सध्या सगळीकडे डेंग्यूचा विळखा पडलेला आहे. राज्यभरातली रुग्णालयं डेंग्यूच्या रुग्णांनी खच्चून भरलेली आहेत. डेंग्यूच्या या कहरापुढे हवामानातल्या चढउताराला, नशिबाला बोल लावले जात आहेत. डेंग्यूच्या बेसुमार वाढीला आपल्या आजूबाजूस असलेली अस्वच्छता, अडगळीत टाकलेल्या अनावश्यक वस्तू हेच प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

ऐकताय ना,

विद्या बालनला डेंग्यू झालाय.. शाहीद कपूरला झालेल्या डेंग्यूला  कारणीभूत ठरलाय त्याच्याच स्वििमगपूलमध्ये जन्माला आलेला डास..

या बातमीमुळं अचानक डेंग्यूला सेलिब्रेटी स्टेट्स आलंय. यापूर्वीही डेंग्यूनं यश चोप्रा, रणवीर सिंग, कसाब यांच्यापर्यंत पोहचत आपला टीआरपी वाढवला होता.

आपली अडचण आहे ती हीच! आपण या हाय टीआरपीवाल्या बातम्या स्टार्टरसारख्या एन्जॉय करतो आणि सोडून देतो. त्यांच्या मुळाशी जातच नाही. मागील दोन वर्षांचे पेपर काढून जरी बघितले तरी जून ते सप्टेंबर या काळात दरवर्षी डेंग्यू असाच हेडलाइनला राहतो आणि नंतर पुढल्या पावसाळ्यापर्यंत गायब होतो. नेमेचि येतो मग पावसाळा आणि त्या पाठोपाठ डेंग्यूही नेमाने येतो. पण तो असा पुन्हा पुन्हा येऊ नये, याकरिता आपण त्याच्या मुळाशी जायला हवं. हेडलाइन पलीकडील वास्तव समजावून घ्यायला हवं आणि खरं म्हणजे या डेंग्यूला थोपविण्यातील तुमची-माझी जबाबदारीही समजावून घ्यायला हवी.

काय आहे परिस्थिती?

गेल्या वर्षी भारतात ९९ हजार ९१३ डेंग्यू रुग्ण आढळले होते आणि त्यातील २२० रुग्णांचा मृत्यू झाला होता. या वर्षी ११ सप्टेंबर २०१६ पर्यंत देशभरात ३६ हजार ११० रुग्ण आढळले आहेत, ७० जणांचा मृत्यू झाला आहे. प. बंगाल, ओरिसा, केरळ, कर्नाटक या राज्यांसह आपल्याकडेही डेंग्यू रुग्ण लक्षणीय स्वरूपात आढळून येत आहेत. देशाची राजधानी असलेलं दिल्ली डेंग्यूने तापलं आहे. डेंग्यूचा प्रश्न राजकीय रूप धारण करू लागला आहे.

05-mosquito-lp

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, आपल्या राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्ण संख्येत जवळपास दुप्पटीनं वाढ झालेली दिसते आहे. मागच्या वर्षी ऑगस्टअखेर राज्यात एक हजार ३७८ रुग्ण आढळले होते. या वर्षी याच कालावधीत रुग्णसंख्या दोन हजार ५७२ आहे. रुग्णसंख्येतील ही वाढ निश्चितच लक्षणीय आहे. यापकी एक हजार ६७२ म्हणजे पासष्ट टक्के रुग्ण हे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे या विभागांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शहरीकरण अधिक असलेल्या या भागाच्या तुलनेत या वेळी मराठवाडा आणि विदर्भात रुग्णसंख्या कमी दिसते आहे. अर्थात या साऱ्याच आकडय़ांकडे आपल्याला थोडे जपूनच पाहणे आवश्यक आहे. सर्वेक्षण व्यवस्थेच्या क्षमतेवर अधिक अचूक आकडेवारी मिळणे अवलंबून असते. याकरिताच या नऊ जूनला भारत सरकारने डेंग्यू नोटिफायेबल आजार म्हणून घोषित केला आहे. यामुळे खाजगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांना आपल्याकडील डेंग्यू रुग्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला कळविणे बंधनकारक झाले आहे. यामुळे डेंग्यूची अधिक अचूक आकडेवारी मिळणे भविष्यात शक्य झाले आहे. अर्थात याकरिता आवश्यक यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत मॅप बेस्ड अभ्यासातून जगभरातील सर्वाधिक डेंग्यूग्रस्त भागांचा शोध घेण्यात आला त्यात भारत सर्वाधिक डेंग्यूग्रस्त आढळला. दरवर्षी भारतात डेंग्यूचे सुमारे तीन कोटी रुग्ण आढळत असावेत, असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. या अभ्यासातून आपली सर्वेक्षण व्यवस्था अजून बळकट करण्याची आवश्यकताच अधोरेखित होते आहे.

डेंग्यू समजावून घेऊ

डेंग्यूचा प्रभावी प्रतिबंध करायचा असेल तर डेंग्यू आपल्यापकी प्रत्येकाने समजावून घेणे आवश्यक आहे. डेंग्यू हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. एडीस इजिप्ती आणि एडीस अल्बोपिक्टस या डासांच्या मादीमार्फत हा आजार पसरतो.

डेंग्यू विषाणूचे चार प्रमुख प्रकार आहेत. त्याला एक ते चार असे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यातही पुन्हा अनेक उपप्रकारही आहेत. एखाद्याला या वर्षी डेंग्यू झाला तर त्याला तो ज्या प्रकारच्या विषाणूंमुळे झाला आहे, त्या प्रकाराविरुद्धच प्रतिकारशक्ती मिळते. मात्र इतर तीन प्रकारांविरुद्ध मात्र म्हणावी तशी प्रतिकारशक्ती मिळत नाही. डेंग्यूचे रुग्ण दरवर्षी आढळण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

डेंग्यू ज्या डासांमुळे पसरतो त्याच डासांमुळे चिकनगुनिया हा आजारही पसरतो, मात्र चिकनगुनियाचा विषाणू हा एकाच प्रकारचा असल्याने एकदा तो झाला की व्यक्तीला दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती मिळते. त्यामुळे दरवर्षी चिकनगुनियाचा प्रभाव आढळत नाही. चिकनगुनियाची साथ साधारण दहा-बारा वर्षांनी येते, असा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी महाराष्ट्रात २००६ मध्ये चिकनगुनियाची मोठी साथ आली होती, त्यात लाखो लोकांना या आजाराने घेरले होते. या वर्षी पुन्हा चिकनगुनिया डोके वर काढतो आहे. या वर्षी पुणे आणि परिसरात चिकनगुनियाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. डेंग्यूबद्दल बोलताना त्याच्या या धाकटय़ा भावंडाबद्दलही माहिती करून घेणे आवश्यक आहे. हे दोघे एडीस डासाच्या पंखावर बसूनच येत असल्याने दोघांना रोखायचा मार्ग एकच आहे.

तीव्र ताप, सांधेदुखी, स्नायुदुखी, डोळ्यांमागे वेदना होणे, उलटय़ा होणे, पोटात दुखणे, रक्तस्राव ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. अर्थात बहुतेक रुग्णांना झालेला डेंग्यू हा सौम्य स्वरूपाचा, फ्लूसारखा आजार असतो. मात्र रक्तस्रावी डेंग्यू ही जिवावर बेतणारी बाब आहे. शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी झाल्याने रक्तस्रावाची संभावना वाढते आणि काही वेळा रुग्ण दगावतोही. डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असते, ही त्यातील सर्वात काळजी करावी अशी गोष्ट.! भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे वाढला असला तरी डेंग्यू समाजवादी आहे, तो साऱ्यांना समान लेखतो आणि म्हणून तो निमशहरी झोपडपट्टी भागात जसा आढळतो तसाच उच्चभ्रू वस्तीत देखील आढळतो.

डेंग्यूच्या या समतावादी वर्तनाचे कारण त्याच्या उत्पत्तीस्थानात दडले आहे. डेंग्यूचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठय़ात वाढणारा डास आहे. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठय़ात, कुंडय़ा, फुलदाण्या, कारंजी, कुलरचे ट्रे, पक्ष्यांना/प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. याशिवाय खराब टायर्स, नारळाच्या करवंटय़ा, इतस्तत: पडलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लास्टिक, झाडांचे खोलगट बुंधे, रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी एडीस जन्माला येतो. अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपटय़ा पडलेल्या टोपणात साचलेले पाणी जरी त्याला सात दिवसांकरिता मिळाले तरी त्यात एडीस बाळाचा जन्म होतो. एडीस डासाची अंडी पाण्याशिवाय एक वर्षभरही टिकू शकतात. डेंग्यूवर कोणतेही औषध आजमितीला उपलब्ध नाही. लस निर्माण करण्यात यश आले असले तरी ती आपल्याकडे उपलब्ध व्हायला, अजून काही अवधी लागेल. तिच्या परिणामकारकतेबाबत आजच काही भाष्य करता येणार नाही. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण..!!! एकात्मिक कीटक व्यवस्थापन असा एक किचकट शब्दप्रयोग यासाठी वापरला जातो. हे प्रभावी डास नियंत्रण करण्यासाठी आपल्या सर्वाच्या सहभागाची आत्यंतिक आवश्यकता आहे.

का वाढतोय डेंग्यू?

डेंग्यू इतक्या वेगानं वाढतोय, त्याचं कारण काय? मागच्या पन्नास वर्षांत तो तीस पट वाढला आहे. १९९६ ला दिल्लीत, २००८ ला रिओ दि जनेरो आणि २०११ मध्ये लाहोर या शहरांमध्ये एका वर्षांत तीनशेहून अधिक मृत्यू डेंग्यूमुळे झाले होते. जनमानसात नुसता हाहाकार माजला होता. डेंग्यूच्या या वाढीकरिता अनेक कारणं आहेत. ही सारी कारणं आरोग्यबाह्य़ आहेत. त्यामुळे त्याची उत्तरंदेखील आपल्याला सर्वसमावेशक धोरणात्मक नियोजनाने शोधावी लागतील, ती केवळ आरोग्य व्यवस्थेत सापडणार नाहीत.

अत्यंत वेगाने होत असलेलं नियोजनशून्य शहरीकरण हे याचं एक प्रमुख कारण. वाढती लोकसंख्या, प्रचंड प्रमाणात होत असलेलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर, वाढतं आंतरराष्ट्रीय दळणवळण, अपुऱ्या नागरी सुविधा, नॉन बायोडिग्रेडेबल वस्तूंचा (बाटल्या, डिस्पोजेबल कप, प्लास्टिक वस्तू, टायर्स इ.) यांचा मोठय़ा प्रमाणावरील वापर या व अशा अनेक कारणांनी डेंग्यूचं प्रमाण वाढण्यात हातभार लावला आहे.

तापमान वाढ व वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे या आजाराला हातभार लावला आहे. साधारणपणे २५ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान आणि ७०-८० आद्र्रता ही डेंग्यू डासाच्या वाढीकरिता आवश्यक असते. या प्रकारच्या वातावरणात अंडी ते प्रौढ डास हा प्रवास सात ते आठ दिवसांत पूर्ण होतो. तापमान कमी असल्यास अंडी उबण्याचा हा कालावधी वाढतो. जगातल्या सव्वाशेहून अधिक देशांना हैराण करणाऱ्या या डासाचं आयुर्मान असतं अवघं चार आठवडय़ांचं! मात्र हवामान बदलामुळे वाढत्या तापमानात डासाचं जीवनचक्र अधिक वेगात पूर्ण होतं, त्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढते, डासाच्या शरीरातील विषाणूंची वाढही अधिक वेगात होते, डासांचं चावण्याचं प्रमाणही वाढतं. तापमानवाढीमुळे पूर्वी ज्या भागात एडीस आढळत नव्हता त्या भागातही या डासाला थारा मिळतो.

पावसामुळे डेंग्यूच्या प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते. खूप जोराचा पाऊस झाला तर डासांची उत्पत्तीस्थाने वाहून जातात. मात्र रिमझिम पावसाने घराभोवती एडीस डासाच्या उत्पत्तीसाठी योग्य स्थाने निर्माण होतात. दुष्काळी परिस्थितीत लोकांची पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते, हेही डासवाढीला कारणीभूत ठरते.

कशी करायची डेंग्यूवर मात?

डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना राबवतो. राष्ट्रीय पातळीवर कीटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यातही करण्यात येते. ताप रुग्ण सर्वेक्षण, एकात्मिक कीटक व्यवस्थापन, लोकसहभाग हे या उपाययोजनेचे प्रमुख भाग आहेत.

डेंग्यू आणि इतर सर्वच कीटकजन्य आजार नियंत्रणासंदर्भात महाराष्ट्रासमोरील प्रश्न नेमके काय आहेत, याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण डेंग्यूवर मात करायची असेल तर वैयक्तिक पातळीबरोबरच आपल्याला धोरणात्मक पातळीवरही काही प्रयत्न करावे लागतील.

वैयक्तिक जबाबदारी

प्रभावी डास नियंत्रण करण्यासाठी आपल्या सर्वाच्या सहभागाची आत्यंतिक आवश्यकता आहे. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणं, आपल्या घरात किंवा अवतीभवती नळगळती असू नये, घरातील फुलदाण्यांतील पाणी दिवसाआड बदलणं किंवा कुंडय़ात डास अळीनाशक ग्रॅन्युल्स टाकणं, बििल्डगवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेल्या असणं, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणं, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणं, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणं, अवतीभोवती/ घराच्या छतावर प्लास्टिकच्या वस्तू, इतर खोलगट वस्तू असतील त्या नष्ट करणं अथवा नष्ट करणं शक्य नसेल तर त्यात पाणी साठणार नाही अशा पद्धतीने ठेवणं, खराब टायर्समध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणं या व अशासारख्या गोष्टी आपण साऱ्यांनी करणं, नियमितपणे करणं आवश्यक आहे. आपल्या घरात, घराभोवती एडीसचं बारसं घातलं जाणार नाही याची काळजी आपण डोळ्यात तेल घालून घेतली पाहिजे. कारण एडीसचं बारसं म्हणजे आपलं मरण हे विसरता कामा नये. विशेषत: सुट्टीवर जाताना कमोड झाकून ठेवणं, पाण्याची भांडी मोकळी करून पालथी घालून ठेवणं, नळ ठिबकून अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणंही आवश्यक आहे.

धोरणात्मक बदलांची गरज

डेंग्यू हा मुख्यत्वे शहरी भागात आढळतो आहे. आज महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेलं महत्त्वाचं राज्य आहे. आपल्याकडे २६ महानगरपालिका आहेत तर अडीचशेहून अधिक नगरपालिका, नगर परिषदा आहेत. महानगरपालिका या नगरविकास विभागाकडे येतात तर नगरपालिका नगर प्रशासनाचा भाग आहेत. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची पायाभूत यंत्रणा ही मुख्यत्वे ग्रामीण भागात आहे. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रं, ग्रामीण रुग्णालयं ही यंत्रणा काही अपवाद वगळता उत्तम प्रकारे विकसित झाली आहे. मात्र शहरी भागातील आरोग्य यंत्रणा ही त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरी विभागात पायाभूत आरोग्य यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आत्ताशी कुठे त्याला सुरुवात झाली आहे. अर्थात केंद्र सरकारच्या या मदतीवर सर्वस्वी अवलंबून राहणं योग्य ठरणार नाही. घटनात्मकदृष्टय़ा आरोग्य हा राज्याचा विषय असल्याने या बाबतीत राज्याने पुढाकार घेणं आवश्यक आहे. शहरी भागातील आरोग्य यंत्रणा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विकसित होणं आवश्यक आहे. याकरिता सार्वजनिक आरोग्य, नगर विकास आणि नगर प्रशासन या विभागांना एकत्रित येऊन समन्वयाने काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. आज जुन्या मनपा वगळता इतर मनपा क्षेत्रात सार्वजनिक आरोग्याची यंत्रणा अभावानेच आढळते. नगरपालिका आणि नगर परिषदांमधील परिस्थिती काळजी करावी, अशी आहे. या शहरी भागात पायाभूत सार्वजनिक आरोग्याचं जाळं विस्तारणं हे केवळ डेंग्यूकरिताच नव्हे तर सार्वजनिक आरोग्याच्या अनेक प्रश्नांकरिता आवश्यक आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मदतीने हे आपण अधिक वेगाने करू शकतो.

इंडोनेशिया मॉडेल

डेंग्यू आणि इतर सर्व कीटकजन्य आजारांसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. डेंग्यूचा डास हा घरातील आणि घराभोवतीच्या साठलेल्या पाण्यात वाढतो, हे लक्षात घेतलं तर लोकसहभागाचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. शहरी भागात सिव्हिक बाय लॉज आणि आरोग्य शिक्षण केवळ एवढंच करून लोकसहभाग साधणं शक्य होत नाही. या बाबतीत इंडोनेशियाच्या सव्वादोन लाख लोकवस्तीच्या पुर्वोकेरटो शहरात राबवलेलं मॉडेल आपल्याला उपयोगी ठरेल. या शहरात आरोग्य विभागाने दर दहा घरांचा एक समूह (दसविस्मा)केला. प्रत्येक घरातील जबाबदार व्यक्तीला डेंग्यूचा डास, त्याच्या अळ्या कशा ओळखायच्या, कशा पाहायच्या याचं प्रशिक्षण दिलं. दर आठवडय़ाला एका घराने इतर नऊ घरांचं सर्वेक्षण करायचं आणि किती घरांत डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतात, याची नोंद करायची. विहित फॉर्म भरून आरोग्य विभागाला सादर करायचा. यामध्ये एका घराला दहा आठवडय़ांतून केवळ एकदा सर्वेक्षण करावं लागतं. पण या अभिनव योजनेचा खूप चांगला फायदा झाला. योजनेच्या सुरुवातीला सुमारे २० टक्के घरात एडीस डासाच्या अळ्या सापडत, काही दिवसांतच ते प्रमाण अवघ्या दोन टक्क्यांवर आलं. डेंग्यू कमी झाला, हे सांगायला नकोच. आपल्या शेजारी श्रीलंकेने स्वत:ला मलेरियामुक्त केलं आहे. सव्वादोन कोटींचा हा चिमुकला देश, मधल्या काळात अंतर्गत युद्धाने ग्रासलेला पण प्रभावी सर्वेक्षण, प्रत्येक रुग्णाचा दीर्घकालीन पाठपुरावा, समूळ उपचाराची खातरजमा, फवारणीकरिता योग्य कीटकनाशकाची निवड आणि लोकसहभाग यामुळे हे शक्य झालं. आपल्या शेजाऱ्याकडून आपणही काही शिकायला हवं, प्रभावी सर्वेक्षण, वैयक्तिक जबाबदारीचं भान, धोरणात्मक बदल, सक्षम कीटकशास्त्र शाखा, लोकसहभाग यातून आपणही डेंग्यूचे रोजच्या हेडलाइनमधील स्थान कमी करू शकतो. गरज आहे ती आपल्या सामूहिक इच्छाशक्तीची !!!

कीटकशास्त्राचा (इन्टोमॉलॉजी) विसर

डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे सारेच कीटकजन्य आजार असल्याने या आजाराच्या नियंत्रणात कीटकशास्त्रज्ञांची (मेडिकल इन्टोमॉलॉजिस्ट) भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. डासांच्या जातींचा अभ्यास करणं, त्यांचं वर्तन अभ्यासणं, कीटकनाशकांची परिणामकारकता तपासणं, त्यानुसार योग्य कीटकनाशकाची निवड करणं, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून संभाव्य उद्रेकाची कल्पना देणं, अशी महत्त्वाची कामं या विषयातील तज्ज्ञ करत असतात. मात्र आज कीटकशास्त्र ही पूर्ण शाखाच दुर्लक्षित झाली आहे, असं दिसतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या मलेरियाविषयक सल्लागार समितीने २०१३ मध्ये प्रत्येक देशाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञांचा योग्य प्रमाणात समावेश करून या विषयाला पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थान देण्याबाबत नमूद केलं आहे. मात्र या बाबतीत सद्य:स्थिती काय आहे, हे विशद करण्यासाठी पॉन्डेचरी येथील कीटक नियंत्रण संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. पी. के. राजगोपालन यांचं हे निरीक्षण पुरेसं ठरावं. ‘भारतात सध्या अनुभवी आणि तज्ज्ञ कीटकशास्त्रज्ञांची संख्या अगदी थोडी आहे. आणि जे आहेत, त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा नीट वापर केला जात नाही. काही संस्थांनी सुरू केलेले मेडिकल ऑर पब्लिक हेल्थ इन्टोमॉलॉजी कोर्सेस वगळता आपल्या देशाकडे डासांसारख्या कीटकांच्यासंदर्भात तळच्या स्तरापासून विद्यापीठ पातळीपर्यंत कोणतेही नियोजन नाही.’     याचा परिणाम असा झाला आहे की अनेक रुग्णालयांतच डासांची पदास केंद्रं निर्माण झाली आहेत. खुद्द डॉक्टरच डेंग्यू आणि इतर कीटकजन्य आजारांना बळी पडत आहेत. डेंग्यूच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपल्याला कीटकशास्त्र शाखा पुनरुज्जिवीत करणं आवश्यक आहे. केवळ धूरफवारणी ही धूळफेक आहे. डेंग्यू नियंत्रण याने साधणार नाही.
डॉ. प्रदीप आवटे – response.lokprabha@expressindia.com