किंवा दुय्यम वागणूक येते.

आजकालच्या कॉर्पोरेट जगामध्ये मात्र चित्र पालटले आहे. आज आपण बघणार आहोत अशाच काही कथा! एखादी कंपनी टेकओव्हर केली जाते तेव्हा कंपनीमध्ये खूप मोठी अस्थिरता निर्माण होते, नोकरी राहील की जाईल असे प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात उपस्थित होतात. संवाद नसेल तर गैरसमज झपाटय़ाने पसरतात. त्यामुळे टेकओव्हर केल्यावर पराभुताशी प्रामाणिक व खुला संवाद साधणे जेत्यासाठी आवश्यक असते.

स्प्रिंट कंपनीने नेक्सटेल कंपनी टेकओव्हर केली तेव्हा हा संवाद साधला गेला नाही. दोन्ही कंपनीमधील संस्कृती वेगवेगळी असल्याने आपला निभाव लागेल का असा नेक्सटेलच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला किंतु होता. त्यांच्या या साधार भीतीला संवादाद्वारे दूर न केले गेल्याने नेक्सटेलच्या बहुतांश लोकांनी संघटित राजीनामे दिले. यामुळे स्प्रिंटचे व्यवस्थापन हडबडून गेले.

टेकओव्हर केल्यावर असे आढळून येते की अनेक अनोळखी चेहरे अचानकपणे आजूबाजूस दिसू लागतात. साहजिकच ऑफिसमध्ये अवघडलेपण, अविश्वास वाढीस लागतो. हे कमी करण्यासाठी विविध गोष्टींवर स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे जसे की, नव्याने निर्माण झालेल्या एकत्रित कंपनीमध्ये प्रत्येकाचा रोल काय असेल, वेतन व भत्त्यांमध्ये काही बदल असतील का? नवीन कंपनीचे व्हिजन, मिशन स्टेटमेंट काय असेल, कोणत्या जुन्या पॉलिसीज आता मोडीत निघतील.

ऑरेकल कंपनीने जेव्हा एन्देका (endeca) कंपनी आपल्या पंखाखाली घेतली तेव्हा ऑरेकल कंपनीच्या नियमानुसार ‘ऑफिसमध्ये पाळीव प्राण्यांना बंदी’ ही पॉलिसी एन्देका कंपनीला आधीच कळविण्यात आली. त्यामुळे एन्देका कंपनीचा मेस्कॉट (बोधचिन्ह) असलेल्या पफर फिशला नवीन एकत्रित कंपनीमध्ये स्थान मिळणार नाही या गोष्टीचा फारसा बोभाटा झाला नाही. ऑफिसच्या बिल्डिंगमधील फिशटँकमध्ये असलेल्या पफर माशाला रोजच्या रोज खाणे देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा जरी भावनिक धक्का असला तरी तो अनपेक्षित दिला गेला नसल्याने त्यांना वाटणारे वैषम्य कमी झाले. जिला टेकओव्हर केले जाते त्या कंपनीचे स्वत:चे एक स्वतंत्र अस्तित्व, संस्कृती असते. प्रसंगी ती संस्कृती तशीच राहावी अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. या व्यतिरिक्तदेखील त्यांच्या अनेक अपेक्षा असतात. त्या ऐकणे व शक्य असल्यास त्या पुऱ्या करणे जेत्याचे कर्तव्य असते.

जॅन कौम (Jan Koum)  व्हॉट्सअ‍ॅपचे सहसंस्थापक आहेत. व्हॉट्सअ‍ॅप जेव्हा फेसबुकने टेकओव्हर केले, तेव्हा दोन्ही कंपनींची संस्कृती वेगवेगळी असल्याने संघर्ष होणे क्रमप्राप्त होते. हे ओळखूनच जॅन कौम यांनी स्वत:हून पुढाकार घेतला व आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फेसबुक कंपनीच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्या भेटीची वेळ त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मागून घेतली. फेसबुकची संस्कृती आत्मसात करताना व्हॉट्सअ‍ॅपची स्वतंत्र संस्कृती अबाधित राहावी व नव्या एकत्रित कंपनीमध्ये आपल्या लोकांची भावनिक घुसमट होऊ  नये म्हणून त्यांचे हे खास प्रयत्न होते.

जेव्हा एकत्रित कंपनी तयार होते तेव्हा, ज्या कंपनीला टेकओव्हर केले जाते, त्या कंपनीतील अधिकाऱ्यांवर नवीन वरिष्ठ बसविले जातात. आर्थिक बचतीच्या नावाखाली कामगार कपात करायची झाल्यास ज्या कंपनीला टेकओव्हर केले गेले आहे त्याच कंपनीतील लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड चालविली जाते. लायक उमेदवारांनादेखील बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो. हे सर्व आकसबुद्धी दाखविते.

त्याऐवजी सारासार विचार करून योग्य त्या स्टाफलाच कामावर ठेवण्यात आले पाहिजे; मग त्यासाठी ज्या कंपनीला टेकओव्हर केले त्यातील लायक स्टाफला कायम करण्यासाठी प्रसंगी ज्या कंपनीने टेकओव्हर केले त्यातील नालायक स्टाफला बाहेरचा रस्ता दाखविण्याचे धैर्य दाखविता आले पाहिजे.

मर्जर व एक्विझिशन हा कॉर्पोरेट जगतामधील उंदरा-मांजराचा खेळ आहे. आज जो जेता आहे तो उद्या मांडलिक होऊ  शकतो किंवा आज जो आश्रित आहे तो उद्या मालक बनू शकतो. आज तुम्ही कोणाला तरी जिंकले, उद्या तुम्हाला कोणी जिंकू शकतो. तेव्हा कंपनी पंखाखाली घेताना किंवा कंपनी ताब्यात घेतल्यावर, जिभेवर साखर ठेवणे व पाय जमिनीवर ठेवणे जमले पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. आपला कार बिझिनेस (इंडिका कार) खास नफा मिळवत नाही हे लक्षात आल्यावर १९९९ मध्ये रतन टाटा, फोर्ड कंपनीला विनंती करायला गेले की फोर्डने टाटांचा हा व्यवसाय विकत घ्यावा. त्या वेळी फोर्डचे व्यवस्थापन गुर्मीत म्हणाले, ‘‘तुम्हाला पॅसेंजर कार बिझिनेस कळत नव्हता तर कशाला हे दु:साहस केलेत? आम्ही जर तुमचा व्यवसाय खरेदी केला तर तुम्ही आमचे उपकार मानले पाहिजेत.’’ पण २००८ मध्ये परिस्थिती पूर्णपणे पालटली होती. फोर्डचे जगप्रसिद्ध ब्रॅण्ड ‘जग्वार’ व ‘लॅण्डरोव्हर’ टाटा ग्रुपने खरेदी केले व बिलफोर्ड यांना नंतर शरमिंदे होऊन मान्य करावे लागले की हे दोन ब्रॅण्ड घेऊन रतन टाटा यांनी त्यांना उपकृत केले आहे.

एखादी कंपनी टेकओव्हर केली जाते तेव्हा तो प्रश्न देशाच्या भावनेशी पण जोडला जाऊ  शकतो. उदा. यूकेची कॅडबरी कंपनी अमेरिकन कंपनी, क्राफ्टने खरेदी केली तेव्हा खूप मोठे वादळ उठले. त्यातच क्राफ्टच्या व्यवस्थापनाने दिलेली वचने पाळली नाहीत. ब्रिस्टोल येथील कॅडबरी प्लान्ट बंद करण्यात आला, नोकरकपात करण्यात आली व कॅडबरीचे हेडक्वार्टर देशाबाहेर म्हणजे स्वित्र्झलडला हलविण्यात आले. थोडक्यात काय, कंपनी पंखाखाली घेताना नुसते आर्थिक पैलू पाहू नका तर भावनिक पैलूदेखील अभ्यासा.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com