एक माणूस उपाहारगृहात जाऊन जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्याला काचेतून दिसते की एक गरीब बहीण-भाऊ  अधाशी नजरेने त्याच्या थाळीकडे बघत आहेत. तो उपाहारगृहाच्या मालकाला दोन पुरी-भाजी त्या मुलांसाठी पार्सल देण्यास सांगतो. आपले झाल्यावर तो  एक थाळी व दोन पुरीभाजीचे  बिल मागवतो. त्याच्या पुढय़ात बिल येते तेव्हा तो अवाक होतो. त्यावर लिहिले असते, ‘माणुसकीची किंमत करणारे मेन्यू कार्ड आमच्याकडे अजून तरी छापलेले नाही.’

एकदा एका खासगी कंपनीचा अधिकारी विमानाने प्रवास करत असतो. त्याच्या विमानात लष्करी प्रशिक्षणासाठी जाणारे काही जवानदेखील असतात. लो कॉस्ट एअरलाइन असल्याने विमानात नाश्ता व शीतपेये घेण्यासाठी पैसे देणे अनिवार्य असते. अधिकारी स्वत:साठी ऑर्डर देतो. त्याच वेळी त्याच्या कानावर एका लष्करी जवानाचे बोलणे पडते. तो म्हणतो, ‘‘आपला भत्ता असे महागडे जेवण घेण्यास पुरेसा नाही. आपण उतरलो की बराकीत जाताना वाटेवरील धाब्यावर खाऊ या.’’ हे बोलणे ऐकताच तो अधिकारी एअर होस्टेसला त्याच्या वतीने विमानातील सर्व जवानांना नाश्ता देण्याचे सांगतो. दहा नाश्त्याचे पैसे अधिकाऱ्याकडून घेताना ती त्याच्यासाठी सुका मेवा, काही ज्युसेस व महागडी चॉकलेट्स असलेली एक स्पेशल प्लेट घेऊन येते आणि सांगते की हे तुमच्यासाठी कॉम्प्लीमेंटरी आहे. अधिकारी एअर होस्टेसला पैसे देत असतो तेव्हा अजून एक-दोन सहप्रवाशांनी ते पाहिलेले असते. ते सहप्रवासी त्या अधिकाऱ्याला धन्यवाद देत, हात मिळविण्याच्या बहाण्याने त्याच्या हातात काही पैसे देतात. जणू तुमच्या या कृत्यामध्ये आमचादेखील खारीचा वाटा असू द्या. मिळालेले सर्व पैसे तो अधिकारी विमानातून उतरल्यावर त्या जवानांकडे सुपूर्द करतो व म्हणतो, ‘‘आमच्या सर्वाखातर तुम्ही प्राणांची बाजी लावून लढता, लढण्यासाठी शरीर सुदृढ असले पाहिजे म्हणून हे पैसे देत आहे. वाटेत चांगले खा प्या.’’

वरील दोन गोष्टींवरून लक्षात येईल की प्रत्येक सहृदयी माणसाच्या मनात समाजाप्रति योगदान देण्याची सुप्त इच्छा असते. कधी वंचित लोकांसाठी आपले हृदय द्रवते तर कधी आपल्यावर अनंत उपकार करणाऱ्या लोकांप्रति उतराई होण्यासाठी आपल्याला समाजसेवेची प्रेरणा मिळते. एका व्यक्तीने जर सुरुवात केली तर अनेक व्यक्ती अशा समाजोपयोगी कार्यात आपला खारीचा वाटा उचलण्यास पुढे येऊ  लागतात. त्याचप्रमाणे ‘कर भला तो हो भला’ या उक्तीनुसार समाजसेवा करणाऱ्या माणसांच्या वाटय़ालादेखील काहीतरी कौतुक किंवा फायदा येतोच (भले त्याने त्याची अपेक्षा केली नसेल तरी).

उद्योग जगातदेखील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत अशी सहृदयता दाखविली जाते. या सीएसआर इनिशिएटिव्हमागे काही उद्योग घराण्यांचा नि:स्वार्थीपणा असतो तर काहीना भविष्यातील आपल्या कंपनीच्या वाढीसाठी तो आवश्यक वाटत असतो.

सीएसआर हा आजकालच्या कॉर्पोरेट युगात परवलीचा शब्द झाला आहे. सरकारी नियमांनुसार नफ्याचा दोन टक्के भाग सीएसआरसाठी राखून ठेवणे अनिवार्य झाले आहे. पण हे कायदेशीर बंधन येण्यापूर्वीच अनेक देशी व विदेशी कंपन्या सामाजिक जाणिवेतून अनेक लोकोपयोगी कामे करत आहेत. गुगल कंपनी ‘गुगल ग्रीन’ उपक्रमांतर्गत अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर देत आहे. रिन्युएबल सोर्स (जसे की पवन ऊर्जा, सौर ऊर्जा) वापरून कंपनीने त्यांच्या डेटा सेंटरला लागणारी विजेची मागणी तब्बल ५०टक्क्य़ांनीे कमी केली आहे. यामुळे वाचणारा पैसा गुगलने समाजोपयोगी कामांसाठी वापरला; त्याचप्रमाणे विजेची बचत झाल्याने तीच वीज ज्यांना खरेच गरज आहे अशांसाठी उपलब्ध झाली.

टार्गेट कंपनीने त्यांच्या नावाप्रमाणेच स्वत:साठी एक टार्गेट ठेवले आहे. आपल्या नफ्याचा पाच टक्के भाग ते वंचित समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात.

झेरॉक्स कंपनीदेखील सीएसआरचा उपयोग तीन कारणांसाठी करून घेत आहे; सामाजिक बांधिलकी जपणे, आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविणे व कंपनीप्रती निष्ठा वृद्धिंगत करणे व समाजात आपल्या ब्रँडबद्दलचा आदर वाढविणे. ‘कम्युनिटी इन्व्हॉल्मेंट प्रोग्राम’अंतर्गत, कंपनी असे काही विषय सीएसआरसाठी निवडते, ज्या विषयांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना समाजसेवा करण्यात रस असतो. यामुळे कर्मचाऱ्यांनादेखील मानसिक समाधान मिळते व ते सच्च्या दिलाने समाजसेवेसाठी आपले तन मन अर्पून काम करतात.

टीसीसी कंपनीदेखील सीएसआरमध्ये गुंतवणूक करताना कोणते प्रोजेक्ट आपल्या स्टाफला करायला आवडतील व कोणते प्रोजेक्ट समाजाला जास्त उपयोगी पडतील यावर संशोधन करून पैसे खर्च करते. टीसीसीचे मेककार्टी यांच्या मते सामाजिक जाणीव, कंपनीची ‘कोअर व्हॅल्यू’ किंवा ‘कल्चर’ होते तेव्हा सीएसआरप्रती कंपनी कटिबद्ध आहे, हा विश्वास कर्मचारी व समाजामध्ये दृढ होतो.

कार तयार करणारी कंपनी म्हणजे प्रदूषणाला आमंत्रण देणारी कंपनी असा समज असतो. या विचारसरणीला धूसर करण्यासाठी बीएमडब्लू या कंपनीने सीएसआरचा आधार घेतला. यामुळे कंपनीला तीन मोठे फायदे झाले. एक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत नऊ टक्के वाढ झाली, याच कंपनीची कार घ्या असा सल्ला देणाऱ्या लोकांमध्ये १३ टक्क्य़ांनी वाढ झाली व  बीएमडब्लूने सामाजिक उपक्रमात भाग घेऊन प्रदूषणाला हातभार लावण्याच्या पातकातून सुटका करून घ्यावी या भूमिकेला आठ टक्क्य़ांहून अधिक पाठिंबा वंचित समाजाकडून व पर्यावरणवाद्यांकडून मिळाला.

‘मायक्रोसॉफ्ट युथ स्पार्क’ या योजनेअंतर्गत मायक्रोसॉफ्ट वंचित समाजातील तरुणाईसाठी अनेक उपक्रम राबवीत आहे. त्यांना उत्तम शिक्षण देणे, रोजगार उपलब्ध करून देणे, प्रसंगी त्यांना उद्योजक बनविण्यासाठी भांडवल पुरविणे अशा प्रकारची कामे ही कंपनी करत आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये सिटिझनशिप टीम व सिटिझनशिप लीड्स यांची नेमणूक केली गेल्यामुळे या सीएसआरची प्रगती योग्य दिशेने व योग्य गतीने होण्यास मदत होते.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com