हवामानबदलाच्या परिणामामुळे जर ‘मार्च’ महिना आता ‘मे’सारखा वागू लागला असेल, तर यापुढील काळात ऋतुचक्राचे काय होईल..? मार्च महिन्यातच महाराष्ट्राला तडाखा दिलेल्या उष्णतेच्या लाटांच्या पाश्र्वभूमीवर हवामानाची दिवसेंदिवस बदलत चाललेली तऱ्हा उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आलेल्या दोन बातम्यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला रायगड जिल्हातील भिरा गावात ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि त्या दिवशी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान असलेले गाव म्हणून भिरा चर्चेत आले. केवळ भिराच नव्हे, तर राज्यातील किनारी भाग सोडता जवळपास सगळीकडेच तापमानाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा ओलांडला.

दुसरी बातमी होती उष्माघाताच्या बळींची. उष्माघात कधी होईल हे सांगता येत नसले तरी त्याचा खरा काळ मानला जातो तो एप्रिल-मे. यंदा मार्चअखेरीसच सोलापूर, जळगाव आणि बीडमध्ये असे उष्माघातामुळे तीन मृत्यू झाले.

मार्च असा काही तापला की त्याने मे महिन्याची आठवण करून दिली. मार्चअखेरीला गुजरात आणि राजस्थानमध्ये बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट होती. या दोन राज्यांसह आसपासच्या महाराष्ट्राच्या भागात काही ठिकाणी चक्रवात (अँटिसायक्लोन) तयार झाली होती. ही अँटिसायक्लोन उष्णता जमिनीलगत धरून ठेवतात आणि त्या भागात तापमान वाढते. याच वेळी गुजरात-राजस्थानकडून महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहात होते. उत्तरेच्या हिमालयीन भागात बर्फवृष्टी किंवा पाऊस होईल अशी हवामानाची स्थिती तयार होण्याची चिन्हे नव्हती, त्यामुळे तिथून दक्षिणेकडे थंड वारे येत नव्हते. या सर्व वातावरणीय गोष्टी एकत्र आल्या आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट चांगलीच जाणवली. विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात त्याचा विशेष फटका बसला.

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या (आयएमडी) माहितीनुसार यंदाचा जानेवारी महिना गेल्या ११६ वर्षांमधील आठव्या क्रमांकाचा सर्वात उष्ण महिना होता. जानेवारीतच ही तऱ्हा असेल तर उन्हाळ्याचे काही खरे नाही, याचा अंदाज तेव्हाच येऊ लागला होता. गेले वर्ष (२०१६) तर भारतासाठी १९०१ पासूनचे सर्वात उष्ण वर्ष होते. राजस्थानमध्ये फालोडी गावात गतवर्षी नोंदले गेलेले ५१ अंश सेल्सिअस तापमान आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशात तब्बल ७०० जणांचा झालेला मृत्यू हे दोन्ही उच्चांक ठरले होते. आणि ही सगळी साखळी अंतिमत: जागतिक तापमानवाढीपर्यंत जाऊन थांबते का, या चर्चेला या उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणवर सुरुवात झाली.

अर्थात केवळ उन्हाळाच बदलतो आहे असे मात्र नक्कीच नाही. हवामानाच्या सर्वच घटकांमध्ये वर्षांनुवर्षे बदल झालेला दिसतो. त्याची संगती जोडून पाहताना आधी हवामानबदल कशावरून मोजतात हे बघायला हवे.

पृथ्वीचे वाढते सरासरी तापमान

पृथ्वीचे सरासरी तापमान (मीन टेंपरेचर) हे सातत्याने वाढते आहे. जागतिक हवामानबदलाचा हाकारा होऊ लागण्याच्या पूर्वी ते कधी वाढलेच नाही असे नाही. पृथ्वीचा अक्ष किंचित कलण्यामुळे तापमान वाढणे किंवा खूप कमी होणे या गोष्टी प्राचीन काळी घडल्या आहेतच. पृथ्वीवरून डायनोसॉर हे अजस्र देहाचे प्राणी नष्ट का झाले किंवा पृथ्वीवर हिमयुग का आले, या प्रश्नांपर्यंत मागे जाऊन पाहिल्यास ते लक्षात येते. पण या गोष्टींना हजारो वर्षे लागली हेही विसरून चालणार नाही. म्हणजे हवामानातील बदल ही पृथ्वीसाठी नवीन गोष्ट नसली तरी गेल्या चाळीस वर्षांत मात्र पृथ्वीचे सरासरी तापमान सतत वाढत चालले आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी सांगतात, ‘‘१९८० हा जागतिक हवामानबदलाचा प्रारंभ बिंदू मानता येईल. त्या वर्षी समुद्राचे (ट्रॉपिकल ओशनचे) तापमान वाढल्याचे प्रकर्षांने जाणवले. अर्थात त्या आधीपासूनच ते हळूहळू वाढत होते, पण जाणवण्याजोगा फरक तेव्हा दिसून आला. तापमानाच्या जवळपास शंभर वर्षांपेक्षा अधिक काळाच्या नोंदी उपलब्ध आहेत. त्यावरून या गोष्टी दाखवून देता येतात. मानवी हस्तक्षेप नसलेल्या हवाई बेटांसारख्या काही विशिष्ट हवामान निरीक्षण यंत्रणांनी घेतलेल्या नोंदीही तेच दाखवतात. जगाच्या सरासरी तापमानात वाढ झाल्यामुळे वेगवेगळ्या भागात दिसणारा परिणाम मात्र वेगवेगळा आहे.’’

हवामानबदलाचे दृश्य परिणाम

हवामानबदल ही संकल्पना आता नवीन नाही. मानवनिर्मित घटकांमुळे हवेतील हरितगृह वायू वाढतात, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवरून परावर्तित होणारी किरणे धरून ठेवतो आणि पृथ्वीचे तापमान वाढते, हे साधे तत्त्व आता लहान मूलही सांगू शकते. हवामानबदलाचे परिणाम काय याचा विचार करताना मात्र ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळेल आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, हेच सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे ही खूप सावकाश घडणारी गोष्ट आहे. तापमान आणि पावसावर होणारे हवामानबदलाचे परिणाम हे खरे तर तुलनेने लवकर दिसणारे आणि मोठा फटका बसेल असे असतात. आपल्यासारख्या कृषीप्रधान देशासाठी तर ते फार महत्त्वाचे आहेत, आणि ते आता दिसायला लागले आहेत.

उन्हाळ्यातील सर्वसाधारण तापमानाचेच उदाहरण घेऊ या. दिवसा तापमान खूप असले तरी रात्री तापमान कमी होणे अपेक्षित असते. म्हणजे दिवसाचे तापमान ३८-३९ अंश सेल्सिअस असेल, तर रात्री १८ ते १९ अंश तापमान असणे सामान्य आहे. काही हवामानशास्त्रज्ञांच्या मते आता उन्हाळ्यात किमान तापमानातही वाढ झालेली दिसते. रात्रीचे तापमानही २२-२३ अंशांपेक्षा खाली येत नाही आणि रात्री प्रचंड उकाडा राहतो.

याचे एक कारण अर्थातच हवेत ‘एअरोसोल’सारखे तरंगणारे कार्बनचे कण. हे कण उष्णता धरून ठेवतात. तापमानाचे चक्र (डायनल सायकल) बदलून किमान तापमानात सर्वसाधारणत: वाढ झाली हेही उपलब्ध माहितीच्या आधारे दाखवता येते, आणि हा बदल हवामानबदलामुळे घडला.

हवेत तरंगणाऱ्या कणांच्या ‘एअरोसोल’चा मान्सूनवरही परिणाम होतो. मान्सूनच्या हंगामात कमी दाबाचे पट्टे (लो प्रेशर सिस्टीम) तयार होतात, त्यांची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाचे पट्टे (डिप्रेशन) तयार होतात. कमी-जास्त पाऊस पडणे हे त्यावर अवलंबून असते. वर्षांनुवर्षे अशी ‘डिप्रेशन्स’ तयार होण्याची संख्या कमी होत आहे. हे सर्व दृश्य परिणाम हवामानबदलाशी जोडता येतात.

हवामानात चढउतार

‘आयएमडी’च्या नोंदींनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत मराठवाडा व विदर्भात पाऊस पडण्याचे दिवस अगदी कमी आहेत. गेल्या सहा-सात वर्षांत मात्र फेब्रुवारी-मार्चमध्ये पाऊस पडतो, गाराही पडतात. त्यामुळे शेतीचे खूप नुकसान होते.

डॉ. कुलकर्णी सांगतात, ‘‘विषुववृत्तीय प्रदेशात उष्ण हवा असते, तर ध्रुवीय प्रदेशात थंड हवा असते. ध्रुवीय प्रदेशातून दक्षिणेकडे आणि विषुववृत्ताकडून उत्तरेकडे वारे वाहत असतात. हे वारे एकमेकांना भेटतात तेव्हा तिथे वाऱ्यांच्या लहरी (वेव्ही पॅटर्न/ द्रोणीय स्थिती) तयार होतात. असा ‘वेव्ही पॅटर्न’ वाढू लागला आहे. होळीच्या वेळी साधारणत: हवामान उबदार असते. यंदाची होळी मात्र थंड होती आणि मार्चअखेर अचानक तापमान खूप वाढले. जमिनीलगत उष्णता धरून ठेवणारे चक्रवात (अँटिसायक्लोन) तयार होणे हे सर्वसाधारणत: एप्रिल आणि मेमध्ये घडते आणि तेव्हा उन्हाळा कडक असण्याचे ते एक कारण असते. आता ती स्थिती मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ापासूनच दिसली. वारे वाहण्याची तऱ्हा बदलल्यामुळे  तापमान आणि पावसावर परिणाम होतो आणि तो लगेच जाणवण्याजोगा असतो.’’

पावसाची तऱ्हा बदलली

आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे मान्सून आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो. आपल्याकडे मान्सूनच्या १८७० पासूनच्या जवळपास दीडशे वर्षांच्या नोंदी उपलब्ध आहेत. मान्सूनच्या हंगामात देशभरात एकूण ८४ सेंमी पाऊस पडतो. त्यात दहा टक्के मागे-पुढे होऊ शकते. म्हणजे ७५ ते ९५ सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. काही हवामानतज्ज्ञांच्या मते पडणाऱ्या पावसात बदल झालेला नाही. पण त्याची तऱ्हा (पॅटर्न) मात्र बदलला आहे. म्हणजे ठरलेला पाऊस कमी दिवसांत पडतो. कमी काळात अधिक तीव्रतेने पाऊस पडल्यामुळे पूर येणे, जमिनीची धूप होणे, जमिनीत पाणी न मुरता ते वाहून जाणे हे सारे घडते. याचाच अर्थ ज्याला हवामानशास्त्रातील ‘एक्स्ट्रीम इव्हेंट्स’ म्हणतात, ते वाढले आहेत. हा बदल सिद्ध झाला असून त्याबद्दल काही संशोधन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.

उष्णतेच्या लाटेची वारंवारिता

उष्णतेच्या लाटेची तीव्रता दर वर्षी वाढते आहे. गेल्या दहा वर्षांतील जवळपास आठ वर्षे मार्च ते जून हे चार महिने अतिशय उष्ण होते. उन्हाळी हंगामात एकूण तापमान सरासरीपेक्षा अधिक राहात असेल, तर उष्णतेच्या लाटेची तीव्रता किंवा ही लाट जितके दिवस राहते ते दिवस वाढणे हे त्याचे महत्त्वाचे कारण असते. या वर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार देशात बहुतांश ठिकाणी उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने अधिक राहणार आहे. काही ठिकाणी ते सरासरीच्या तुलनेत एक अंशापेक्षा अधिक राहील. अशा ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वाढणार.

पुणे ‘आायएमडी’च्या हवामान संशोधन व सेवा विभागाचे प्रमुख   डॉ. ए. के. सहाय सांगतात, ‘‘हरितगृह वायूंच्या परिणामामुळे मान्सून कमी होईल की वाढेल याबद्दल हवामानाच्या प्रारूपांचे निष्कर्ष वेगवेगळे असतात. येणाऱ्या दशकांमध्ये होणारी तापमानातील वाढ मात्र प्रत्येक प्रारूप दर्शवते. तापमान वाढण्याची तीव्रता कमी-जास्त असू शकेल, पण ते वाढणार यावर एकमत आहे. तापमान वाढत गेले तर उष्णतेच्या लाटेची वारंवारिता आणि या लाटेच्या दिवसांची संख्याही वाढेल.’’

भविष्यात काय घडू शकेल?

हवामानबदल आणि हिमकडे वितळून येऊ घातलेला जलप्रलय ही प्रतिमा थोडी बाजूला ठेवून हवामानाच्या इतर परिणामांचा विचार केला, तरी हवामानतज्ज्ञांच्या मते भविष्यात घडतील अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला तयार राहावे लागणार आहे. तापमान वाढल्यामुळे नवीन प्रकारची रोगराई उद्भवू शकेल. पिकांवर आणि धान्योत्पादनावर परिणाम होऊ शकेल. जलसाठय़ावरही परिणाम होईल, तसेच मातीतील पाण्याचे बाष्पीभवन वाढल्यामुळे पिकांना पाणी कमी पडू शकेल. पुढील १००-१५० वर्षे हवामानबदल होत राहिला तर पुढच्या पिढय़ांना त्याचा फटका निश्चित बसणार आहे. त्यामुळे केवळ बदल सावकाश होणारे आहेत म्हणून निर्धास्त राहून चालणार नाही.

पावसाचा ‘पॅटर्न’ बदलल्याचे तीव्र चटके शेतकरी सोसतो आहे. शेतीचे होणारे नुकसान आणि पुढे भाजीपाला आणि धान्योत्पादनावर होणारा परिणाम या रुपाने ते चटके मध्यमवर्गीयांच्या दारापर्यंत आले आहेत. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच भट्टीत भाजून काढल्याचा अनुभव देणाऱ्या झळांनी ते पुन्हा अधोरेखित केले इतकेच. पावसाळा बदलला, तसा उन्हाळाही बदलतोय याची जाणीव तर झाली, पण ही गोष्ट नुसती जाणीव करून घेऊन थांबण्यासारखी नाही. यापुढेही ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करण्यासाठी आपण जागतिक आणि स्थानिक स्तरावरही कृतीपासून दूर राहिलो, तर येत्या वर्षांत हे फटके वारंवार बसत राहणार. हवामानबदलाचा ‘ट्रेण्ड’ असाच वाढता राहिला, तर अंतिमत: पृथ्वीला आणि मानवजातीलाच धोका पोहोचू शकतो, असे हवामानतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यापुढच्या काळात हवामानबदल केवळ जागतिक तापमानवाढ परिषदेचे वार्ताकन वाचून सोडून देता येणार नाही. ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या व्यासपीठापासून अगदी आपल्या माजघरापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याची चर्चा सातत्याने होत राहणे गरजेचे होणार आहे.

तापमान वाढले, पाऊस घटला

‘आयएमडी’च्या शास्त्रज्ञांनी १९५१ ते २०१० या कालखंडात देशात राज्यस्तरावर हवामानबदल कसा दिसून आला याबद्दल एक संशोधन केले आहे. २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार अनेक राज्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात सहा दशकांमध्ये लक्षणीय वाढ झाली. तसेच बऱ्याच राज्यांमध्ये मान्सून हंगामात पडणारा कमी झालेला दिसला. ही चिंता करण्यासारखीच गोष्ट आहे, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

आणखी काही संशोधने

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी’नेही (आयआयटीएम) हवामानबदलाच्या परिणामांबद्दल संशोधन केले आहे. २०१० मध्ये जुलैत पाकिस्तानात पूर आला होता. त्या ठिकाणची परिस्थिती पाहता एवढा मोठा पूर अपेक्षितच नव्हता. याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणारे एक संशोधन आहे. प्रशांत महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर या प्रत्येकाची स्वत:ची काही वैशिष्टय़े असतात. त्यात बदल दिसून आला आणि वायव्य पाकिस्तानात अनपेक्षितपणे मोठा पाऊस पडला. आशिया खंडातील वेगवेगळ्या भागात पडणाऱ्या मान्सून पावसाचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे  एका  ठिकाणचा मान्सून अनपेक्षितरीत्या प्रभावी झाला, तर दुसरीकडे त्याचा परिणाम होतो. हे सगळे हवामानातील बदलांशी (लार्ज स्केल सक्र्युलेशन चेंजेस) जोडता येते, असे एका संशोधनात दाखवण्यात आले आहे.
संपदा सोवनी – response.lokprabha@expressindia.com