गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्राने मलेरियाचा उद्रेक पाहिला. त्यानंतरची स्वाइन फ्लूची साथ अनुभवली आणि गेल्या दोन वर्षांपासून आपण डेंग्यूंचा विळखा पाहतोय. महाराष्ट्राला पडलेल्या डेंग्यूच्या या विळख्याचा ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा.

संकलन  : अनिकेत साठे, सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे, महेंद्र कुलकर्णी, एजाजहुसेन मुजावर, दिगंबर शिंदे, प्राजक्ता कासले, संपदा सोवनी, मनोज पत्की, मीनल गांगुर्डे, श्रीकांत सावंत, महेश बोकडे.(साभार – लोकसत्ता रविवार विशेष)

imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
ajit pawar
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अयोध्या, जम्मूत उभारणार ‘महाराष्ट्र भवन’
SANJAY RAUT
“कमळाच्या पदराखाली लपा अन्…”, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “फुटलेल्या दोन गटांना…”

मुंबई : डेंग्यूचे वाढते प्रमाण

डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून दिसत नसले, तरी खासगी सेवा देणारे डॉक्टर व नर्सिग होममध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढताना दिसते. गेल्या वर्षी या सुमारास पावसाने आवरते घेतल्याने सप्टेंबरमध्येच डेंग्यूचे रुग्ण प्रचंड वाढले होते. यावेळी अजूनही पाऊस लांबल्याने सप्टेंबरच्या अखेरपासून डेंग्यूची साथ वाढण्याची भीती आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ११ सप्टेंबपर्यंत १२२ डेंग्यू, १५१३ संशयित डेंग्यू, ३१३ मलेरिया, ८ लेप्टो, २४९ गेस्ट्रो आणि ६३ कावीळ रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षी सप्टेंबपर्यंत २४८ डेंग्यू, ३१५ मलेरिया, २६ लेप्टो, ७६९ गेस्ट्रो, ८६ कावीळ रूग्ण आढळले होते.

मात्र प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकाराअंतर्गत पालिकेचे दवाखाने, रुग्णालये तसेच राज्य सरकारच्या पाच रुग्णालयांमधील मिळवलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ यादरम्यान डेंग्यूचे १०,२९९ रुग्ण तर २०१५-१६ मध्ये डेंग्यूचे १५,२४४ रुग्ण होते.

पालिका आणि प्रजा फाऊंडेशनच्या आकडेवारीत नेहमीच मोठी तफावत आढळत असून प्रजाची माहिती चुकीची असल्याचे पालिकेला सप्रमाण दाखवता आलेले नाही. पालिका व सरकारी रुग्णालयात फक्त ३० टक्के लोक जात असल्याचे लक्षात घेतल्यास प्रत्यक्षात डेंग्यू रुग्णांची आकडेवारी तीन ते चार पट अधिक असण्याची शक्यता आहे.

भारतात खासगी वैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असून खासगी रुग्णालये व दवाखान्यांमधून रुग्णांची माहिती गोळा केल्यावरच आजारांचे खरे स्वरुप लक्षात येऊन त्यानुसार उपाययोजना करता येतील, असे जागतिक आरोग्य संस्थेचे भारतातील प्रतिनिधी हेंक बेकेडम यांचे म्हणणे आहे.

संपूर्ण मुंबईतच डेंग्यूचे डास आढळत असले तरी भायखळा, शिवडी, कांदिवली, मालाड, खार या भागांमध्ये अधिक प्रमाणात डासांच्या अळ्या आढळल्या आहेत.

ठाणे : आरोग्ययंत्रणांची दमछाक

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून या आजाराची साथ झपाटय़ाने फोफावत आहे. झोपडपट्टी, बैठय़ा चाळी आणि दाट वस्तीच्या भागाबरोबरच शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्येही डेंग्यूचे संशयित सापडू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणांची मोठी दमछाक उडाली आहे. ठाणे शहरात डेंग्यू रुग्णांची माहिती पद्धतशीरपणे लपवली जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत.

मुंब्रा परिसरात गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूमुळे तीन जणांचे बळी गेले असून अनेक संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर आणि भिवंडी परिसरांतही रुग्णांची संख्या मोठी आहे. जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी उपचारांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालये किंवा मुंबईतील रुग्णालयांकडे धाव घेऊ लागले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांहून अधिक आजारांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, कावीळ, टॉयफाइड आणि तापाचे प्रमाण अधिक आहे, अशी कबुली जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे, तर कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये डासांची पैदास रोखण्यासाठी आवश्यक असताना या फवारण्याच झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फवारणीसाठी पालिकेकडे देण्यात आलेली औषधे गेल्या तीन महिन्यांपासून पडून असल्यामुळे तेथील डासांची उत्पत्ती सुरूच होती. ठाण्यातील घोडबंदरसारख्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये व्यापक उपाययोजना अवलंबल्या गेल्या नसल्याने या भागातही रहिवाशांना डेंग्यूचा धोका निर्माण झाला. मध्यंतरी मुंब््रयातील काही ठरावीक वसाहतींमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने महापालिकेने या भागात विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. मुंब्रा परिसरात या वेळी ३७८ तापाचे रुग्ण आढळून आले, तर ८ हजार ८४८ घरांमधील पाण्यांच्या टाक्यांमधील तपासणीदरम्यान ७५५ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या 07-chart-lpआढळून आल्या. कल्याण-डोंबिवलीतील काही सोसायटय़ांमधील एकाच वेळी २० ते २५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये या शहरांमध्ये ५६५ डेंग्यूचे संशयित आढळले आहेत.

पुणे : तापाचा कहर

डेंग्यूच्या तापाने पुण्याला गेल्या वर्षीही त्रास दिला होता. यंदाही जानेवारीपासून तब्बल १४५२ डेंग्यूसदृश रुग्णांची शहरात नोंद झाली आहे, तर त्यातील २४१ रुग्णांचे ‘निश्चित डेंग्यू रुग्ण’ म्हणून निदान करण्यात आले आहे. डेंग्यूच्या एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूसदृश ताप जूनपासून एकदम वाढला आणि ऑगस्टमध्ये त्याचे सर्वाधिक म्हणजे ५३१ संशयित रुग्ण सापडले. आताही सप्टेंबरच्या निम्म्यावरच ३३८ डेंग्यूसदृश रुग्ण सापडले आहेत.

या वर्षी जानेवारीतच चिकुनगुनियाचे ६८ रुग्ण शहरात सापडले. नंतर जुलैपर्यंत चिकुनगुनियाची रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात राहिली, परंतु ऑगस्टमध्ये पुन्हा ११९ चिकुनगुनिया रुग्णांची नोंद झाली असून सप्टेंबरमध्येही शुक्रवापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ७० आहे. पालिकेने डासांच्या पैदाशीवर यंदाही दंडाची मात्रा अवलंबली असून गेल्या एका महिन्यातील सर्वेक्षणात साडेसहा हजारांहून अधिक ठिकाणी डासांची पैदास सापडली आहे.

चिकुनगुनियातील असह्य़ सांधेदुखी आणि डेंग्यूतील हाडे दुखवणारी अंगदुखी ही लक्षणे तापाच्या बहुसंख्य रुग्णांत दिसत आहेत. तरीही या दोन्ही चाचण्या ‘निगेटिव्ह’ येत असल्याचा अनुभवही अनेक रुग्णांचा आहे. हा कुठला दुसराच ताप तर नाही ना, अशी शंका काही डॉक्टरांकडून व्यक्त केली गेल्यामुळे पालिकेने पाच रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीस पाठवले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

मराठवाडा : डेंग्यू पाय पसरतोय

मराठवाडय़ातील बहुतांश जिल्हय़ांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ, शहरांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. औरंगाबाद शहरात दोन महिन्यात डेंग्यूचे १३३ संशयित रुग्ण आढळले असून त्यातील ३३ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आहेत. शहरात लहान मुले आजारी पडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. घाटी रुग्णालयात एका खाटेवर दोन-दोन मुलांना ठेवावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात डेंग्यूचा फारसा फैलाव नसल्याचा दावा आरोग्य विभाग करत असले तरी शहरांमध्ये भरती होणारे रुग्ण ग्रामीण भागातीलच असल्याचे आढळते. डेंग्यू रुग्णांना लागणाऱ्या प्लेटलेट शहरांतच उपलब्ध होत असल्याने शहरातील रुग्णालयांत खाटांची कमतरता भासत आहे. याचाच अर्थ ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था एका अर्थाने कोमात आहे असे म्हणावे लागेल. मराठवाडय़ातील एकाही महापालिकेची स्थिती चांगली नसल्याने स्वच्छतेच्या बाबतीत ओरड कायमचीच आहे.

विदर्भ : संसर्गजन्य आजारांचा विळखा!

नागपूर महापालिका क्षेत्र वगळता विदर्भात जानेवारीपासून गेल्या आठ महिन्यात डेंग्यूचे ६३ व हिवतापाचे ७,९९० रुग्ण आढळले आहेत. पूर्व विदर्भातील महापालिका क्षेत्र वगळता तापाच्या २३ लाख रुग्णांची नोंद झाली असून नागपूरतील दोन-तीन घरामागे एक तापाचा रुग्ण आहे.

विदर्भात गेल्या वर्षी हिवताप व डेंग्यूचे २४, तर यंदा ७ मृत्यू झाले. यंदा १ जानेवारी ते ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भातील नागपुरात सर्वाधिक डेंग्यूग्रस्त आढळले.  हिवतापाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद गडचिरोली जिल्ह्य़ात (६ हजार १२८) झाली. नागपूर महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे १६, ग्रामीणचे ७, तर हिवतापाचे शहरात १६, तर ग्रामीण भागात ७९ रुग्ण नोंदवले गेले. आरोग्य विभागाला या काळात भंडारा, गोंदिया, चंद्रपूरसह त्या महापालिका क्षेत्रात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळलेला नसून, हिवतापाचे भंडारा ६१, चंद्रपूर महापालिका क्षेत्र ३, नागपूर महापालिका १६ आणि वर्धा २१ रुग्ण नोंदवले आहेत. खासगी रुग्णालयांनी अद्याप रुग्ण नोंदणीला प्रतिसादच दिलेला नाही.

नाशिक : खरा ताप डेंग्यूचा!

नाशिक विभागात चिकुनगुनियापेक्षा डेंग्यूने अधिक थैमान घातले असून रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आता विशेष कृती कार्यक्रमाद्वारे डासांचे उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार. आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपाय योजनांच्या अंमलबजावणीवर मर्यादा येतात.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये हे आजार अधिक बळावत आहेत. या क्षेत्रात स्वच्छता, धूर फवारणी आणि डास अळी-अंडी नष्ट करणे ही कामे नियमितपणे होत नसल्याने हे संकट ओढावले आहे. हिवतापाने गतवर्षी दोन जणांचा मृत्यू झाला होता. या काळात हिवतापाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून हा आजार नियंत्रणात असल्याचे आरोग्य सेवा (हिवताप) विभागाचे म्हणणे आहे. चिकुनगुनियामुळे गतवर्षी दोन आणि या वर्षी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ांत चिकुनगुनियाचा फारसा प्रादुर्भाव नाही. सर्वसामान्यांना खरा ताप डेंग्यूचा आहे. या आजाराने नाशिक शहरात तीन, ग्रामीण भागात पाच तर नगर जिल्ह्य़ात एक अशा एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. नाशिकमध्ये २४, नगर जिल्ह्य़ात १५, नंदुरबारमध्ये पाच तर धुळे जिल्ह्य़ात एक अशी एकूण ४५ गावे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत.

नाशिक विभागात जानेवारी ते ऑगस्ट २०१६ दरम्यान संशयित २६१४ डेंग्यू रक्त नमुन्यांपैकी ८३२ पॉझिटिव्ह आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.  (नाशिक ६३०, धुळे ८१, नंदुरबार ३, जळगाव ८ आणि अहमदनगर १३०)

अहमदनगर : तोकडय़ा उपाययोजना

गेल्या दोन महिन्यांपासून नगर जिल्हा साथीच्या आजारांनी बेजार झाला असून या काळात १५ पेक्षा अधिक रूग्ण डेंग्यूने दगावले आहेत. यात मुख्यत: बालकांचे प्रमाण अधिक आहे. नगर शहरात चार, कोपरगाव तालुक्यात सहा, श्रीरामपूर तालुक्यात तीन आणि शिर्डीत (राहाता तालुका) दोन रूग्ण डेंग्यूने दगावले आहेत. याला सरकारी यंत्रणेने मात्र दुजोरा दिलेला नाही.

डेंग्यूची नागरिकांनी धास्ती घेतली असून सरकारीच नव्हे, तर खासगी रूग्णालयेही या रूग्णांनी खचाखच भरली आहेत. जिल्ह्य़ात गेला दीड महिना पावसाने ताण दिला, शिवाय या काळात सतत ढगाळ हवामान होते. गेली तीन- चार वर्षे दुष्काळी स्थितीमुळे पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची साठवणूक करून ठेवण्याची मानसिकता मुख्यत: ग्रामीण भागात वाढली आहे. साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे हे आजार वेगाने फैलावल्याचे चित्र आहे.

आजारांच्या तुलनेत उपाययोजना अत्यंत तोकडय़ा असून स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी यंत्रणांच्या पातळीवरही कमालीची उदासीनता आहे. औषध फवारणी, धूर फवारणी होत नसल्याच्याही तक्रारी आहेत. साथींच्या आजारांसाठी मुख्यत: प्रतिबंधक उपायांबाबत प्रबोधनाची गरज असून खेडोपाडी कोणतीच यंत्रणा पोहोचलेली दिसत नाही.

पश्चिम महाराष्ट्र : डेंग्यूने त्रस्त

सोलापूर शहरात डेंग्यूचे संशयित रूग्ण ३९१ असून त्यापकी १०३ रूग्णांना डेंग्युची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्य़ात मात्र डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात एकूण ३२५ संशयित रूग्ण आहेत, तर त्यापकी ६७ रूग्णांना प्रत्यक्ष डेंग्यूचे निदान झाले आहे. माळशिरस व पंढरपूर येथे रूग्णांची संख्या विशेषत्वाने आढळून येते.

सांगली जिल्ह्य़ात १०७ डेंग्यूरुग्ण असून त्यापकी ४४ रुग्ण सांगली शहरात आढळले आहेत. विस्तारित भागात गटारे नसल्याने पाणी साचून डासांची वाढ होताना दिसत आहे. औषध फवारणीतही सातत्य नाही. साताऱ्यात वाई व सातारा तालुक्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव असून १ ऑगस्टपासून २९ निश्चित डेंग्यूरुग्ण सापडले आहेत. कोल्हापूरमध्ये कसबा बावडा येथील एका रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.

ऑगस्टपूर्वीच प्रयत्न गरजेचे

राज्यात ऑगस्टमध्ये ७९४ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे व त्यातील ६२० रुग्ण हे शहरी भागांतील आहेत. इतर वेळीही डेंग्यूचे ३५ टक्के रुग्ण ग्रामीण तर ६५ टक्के रुग्ण शहरी भागांत आढळतात. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई या चार शहरांत डासांचे प्रमाण व त्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे व त्यावर तेथील महानगरपालिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. डेंग्यूच्या अळी शोधण्यासाठी तसेच रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यस्तरावरून वारंवार सूचना दिल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी पालिकांच्या पातळीवरच होते. गेल्या काही वर्षांतील चित्र पाहता ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या साथीला सुरुवात होते व ऑक्टोबरमध्ये तिचा उद्रेक होतो, त्यानंतर ही साथ ओसरायला लागते. त्यामुळे डेंग्यूची साथ कमी करण्यासाठी ऑगस्टपूर्वीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयात रॅपिड टेस्टने नोंदवलेल्या डेंग्यूच्या रुग्णांना केवळ संशयित मानले जाते, मात्र त्यांची पुढील चाचणी करून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये त्यांचाही समावेश करता येईल.
– डॉ. कांचन जगताप, आरोग्य उपसंचालक.
response.lokprabha@expressindia.com