17-lp-prashantएका गावात एक पोस्टमन अनवाणी चालतच टपाल देण्यासाठी एका घरी गेला. दारावरची बेल दोनदा वाजवली तरी कोणीच दार उघडण्यासाठी आले नाही. अनवाणी असल्याने पोस्टमनचे पाय पोळून निघत होते. तो भयकंर चिडला. एवढय़ात घराचे दार उघडले गेले व त्याच्यासमोर उभी होती एक आठ वर्षांची गोंडस मुलगी; पण ती कुबडय़ा घेऊन आली होती. त्या मुलीने दोन्ही पाय एका अपघातामध्ये गमावले होते. पोस्टमन काकांकडे एक स्मितहास्य टाकत ती मुलगी म्हणाली, ‘‘काका, माफ करा थोडा उशीर झाला. कारण कुबडय़ाच सापडत नव्हत्या.’’ त्या पोस्टमनचा राग कुठल्या कुठे पळाला व तो मुलीचे टपाल देऊन आल्या पावली माघारी फिरू लागला. त्या मुलीने म्हटले, ‘‘काका उन्हात पाय पोळले असतील ना तुमचे! जरा बागेतील नळाखाली पाय धरा, बरे वाटेल.’’ त्या पोस्टमनने मुलीचे म्हणणे ऐकले. पायावर थंड पाणी पडल्यावर पोस्टमन काकांचे मनदेखील शांत झाले.

त्या निरागस अपंग मुलीने पोस्टमनच्या मनात घर केल्याने तो पोस्टमन त्या दिवसानंतर वेळोवेळी त्या मुलीला काहीतरी निमित्त करून भेटायला येई. दिवाळीचे दिवस असल्याने पोस्टमन काका दिवाळीच्या बक्षिसीसाठी सर्व घरांना भेट देत होते. खरे तर त्या मुलीकडून त्यांना कसलीच अपेक्षा नव्हती, पण तिचा हसरा चेहराच त्यांच्यासाठी बक्षिसी होती. त्यांनी सवयीने त्या मुलीच्या घराची बेल वाजविली. पोस्टमन काकांना दारापाशी बघताच त्या मुलीने त्यांना क्षणभर थांबायला सांगितले व उलटय़ा पावली आत जाऊन एक सुंदर बॉक्स आणला. पोस्टमन काकांच्या हाती तो बॉक्स देत त्यांना दिवाळी शुभेच्छा दिल्या. काकांनी तो बॉक्स उघडून पाहताच आत एक सुंदर बुटांचा जोड होता. हे गिफ्ट पाहून पोस्टमन काकांचे डोळे पाणावले व त्यांनी मुलीला मिठीच मारली. आपल्या साइजचे बूट कसे मिळाले हे त्यांनी विचारताच मुलगी म्हणाली, ‘‘त्या दिवशी नळाखाली पाय धुतल्यावर तुमच्या पावलांचे ठसे बागेतील मातीत उमटले होते. त्यावरूनच मी अंदाज बांधला. मला तर अपंगत्वामुळे बुटांचा उपयोग नाही, पण तुम्हाला त्यांचा उपयोग होईल’’

कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील आजकाल अशीच एम्पथी पाहायला मिळू शकते. एखाद्या सहकाऱ्याला कौटुंबिक कारणांमुळे वरचेवर सुट्टी घ्यावी लागत असेल (उदा. स्वत:चे किंवा कुटुंबातील व्यक्तीचे गंभीर आजारपण, मुलांचे संगोपन) व त्याच्याकडे सुट्टय़ाच शिल्लक न राहिल्यामुळे त्याला बिनपगारी रजा घ्यावी लागत असेल अशा वेळी त्याचा सहकारी किंवा बॉस त्याला आपल्या वाटणीच्या सुट्टय़ा ट्रान्स्फर करू शकतो. ज्या कर्मचाऱ्याकडील अतिरिक्त सुट्टय़ा वाया जाणार असतील तो त्या सुट्टय़ा गरजू सहकाऱ्याला देऊन एक चांगले काम करू शकतो. यू एस पोस्टल सव्‍‌र्हिसेसमध्ये अशी सुविधा व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ केली आहे. एक्सेंच्युअर कंपनीमध्येदेखील लीव्ह डोनेशन पॉलिसी लागू करण्यात आली आहे ज्यायोगे अनेक कर्मचाऱ्यांना वर्क-लाइफ बॅलन्स सांभाळता येणे शक्य झाले आहे.

आता दुसरी कथा पाहू. एकदा गावातील एका मुलाला दुसऱ्या गावाला जत्रा पाहायला जायचे असते. गावातून जत्रेला जाणारी एसटी दिवसातून एकमेव असल्याने त्याला ती कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकवायची नसते. सकाळी न्याहारी लवकर उरकून ती बस पकडण्यासाठी मुलगा आपल्या आईकडे सारखा ‘पटकन उरक’ असा तगादा लावत असतो. आधी नाश्ता दे व नंतर जत्रेत मजा करण्यासाठी ५० रुपयेपण दे अशी सगळी फर्माईश होत असल्याने आईची तारांबळ उडते व मुलाला चुलीवरची भाकर व चहा उतरवून देताना फडके घ्यायला विसरल्याने आईचे हात चांगलेच भाजतात. मुलाला क्षणभर अपराधी वाटते, पण बस चुकू नये म्हणून तो स्टॅण्डच्या दिशेने धूम ठोकतो. रात्री जत्रेवरून परतल्यावर त्याची आई त्याला जत्रेतील गमतीजमती विचारते. मुलगा सर्व काही कथन करत असताना पुन्हा पुन्हा आईच्या पोळलेल्या हातांकडे बघत असतो. ५० रुपयांचे काय केले असे जेव्हा आई मुलाला विचारते तेव्हा तो आईच्या हातावर अलगद एक पक्कड ठेवतो. आपला मुलगा स्वार्थी नाही हे पाहून आईच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळते.

कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील काही कंपन्या या कथेतील मुलासारख्याच वागतात. आजच्या युगात कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अनेक उच्च पदांवर किंवा महत्त्वाच्या पदांवर महिला कर्मचारी कार्यरत आहेत. पण मातृत्वामुळे अशा कर्तबगार महिलांना जॉब सोडावा लागतो. मूल सांभाळावं की करिअर या पेचामध्ये बरेचदा करिअरचा गळा घोटला जातो. अशा द्विधा मन:स्थितीमधील स्त्रियांना मदत करण्यासाठी काही कंपन्या आगळेवेगळे उपाय योजत आहेत. ज्या स्त्रियांनी लग्नाआधी किंवा मूल होण्याआधी कंपनीच्या उत्कर्षांसाठी अनेक त्रास सोसले त्यांना मातृत्वाच्या दिवसांमध्ये कम्फर्टेबल वाटावे म्हणून अनेक कंपन्यांनी लॅक्टेशन रूम्स बनविल्या आहेत. मुलांना कामावर घेऊन आल्यास स्तनपान देता यावे म्हणून अशी सोय केली आहे ती सोनी कंपनीने. या खोलीमध्ये आई तिचे दूध पम्प करून फ्रिझरमध्ये साठवूदेखील शकते. ज्यायोगे घरी गेल्यावर ती ते दूध मुलाला पाजू शकते.

फ्लिपकार्ट कंपनी आपल्या गरोदर स्टाफला प्रेग्नन्सीच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये टॅक्सीने ये-जा करण्यासाठी प्रतिदिन ६०० रुपयांचा अतिरिक्त भत्ता देते. तर टाटा ग्रुपमध्ये मॅटर्निटी लीव्हवर असतानाचा कालावधी प्रमोशन, पगारवाढ व पर्फॉर्मन्स अप्रेझलसाठी विचारात घेतला जात नाही. त्याऐवजी मागील दोन वर्षांमधील पर्फॉर्मन्स विचारात घेऊन रेटिंग, पगारवाढ ठरवली जाते. त्यामुळे मातृत्व स्वीकारलेल्या महिला कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर होतो. एक्सेंच्युअर कंपनी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात बालसंगोपन सुविधा उपलब्ध करून देते.

थोडक्यात काय तर एम्पथीच्या माध्यमातून आपण इतरांसाठी खूप काही करू शकतो. घरातील लोकांइतकाच आपण ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत वेळ घालवितो. त्यामुळे हे सहकारी आपली एक्स्टेंडेड फॅमिलीच असतात. तेव्हा उनके लिये तो कुछ बनता है ना!
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com